(१) आद्य मासिक :- हे पहिल्या महिन्याचे आरंभास म्हणजे मरण दिवशीं करावयाचें; परंतु त्या दिवशीं सूतक असल्यानें, सूतक फिटल्यावर तें करावें असें वचन आहे.
(२) ऊन मासिक :- पहिला महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसाचे पूर्वींच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.
(३) द्वितीय मासिक :- दुसरे महिन्याचे आरंभी करावें.
(४) त्रैपक्षिक :- तीन पंधरवड्यांनीं म्हणजे पंचेचाळीसावे दिवशीं करावें.
(५) तृतीय मासिक,
(६) चतुर्थमासिक,
(७) पंचम मासिक,
(८) षष्ठ मासिक - ही श्राद्धें ज्या त्या महिन्याचे आरंभास करावी.
(९) ऊनषाण्मासिक :- सहावा महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसांचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.
(१०) सप्तम मासिक,
(११) अष्टम मासिक,
(१२) नवम मासिक,
(१३) दशम मासिक,
(१४) एकादश मासिक,
(१५) द्वादश मासिक :- हीं ज्या त्या महिन्याचे आरंभी करावीं.
(१६) ऊनाब्दिक : - बारावा महिना ज्या दिवशीं संपतो त्या दिवसाचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांहि करावें. अधिक मास त्या महिन्याचें मासिक श्राद्ध दोनदां करावें; म्हणजे एकंदर सतरा श्राद्धें करावयाची. ही सर्व मासिकें खरोखर त्या त्या उक्त कालीं केलीं पाहिजेत; परंतु बारावे दिवशीं सपिंडी करावयाची असल्यानें, व सपिंडी करण्याचा अधिकार मासिक श्राद्धें केल्यावांचून प्राप्त होत नसल्यानें, ती अकरावे किंवा बारावे दिवशी अपकर्ष करून ( अलीकडे ओढून घेऊन ) करण्याची चाल आहे. वास्तविक पाहतां सपिंडीकरणश्राद्ध हें सर्व मासिकें झाल्यानंतर वर्षाचे शेवटचे दिवशीं अब्दपूरित श्राद्ध करून करावें, हा उत्तम पक्ष, असें वचन आहे. परंतु सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादि मंगलकार्ये करतां येत नसल्यानें, सपिंडी श्राद्ध बारावे दिवशींच करण्याचा आतां प्रघात पडला आहे या विषयीं धर्मसिंधूंत ‘ आनंत्यात्कुलधर्माणां पुंसां चैवायुषः क्षयात् । अस्थिरत्वाच्छरीरस्य द्वादशाहः प्रशस्यते ’ असें वचन आहे. म्हणजे, कुलधर्म अपार आहेत, व मनुष्याचें आयुष्य क्षणभंगुर आहे, तसेंच शरीर अशाश्वत आहे; यासाठी बारावा दिवस ( सपिंडीस ) योग्य आहे. या कारणास्तव सपिंडी अलीकडे घेतल्यानें तत्पूर्वींचीं जीं मासिक श्राद्धें तीहि सपिंडीपूर्वीं ओढावी लागली. तथापि सपिंडी झाल्यावर हीं सर्व मासिकें तत्तत्कालीं पुन्हां करतात. याबद्दल पुढें विवेचन केलें आहे. ( पहा सपिंडी प्रकरण ).
प्रयोग :- या सोळा श्राद्धांस सोळा ब्राह्मण सांगावे. त्यांची श्मश्रू सकाळीं करवून अभ्यंग स्नान घालावें, व दुपारीं एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणें एक तंत्रानें ( एकदम ) ही श्राद्धें करावी. असमर्थानें आमान्नानें करावींत.