लक्षणे - ७ ते ९

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  



अनुमानें रान घेतसे वाजट । तयासी चावट कोण बोले ॥१॥
बोलतां बोलतां सीणची होतसे । संतोष जातसे अंतरीचा ॥२॥
अंतरीचा देव अंतरीं पाहावा । मीपण हें देवा समर्पावें ॥३॥
समर्पावें भावें तन मन धन । आत्मनिवेदन कैसें आहे ॥४॥
कैसे आहे सोहं कैसे आहे हंसा । वाक्यार्थ आमासा वोळखावा ॥५॥
वोळखतां तेथें तत्वेंची सरती । नाही अहंकृती कांहिं येक ॥६॥
कांहिं तरी येक वृत्ती कामा नये । घडतो अपाय बहुविध ॥७॥
बहुविध आग्र करावा येकाग्र । सुक्षम समग्र विवंचावें ॥८॥
विवंचावे चळ चंचळ सर्वदा । तुटती आपदा संसारीच्या ॥९॥
संसारीक लोक त्या नाहिं विवेक । मुख्य देव येक विसरलीं ॥१०॥
विसरली तेणें पुनरागमन । श्रवण मनन केलें नाहिं ॥११॥
केलें नाहिं हित आपुलें स्वहित । सर्व अंतवंत लोकिक हा ॥१२॥
लोकिकाकरितां कांहींच घडेना । अंतरीं जडेना समाधान ॥१३॥
समाधान होये साधुचे संगती । पाविजेते गति दास म्हणे ॥१४॥


देव सर्व जेणे घातले बांदोडीं । त्याची मुरकुंडी रणांगणीं ॥१॥
ऐसा काळ आहे सर्वां गिळीताहे । विचारूनी पाहें आलया रे ॥२॥
इंद्रजीतनामें इंद्रासी जिंकीलें । त्याचें श्री नेलें गोलांगुळीं ॥३॥
देवां दैत्या वाळी बळी भूमंडळीं । तया येका काळीं मृत्यू आला ॥४॥
देवासी पिटीलें तया जाळांधरें । तोडीलें शंकरे शीर त्याचें ॥५॥
करें भस्म करी नामें भस्मासुर । तया संव्हार विष्णु करी ॥६॥
प्रल्हादाचा पिता चिरंजीव होता । नृसिंह मारिता त्यासी होये ॥७॥
विरोचनाघरीं विष्णु जाला नारी । तया यमपुरी दाखविली ॥८॥
गजासुर गेला दुंदुभी निमाला । प्रताप राहिला वैभवाचा ॥९॥
ऐसे थोर थोर प्रतापी अपार । गेले कळेवर सांडुनीयां ॥१०॥
शरीर संपत्ती सर्व गेली अंतीं । सोसील्या विपत्ती येकायेकी ॥११॥
म्हणोनि वैभवा कदा भुलों नये । क्षणा योये काये तें कळेना ॥१२॥
रामदास म्हणे स्वहित करणें । निर्धारें मरणें मागें पुढें ॥१३॥


दृश्य हें काशाचें कोणें उभारिलें । मज निरोपीलें पाहिजे हें ॥१॥
पाहिजे हें दृश्य भूतपंचकाचें । उभारलें साचें मायादेवी ॥२॥
मायादेवी कैसी कोण वोळखावी । आणी हे त्यागावी कोणेपरि ॥३॥
परी हे मायेची कैसी वोळकावी । जाणोनि त्यागावी ज्ञानबोधे ॥४॥
ज्ञानबोधें माया जाणोनि त्यागिली । परी नाहीं गेली काय कीजे ॥५॥
कीजे निरूपण संतांचे संगतीं । तेणें शुद्ध मती होत असे ॥६॥
होत असे परी तैसेंचि असेना । निश्चयो वसेना मनामध्यें ॥७॥
मनामध्यें सदा विवेक धरावा । निश्चयो करावा येणें रीती ॥८॥
रीती विवेकाची पाहातां घडीची । जातसे सवेंची निघोनीयां ॥९॥
निघोनीयां जाये विवेक आघवा । तो संग त्यागावा साधकानें ॥१०॥
साधकाने संग कोणाचा त्यागावा । सदृढ धरावा कोण संग ॥११॥
संग हा आदरें धरीं सज्जनाचा । त्यागीं दुर्जनाचा दास म्हणे ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP