(१) पंचकविधि :- धनिष्ठा व त्या पुढील चार नक्षत्रांपैकी कोणत्याहि नक्षत्रावर मृत्यु आला असतां वंशास तो अशुभ समजतात, आणि वंशावर आलेलें अरिष्ट टाळण्यासाठीं पंचक विधि करतात. दर्भाचे पांच पुतळे करून त्यांस सांतूच्या पिठाचा लेप करतात, व त्यांची पूजा करून, प्रेताबरोबर ते जाळतात. या विधीनें वंशावर आलेलें अरिष्ट नाहीसें होतें अशी समजूत आहे.
(२) त्रिपादविधि :- त्रिपाद नक्षत्रावर मृत्यु आला असतांहि वंशास अनिष्ट समजतात, व तीन पुतळे करून त्यांची पूजा करतात व प्रेताबरोबर जाळतात.
(३) अस्थिक्षेपविधि :- अस्थि तीर्थांत टाकण्यासाठीं घेऊन जाण्यापूर्वीं एकोद्दिष्टविधीनें श्राद्ध करावें, व गंगा, नर्मदा इत्यादि तीर्थाकडे तोंड करून ‘ यमधर्माला नमस्कार असो ’ असें म्हणून बेंबी इतक्या पाण्यांत जावें; आणि ‘ त्याची माझ्यावर प्रीति असों ’ असें म्हणून अस्थि तीर्थांत सोडून द्याव्या.
(४) पंचकशांति :- धनिष्ठापंचक नक्षत्रावर मृत्यु आला असतां अकराव्या दिवशीं वृषोत्सर्ग व एकोद्दिष्ठ श्राद्ध करावयाचे पूर्वीं शान्ति करतात. या शान्तीनें वंशारिष्ट टळतें, अशी समजूत आहे.
(५) त्रिपादशांति :- त्रिपादनक्षत्रावर मृत्यु आल्यास वंशारिष्ट नाहीसें होण्यासाठी त्रिपादशांति करतात.
(६) पालाशविधि :- विदेशीं मरण येऊन मंत्राशिवाय प्रेतदहन केलें असल्यास तें उचित नाहीं, त्यासाठीं और्ध्वदेहिकक्रिया करण्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी पळसाच्या ( पालाश ) ३६० पानांचें कृत्रिम शरीर बनवून त्याचें शास्त्रोक पद्धतीनें दहन करतात.
(७) नारायणबलि :- आत्महत्येनें, पाण्यांत बुडून, अगर अन्य कारणानें मनुष्यास दुर्मरण ( वाईटरीतीनें मरण ) आले असल्यास दुर्मरणदोषाचे नाशासाठी नारायणबली करण्याची चाल आहे. या विधीत विष्णु, वैवस्वत व यम यांचें आवाहन करून षोडशोपचार पूजा करतात. आणि विष्णुरूपी प्रेत असा उच्चार करून मृताचें श्राद्ध करतात; व विष्णु, ब्रह्मा, शिव व यम या चौघांस चार पिंड सव्यानें, आणि मृतास पांचवा पिंड अपसव्यानें देतात. शेवटी ‘ मृत मनुष्य या नारायणबलीच्या योगानें पापापासून मुक्त होवो ’ अशी विष्णूची प्रार्थना करितात.
(८) सर्पदंशानें मरण आल्यास करावयाचें कृत्य :- सर्पदंशानें मरण आल्यास, पिठाचा नाग करून प्रत्येक महिन्यास नागाची पूजा करावी; व वर्षांतीं सोन्याचा नाग व गाय यथाविधि पूजन करून दान करावी. श्राद्ध वगैरे कृत्यें नारायणबलीप्रमाणें करावी.
(९) ब्रह्मचारी मरण पावला असतां त्याविषयीं विशेष कृत्य :- ब्रह्मचर्यव्रत मोडल्याबद्दल प्रायश्चित्त देऊन ब्रह्मचारिव्रत सोडण्याचा संस्कार ( ब्रह्मचर्यव्रत विसर्जन ) मेल्यावर त्याच्या देहास करितात. व विवाहसंस्कार अर्थात् झाला नसल्यानें तोहि त्याप्रेताचा रुईशी करतात. नंतर दहन करतात.
(१०) स्तानकाचे ( सोडमुंज झालेल्याचे ) मरणांत विशेष विधि :- रुईशी विवाह करून नंतर दहन करितात.
(११) रजस्वला मरणविधि :- अशुद्ध स्थितींत मरण आल्यामुळें प्रथम प्रायश्चित्त करून नंतर सातूंचे पिठाचा प्रेतास लेप करावा. नंतर कर्त्यानें स्नान करावें आणि एकशें आठ वेळ प्रेतास सुपानें स्नान घालावें. नंतर राख, शेण, माती दर्भमिश्रित उदक, पंचकगव्य व शुद्ध उदक यांहीं प्रेतास स्नानें घालून प्रेत शुद्ध - करावें, नंतर यथाविधि दहन करावें.
(१२) गर्भिणी मरणविधि :- गर्भ राहून सहा महिनें झाल्यावर मरण आल्यास कर्त्यानें प्रेतावर गोमूत्र शिंपडून प्रेत श्मशानांत न्यावें, व बेंबीच्या खालीं डाव्या बाजूस चार आंगळें पोट जिरून मूल काढावें. तें जिवंत असल्यास त्याचें तोंडांत स्तन देऊन नंतर घरी घेऊन जावें; जिवंत नसल्यास पुरावें. नंतर पोट शिवून व गर्भासहित मरणाबद्दल प्रायश्चित्त करून यथाविधि दहन करावें. सहा महिने पुरे होण्यापूर्वीं गर्भिणी मेल्यास गर्भ न काढतां गर्भासह जाळण्याबद्दलचें प्रायश्चित्त करून नंतर यथाविधि दहन करावें.
(१३) बाळंतीण मेली असतां करण्याचा विधि :- प्रायश्चित्त, स्नान, इत्यादि विधि वर रजस्वलामरणप्रसंगी सांगितले आहेत, ते करून नंतर दहन करावें.
(१४) सकेशा विधवा मरणविधि :- वैधव्य आल्यावर सकेशा राहिल्याबद्दल व चोळी घातल्याबद्दल प्रायश्चित्तें करून प्रेताची चोळी काढून टाकावी. व केशवपनानंतर यथाविधि दहन करावें.