अध्याय ५१ वा - श्लोक ४६ ते ५०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
मुचुकुंद उवाच - विमोहितोऽयं जनं ईश मायया त्वदीयया त्वां न भजत्यजर्थदृक् ।
सुखाय दुःखप्रभवेषु सज्जते गृहेषु योषित्पुरुषश्च वंचितः ॥४६॥
वर माग ऐसी ऐकोनि आज्ञा । परम विशुद्ध नृपाची आज्ञा । अभीष्ट विवरितां कामना । इत्यर्थ मना जो केला ॥६१॥
तो हा ऐकोनि सज्जनीं । स्वयें विवरिजे आपुले मनीं । प्राप्तप्रसंगें निरूपणीं । सूचना म्हणोनि हे दिधले ॥६२॥
मुचुकुंद विवरी आपुल्या चित्तीं । परम दुर्लभ भगवद्भक्ति । नश्वर भवसुखविषयासक्ति । तत्कामरति अतितुच्छ ॥६३॥
इहामुष्मिक जाणोनि तुच्छ । ते वर न मगों कुत्सित कुत्स । तमिस्रागर्भीं खद्योतपुच्छ । तेंवि हे स्वच्छ भ्रमग्रस्ता ॥६४॥
भगवच्चरणीं विमुख अभक्त । तेचि या भवभोगीं आसक्त । आठां श्लोकीं तच्चेष्टित । वर्णीं विरक्त होऊनी ॥२६५॥
संसार दुःखाचा सागर । जाणत असतां प्राणिमात्र । होती भवसुखदुराशापर । हे मोहक दुस्तर तव माया ॥६६॥
ऐसा प्राकृत मायाग्रस्त । प्राणी भवभोगीं आसक्त । दों श्लोकीं ते वर्णूनि मात । कथी निजवृत्त सा श्लोकीं ॥६७॥
एवं अष्टश्लोकावदि । भवसुख तुच्छत्वें प्रतिपादी । तें व्याख्यान सत्संसदीं । जिज्ञासुवृंदीं परिसावें ॥६८॥
सर्वनियंता श्रीभगवान । ईश ऐसें त्या संबोधन । भो भगवंता तुज अधीन । प्राणी गौण गुणबद्ध ॥६९॥
पुरुष योषिता द्विविध कोटी । सुखभोगार्थ जीवकोटी । तुझिया मायेच्या मोहापोटीं । स्वहितगोठी अनोळक ॥२७०॥
यालागिं अनर्थदृक् त्या नाम । अर्थ इच्छूनि अनर्थकर्म । करिति तो हा भवसंभ्रम । अतिदुर्गम दुःखाब्धि ॥७१॥
परमार्थ सुखरूप जो तूं आत्मा । तो विसरले आत्मप्रेमा । म्हणोनि विमुख तव पादपद्मा । वधूधनसद्मा भजताती ॥७२॥
स्त्रीसंभोगीं परम सुख । भावूनि तव भजनीं नर विमुख । पुरुषीं तैसीच वनिता देख । आत्यंतिक सुख भावी ॥७३॥
ऐसीं परस्परें सुखबुद्धि । भ्रमोनि वरपडलीं भवाब्धि । सुखार्थ कवळिती उपाधि । तों तों खेदीं आतुडती ॥७४॥
योषित्संगें सुख भोगणें । म्हणोनि योषिता मेळवी यत्नें । तदर्थ भोगांचीं साधनें । करितां बंधनें दृढ होती ॥२७५॥
भोग न फवे उघडवासीं । म्हणोनि आरंभी सदनासी । गृहसमृद्धि मेळवावयासी । दाही दिशीं धावतसे ॥७६॥
नाना धान्यें षड्रस अन्न । मेळवावयाचे क्लेश गहन । गुडाज्यशर्करास्नेहलवण । संग्रह साधन क्लेशपर ॥७७॥
वसनें भूषणें धातुपात्रें । शय्या वितानें चित्रविचित्रें । धनगोधनें इष्टें मित्रें । आप्तें इतरे दास दासी ॥७८॥
यांचे पडतां योगक्षेमीं । तृष्णाजाळ मन आक्रमी । सुख कामितां दुःखधामीं । पडोनि अधर्मीं विचंबिजे ॥७९॥
वनिता केली सुखभोगार्थ । तेथ क्लेशचि जाले प्राप्त । न जोडे स्वार्थ ना परमार्थ । जन्मचि व्यर्थ गमाविला ॥२८०॥
मोहक तव माया हे गहन । सुरनरतिर्यक भ्रमवी जाण । त्यांमाजि दोन्ही कर्माधीन । विविश बंधनफळ भोगीं ॥८१॥
स्वर्गीं सुकृतफळाचा भोग । स्वप्नप्राय हारपे चांग । दुष्कृतभोगीं तिर्यग्वर्ग । विवेकप्रसंग त्या नाहीं ॥८२॥
स्वर्गीं शक्र नरकीं कृमि । कामसुखाची समान ऊर्मी । देहाभिमानाच्या संभ्रमीं । भगवत्प्रेमीं विमुखत्व ॥८३॥
तें एक मनुष्यदेहीं घडे । तो देह लाहूनि विषयचाडे । आयुष्य वेंचूनि नरकीं पडे । हें कर्म कुडें नृप वर्णी ॥८४॥
लब्ध्वा जनो दुर्लभमत्र मानुषं कथंचिदव्यंगमयत्नतोऽनघ ।
पादारविंदं न भजत्यसन्मतिर्गृहांधकूपे पतितो यथा पशुः ॥४७॥
स्वर्गीं नरकीं अचुक भोग । मानुषीं संबंधे आत्मविवेक । तो दुर्लभ देह लाहोनि देख । विषयीं मूर्ख नागवती ॥२८५॥
दुर्लभ मनुष्यत्व लाहोन । दैवें अवयवपटुता पूर्ण । अंधमूकबधिरत्वविहीन । तनुवाड्मन अनुकूळ ॥८६॥
नरदेह म्हणिजे कर्मभूमि । येथूनि पाविजे कैवल्यधामीं । तें विसरोनि विषयकामीं । आयुष्य अधर्मीं गमाविजे ॥८७॥
ज्याचेनि स्मरणें अघनिवृत्ति । अनघसंबोधनें तो श्रीपति । संबोधूनियां मुचुकुंदनृपति । म्हणे दुर्मतिजन न भजे ॥८८॥
नरदेह लाहूनि तव पदपद्मा । न भजोनि निश्चळ मानी पद्मा । रंगे धनुसुतवनितासद्मा । तो असादात्मा असन्मति ॥८९॥
जैसा कोमळ तृणार्थ पशु । विवेक न करूनि धरी हव्यासु । पतनक्लेशु । भोगी विशेष मंदमति ॥२९०॥
तैसाचि विषायान्ध विवेकशून्य । गृहान्धकूपीं पावे पतन । भगद्भजनीं विमुख जन । पशुहीहून पामर तो ॥९१॥
असो जनाची किमर्थ गोठी । मजही घडली तेचि राहटी । पडली तव पदभजनीं तुटी । तें वाक्पुटीं वर्णितसें ॥९२॥
ममैष कालोऽजित निष्फलो गतो राज्यश्रियोन्नद्धमदस्य भूपतेः ।
मर्त्यात्मबुद्धेः सुतदारकोशभूष्वासज्जमानस्य दुरन्तचिंतया ॥४८॥
भो भो अजिता अज अव्यया । यावत्काळ मम वय वायां । गेलें भजतां भवसुखनिलया । नृपमदश्रिया औद्धत्यें ॥९३॥
माझा निष्फळ गेला काळ । राज्यश्रियोन्नद्ध व्याकुळ मनुष्यदेव म्हणवीं स्थूळ । मानूनि केवळ आत्मत्वें ॥९४॥
पाञ्चभौतिक मर्त्यशरीर । मानितां आत्मत्वें नश्वर । पुत्रदारकोशभाण्डार । सर्व भूचक्र अभिमानी ॥२९५॥
इत्यादि अभिमानें वेंठला । म्हणोनि निष्फळ काळ केला । नाहींच स्वहितविवेक केला । कीं जें व्यापिला राज्यपदें ॥९६॥
राज्योन्मादभ्रमाची थोरी । म्हणे तूं परमात्मा अवधारीं । पश्चात्तापें नृपवैखरी । व्याख्यान करी तें ऐका ॥९७॥
कलेवरेऽस्मिन्घटकुड्यसन्निभे निरूढमानो नरदेव इत्यहम् ।
वृतो रथेभाश्वपदात्यनीकपैर्गां पर्यटंस्त्वागणयन्सुदुर्मदः ॥४९॥
जैसा मृत्तिकेचा मृद्घट । कें मृद्भित्तिभव मृण्मय मठ । तद्वत्कलेवर कळतां स्पष्ट । अहंताविष्ट आत्मत्वें ॥९८॥
ऐसिया स्थूळदेहाच्या ठायीं । देहाभिमानें निरुढ पाहीं । म्हणवीं भूचक्राच्या ठायीं । नरदेव अक्षयीं श्रीमंत ॥९९॥
ऐसा अभिमान धरूनि आंगीं । वेष्टित अमात्यसैनिकवर्गीं । रथगजपदातिसह तुरंगीं । सैनिकसंगीं भू विचरें ॥३००॥
ऐसा लाहोनि ऐश्वर्यमद । एकातपत्री भूप विशद । तूतें न गणींच मी दुर्मद । एवं प्रमाद आघवा ॥१॥
तूं काळाचा अंतकाळ । सर्वग सर्वात्मा गोपाळ । लवनिमेषें ग्रसनशीळ । मोहान्ध बरळ तुज न गणीं ॥२॥
वियषमदें ऐश्वर्यगुणें । तुज न गणितां उन्मत्तपणें । परी तूं न विसंबसी क्षणें । भास्करभ्रमणें आक्रमिसी ॥३॥
तेचि आक्रमणाची रीति । वदली मुचुकुंदभारती । शुक निरूपी परीक्षिती । ते येथ श्रोतीं परिसावी ॥४॥
प्रमत्तमुच्चैरिति कृत्यचिंतया प्रवृद्धलोभं विषयेषु लालसम् ।
त्वमप्रमत्तः सहसाभिपद्यसे क्षुल्लेलिहानोऽहिरिवाखुमंतकः ॥५०॥
विषयमदें मदोन्मत्त । धनसुतवनितादेहासक्त । नृपऐश्वर्यें होऊनि भ्रांत । नेणें कृतारतग्रासक तूं ॥३०५॥
म्हणसी विसरासि काय कारण । प्रपंचकृत्यांचें चिंतन । तियें कृत्यें म्हणसी कोण । ऐक लक्षण तयांचें ॥६॥
शत्रुनिग्रहणीं प्रयत्नशीळ । यास्तव रक्षिजे प्रबळबळ । अभयपत्रें प्रजापाळ । न्याय निर्मळ धर्मपथें ॥७॥
परदुर्गग्रहणाचे प्रयत्न । द्वीपान्तरीं करूनि यान । नूतनराष्ट्रें संपादून । मुद्रामान स्वशिक्षा ॥८॥
कुमराकुमरींचे विवाह । तडागजलाशयप्रवाह । पथ्यभेषजीं पटुतर देह । आश्रितनिर्वाहयोजना ॥९॥
ममता वालभ लालस ललिता । भद्रीं अवहित नाट्यगीता । नियोगी लेखन गवेषणार्था । करितां चित्ता अनुंगडं ॥३१०॥
इत्यादि कृत्यें सांगों किती । यांची करितां उभराभरती । अनवधानता आत्मस्वहितीं । न घडे भक्ति तद्योगें ॥११॥
जर्ही मनोरथ भग्न होती । तर्ही दुत्यज विषयासक्ति । तदौत्सुक्यें वाढे प्रीति । हे माया भ्रांतिप्रवर्तक ॥९२॥
प्रबळदैवें मनोरथ प्राप्त । पुढती तेणें प्रलोभ स्वार्थ । तृष्णाजाळ वाढेव बहुत । अवचित कृतान्त तूं ग्रासिता ॥१३॥
कृतान्त ग्रासील मजला पुढें । विषयव्यापारें नेणे वेडें । अवधि भरतां देऊनि झडे । रगडी दाढे काळात्मा ॥१४॥
जेंवि बिळाबाहेर चारयालोभें । मूषक विचरे तनुवालभें । जिह्वा लाळित भुजंग क्षोभें । ग्रासी न लभे मग शुद्धि ॥३१५॥
ज्या देहाचें प्रेम गहन । काळें ग्रासितां तो पावे मरण । मग तयाची व्यवस्था कोण । तेंही लक्षण नृप वर्णी ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP