अध्याय ५१ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


शुश्रूषतामव्यलीकमस्माकं नरपुंगव । स्वकर्म जन्म गोत्रं वा कथ्यतां यदि रोचते ॥३१॥

ऐकों इच्छितियां आम्हांसी । यथार्थवादें पुशिली पुशी । नरश्रेष्ठा तव मानसें । मानेल तैसी निरूपीं ॥२००॥
जरी हे रुचेल मम प्रार्थना । तरी तूं निरूपीं क्रमेंचि प्रश्ना । स्वगोत्र जन्म कर्माचरणा । बोधवीं श्रवणामाजिवडें ॥१॥
कोणापासूनि तुझें जन्म । कोण गोत्र काय नांव । कोण वृत्ति कैसें कर्म । यथानुक्रमें बोधवीं ॥२॥
इत्यादि मातें पुससी जरी । स्वमुखें कथितों मे अवधारीं । त्यानंतरें तूं कथन करीं । संशय अंतरीं न धरूनी ॥३॥

वयं तु पुरुषव्याघ्र ऐक्ष्वाकाः क्षत्रबंधवः ।
मुचुकुंद इति प्रोक्तो यौवनाश्वात्मजः प्रभो ॥३२॥

भो भो श्रेष्ठो नरशार्दूळा । आमुची ऐक्ष्वाकवंशमाळा । माजि जन्मलों क्षत्रियकुळा । जनक बोलिला मान्धाता ॥४॥
मुचुकुंद ऐसें नाम माझें । तारकसमरीं सुरवरकाजें । युद्ध केलें प्रतापतेजें । स्वधर्मव्याजें चिरकाळ ॥२०५॥
सुरकैपक्षी षण्मुख आला । तारकसमरीं सज्ज जाला । क्लेशोपशमना निर्जरी मजला । निरोप दिधला ते समयीं ॥६॥

चिरप्रजागरश्रांतो निद्रयापहतेंद्रियः ।
शयेऽस्मिन्विपिने कामं केनाप्युत्थापितोऽधुना ॥३३॥

दोनी महर्युगें मात्र । युद्ध केलें अहोरात्र । समरश्रमें श्रान्तगात्र । मुकुलितनेत्र निद्रेनें ॥७॥
विकळ इंद्रियें निद्राभरें । मग यें विपिनीं निर्जरवरें । निद्रा केली स्वेच्छादरें । कोणें चेइरें मज केलें ॥८॥
आतां निद्रा भंगोनि मातें । जेणॆं उठविलें अवचितें । तोही जळाला दृगग्निपातें । निज दुष्कृतें बहुतेक ॥९॥

सोऽपि भस्मीकृतो नूनमात्मीयेनैव पाप्मना ।
अनंतरं भवाञ्श्रीमांल्लश्रीतोऽमित्रशातनः ॥३४॥

त्यानंतरें देदीप्यमान । देखिलासि तूं श्रीभगमान । भो भो अमित्रनिबर्हण । मित्रतोषण मित्रात्मा ॥२१०॥

तेजसा तेऽबिषह्येण भूरि द्रष्टुं न शक्नुमः ।
हतौजसो महाभाग माननीयोऽसि देहिनाम् ॥३५॥

तुझ्या अविषह्य तेजें करून । पहावया असमर्थ आमुचे नयन । न पाहवेचि चंडकिरण । डुडुळालागून साकल्यें ॥११॥
जितुकें प्राणी देहधारी । त्यांसि मानार्ह तूं चराचरीं । महाभाग या नामोचारीं । संबोधूनियां म्हणतसें ॥१२॥
तुझिया तेजःप्रतापेंकरून । स्तिमित बुद्ध्यादि इंद्रियगण । हतौजसपदांचें व्याख्यान । विस्मयापन्न करीतसे ॥१३॥
नृपदर्शनीं सामान्य रंक । चकित पाहे जेंवि साशंक । तेंविच मुचुकुंदें श्रीवत्साङ्क । होऊनि अल्पक प्रार्थिला ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP