अध्याय ५१ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


लब्ध्वा गुहं ते स्वःपालं मुचुकुंदमथाब्रुवन् ।
राजन्विरमतां कृच्छ्राद्भवान्नः परिपालनात् ॥१६॥

देवीं आपणा स्वर्गरक्षक । यत्नें आणूनियां षण्मुख । तेणें पदखळिला तारक नृप धार्मिक स्थिराविला ॥३७॥
सुरवर म्हणती मुचुकुंदातें । राया घेइजे विश्रांतीतें । आमुच्या पालनार्थ क्लेशातें । पावलासि तूं चिरकाळ ॥३८॥
ब्रह्मयाच्या वरें करून । षण्मुखहस्तें तारकमरण । तो दैत्येंसिं करील रण । तूं येथून विश्रामें ॥३९॥
क्षुधातृषानिद्रात्यागें । समरीं क्लेश सोसिले आंगें । आमुच्या कैपक्षप्रसंगें । ऐश्वर्यभोगें अंतरूनी ॥१४०॥
आम्हांनिमित्त ऐश्वर्य त्यजिलें । ऐसें देवीं जें बोलिलें । तें ये श्लोकीं निरूपिलें । श्रोतीं परिसिलें पाहिजे ॥४१॥

नरलोके परित्यज्य राज्यं निहतकंटकम् ।
अस्मान्पालयतो वीर कामास्ते सर्व उज्झिताः ॥१७॥

लक्षूनि नरलोकाची प्राप्ति । अमर मरणातें वांछिती । जेथ जन्मोनियां सुकृती । अक्षय साधिती कैवल्य ॥४२॥
त्या नरलोकाच्या ठायीं । जन्म लाहूनि सूर्यान्वयीं । क्षात्रधर्मीं नीतिन्यायीं । दुष्ट अन्यायी दंडिले ॥४३॥
निष्कलंक सर्व जगती । शासिली सप्तद्वीपवती । भविष्यमाणीं अथवा भूतीं । नाहीं नृपति तुज ऐसा ॥४४॥
ते त्वां तुमच्या पालनकार्या । स्वराज्यभोग त्यागिले राया । समरीं असुरां त्रासूनियां । निर्जरनिलया रक्षियलें ॥१४५॥
तुज रक्षितां अमरावती । जाली अजरामरत्वप्राप्ति । मर्त्यलोकींच्या भोगसंपति । त्यांची निर्गति अवधारा ॥४६॥

सुता महिप्यो भवतो ज्ञानयोऽमात्यमंत्रिणः ।
प्रजाश्च तुल्यकालीया नाऽधुना संति कालिताः ॥१८॥

निर्जर म्हणती मान्धातृतनया । भोगभोजनें ज्या तव जाया । पट्टमहिषी परम प्रिया । समानवया अनकूळा ॥४७॥
त्यांच्या ठायीं तव औरस । गुणाढ्य पुत्र जे रूपस । समरप्रवीण कृताभ्यास । स्वधर्मलालस तुजहूनी ॥४८॥
बंधु गोत्रज ज्ञातिवर्ग । तवाश्रयें जे प्रवृद्ध साङ्ग । भोगिती ऐश्वर्य भूभाग । शौर्यें समरंगप्रवीण ॥४९॥
अमात्य मंत्री सेनाधर । धीर धार्मिक शूर चतुर । चमू चतुर्विध दुर्गें राष्ट्र । एकातपत्र असपत्र ॥१५०॥
अनुकूळ प्रजा अनुशासना । अनुल्लंघ्य भूचक्रीं एकाज्ञा । सांडूनि ऐसिया सिंहासना । सुरक्षणा स्वीकेलें ॥५१॥
तियेकाळींचे स्त्रियापुत्र । मंत्री अमात्य सेनागोत्र । कोश भांडार दुर्गें राष्ट्र । काळें सर्वत्र भक्षिलीं ॥५२॥
तुझिये काळींचें दृश्य कांहीं । इये काळीं उरलें नाहें । भूतळीं जाऊनि पाहसी कायीं । कालप्रवाहीं गतसृष्टि ॥५३॥
कोण कैसा काळ म्हणसी । तोही राया तूं परियेसीं । जो अनावर ईश्वरासी । सृजूनि ग्रासी त्रिजगातें ॥५४॥

कालो बलीयान्बलिनां भगवान्विष्णुरव्ययः ।
प्रजाः कालयते क्रीडन्पशुपालो यथा पशून् ॥१९॥

राया तूं जरी ऐसें म्हणसी । समरीं तारक न थरे मजसीं । मत्प्रजांतें काळ ग्रासी । गोष्टी कायसी हळवट हे ॥१५५॥
तरी हें न म्हणावें भूपति । बळीष्ठाबळिष्ठ जितुके असती । त्यांहूनि बलिष्ठ काळशक्ति । करी समाप्ति सर्वांची ॥५६॥
ब्रह्म निर्गुण निराकार । तेथील प्रथम स्फुरणाङ्कुर । जगद्बीज जो ओंकार । तद्वत साचार कालात्मा ॥५७॥
काळकळनें नाकळे कांहीं । प्रणवबीजें तें सृजलेंचि नाहीं । यालागीं जो ईश्वर तोहि । कालप्रवाहीं लय पावे ॥५८॥
जे जे काळीं जें जें सृजिलें । तें तें तेव्हांचि काळें व्यापिलें । व्यापक विष्णुत्व जें संचलें । कालरूपीं तें जाण ॥५९॥
निमेषपळलवअहरहवेगें । कालप्रवाहीं लोटती युगें । त्यामाजि भ्रमिजे चंचळ जगें । क्रीडाप्रसंगें काळाचिया ॥१६०॥
स्थूळें चंचळें भ्रमती भुयी । तीं पडलिया प्रारब्धक्षयीं । लिंगें भ्रमवी नाना ठायीं । क्रीडाप्रवाहीं कालात्मा ॥६१॥
जेंवि पशूंतें पशुपालक । नानास्तानीं संस्थापक । होय रक्षक नियामक । काळ चाळक तेंवि जगा ॥६२॥
यालागीं बलिष्ठ कालसत्ता । जाणोनि राज्याची सांडीं आस्था । मागें जें तुज आवडे चित्ता । तो तत्त्वता वर देऊं ॥६३॥

वरं वृणीष्व भद्रं ते ऋते कैवल्यमद्य नः । एक एवेश्वरस्तस्य भगवान्विष्णुरव्ययः ॥२०॥

एक कैवल्य वेगळें करून । मागें अपेक्षित वरदान । कैवल्यदाता श्रीभगवान । विष्णु सनातन अव्यय जो ॥६४॥
तया ईश्वरावांचून कोण्हा । सामर्थ्य नाहीं कैवल्यदाना । त्यावीण अभीष्ट भोगनाना । आम्हां सुरगणां तूं मागें ॥१६५॥
राया कल्याण असो तूतें । तुवां रक्षिलें सुरगणांतें । उत्तीर्णया तव क्लेशातें । कांहीं आम्हां तें प्रार्थावी ॥६६॥
ऐसी ऐकोनि सुरवरवाणी । राजा विवरी अंतःकरणीं । कैवल्य नेदवे अमरांचेनी । न रुचे मनीं नैश्वर्य ॥६७॥
आतां वृथा मागणें काय । श्रमापहरणीं निद्रेसि ठाय । पुसतां निर्जर वदले काय । तें कुरुरायें परिसावें ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP