लक्षणे - ४६ ते ५०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


४६
अलभ्याचा लाभ अकस्मात जाला । देव हा वोळला येकायेकीं ॥१॥
येकायेकीं सुख जाहलें येकट । व्यर्थ खटपट साधनाची ॥२॥
साधनाची चिंता तुटली पाहातां । वस्तुरूप होतां वेळ नाहिं ॥३॥
वेळ नाहिं मज देवदरूशना । सन्मुखची जाणा चहूंकडे ॥४॥
चहूंकडे मज देवाचे स्वरूप । तेथेंमाझें रूप हारपलें ॥५॥
हारपले चित्त देवासी चिंतीतां । दास म्हणे आतां कोठें आहे ॥६॥

४७
रामभक्तीविण अनु नाहिं सार । साराचेंही सार रामनाम ॥१॥
कल्पनाविस्तारू होतसे संव्हारू । आम्हां कल्पतरू चाड नाहिं ॥२॥
कामनेलागुनि विटलासे मनु । तेथें कामधेनु कोण काज ॥३॥
चिंता नाहिं मनीं राम गातां गुणी । तेथें चिंतामणी कोण पुसे ॥४॥
कदा नाहीं नाश स्वरूप सुंदरे । तेथें काय हिरे नासीवंत ॥५॥
रामदास म्हणे रामभक्तीविणें । जाणावें हें उणें सर्व कांहिं ॥६॥

४८
नमूं वक्रतुंडा स्वरूपें प्रचंडा । स्थूळ हे ब्रह्मांडा विराटाचें ॥१॥
विराटाचें सत्य पाताळीं चरण । तेथें अधिष्ठान त्रिविक्रमा ॥२॥
त्रिविक्रम स्थूळ तें सप्तपाताळ । कटमहितळ विराटाचें ॥३॥
विराटाचें रोम गुल्मलता द्रुम । सर्व नद्या नेम नाडीचक्रें ॥४॥
नाडीचक्र नद्या सप्तही सागर । जाणावें उदार विराटाचें ॥५॥
विराटाचा पोटीं क्षुधेचा प्रबळ । तोची दावानळ सागरीचा ॥६॥

४९
कर्ता येक देव तेणें केलें सर्व। तयापासीं गर्व कामा नये ॥१॥
देहे हें देवाचें वित्त कुबेराचे । तेथें या जीवाचें काय आहे ॥२॥
देता देवविता नेता नेवविता । कर्ता करविता जीव नव्हे ॥३॥
निमित्ताचा धणी केला असे प्राणी । पाहातां निर्वाणीं जीव कैचा ॥४॥
लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची । त्याविण जीवाची उरी नाहिं ॥५॥
दास म्हणे मना सावध असावें । दुश्चीत नसावें सर्व काळ ॥६॥

५०
आलया देवाची वात चुकलासी । म्हणोनी आलासी संवसारा ॥१॥
संवसारीं दुखें करीसी रूदन । चुकलें भजन राघवाचें ॥२॥
राघवाची भक्ती नेणतां विपत्ती ॥ तुज अधोगती जन्म जाला ॥३॥
जन्म जाल अपरी वेगीं सोये धरीं । सत्वर संसारीं मोकळीक ॥४॥
मोकळीक होये भक्तिपंथें जातां । वाक्य हें तत्वता दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP