श्रीकल्याणकृत पदें - श्रीराम

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


१. ( राग - असावरी; ताल - दीपचंदी )
अहो जयरामा ॥ध्रु.॥
अनाथबंधु करुणासिंधु । उतरवि भवसिंधु ॥१॥
मेघश्यामा उत्तमोत्तमा । तारिं तारिं आम्हां ॥२॥
दुर्घट वाटे अंतर दाटे । काय करूं राघवा ॥३॥
मायाजाळ हा भवव्याळ । डंखूं पाहे आम्हां ॥४॥
मनाच्या कामना अनंत भावना । निरसीं तूं मेघश्यामा ॥५॥
नाम कल्याण म्हणोनि शरण । देईं चौथी भक्ति रे रामा ॥६॥

२. ( राग - भीमपलास; ताल - दादरा )
राम दीनबंधु रे भक्तपाळ । तो कृपाळ देव आमुचा ॥ध्रु.॥
दृष्टासी मारितो दासासी तारितो । संकट वारितो सत्य वाचा ॥१॥
भिलटी वदली भावार्थें लोधली । शेषफळें खादलीं विकल्प कैंचा ॥२॥
त्रैलोक्यनायकु कल्याणदायकू । भक्तांसि रक्षकु रुद्र साचा ॥३॥

३. ( राग - कानडा; ताल - त्रिताल )
मज पावावें राघवा । पतितोद्धारक देवा ॥ध्रु.॥
उडुपति नाश रविकुळटिळका । सकळिक पाळक जीवा हो ॥१॥
अवनीजावर सुरवर ध्यानीं । ध्याति सदाशिव शीवा हो ॥२॥
श्री कल्याण करी तव कृपा । अंकित मागत सेवा हो ॥३॥

४. ( राग - भीमपलास; ताल - दादरा )
गाइला चि गावा राम गावा ॥ध्रु.॥
चकोरा आवडे जीवा । चंद्रामृत निजठेवा ।
अनुदिनीं करिती धांवा । वानिला चि वानावा नित्य नवा ॥१॥
चातका लागला हेवा । घनानंद भेटावा ।
अखंड सातवा आठवा । दीनबंधु ध्याईला चि ध्यावा ॥२॥
भावार्थ बळकट व्हावा । स्मर कल्याण जीवा ।
येथें कांहीं नाहीं गोवा । नामामृत सेविलेंचि सेवा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP