लक्षणे - २६ ते ३०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२६
वोकीतां वोकीतां मन कंटाळलें । राखेनें झांकीलें सावकास ॥१॥
सावकास तया कोण अभिलाषी । कोणाला असोसी कासयाची ॥२॥
कासयाची आतां वासना धरावी । गोडी विवरावी विषयांची ॥३॥
विषयांची गोडी कंटाळलें मन । नागवले जन असोसीचे ॥४॥
असोसीचे जन ते जन्म घेईल । जीवचे देईल विषयांसीं ॥५॥
विषयांसी वीट मनापासूनीयां । निर्वासना तया जन्म नाहिं ॥६॥
जन्म नाहिं ऐसें केलें देवरायें । वासना उपायें सोडविली ॥७।
सोडविली देव धन्य दयानिधी । तुटली उपाधी सर्वकांहिं ॥८॥
सर्व कांहिं नाहिं हेंची हें प्रमाण । दास म्हणे खूण देव जाणे ॥९॥
देव जाणे सर्व राहिला विकार । ब्रह्म निर्विकार दास म्हणे ॥१०॥

२७
ब्रीद साच केलें भक्तां उद्धरीलें । प्रचीतीस आलें मनाचीये ॥१॥
मनाची प्रचीती जाली निर्वासना । लेशहि असेना विषयांचा ॥२॥
विषयांचा लेश संसारदायक । जानकीनायक चुकवितो ॥३॥
चुकवितो जन्ममृत्यु सेवकाचा । विचार हा काचा कदा नव्हे ॥४॥
कदा नव्हे कांहिं वाक्य अप्रमाण । धरावे चरण राघवाचे ॥५॥
राघवाचे दास सर्वस्वें उदास । तोडि आशापाश देवराणा ॥६॥
देवराणा भाग्यें जालीयां कैपक्षी । नानापरी रक्षी सेवकांसी ॥७॥
सेवकांसी कांहिं नलगे साधन । करितो पावन ब्रीदासाठीं ॥८॥
ब्रीदासाठीं भक्त तारिले अपार । आतां वारंवार किती सांगों ॥९॥
किती सांगों देव पतितपावन । करावें भजन दास म्हणे ॥१०॥

२८
स्वप्नीच्या सुखें सुखावला प्रशरी । थोर जाली हाणी जागृतीसी ॥१॥
जागृतीसी नाहिं स्वप्नीचे सुख । तेणें जालें दुःख बहुसाल ॥२॥
बहुसाल खेद मानीला अंतरीं । वांयां झदकरी जागा जालों ॥३॥
जागा जालों म्हणे वायां अवचीता । निजोनि मागुता सुख पाहे ॥४॥
सुख पाहे पुन्हा स्वप्नीचें न दिसे । भयानक दिसे प्राणीयासी ॥५॥
प्राणीयासी दुःख जाहालें मागुतें । जागा जालियातें सर्व मिथ्या ॥६॥
मिथ्या सुखदुःख स्वप्नाचा वेव्हार । तैसा हा संसार नाथिलाची ॥७॥
नाथिलाची जाय क्षण आनंदाचा । सवेंची दुःखाचा क्षण जाये ॥८॥
क्षण येक मनाराघवी सावध । तेणें नव्हे खेद दास म्हणे ॥९॥

२९
देव हे समर्थ आणी देहेधारी । कष्टी परोपरीं ब्रह्मादिक ॥१॥
ब्रह्मादिक तया रावणाचे बंदीं । दैत्य उणी संधी पाहाताती ॥२॥
पाहाताती येकीं केल्या हज्यामती । रासभें राखती येक देव ॥३॥
देवची गादले बहु दगदले । कासाविस जाले कारागृहीं ॥४॥
कारागृहीं देहेसंबंधानें होती । विवेकें राहाती देहातीत ॥५॥
देहातीत दुःख सांडुनि संसार । येथें काय सार सांपदलें ॥६॥
सांपडलें नाहिं कष्ट जन्मवरी । दीनाचीयेपरी दैन्यवाणे ॥७॥
दैन्यवाणे देव जाले संवसारीं । मनुष्याचा करी कोण लेखा ॥८॥
लेखा नाहिं ऐसें कसया करावें । निश्चळची व्हावें दास म्हणे ॥९॥

३०
जीव येकदेसी शीव येकदेसी । याचेनी सायासीं कांहिं नव्हे ॥१॥
हित करवेना आपुलें आपण । त्यासी कर्तेपण घडे केवि ॥२॥
देहे त्याचा त्याला न जाय राखीला । निमित्य भक्षिला अकस्मात ॥३॥
काळ आवर्षण पडतां कठीण । तेव्हां पंचप्राण सोडूं पाहे ॥४॥
जीवा जीव्पाण देता नारायण । तयावीण कोण करूं शके ॥५॥
राया करी रंक रंका करी राव । तेतें धरीं भाव आलया रे ॥६॥
आलया रे जना भावासीं कारण । येर निःकरण सर्व कांहिं ॥७॥
सर्वही हे देहे देवाचीपासुनि । तयाचे भजनीं रामदास ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP