अध्याय ५१ वा - श्लोक ५१ ते ५५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
पुरा रथैर्हैमपरिष्कृतैश्चरन्मतंगजैर्वा नरदेवसंज्ञितः ।
स एव कालेन दुरत्ययेन ते कलेवरो विट्कृमिभस्मसंज्ञितः ॥५१॥
पूर्वीं तारुण्यभरतें आंगीं । ऐश्वर्यमदाच्या प्रसंगीं । नरेंद्रनामाथिलों जगीं । महत्त्वें भोगीं नृपपदवी ॥१७॥
रत्नजडित सुवर्णरथ - । परिवेष्टित शतानुशत । अनेक कुंजर साळंकृत । रत्नखचित साभरणीं ॥१८॥
शिबिकाप्रमुख अनेक यानें । विशाळ शिबिरें तुंग वितानें । सन्नद्ध बद्ध प्रबळ सैन्यें । अमात्यरत्नें धीमंत ॥१९॥
तिहीं वेष्टित भूतळपृष्ठीं । मृगयाव्याजें देऊनि घरटी । समरीं नृपवर कोट्यनुकोटी । जिंकूनि सृष्टी यश मिरवीं ॥३२०॥
अजरामर मानूनि आपणा । म्हणवी महेंद्र नृपवर राणा । संपत्तिमदें भुलोनि कोण्हा । न गणी मरणा विसरोनी ॥२१॥
काळात्मका तो तुझेनि योगें । विपत्ति पावे ऐश्वर्यभंगें । तेव्हां तोचि देह देखिजे जगें । दैवप्रसंगें परिणमतां ॥२२॥
श्वानसृगाळीं भक्षिला देहो । तैं होय तद्विष्ठेचा पोहो । सडोनि जातां कृमींचा रोहो । पावता दाहो भस्ममय ॥२३॥
म्हणसी येवढ्या ऐश्वर्यवंता । किमर्थ होईल हे अवस्था । तरी दुरत्यय तुझी काळसत्ता । तीतें लंघितां कोण असे ॥२४॥
काळें ग्रासिले अनेक भूप । अगाध ऐश्वर्य प्रतापकल्प । आपण केउते त्यामाजि अल्प । तथापि साक्षेप मदगर्वें ॥३२५॥
ऐश्वर्याची ऐसी दशा । कुत्सितदेहपरिणाम ऐसा । ऐसें कळतां तनुभरंवसा । धरूनि कां फांसां पडताती ॥२६॥
ममता करूनि देहावरी । जे नर न भजती श्रीहरि । ते आपणा आपण वैरी । जाले संसारीं जन्मोनी ॥२७॥
काय म्हणोनि म्हणाल ऐसें । तरी आत्मशत्रुत्व त्यांचें दिसे । यदर्थीं पुराणसंमति असे । तें तूं परिसें भगवंता ॥२८॥
संमतिः - योने सहस्राणि बहूनि गत्वा दुःखेन लब्ध्वाऽपि च मानुषत्वम् ।
सुखावहं येन भजंति विष्णुं ते वै मनुष्यात्मनि शत्रुभूताः ॥
अनेकयोनींचें सहस्र । पावोनि मरतां वारंवार । भोगितां दुःखें अतिदुष्कर । दुर्लभ फार नरदेह ॥२९॥
तेंही लाहूनि मनुष्यपण । अवयवपाटव बुद्धिज्ञान । असतां न भजती जे भगवान । आपणां आपण शत्रु ते ॥३३०॥
प्राणी परतंत्र जठरचाडे । जचतां पदती काळदाढे । म्हणोनि पूर्वींच जे दिग्विजयी । विषयपरतंत्र होऊनि तेही ॥३१॥
अन्तक प्राप्त झालाचि नाहीं । त्याहूनि पूर्वींच जे दिग्विजयी । विषयपरतंत्र होऊनि तेही । दुःखप्रवाहीं बळें बुडती ॥३२॥
तयांची विषयपरतंत्रता । मुचुकुंद कथी श्रीभगवंता । एकाग्र होऊनि परिसिजे श्रोतां । विषयावर्त्ता चुकवावया ॥३३॥
निर्जित्य दिक्चक्रमभूतविग्रहो वरासनस्थः समराजवंदितः ।
गृहेषु मैथुन्यसुखेषु योषितां क्रीडामृगः पूरुष ईश नीयते ॥५२॥
सप्तद्वीपवती अवनी । जिंकूनि दिक्चक्र विग्रहयानीं । एकातपत्रीभूशासनीं । भद्रासनीं सार्वभौम ॥३४॥
जिंकूनि भूतळींचे भूपाळ । साधूनि असपत्न भूमंडळ । वरिष्ठ भूभुज पूर्वील सकल । नमिती पदतळ दासवत् ॥३३५॥
समरीं विग्रह न करी कोण्ही । यालागिं निवांत चतुरंगिणी । करभार येती पत्रशासनीं । न्यायरक्षणीं धुरंदर ॥३६॥
ऐसें ऐश्वर्य जोडल्यावरी । नव्हती श्रीपदभजनाधिकारी । नरदेह नृपत्व तिहीं पामरीं । वृथा संसारीं कां कीजे ॥३७॥
रंकें परतंत्र जठरचाडे । सार्वभौमातें नाहीं कोडें । भगवद्भजनीं तोही न जडे । तेंचि निवाडें बोलतसें ॥३८॥
बाह्यप्रतापी तेजःपुंज । एकातपत्र कीर्तिध्वज । जिंकूनि दिक्चक्र भूभुज । भोगी साम्राज्य स्वतंत्र ॥३९॥
परंतु शत्रु अंतर्गत । कंदर्पदर्पें धडधडित । तो न जिणतां अवघें व्यर्थ । करी ग्रहगस्त स्त्रीकामें ॥३४०॥
कामशत्रु बळिष्ठ प्रबळ । तो उत्पादी देहुडें बळ । मग तो अजिंक अरिवर्गमेळ । करी व्याकुळ मौनास्त्रें ॥४१॥
भोगलिप्सास्पदीभूत । प्रलोभ बळिष्ट तत्संगत । भोगतृष्णा विफळ जेथ । द्वेष बैसत ते ठायीं ॥४२॥
कामभूपाचे पार्षद दोघ । मुख्य शत्रु हेचि त्रिवर्ग । या तिघांचे प्रतिनिधि तिघ । परम अभंग प्रतापी ॥४३॥
कामप्रतिनिधि जो मद । तो जाणिजे अष्टविध । लोभप्रतिनिधि दंभ विशद । तोच बहुविध अनावर ॥४४॥
द्वेषप्रतिनिधि तो मत्सर । गर्वविषादतिरस्कार । एवमादि शत्रुनिकर । अजिंक अंतर्गत राहे ॥३४५॥
पशुपक्ष्यादि युद्धीं जयिन । शुकसारिकासुभाषितप्रवीण । प्लवंग करिती शिक्षानर्तन । तेंवि नृपासन बहिर्मुख ॥४६॥
कमनीयकामिनीकटाक्ष क्रूर । भेदतां न भंगे हृदय कठोर । कंदर्पदर्प जो जिंके धीर । अपरशूर तो वदान्य ॥४७॥
मर्मस्पर्शाचे वाग्वाण । निंदाद्वेषीं निश्चळ मन । विषयव्याघातीं प्रशान्त पूर्ण । तोचि जयवान जगत्त्रयीं ॥४८॥
बाह्यप्रतापें सामाज्यपदवी । अंतरशत्रु कोण्हा नदवी । तो हस्तकीं देऊनि दिवी । नर्तितां वदवीं उदो उदो ॥४९॥
स्त्रीकामाचे कटाक्षबाण । लागतां विरहें व्याकुळ प्राण । तेणें होऊन स्त्रीअधीन । क्रीडामृगपण अवलंबी ॥३५०॥
स्त्रिया नाचविती तैसा नाचे । वचन लंघूं न शके त्यांचें । परमवालभ स्त्रीकामाचें । आन न सुचे परमार्थ ॥५१॥
नित्य नूतन रत्नजडितें । भूषणें लेववी रुक्मघडितें । एकापरिस एक चढितें । यानें भुवनें वसनादि ॥५२॥
पानें अन्नें सौरभरस । विविध अर्पूनि करी विलास । अनुल्लंघ्य आज्ञापालना दास । रक्षी मानस स्मरवेधें ॥५३॥
स्त्रियासंगीं खेळे द्यूत । स्त्रियांसमवेत करी नृत्य । एवमादि चेष्टा बहुत । वादित्र गीत स्मरलास्यें ॥५४॥
क्रीडार्थ भ्रमे वनोपवनीं । नानास्थानीं भुवनीं जीवनीं । विविधयानीं गम्यमानीं । मानी मैथुनीं आह्लाद ॥३५५॥
सापत्न ईर्ष्यासंरुष्ट वनिता । साष्टांगनमनें प्रसन्न करितां । न स्मरे साम्राज्यपदयोग्यता । निरपत्रपता येथवरी ॥५६॥
नर्मव्यंग्योक्ति तद्विलासीं । लत्तापहार साहे शिशीं । ष्ठीवनलेहनीं न मनी चिळसी । मन्मथपाशीं संरुद्ध ॥५७॥
कैवल्याहूनि अधिकतर । मैथुनसुखचि परमरुचिर । जिये ठायीं निरंतर । तें स्त्रीमंदिर न संडवे ॥५८॥
ऐइस्या स्त्रियांच्या मंदिरीं । मैथुनसुखार्थ निरंतरीं । गोळाङुळाचियेपरीं । नर्त्तन करी तच्छंदें ॥५९॥
मुचुकुंद म्हणे भो भो ईशा । सार्वभौमही पुरुष ऐसा । वरपडोनि विषयसोसा । व्यर्थ आयुष्या नाशितसे ॥३६०॥
नरदेहींची आयुष्यघडी । न मिळे वेंचितां सहस्रकोडी । मैथुनसुखार्थ पामर दवडी । न धरूनि आवडी तव भजनीं ॥६१॥
याहूनि अपूर्व ऐकें ईशा । विषयतृष्णाकुलमानसा । संप्राप्त भोगार्थ अवकाशा । न लभे दुराशा भ्रमग्रस्त ॥६२॥
करोति कर्माणि तपःसु निष्ठितो निवृत्तभोगस्तदपेक्षया ददत् ।
पुनश्च भूयेयमहं स्वराडिती प्रवृद्धतर्षो न सुखाय कल्पते ॥५३॥
अनकूळ भोग भोगितां हांव । मानसीं तृष्णा वाढवी भाव । म्हणे इहलोकींचें वैभव । क्षणिक सर्व नैश्वर्य ॥६३॥
शाश्वत अमरपदींचे भोग । तत्प्राप्तीचे विवंची योग । तपश्चर्यादि कर्में सांग । आदरी अव्यंग मीमांसा ॥६४॥
वसंतग्रीष्मीं तीव्र पंचाग्नि । प्रावृटीं शरत्काळीं गगनीं । माळा करूनि दिवसरजनी । वर्षतां घनीं दृढ राहे ॥३६५॥
हेमंतशिशिरीं आकंठजळीं । कणींग मांडूनि भरी उपळीं । माजि बैसे निशाकाळीं । सापेक्ष फळीं सुरभोगा ॥६६॥
ब्रह्मचर्यादि व्रते कठिन । जटा कौपीन कृष्णाजिन । फलमूलाशन अधःशयन । भोग लक्षून अमरांचे ॥६७॥
कुंडें मंडप वेदि शुद्ध । हविर्मत्राज्यसंभार विविध । यथोक्ति दक्षिणा द्विजवर विबुध । परम विशुद्ध आर्त्विज्य ॥६८॥
क्रियाकलापमंडित ऐसे । राजसूयादिक्रतुवरसोसें । आचरे अमरेंद्रपदाभिलाषें । भरलें पिसें तृष्णेचें ॥६९॥
इत्यादि कठोरकर्माचरणीं । अमरेंद्र होईल हें मानूनी । रंभा उर्वशी मोहिनी । म्हणे या रमणी मज होती ॥३७०॥
नंदनवनादिवनक्रीडन । स्वेच्छा करीन पीयूषपान । ऐरावतादिवारनयान । विलासभुवन अमरपुरी ॥७१॥
चिरकाळ ऐश्वर्य भोगीन ऐसें । पुण्यक्शयाचें भय कायसें । मर्त्यांमाजि तत्पुण्यलेशें । साम्राज्य सरिसें लाहेन ॥७२॥
पुडती होईन चक्रवर्ती । पुडती भोगीन असपत्न क्षिति । लालसललनाललितगीतीं । भोगीन रति स्मरलास्यें ॥७३॥
इत्यादितृष्णाप्रवृद्धपुरुष । वाढवूनि विषयसोस । भोगून लाहे प्राप्त भोगांस । सोसी क्लेश हव्यासें ॥७४॥
एवं तृष्णेचिया भरीं । पडोनि सोसी दुःखलहरी । फळाभिळाषें कर्में करी । सुख संसारीं दुर्लभ त्या ॥३७५॥
ऐसा धरूनि विषयाभिलाष । कामतृष्णाप्रवृद्धक्लेश । तपश्चर्याकर्में विशेष । सुकृतलेश उत्पादी ॥७६॥
तेणें अमुत्रभोगकामें । भोगभूयिष्ठ पावे जन्में । पतन पावे सुकृतोपशमें । जठरी नियमें मग पचणें ॥७७॥
अधोमुख जठरकुहरीं । नवमास विष्ठेच्या दाथरीं । पवोनि प्रसवे मूत्रद्वारीं । पुन्हा संसारीं भ्रमग्रस्त ॥७८॥
पुन्हा विषयार्थ तैसाचि जचे । प्रेम धरूनि स्वर्गसुखाचें । व्रततपनियमकाम्यकर्मांचें । करितां कांचे क्लेशभरें ॥७९॥
सर्वदा कर्मसाङ्गता कैंची । घरटी अनावर काळाची । अघटितरचना रची खची । ते माया प्रपंचीं भ्रमवीतसे ॥३८०॥
एवं जन्में उच्चावचें । धरूनि विषयप्रलोभें जाचे । आठं श्लोकीं त्या बहिर्मुखांचें । विविशत्व कथिलें भो ईशा ॥८१॥
तेथूनि सुटिका जेणें होय । तो एक पदभजनोपाय । कोण्या योगें प्राणी लाहे । तें वदताहे मुचुकुंद ॥८२॥
भवापवर्गो भ्रमतो यदा भवेज्जनस्य तर्ह्यच्युत सत्समागमः ।
सत्संगमो हर्हि तदैव सद्गतौ परावरेशे त्वयि जायते मतिः ॥५४॥
ज्याचें ऐश्वर्य नोहे च्युत । म्हणोनि नामें तो अच्युत । त्यातें मुचुकुंद संबोधित । भो भो अच्युत म्हणोनिया ॥८३॥
मुचुकुंद म्हणे पुरुषोत्तमा । भव म्हणिजे या संसारभ्रमा । माजि संसरे मरनजन्मा । भोगिती श्रमा भ्रमग्रस्त ॥८४॥
अपवर्ग म्हणिजे भ्रमाचा अंत । त्या नांव मुख्य परमपुरुषार्थ । तो प्राण्यांसि अकस्मात । जोडतां प्रपत सत्संग ॥३८५॥
भ्रमापासूनि सुटला जरी । तरीच सत्संगीं प्रेम धरी । सत्संगप्रेमा जरी अंतरीं । तरी संसारीं मग न रमे ॥८६॥
सत्संगाची लाहतां सोय । सर्वसंगाची निवृत्ति होय । निःसंग जालिया सद्गति लाहे । तोचि उपाय अवधारीं ॥८७॥
कार्यकारणनियंता जो तूं । त्या तुझ्या ठायीं सप्रेम तंतु । लाहोनि अनन्य भक्तिपंथु । होय निर्मुक्त तव बोधें ॥८८॥
तुझा भजनमार्ग लाहतां सरळा । तरणोपाय भाविकां अबळां । योगयागादि न परिपाळा । सप्रेमळा तव भजनीं ॥८९॥
शब्दस्पर्शरूपरस । गंधादि पंच विषयाभास । याचि नामें भवाब्धि दृश्य । प्राणी अशेष बुडविता ॥३९०॥
या पंचकापासूनि मन । निःशेष होऊनियां वितृष्ण । सप्रेम तव पदभजनीं लीन । तैं भवभान केउतें ॥९१॥
योगयागतपःप्रयास । वेदशास्त्रविद्याभ्यास । हा अवधाचि विषयाभास । येणें विशेष भ्रम वाढे ॥९२॥
म्हणाल इत्यादि न कीजे कांहीं । तरी मग भजन तें कैसें काई । अनावर मानस मुक्तिसोयीं । कोण्या उपायीं लागेल ॥९३॥
मुचुकुंद म्हणे याचिसाठीं । तुझी न होतां कृपादृष्टि । न सुटे संसारबांधाटी । तैं मनोजयगोष्टी कैं कोण्हा ॥९४॥
यालागिं तवानुग्रहें करून । संसृतिचक्रीं भ्रमतां जन । त्यासि मुक्तता भ्रमापासून । तैं लाहे निर्वाण भवविलयें ॥३९५॥
अनुग्रह म्हणाल कैसा काय । जैं सत्वसंपत्ति करी उदय । तैं विवेकाची लाभे सोय । अविवेक जाय निःशेष ॥९६॥
शुद्धसत्वीं वस्तु अवतरे । तैं पूर्ण ऐश्वर्य तें उभारे । सर्वज्ञसर्वकर्तृत्व स्फुरे । हें श्रुतिनिर्धारें उमजे कीं ॥९७॥
पुढें त्रिविध गुणक्षोभ । तेथही सत्वगुणाचा कोंभ । तेथेंचि ज्ञानशक्ति स्वयंभ । येरा बालभ द्रव्यक्रिया ॥९८॥
सूxxतेजें गगन भरे । तत्तेज सूर्यकान्तीं अवतरे । येर शुष्केन्धनें लघुतरें । नव्हती चतुरें तद्ग्रहणीं ॥९९॥
एवं होतां सत्वसंपन । ज्ञानशक्तीचें अधिष्ठान । तेथ प्रकटे श्रीभगवान । न लगे अनुमान यदर्थीं ॥४००॥
भगवदनुग्रहें सत्वशुद्धि । तें जाणो ये विवेकबुद्धि । विवेकाथिली प्राञ्जळबुद्धि । तोडी उपाधि भ्रमभूता ॥१॥
विवेकाञ्जन बुद्धिनयनीं । मिलतां विचार सर्वां करणीं । प्रवृत्तिप्रवाह विषयाचरणीं । निवृत्तिवाहणी त्या मुरडी ॥२॥
गंधविषयोन्मुख जें घ्राण । बाह्यगंधार्थ वळघे रान । बुद्धि लाहतां विवेकनयन । पाहे गंधज्ञ त्यामाजि ॥३॥
गंधज्ञाची गवेषणा । करितां निवृत्ति होय घ्राणा । गंधविषयभमभावना । तैं कें कोणा भ्रामक पैं ॥४॥
गंधप्रकाशक अपान । पायुघ्राणें त्यागादान । एतज्ज्ञापक जो अभिमान । निवृत्त होऊन तो राहे ॥४०५॥
रसना बाह्यरसाचे पाठीं । लागोनि भंवे अखिल सृष्टि । तेथ रसज्ञ विवेकदृष्टि । पाहतां उफराटी ते होय ॥६॥
रसप्रकाशक प्राण बव्हें । त्यागादान शिश्नजिह्वे । रसज्ञापक जें चित्त प्रभावें । तैं तें स्थिरावे स्वस्वरूपीं ॥७॥
चक्षु बाह्यरूपग्रहण । साभिलाष करिती भ्रमण । तेह बुद्धिविवेकें रूपाभिज्ञ । पाहतां वयुना निवृत्ति ये ॥८॥
रूपप्रकाशक उदान । चरणा नयना त्यागादान । उभयज्ञापक मनीषाकरण । निवृत्ति होऊनि तैं राहे ॥९॥
बायस्पर्शाचिये चाडे । सैरां त्वगिंद्रिय वावडे । विवेकदृष्टि स्पर्शज्ञाकडे । परततां मोडे बाह्य भ्रम ॥४१०॥
समान स्पर्शातें प्रकाशी । त्यागदानकरत्वकाशी । उभयज्ञापकता मनासी । निवृत्तीसी तें लाहे ॥११॥
शब्दविषय श्रवणीं फावे । तदर्थ बाह्यगगनीं भ्म्वे । विवेकदृष्टि विभ्रमभावें । करी तैं ठावें शब्दज्ञा ।१२॥
शब्दचेष्टक चेष्टा व्यान । वाक्श्रोत्रें त्यागादान । उभयज्ञापक अंतःकरण । ठाके परतोन निवृत्त जैं ॥१३॥
तवानुग्रहें सत्वसंपत्ति । तेणें विवेक लाहे मति । विवेंके मोडे विषयप्रवृत्ति । होय निवृति सुविचारें ॥१४॥
निवृत्त जालिया अंतःकरण । सत्संगमें समाधान । नितान्तनिर्मलता लाहोन । त्वदेकशरण सप्रेमें ॥४१५॥
अपरोक्षअभेदबोधावाप्ति । जिये नांव चौथी भक्ति । ते लाहोनि भवनिवृत्ति । भ्रमोपहति या नाम ॥१६॥
भ्रमनिवृत्तीसी जो कारण । तो हा तवानुग्रह पूर्ण । यावीण योगयागाध्ययन । तें भवभान तन्मात्र ॥१७॥
शब्दविषय गुरूच्या वचनें । शिष्यें करूनि श्रवणें । केलीं वेदशास्त्राध्ययनें । विषयज्ञानें तीं अवघीं ॥१८॥
तीर्थें क्षेत्रें देवदर्शनें । तेथ रूपविष फावे नयनें । स्नानार्चनें शीतोष्णसहनें । स्पर्शाविणें आन न फवे ॥१९॥
तीर्थप्रसाद पुरोडाश । देवब्राह्मणपितृशेष । अवघा रसविषयो जिह्वेस । तेंवि घ्राणास भूगंध ॥४२०॥
त्यामाजि शुभाशुभभावना । अभ्यस्तशास्त्रविवंचना । अविधिविधिप्रवृत्ति नाना । सर्वकल्पना मनोभव ॥२१॥
परस्परें विरोध शास्त्रां । तदाचरणें त्या तन्मात्रा । रूप आणिती यथासूत्रा । शरीरयात्राप्ररोचका ॥२२॥
ऐसी बाह्याभ्यासप्रवृत्ति । दीक्षित पंडित सर्वज्ञ होती । देहाध्यासें भवीं बुडती । जनीं मिरवती ज्ञोतपणीं ॥२३॥
देवतिर्यक ब्रह्मराक्षस । करी प्रवृत्ति ज्ञानाभ्यास । तवानुग्रहें दःखनिरास । विषयाभास मावळवी ॥२४॥
कोण्हे एके योनीआंत । तवानुग्रहें विवेकवंत । होतां होती क्लेशरहित । हा सिद्धान्त श्रुतीचा ॥४२५॥
ऐसा तुझा अनुग्रहमैमा । प्रत्यक्ष प्रत्यय बाणला आम्हां । तूं तुष्टलासि पुरुषोत्तमा । तेणें भवभ्रम मावळला ॥२६॥
मजवरी कैसा अनुग्रह तुझा । तें अवधारीं गरूडध्वजा । मुचुकुंदाच्या स्फुरती भुजा । स्वलाभ वोजा उमजलिया ॥२७॥
मन्ये ममानुग्रह ईश ते कृतो राज्यानुबंधापगमो यदृच्छया ।
यः प्रार्थ्यते साधुभिरेकचर्यया वनं विवक्षद्भिरखंडभूमिपैः ॥५५॥
सर्वनियंता तूं ईश्वर । संबोधनें तो ईशोच्चार । तुझी ईशनशक्ति सधर । येर परतंत्र सर्वही ॥२८॥
हेतुगर्भितें कर्मफळें । तैसतैसा फळभोग मिळे । तुवां स्ववश केलें बळें । करुणावत्सळें ईशत्वें ॥२९॥
जन्ममरणांची समाप्ति । व्हावया कारण भ्रमोपहति । तीचें कारण सत्संगति । तेणें उपरति भवभोगीं ॥४३०॥
सत्संगमें नित्यानित्य । कळतां अनित्यीं होय विरक्त । अनित्य राज्यादिभोग समस्त । निःसंग होत तत्त्यागें ॥३१॥
ऐसीं सहेतु मोक्षसाधनें । तीं मज न घडतां जनार्दनें । अनुग्रह केला ईशपणें । तो मी नेणें आजिवरी ॥३२॥
तोचि अनुग्रह म्हणसी कैसा । माझा सार्वभमत्वठसा । साङ्ग सुंदर लावण्ययसा । रुचली मानसा रतिलास्यें ॥३३॥
तेथें विरक्ति रुचे कवणा । अष्टमदांचिया आडराना । माजि बळिष्ठां शत्रुगणा । जालों अंकणा भ्रमग्रस्त ॥३४॥
नसतां विरक्तीसि कारण । कोण्हा न करवे सोडवण । यथार्थ ईश्वर चिंतूं म्हणोन । बळें तेथून सोडविलें ॥४३५॥
न इच्छितां अकस्मात । देवीं प्रार्थिलों स्वकार्यार्थ । तेथ तारकसमरीं नित्य । भिडतां बहुत युगें गेलीं ॥३६॥
देवीं षण्मुख तारकहनना । आणूनि मजला दिधली आज्ञा । पुन्हा जातां भद्रसेना । कालकलना सूचविली ॥३७॥
भववैरस्यें मग ये विवरीं । निद्रिस्त होतों आजिवरी । तुवां अनुग्रह हा श्रीहरि । केला मजवरी ईशत्वें ॥३८॥
सार्वभौमपदींचे भोग । सर्वोपचार ऐश्वर्यसंग । बळेंचि कृपेनें तोडिले सांग । विरक्ति अभंग प्रयोजिली ॥३९॥
राज्यानुबंधाचा अपगम । प्रार्थितीं राजर्षिसत्तम । साधु साधनीं कृतसंयम । शमदमोपशमसंपन्न ॥४४०॥
अवगमोनि एकात्मता । लाहोनि निस्पृह निःसंगता । खंडोनि भूपत्वाहंता । वांछिती तत्वता वनवास ॥४१॥
सेवक अनुयायी पार्षद । किंबहुना जे उपचारमद । अशन वसन वदूसंबंध । इत्यादि विच्छेद संगाचा ॥४२॥
एकचर्येंकरूनि वनीं । अखंड विचारावें म्हणोनी । वांछिती भूभुज बहुधा जनें । तें मजलागूनि अनायासें ॥४३॥
म्हणाल एकचर्या ते कवण । उपचारप्रद जो पार्षदगण । एकवर्ष्म तदाचरण । करूनि पूर्ण निःसंग ॥४४॥
जलद अंजलि अमत्रक । मृदुळास्तरणीं भूपर्यंक । आच्छादनें गगनांसुक । उपबर्हणीं निजबाहु ॥४४५॥
गीत वादित्र अनाहत । स्वात्मानुभूतिरतिएकांत । आत्मोपलब्धानंदभरित । इत्यादि समस्त एकचर्या ॥४६॥
तुझा अनुग्रह हा मजवरी । म्हणोनि भंगली भवभ्रमलहरी । प्रतीति बाणली ममान्तरीं । दर्शनथोरी हे तुझी ॥४७॥
अनुग्रह करावया कारणें । आलों म्हणोनि समर्थपणें । बोलिला तें पूर्वस्मरणें । अनुग्रहिलों तें कथिलें ॥४८॥
पूर्वींच अनुग्रहिलों ऐसा । आतां उमजलें श्रीपरेशा । वरांतें मागें या उद्देशा । पावूनि दुराशा पोखिली ॥४९॥
तरी तयाविषयीं मम प्रार्थन । ऐकें श्रीहरि सावधान । भवसुखैश्वर्य भगवद्भजन । दोन्ही विवरून बोलतसें ॥४५०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP