अध्याय ५१ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीपरमात्मने नमः ॥
श्रीमद्गोविंदपादाब्जभ्रमर । कृष्णदयार्णवआदेशकर । करूनि श्रोतियां नमस्कार । श्रवणीं सादर बैसऊनि ॥१॥
एकावन्नावे अध्यायीं । यवना येऊनि शेषशायी । मुचुकुंददृगग्निमाजि दाही । भेटे लवलाहीं मुचुकुंदा ॥२॥
यवनासमरीं पलायन । करिता जाला कां भगव्वान । म्हणाल तरी तें संबंधकथन । ऐका विष्णुपुराणोक्त ॥३॥
कालयवन यवनेंद्रकुमर । सर्व यादवां भयंकर । ऐसा जाणोनि शंकरावर । करी श्रीधर पलायन ॥४॥
येथ श्रोतयांचा आक्षेप । यवना वरद किमर्थ गरप । यदर्थी प्राचीन इतिहासकल्प । परिसा अल्प कथिजेतो ॥५॥
वृद्ध गर्गाचा तनय गार्ग्य । तपस्वी निर्जितकरणवर्ग । लोहचूर्णाशी स्वदारसंग । न करी प्रसंग स्वप्नींही ॥६॥
यास्तव उपहासें श्यालक । गार्ग्या म्हणतां नपुंसक । यादवीं ऐकोनि धीपूर्वक । षंढत्व सम्यक् आरोपिती ॥७॥
यादवांच्या ज्या हेलनोक्ति । ऐकोनि गार्ग्य क्षोभला चित्तीं । दक्षिणसमुद्रीं एकाग्रभक्ति । केला पशुपति प्रसन्न ॥८॥
द्वादश वर्षें लोहचूर्ण । भक्षूनि करितां अनुष्ठान । अघोर मंत्रपुरश्चरण तेणें । ईशान तुष्टला ॥९॥
प्रसन्न होतां काळाग्निरुद्र । गार्ग्यें याचिला ऐसा वर । यदुकुळहंता देईं कुमर । ऐकोनि शंकर गुह्य वदे ॥१०॥
कृष्णावेगळे यादव सर्व । समरीं जिंकील वत संभव । कृष्णही पावेल पराभव । न धरी हांव समरंगीं ॥११॥
ऐसी ऐकोनि वरदवाणी । परमाह्लाद गार्ग्यामनीं । वर लाधलों यदुकुळहननीं । समरांगणीं हरि न थरे ॥१२॥
गार्ग्य येतां निजसदनासी । मार्गीं यवनें देखिलें त्यासी । तेणें नेऊनि स्वनगरासी । भक्तिभावेंसिं पूजिलें ॥१३॥
वृत्तांत पुसतां सविस्तर । गार्ग्यें कथिला शंकरवर । यवनें करूनि नमस्कार । प्रार्थिला मुनिवर बहुयत्नीं ॥१४॥
तुमच्या वीर्यें माझिये क्षेत्रीं । पुत्र उत्पादा महाक्षत्रीं । कुठार होऊनि यादवगोत्रीं । करील धरित्री अयादवी ॥१५॥
भक्ति देखूनि तोषला मुनि । मग काळीनामका यवनपत्नी । तीच्या जठरीं स्ववीर्यदानीं । पुत्र देऊनि निघाला ॥१६॥
गार्ग्य गेलिया नंतर । यथाकाळें कालि कुमर । प्रसवली मधुकरभासुर क्रूर । वरदांकुर रुद्रांचा ॥१७॥
भूतसृष्टीचा संहारकाळ । होतां उदैजे प्रळयानळ । तेंवि वाढला यवनबाळ । यादवकुळनिर्दळणा ॥१८॥
काळा म्हणोनि काळयवन । सहज जालें गुणाभिधान । प्रतापी वीर कोठें कोण । पाहें धुंडून भूचक्रीं ॥१९॥
पुढें नारदें देतां सूचना । क्षोभ उदेला कालयवना । तेणें रोधितां मथुराभुवना । द्वारकारचना हरि करवी ॥२०॥
तेथ ठेवूनि मथुराजन । पाळावया हरवरदान । कृष्णें केलें पलायन । तें व्याख्यान अवधारा ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP