अध्याय ५१ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
इति निश्चित्य यवनः प्राद्रवंतं पराड्मुखम् ।
अन्वधावज्जिघृक्षुस्तं दुरापमपि योनिनाम् ॥६॥
ऐसा निश्चय करूनि यवन । धरावयाचे इच्छे करून । रथातळवटीं उतरून । निःशस्त्र होऊन धाविन्नला ॥३६॥
यवनापुढें पराड्मुख । चपळ पळतां यदुनायक । तदनुलक्षें ग्रहणोन्मुख । धावे सम्यक कालयवन ॥३७॥
माझा प्रताप जाणोनि प्रौढ । सामान्यत्वीं आपणा गूढ । करूनि पलायन करी वाड । जाणें कैवाड मी याचें ॥३८॥
मजपुढें हा पळेल कोठें । मारीन हाणोनियां चपेटे । म्हणोनि धांवे परम नेटें । पडती कोठें पद न कळे ॥३९॥
ऐशी विशाळ हांव म्लेच्छा । कृष्णापाठीं धांवे स्वेच्छा । दुर्लभ यत्ना योगियांच्या । तो या तुच्छा केंवि गवसे ॥४०॥
योगियांचीं शिक्षितमनें । परम एकाग्रें सावधानें । त्यांसि नावरे दुर्घट प्रेमें । कालयवनें त्या धरितां ॥४१॥
हस्तप्राप्तमिवाऽऽत्मानं हरिणास पदे पदे । नीतो दर्शयता दूरं यवनेशोऽद्रिकंदरम् ॥७॥
पदोपदीं स्पर्शती बोटें । तों तों यवन धांवे नेटें । म्हणे आतां पळसी कोठें । माझे चपेटे चुकवूनी ॥४२॥
हातीं सांपडलियाचि परी । आपणातें त्या दावी हरि । पदोपदीं स्खलना वारी । तनु सांवरी पुनः पुनः ॥४३॥
पळतां पळतां जाती झोंक । तैसाचि धीरें सांवरी तवंक । तंव पाठीशीं ताम्रमुख । मारी हाक भयंकर ॥४४॥
हस्त वितस्ति अंगिळें चारी । अलब्धगात्र स्पर्शें करीं । आवेशें दीर्घ हाका मारी । मानी अंतरीं हस्तगत ॥४५॥
जीवधाकें पळतो हरि । मार्ग अमार्ग हें न विचारी । दरें दरकुटें गिरिकंदरीं । घोर कान्तारीं धांवतसे ॥४६॥
कडे कपाटे डोंगर । नद्या प्रस्रव द्रुम पाथर । पुलिनें खदकें कंटक क्रूर । कर्दम दुस्तर उल्लंघिती ॥४७॥
पळतां अवचितें मृग जंबुक । वराह वानर कुंजर वृक । व्याघ्र चमरीमृगनायक । पळती निःशंक जीवभयें ॥४८॥
ऐसा हावे चढवूनि यवन । कृष्णें करूनि पलायन । नेला गिरिकुक्षीं वोढून । निधनकारण लक्षूनी ॥४९॥
म्लेच्छ मानी आपुले मनीं । पळतां कृष्णासि जाली ग्लानि । आतां प्रतापें आकळोनी । बळें बांधोनि नेईन ॥५०॥
तंव तो गतिमंतांचा स्वामी । ज्याचेनि मारुत जवीन व्योमीं । चपळ कल्पना मनोधर्मीं । कामना कामीं अनावर ॥५१॥
तयासि पळतां कायसे कष्ट । कालयवनाचें वळलें मेंट । तथापि धरूनियां धारिष्ट । बोले लघिष्ठ नोकूनी ॥५२॥
पलायनं यदुकुले जातस्य तव नोचितम् । इति क्षिपन्ननुगतो नैनं प्रापाहताशुभः ॥८॥
म्हणे रे यदुकुळीं जन्मोन । समरीं करिसी पलायन । हें तुज उचित नोहे जाण । पाहें परतोन मुख दावीं ॥५३॥
पुरुषचिह्नें आंगीं वाहसी । तरी कां समरीं पळोनि जासी । यदुकुळीं जरी जन्मलासी । तरी समरासि दृढ होयीं ॥५४॥
ऐसा बहुधा निस्तेजून । बोलत होत्साता पै यवन । कृष्णामागें परम जवीन । करी यत्न धरावया ॥५५॥
अहताशुभ जो अक्षीणकर्मा । धरूं न शकेचि मेघश्यामा । मांद्य जाणोनि आपुल्या वर्ष्मा । नोकी जन्मा यदुकळींच्या ॥५६॥
एवं क्षिप्तोऽपि भगवान्याविशद्गिरिकंदरम् ।
सोऽपि प्रविष्टस्तत्रान्यं शयानं ददृशे नरम् ॥९॥
ऐसा हिणावितांही हरि । दाटोदाटीं गिरिकंदरीं । प्रवेशला गुहाद्वारीं । तोषे अंतरीं यवनेंद्र ॥५७॥
आतां पळेल कवणे ठाइं । गुहेमाझारी कोंडला पाहीं । गुहा धांडोळोनि सर्वही । धरीन बाहीं कवळूनी ॥५८॥
म्हणोनि प्रवेशे गुहेमाजी । भीतरी न्याहाळी नेत्रकंजीं । अन्यत्र पुरुष निद्रिस्त सहजीं । सध्वान्ततेजीं अवगमला ॥५९॥
मंद प्रकाशामाजि जेंवि । रुज्जु लपोनि सर्पत्व दावी । काळयवनें तयाचि भावीं । तो नर माधवीं अवगमिला ॥६०॥
कालयवनातें नेऊनि तेथें । निजरूप लपविलें भगवंतें । यवन वितर्की आपुल्या चित्तें । तें कुरुनाथें परिसावें ॥६१॥
नन्वसौ दूरमानीय शेते मामिह साधुवत् ।
इति मत्वाऽच्युतं मूढस्तं पदा समताडयत् ॥१०॥
बहुतेक मातें आणूनि दुरी । प्रवेशोनि हा गुहान्तरीं । येथें निजेला साधूपरी । ऐसें अंतरीं मानूनी ॥६२॥
अच्युत ऐसें त्या मानून । भगवन्मायामोहित यवन । मूढमतीस्तव लत्ताहनन । करिता जाला तयातें ॥६३॥
कालयवनाच्या लत्ताप्रहारें । जालें निद्रिता चेइरें । निद्रा भंगतां निर्जरवरें । म्लेच्छ संहरे तें ऐका ॥६४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP