अध्याय ५१ वा - श्लोक ६१ ते ६४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


युंजानानामभक्तानां प्राणायामादिभिर्मनः ।
अक्षीणवासनं राजन्दृश्यते पुनरुत्थितम् ॥६१॥

मदैक्यप्राप्तीचा जो प्रेमा । तदुदयाची जेथ अमा । येर योगादिपरिश्रमा । चित्तोपरमालागिं करिती ॥५१५॥
ऐक्यबोधें नव्हती भक्त । केवळ भेदज्ञ अभक्त । प्राणायामादिकीं निरत । होऊनि योजिती मन योगीं ॥१६॥
मूळबंधें वज्रासन । नाभिस्थानीं औड्डियान । वक्षीं हनुवटी नेहटून । बंध देऊन जालंधर ॥१७॥
नासापुटीं धरूनि लक्श । भूचरीमुद्रासाधनीं दक्ष । नासामध्य अंतरिक्ष । चतुरंगुळिका चांचरिये ॥१८॥
नासामूळीं भ्रुवोर्मध्य । खेचरीमुद्री साधूनि शुद्ध । मनपवनांचा करूनि रोध । करिती प्रसिद्ध मनोलया ॥१९॥
ऐसे अभ्यासें योगाग्रणी । होती अभक्त साधक श्रेणीं । मानस मूर्च्छित विभक्तपणीं । अक्षीणवासनीं लयभूत ॥५२०॥
राया तयांचें मानस लीन । मुद्रा सुटतां होय भिन्न । तैं तें करी विषयध्यान । पूर्ववासनासंस्कारें ॥२१॥
जैसा क्कचिद्योगाभासी । आला गृहस्थ मंदिरासी । तेणें प्रार्थिला भोजनासी । नियमें द्वादशी साधावया ॥२२॥
तंव तो म्हणे यवागूपचन । मदर्थ कीजे शिथिलौदन । गृहस्थें आज्ञा अभिवंदून । चुल्ल्यारोपण केलें पैं ॥२३॥
तंव येरें बैसोनि सिंहासनीं । पूर्वाभ्यासें लक्श धरूनी । मनोलय करितां बाह्यज्ञानीं । ठेली पडोनि ताटस्थ्यमुद्रा ॥२४॥
गृहस्थ म्हणे गेला प्राण । द्वादशीव्रतां आलें विघ्न । पुरोहित करिती समाधान । तनुचैतन्य पाहोनी ॥५२५॥
मग सारून तिहीं पारणें । भूगृहीं त्या ठेविलें यत्नें । बहुताकाळीं गृहस्था मरणें । सदनें पतनें पावलिया ॥२६॥
पुढें कित्येक काळान्तरीं । वास्तु निर्मितां श्रीमंतनरीं । योगी देखोनि भूगर्भविवरीं । आश्चर्य भारी ते करिती ॥२७॥
आणूनि योगाभ्यासियां चतुरां । उपायें उतरिली योगमुद्रा । तो म्हणे यवागू विस्तारा । त्वरा करा पारणिया ॥२८॥
भवंते जनपद म्हणती तया । कोण पारणें योगिराया । येरें देखूनि जनसमुदाया । लाजोनियां मौनावे ॥२९॥
ऐसें योगीं योजिलें मन । न होतां विषयीं क्षीणवासन । मुद्रा सुटतांचि उठोन । धरी अनुसंधान विषयाचें ॥५३०॥
तैसी नोहेचि तुझी स्थिति । बाणली सविवेक विरक्ति । बरें प्रलोभितांही चित्तीं । नुपजे आसक्ति विषयांची ॥३१॥
आतां घेई मद्वरदान । तेंचि ऐकें सावधान । जेणें विषयवासना क्षीण । अखिल कल्याण मद्भजनें ॥३२॥

विचरस्व महीं कामं मय्याविशितमानसः ।
अस्त्वैव नित्यदा तुभ्यं भक्तिर्मय्यनपायिनी ॥६२॥

माझेनि वरें निर्भय भावीं । यथा स्वेच्छा विचरें पृथ्वी । मन मद्रूपीं प्रवेशवीं । लघुगौरवीं समबोधें ॥३३॥
म्हणसी तुझा मज वियोग होतां । कोठें जोडेल निर्भयता । तरी तें वर्म तुझिया हाता । पहिलें तत्वतां आलें असे ॥३४॥
नित्य सुखाची प्रदायिनी । ते मद्भक्ति अनपायिनी । अपायीं न घले कोणे क्षणीं । कृपाईक्षणीं पैं माझ्या ॥५३५॥
माझ्या ठायीं ते तव भक्ति । अक्षय कैवल्यसुखाची दाती । अभेदबोधें पूर्णस्थिति । बाणली ऐसी मी जाणें ॥३६॥
पूर्वींच आहे भक्ति ऐसी । अनन्य अव्यभिचारें मजसीं । भेदें भ्रमे जे विषयाभासीं । म्हणिजे तियेसी व्यभिचारिणी ॥३७॥
भगवद्दर्शनावाप्ति जाली । तेव्हांचि अक्षय सिद्धि जोडली । लोकसंग्रहार्थ प्रयोजिली । शेष आयुष्यीं तापसता ॥३८॥
युक्तिचेनि आभासेंकरून । क्षात्रधर्मीं दोषदर्शन । तत्पातकें भेडसावून । सांगे साधन तें ऐका ॥३९॥

क्षात्रधर्मस्थितो जंतून्न्यवधीर्मृगयादिभिः । समाहितस्तत्तपसा जह्यघं मदुपाश्रितः ॥६३॥

पूर्वीं क्षात्रधर्मेंकरून । मृगयादिकीं जंतुहनन । सार्वभौम भद्रासन । न्यूनपूर्ण न्यायादि ॥५४०॥
ऐसीं पातकें शुष्केन्धनें । समाहित एकाग्र तपाचरणें । मदुपाश्रितमदैक्यपणें । जालीं म्हणोनि सुचविलें ॥४१॥
मदैक्यबोधानुसंधानें । शमदमपूर्वक एकाग्रपणें । ऐसीं तपश्चर्याचरणें । अघनिर्दळणें वय सारीं ॥४२॥
पडलिया हें कलेवर । पुढील चरम जन्मान्तर । तेहील मत्प्राप्तिप्रकार । ऐक सादर म्हणे हरि ॥४३॥

जन्मन्यनंतरे राजन्सर्वभूतसुहृत्तमः । भूत्वा द्विजवरस्त्वं वै मामुपैष्यसि केवलम् ॥६४॥

या उपरी जें लाहसी जन्म । तेथ होऊनि द्विजोत्तम । सर्वां भूतीं सुहृत्तम । अवंचक प्रेम मद्भजनीं ॥४४॥
नितान्तनिर्मळचित्तशुद्धि । इहामुत्रार्थीं विरक्तबुद्धि । लाहसी मदैक्यकैवल्यसिद्धि । अक्षयसमाधि मद्वरें ॥५४५॥
ऐसें स्वमुखें श्रीभगवान । देतां मुचुकुंदा वरदान । परमानंदें द्रवती नयन । पादावनेजन नतियोगें ॥४६॥
ऐसें मुचुकुंदाचें भाग्य । भक्ति ज्ञान भववैराग्य । ऐकोनि स्पृहती तेही श्लाघ्य । श्रेष्ठीं योग्य मानिजती ॥४७॥
वैय्यासकि म्हणे राया । इतुकेनि समाप्ति ये अध्याया । पुढिले कथेचिया अन्वया । परिसावया दृढ होईं ॥४८॥
बावन्नाविया माझारीं । यवनसेना मारूनि हरि । अश्वगजरथसंपदाभारीं । द्वारकेमाझारी येईल ॥४९॥
तंव मध्येंच अकस्मात । देखोनि मागध युद्धा उदित । परम निर्भयही भयभीत । होऊनि पळती तयापुढें ॥५५०॥
प्रवर्षणाख्यनामें गिरि । वेंघोनि लपती तयाचे शिखरीं । इत्यादि कथा सविस्तरीं । उपसंहारीं पावलिया ॥५१॥
बलरामाचें विवाहकथन । नवमस्कंधीं निरूपण । त्याचें येथ देऊनि स्मरण । रुक्मिणीहरण कथिजेल ॥५२॥
तये कथेच्या श्रवणरसा । श्रवणपात्रें घेऊनि बैसा । पुरती अभिवांच्छितफलाशा । हा भरंवसा जाणोनी ॥५३॥
श्रीएकनाथकृपापांगें । एकात्मता लाहिजे आंगें । नोहे सांगन्या वागण्या जोगें । सप्रेम प्रसंगें विश्वस्तां ॥५४॥
दयार्णवाची इतुकी विनति । अमळ अचळ भगवद्गति । लक्षूनि बैसतां श्रवणाप्रति । बाणे प्रतीति स्वतःसिद्ध ॥५५५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कालयवनवध - मुचुकुंदस्तवनं नामेकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥६४॥ ओव्या ॥५५५॥ एवं संख्या ॥६१९॥ ( एकावन्नावा अध्याय मिळून ओवी संख्या २३९६० )

अध्याय एकावन्नावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP