अध्याय ५१ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एवं संभाषितो राज्ञा भगवान्भूतभावनः । प्रत्याह प्रहसन्वाण्या मेघनादगभीरया ॥३६॥

ऐसिया प्रकारें मुचुकुंदराजा । बोलता जाला गरुडध्वजा । तें ऐकोनि कवणें वोजा । नंदात्मजा सुख जालें ॥२१५॥
वत्स धेनूसि हुदक्या मारी । तेणें वोरसें पान्हा भारी । मुचुकुंदप्रश्नें तेंवि हरि । तोषोनि अंतरीं बोलतसे ॥१६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । त्रिजगीं भूतांचा भावन । सृजनपालनोपसंहरण । कर्ता सर्वज्ञ भक्तपति ॥१७॥
तेणें हास्य करूनि वदनीं । मेघस्वनासम गभीर वाणीं । प्रतुत्तर त्या चक्रपाणि । देता जाला तें ऐका ॥१८॥

श्रीभगवानुवाच - जन्मकर्माभिधानानि संति मेंऽग सहस्रशः ।
न शक्यंतेऽनुसंख्यातुमनंतत्वान्मयाऽपि हि ॥३७॥

अनंताचिंत्यगुणपरिपूर्ण । सर्वीं सर्वग त्रिकालज्ञ । नृपातें स्वरूपपरिज्ञान । द्यावया कृतप्रश्न निरूपी ॥१९॥
माझिया जन्मकर्मा नामा । सहस्रेंसहस्र करितां सीमा । करूं न शकवे आमुची आम्हां । सुरहरब्रह्मा कें तेथें ॥२२०॥
सहस्र म्हणिजे अनंतवाची । जन्में कर्में नामें साचीं । असती तीं आम्हां आमुचीं । गणावयाची ठी न लभे ॥२१॥
जन्मकर्माभिधानातें । अनंतत्वास्तव कवणातें । गणना अशक्य विधिहरांतें । ऐसें नृपातें हरि वदला ॥२२॥
गणना अशक्य कोठवरी । अनंत अगाधतेची थोरी । बोधावया मधुरोत्तरीं । सांगे मुरारि तें ऐका ॥२३॥

क्कचिद्रजांसि विममे पार्थिवान्युरुजन्मभिः । गुणकर्माभिधानानि न मे जन्मानि कर्हिचित् ॥३८॥

पृथ्वी समग्र घालूनि कांखे । एकैक परमाणु गणितां अंकें । बहुताजन्मीं पुण्याधिक्यें । क्कचित् कदाचित् गणवती ॥२४॥
परंतु माझीं जन्में नामें । लीला प्रताप ऊर्जित कर्में । इत्यादि गुणगणनेचे सीमे । न पवती नियमें कदापिही ॥२२५॥

कालत्रयोपपन्नानि जन्मकर्माणि मे नृप । अनुक्रमंतो नैवांतं गच्छंति परमर्षयः ॥३९॥

सृष्टिस्थितिलयकालोपपन्नें । जन्मकर्मादि अनुक्रमणें । करितां महर्षींचीं ज्ञानें । नाहीं परपार पावलीं ॥२६॥
तथापि राया तुझिये मती - । माजि माझी वोळखी पुरती । होवावया वृत्तांत कथीं । तो तूं सुमति अवधारीं ॥२७॥

तथाप्यद्यतनान्मंग श्रृणुष्व गदतो मम । विज्ञापितो विरिंचे न पुराहं धर्मगुप्तये ॥४०॥

अद्यतनें म्हणिजे माझीं । जन्में कर्में नामें सहजीं । ये काळींचीं असतीं जीं जीं । ममोक्तवाजी ते ऐक ॥२८॥
कलिकाळाचा उदयाङ्कुर । यास्तव दैत्यरूपी भूवर । दुष्ट उत्पथ परम क्रूर । अन्यायकर बहु जाले ॥२९॥
तेणें पृथ्वी धेनुरूपें । येऊनि कथितां विरिंचिपें । ऐकोनि विधीनें साक्षेपें । विज्ञापना मज केली ॥२३०॥
धर्मसंरक्षणाकारणें । मी विनविलों चतुराननें । म्हणॊनि जालें अवतार धरणें । हें त्वा जाणणें पूर्ववृत्त ॥३१॥
करितां धर्माचें गोपन । तदंगकार्यें कोण कोण । करणें लागती मजलागून । समासें कथन तें ऐक ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP