अध्याय ५१ वा - श्लोक ५६ ते ६०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
न कामयेऽन्यं तव पादसेवनादकिंचनप्रार्थ्यतमाद्वरं विभो ।
आराध्य कस्त्वां ह्यपवर्गदं हरे वृणीत आर्यो वरमात्मबंधनम् ॥५६॥
विभो ऐसें संबोधन । विभवें विभुत्व तुझें पूर्ण । तुजवीण समर्थ असे कोण । गुणपरिपूर्ण ब्रह्मांडीं ॥५१॥
समर्था तव पादसेवनावीण । आन न कामी अंतःकरण । जें प्रार्थिती अकिंचन । सकाम होऊन निष्कामही ॥५२॥
ते अकिंचन म्हणाल कैसे । अनित्यबोधें भववैरस्यें । अतद्व्यावृत्तिनिरासें । सच्चित्प्रकाशें उजळले ॥५३॥
ऐसियासही जें प्रार्थ्यतम । त्याहूनि वरिष्ठ तव पदप्रेम । तद्व्यतिरिक्त नुपजे काम । जाणसी हृत्पद्मसाक्षित्वें ॥५४॥
ईश्वरपर्यंत आराधक । सर्वांसि आराध्य तूंचि एक । कृपाळू अपवर्गदायक । त्या तूतें भवसुख कोण मागे ॥४५५॥
विवेकसंपन्न त्या नाम आर्य । ऐसा कोण पां विवेकी होय । मोक्षदा तूतें भवभ्रमविषय । बंधनोपाय याचील ॥५६॥
अनंतजन्मसहस्रें पूर्वीं । तपोध्यानसमाधिविभवीं । तूंतें अराधूनि भवगोंवी । याचिजे केवीं स्वबंधनें ॥५७॥
यालागिं त्वत्पादभजनाविणें । वरदुराशाप्रलोभणें । प्रलोभ नुपजे अंतःकरणें । हें सर्वज्ञें जाणावें ॥५८॥
प्रथमस्फुरणजनित सृष्टि । पासूनि आजिपर्यंत घरटी । जन्ममरणांच्या वाहवटीं । कामनाकोटी अनावरा ॥५९॥
झाडीं बांधोनि कांठपरा । भरितां न भरे विदिहरशक्रां । कीं अर्पितां इंधनभारा । वैश्वानरा अतृप्ति ॥४६०॥
कीं वृष्टिभरें भरोनि सरिता । अहोरात्र समुद्र भरितां । आपूर्यमाण राहे रिता । तेंवि तत्वतां भवकाम ॥६१॥
हेही भरती कोण्ही काळीं । परी दुर्भर काम प्रबळबळी । विषयेंद्रियांच्या संमेळीं । विश्वा आकळी प्रलोभें ॥६२॥
ऐसिया कामाची निवृत्ति । तैंचि उपजे भवविरक्ति । यास्तव तव पदभजनीं रति । प्रकटे सन्मतीमाजिवडी ॥६३॥
देनि ऐसिया अधिकारा । पुढती माग म्हणसी वरा । तरी तव पदभजनावीण अपरां । न भजें दुर्भरां भवकामा ॥६४॥
तस्माद्विसज्याऽऽशिष ईश सर्वतो रजस्तमःसत्त्वगुणानुबंधनाः ।
निरंजनं निर्गुणमद्वयं परं त्वां ज्ञप्तिमात्रं पुरुषं व्रजाम्यहम् ॥५७॥
भो भो ईशा सर्वात्मका । सर्वैश्वर्यप्रदायका । न देववे जें अमरप्रमुखां । त्या चित्सुखा दायक तूं ॥४६५॥
यास्तव समर्थ तूं ईश्वर । तरी वर्जूनि वर नश्वर । जे कां रजतमसत्वाकार । सर्व संसारबंधमय ॥६६॥
रजोगुणाचें बंधन । ऐश्वर्यसमृद्धिभोगसंपन्न । तमोगुणें भू असपत्न । शरुमरण जयकाम ॥६७॥
सत्वगुणें स्वधर्मरति । प्रजापालन धर्मपवृत्ति । पुनः पुनः पुनरावृति । भवनिवृत्ति इहीं न घडे ॥६८॥
यालागिं सर्वत्र ऐसे गौण जिहीं । पुढती भवबंधन ते अवघेचि वर वर्जून । त्वदेकशरण वांछितसें ॥६९॥
अविद्यावेष्टित अपर पुरुष । ते वर्जून गौण अशेष । जो तूं उत्तमपरमपुरुष । तूंतें निःशेष मी भजलों ॥४७०॥
म्हणसी पुरुष प्रकृतिमंत । तरी तन्नियंता ईश्वर नाथ । त्या तूंतें मी शरणागत । ईश समर्थ सर्वग तूं ॥७१॥
अनंतब्रह्मांडांभीतरी । ज्ञप्तिमात्र जो चराचरी । ज्ञानघन जो निर्विकारी । सर्वविकारी अनुगत जो ॥७२॥
विकारीं अनुगत जाला असतां । म्हणसी कैसी निर्विकारता । तरी निरंजन विशेषणें तत्वता । रासता गौणमळा ॥७३॥
अष्टलोहाची परीक्षा । वह्नि जाणे प्रकाशकदीक्षा । परी तन्मळाची करूनि रक्षा । साक्षित्वशिक्षा न भंगे ॥७४॥
तेंवि प्रकाशूनियां गुण । जो तूं गुणसाक्षी निर्गुण । तोही कैसा पुससी खुण । तरी द्वैतविहीन अद्वय जो ॥४७५॥
अतएव द्वैताची उत्पत्ति । तेथूनि पुंजाळे संसृति । वाढे मोडे घडे गणती । शरणावाप्ति त्या सर्वां ॥७६॥
म्हणोनि अक्षर जो निर्गुण । त्या तूंतें मी जालों शरण । न मगें नश्वर वर यावीण । पुन्हा प्रार्थन काय करी ॥७७॥
ऐकोनि मुचुकुंदाच्या उक्ति । परमाह्लाद कृष्णचित्तीं । म्हणे अगाध याची स्थिति । तीव्र विरक्ति बाणली ॥७८॥
पुढती म्हणे ऐक्ष्वाकवर्या । परमविरक्त मान्धातृतनया । दैवें मत्प्रपति जालिया । कैवल्य राया करस्थित ॥७९॥
परंतु साम्राज्यपदीं जे भोग । लावण्यतारुण्यवयसासांग । अपूर्णकामें लाहूनि स्वर्ग । देव अभंग कुढाविले ॥४८०॥
पुढती भोगाची कामना । धरूनि जातां भद्रासना । देवींण सूचिली कालकलना । मग आलासि वना तद्विरहें ॥८१॥
तरी तें आतां मत्प्रसादें । भोगीं साम्राज्यैश्वर्य समुदें । कैवल्य करतलस्थित या मोदें । विषय विनोदें आस्वादीं ॥८२॥
इत्यादि विषयप्रलोभें हरि । झणें घालील भवसागरीं । म्हणोनि कृष्णाचे चरण धरी । मज यावरी हें न कथीं ॥८३॥
म्हणसी मद्वरें ऐश्वर्य भोग । जोडतां कां तूं मानिसी उबग । तरी हे माझी विनति सांग । ऐकें त्रिजगत्सुखजनका ॥८४॥
चिरमिह वृजिनार्तस्तप्यमानोऽनुतापैरवितृषषडमित्रो लब्धशांतिः कथंचित् ।
शरणद समुपेस्तत्पदाब्जं परात्मन्नभयमृतमशोकं पाहि मापन्नमीश ॥५८॥
जंववरी अज्ञानाचें पटळ । तंववरी स्वहित नेणें बाळ । क्रीडासुखें कवळी अनळ । होय सपोळ परी न टकी ॥४८५॥
तें उमजल्या न धरी हातीं । तैसी मजला जाली गति । अंतर्वेत्ता तूं श्रीपति । काय तुजप्रति म्या कथिजे ॥८६॥
वृजिनें म्हणिजे परमदुःखें । चिरकाळ कवळिलीं मानूनि सुखें । तियें कर्मफळेंचि अशेखें । फळती क्लेशें पुनः पुनः ॥८७॥
तेणें जालों परम आर्त । परंतु त्यांचा न सुटे स्वार्थ । पुढती तद्वासना अभिरत । त्रितापतप्त अतिदुःखी ॥८८॥
तथापि न वचे विषयतृष्णा । विमुखार्कमृगें भ्रमोनि उष्णा । ऊषरीं भावूनि जळभावना । धांवती राना जळलोभें ॥८९॥
तेथ साचचि नाहीं जळ । परंतु मृगांसि तृष्णा बहळ । धांवतां प्राण होती विकळ । तेंवि हे केवळ भवतर्षा ॥४९०॥
अवितृष म्हणिजे अविगततृष्णा । अतृप्त विषयांची वासना । तदर्थ दुःकें भोगी नाना । पुढती कामना भवभोगीं ॥९१॥
एवं भ्रमतां भवकाननीं । अमित्रवर्गीं साही जणीं । विषयप्रलोभें दावूनि ग्लानि । षड्विधकरणीं जाचिजत ॥९२॥
ऐसा भवंता शत्रुमेळ । तापत्रयाचे इंगळ । कर्में भोगितां चिरकाळ । न सुटे हळहळ विषयांची ॥९३॥
कामशत्रु इंद्रियाहातीं । वोपूनि बुडवी तृष्णावर्तीं । यालागिं आकल्प अलब्धशांति । मग विश्रांति कैं लाभे ॥९४॥
अशांतासि कैचें सुख । एवं चिरकाळ भोगितां दुःख । अवचट दैवें पादोन्मुख । जालों नावेक जगदीशा ॥४९५॥
तव पदप्रणति जैं लाहणें । त्यातेंचि ऊर्जित दैव म्हणणें । उपलब्धशान्तिसुखाचें लेणें । आंगीं बाणे ते काळीं ॥९६॥
सर्व दुःखाचें निरसन । जेणें होय तें अपरोक्ष ज्ञान । तद्दाता तूं श्रीभगवान । तुज संबोधन शरणद हें ॥९७॥
अगा शरणदा श्रीगोपति । शरण तव पदपद्माप्रति । आलों माझी छेदीं आर्ति । निजविश्रान्ति वोपूनि ॥९८॥
शोकवर्जित तव पदकंज । यालागिं विशोक म्हणणें सहज । जेथ निमालें भयाचें बीज । परम निजगुज निर्भय तें ॥९९॥
ऋत म्हणिजे सत्यस्वरूप । तें एक परब्रह्म निष्कंप । भयशोकादि अनृतलेप । इत्यादि विकल्प ज्या न शिवे ॥५००॥
ऐसिया तव पदपद्माप्रति । आपदाव्याप्त सक्लेशमति । शरण आलों भवविपत्ति । छेदूनि आर्ति मज रक्षीं ॥१॥
ऐसें स्तवितां मुचुकुंदभूप । ऐकोनि भक्तामरपादप । बोलता जाला परम सकृप । तो नृपा संक्षेप मुनि सांगे ॥२॥
श्रीभगवानुवाच - सार्वभौम महाराज मतिस्ते विमलोर्जिता ।
वरैः प्रलोभितस्यापि न कामैर्विहता यतः ॥५९॥
हर्षयुक्त हास्यवदनें । भगवान मुचुकुंदातें म्हणे । सार्वभौम या संबोधनें । महाराजमानें गौरवूनि ॥३॥
राया तुझी ऊर्जितमति । नितांत निर्मळ सुनिश्चिति । व्यवसित जाली हें जाणोनि चित्तीं । सप्रेमप्रीति संतुष्ट ॥४॥
ऊर्जित व्यवसित विमळ मति । याचा स्पष्टार्थ जाणीजे श्रोतीं । जेंवि वज्रमणि घनाच्या घातीं । अभंगस्थिति अनर्घ्य ॥५०५॥
तैसें तुजला सकामवरीं । प्रलोभितांही बहुतां परी । न झके ऐश्वर्यकामावरी । यास्तव खरी व्यवसित हे ॥६॥
वराभिलाषें प्रलोभन । करूनि पाहिलें सावधपण । तंव तव मति अनवधान । नाहीं म्हणोनि विमळत ॥७॥
वरप्रलोभन जें म्यां केलें । तें तुज सावधपणें वोपिलें । प्रमादापासूनि सोडविलें । हें तुज कळलें असों दे ॥८॥
प्रलोभितो वरैर्यत्त्वं मत्प्रसादाय विद्धि तत् ।
न धीर्मय्येकभक्तानामाशिर्भिर्भिद्यते क्कचित् ॥६०॥
अखिल व्यापक जो मी विष्णु । त्या माझ्या ठायीं समरसोन । विभक्तपणाचें भेदभान । ग्रासूनि जाले एकभक्त ॥९॥
ऐसिया अभक्तांची मति । मय्येकत्वें समरसावाप्ति । त्यांतें त्रिजगदैश्वर्यसंपत्ति । न धरिती आसक्ति जोडलिया ॥५१०॥
बलात्कारें त्रिजगदैश्वर्य । जोडल्या भोगी सज्ज न होय । साक्षित्वबोधें प्राकृतविषय । वमनप्राय पार्थक्यें ॥११॥
विषय साक्षित्वें आस्वादणें । भवसुख ऐसें यातेंचि म्हणणें । मद्भक्तांची बुद्धि येणें । भेटली न वचे तल्लाभें ॥१२॥
पूर्वीं चिरकाळ व्यवसायवती । होती म्हणोनि ते व्यवसितमति । ऐसें ऐश्वर्य मनोरथीं । भेद न पवती सज्जत्वें ॥१३॥
तरी ऐश्वर्य झकती कोण । ऐक राया तयांचें चिह्न । मुचुकुंदासि म्हणे भगवान । तें व्याख्यान अवधारा ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP