यालाच भहैकोद्दिष्ट श्राद्ध असेंही म्हणतात. तें दोन प्रकारांनीं करतां येतें. एक प्रत्यक्ष ब्राह्मण बोलावून त्यास भोजन घालून पिंडदान वगैरे विधीनें; व दुसरें, ब्राह्मणाभावी अग्नींत होम करून. एकोद्दिष्ट श्राद्धी आमंत्रण घेणें कमीपणाचें मानिलें जातें, त्यामुळें बरीच मोठी दक्षिणा दिल्याशिवाय ब्राह्मण मिळत नाहीत. म्हणून क्कचित् श्रद्धावान् धनिक असेल तोच मोठा खर्च करून प्रत्यक्ष ब्राह्मण श्राद्धी बसवितो. या श्राद्धांत देवांचें कृत्य नाहीं. एकच ब्राह्मण असतो व तो, पितरांचे नव्हे तर फक्त प्रेताचे उद्देशानें सांगावयाचा असतो. त्यामुळें प्रेतत्व पतकरिल्यासारखें होतें, व सपिंडीश्राद्ध झाल्यावर प्रेतपणा जाऊन पितरपणा येतो अशी समजूत आहे. त्यामुळें पितरांसाठीं आमंत्रण स्वीकारण्यांत ब्राह्मणास कमीपणा वाटत नाहीं या कारणासाठी हें एकोद्दिष्ट श्राद्ध अग्नीवर करण्याची चाल आहे. गांवाबाहेर स्वच्छ ठिकाणीं जागा सारवून कर्त्यानें आचमनप्राणायामादिक करून ‘ अमुक प्रेतास उत्तम लोकप्राप्ति होण्यासाठी अग्नीवर महैकोद्दिष्ट श्राद्ध करितों ’ असा संकल्प करावा; व नवश्राद्धाप्रमाणें दर्भबटु करून त्याची पूजा करावी; व अग्नीपुढें त्रिकोणाकृति मंडल करून त्यावर अन्नपात्र ठेवावें; व परिवेषणादिपर्यंत कर्म करून अग्नींत :-
“ आमचे उत्तम, मध्यम, व कनिष्ठ पितर सोमरस पिऊन वर जावोत. आम्हीं केलेलें यज्ञकर्म जाणून लांडग्याप्रमाणें आम्हांस त्रास न देतां, जे आमच्या प्राणांचें रक्षण करण्याकरितां आले आहेत, ते पितर आमच्या स्तुतीस अनुसरून आमचें रक्षण करोत. ”
“ जे पितर आमच्यापेक्षां मोठे अथवा लहान पितृलोकीं गेले आहेत, व जे या पृथ्वीवर रजोगुणकर्मांत गुंतले आहेत, अथवा सुसंपन्न लोकांमध्यें राहिले आहेत, त्या पितरांस आज आमचा नमस्कार असो. ”
“ ज्ञानी पितर मला सांपडले आहेत. त्यामुळें माझ्या यज्ञाचा नाश न होतां उत्कर्षच होत आहे. येथें आलेले ते पितर यज्ञांत बसून अन्नाचा व सोमरसाचा आस्वाद घेत आहेत. ”
“ हे पितरांनो, आमच्या समोर यज्ञांत बसा, व आमचें रक्षण करा ही हवनद्रव्यें तुमच्यासाठीं तयार केलीं आहेत. त्यांचा स्वीकार करा. व आमचें रक्षण व कल्याण करा, व आह्मांस सुख, पुण्य व आरोग्य द्या. ”
“ सोम पिणारे पितर आमच्या प्रार्थनेनें येथें या आमच्या प्रिय अशा महायज्ञांत येवोत, आमचें स्तवन ऐकोत, व आम्हांस आशीर्वाद देऊन आमचें रक्षण करोत. ”
“ हे पितरांनो, उजवी मांडी प्रथम घालून तुम्ही सर्वजण बसा, व आमच्या यज्ञानें प्रसन्न व्हा. आमच्या मनुष्यस्वभावामुळें तुमचा कोणताही अपराध झाला तरी तुम्ही आम्हांस शासन करूं नका. ”
“ हे पितरांनो, यज्ञाग्नीच्या ज्वाळांजवळ बसा व आहुती देणार्या यजमानास धन द्या, त्याच्या पुत्रांनांही धन द्या, आणि आमच्या यज्ञकर्यांत शक्ति उत्पन्न करा. ”
“ आमचे श्रीमान् पूर्वजांनीं पूर्वी देवपितरांस सोमपान करविलें; त्यांच्यासह यम रममाण होत्साता हविर्भाव यथेष्ट ग्रहण करो. ” ( ऋ. ७-६-१७).
हे आठ मंत्र पुनः पुनः चारदां म्हणून ३२ आहुती द्याव्या. आहुती घांसायेवढ्या मोठ्या असाव्या. नंतर अग्नीसमोर नवश्राद्धाप्रमाणेंच सर्व विधि करून समाप्ति करावी. सांगतासिद्धीसाठी भूयसी ( दक्षिणा ) द्यावी.