श्री कल्याण - सोलीव सुख

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


॥ श्रीरामसमर्थ ॥
जय जय जी सद्‍गुरुवर्या । पूर्ण ब्रह्म प्रतापसूर्या ।
तुज नामो जी आचार्य । करुणासिंधु ॥१॥
जे भवसमुद्रीं पोळले । विषयमदें अंध जाले ।
चौर्‍यासींत वाहूं लागले । मार्ग सुचेना तयासी ॥२॥
ऐसें¹ विश्व बहुत बुडालें । मी जीव म्हणोनी धाऊं लागलें ।
मुळीचें स्मरण विसरलें । मी कोण ऐसें ॥३॥
तयासी मुक्त कराव्या पूर्ण । तूं बा उतरलासी ज्ञानघन ।
रोगिया औषधी देऊन । भवमोचन करसील ॥४॥
ऐसें औदार्य तुझें सघन । म्हणोनी आलों मी शरण ।
दयार्णवा कृपा करून । मज दातारें तारावें ॥५॥
आपण आपणातें पावें । ऐसें माझे मनीं बोलावें ।
तें दातारें गोचर करावें । रोकडें ब्रह्म ॥६॥
ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी । ज्ञानाचें भरतें आलें स्वामीलागोनी ।
आसन सोडूनिया तये क्षणीं । कडकडोनी भेटले ॥७॥
रे बाळका ऐक निर्धार । तुझा प्रश्न तो वाग्दोर ।
माझे कंठीं बैसला साचार । बरें घेई निज वस्तु ॥८॥
मग स्नेहाळें नवल केलें वोसंगा   सत् शिष्या घेतलें ।
अर्ध मात्रा रस काढिले । पूर्ण फुंकिले कर्णरंध्रीं ॥९॥
खडतर औषधी दिव्य रसायन । नयनीं झोंबलें जाऊन ।
डोळियाचा डोळा फोडून । चित्सूर्य  भेदिले ॥१०॥
पूर्ण अंश गगनीं भेदिला । अर्क तो पिंडीमाजीं उतरला ।
त्रिकुट श्रियाट चुराट केला । सेखीं भरला गगनगर्भीं ॥११॥
उग्र तेज लखलखाट । तेणें जाला चौदेहाचा आट ।
भ्रांती पडली बळकत । तेव्हां बाळ निचेष्टित पडे ॥१२॥
ऐसें पाहोनि सद्रुरुनाथ । पद्महस्त मस्तकीं ठेवीत ।
वत्सा सावध त्वरित । निज रूप पहा आपुलें ॥१३॥
जागृत करूनि ते वेळीं । अजपाची दोरी देउनी जवळी ।
निहंगम डोल्हारी डाये वेळीं । आलक्षें लक्षीं बैसविलें ॥१४॥
धैर्याचें आसन बळकट । आणी इंद्रियें वोढुनी सधट ।
धरी ऊर्ध्व पंथें वाट नीट । अथळ पदीं लक्ष लावी ॥१५॥
पुढें करूनीया जाणीव । मागें सारोनि नेणीव ॥
जे जे जाणीव अभिनव । ते तूं नव्हेसी तत्वता ॥१६॥
तै मार्गाचा करू  नादाची नवाळी ।
दुसरी किंकिणीची मोवाळी । तिसरी अनुहत कोल्हाल ॥१७॥
आतां अग्रीं लक्ष लावी । काय दिसेल तें न्याहाळी ।
चंद्रज्योती प्रकाशली । विभु बांधिला बळकट ॥१८॥
तें सुख अंतरीं घेउनी । पुढे चालू करी संगमीं ।
तेथें विजुऐशा कामिनी । चमकताती३ सुवर्णरंग ॥१९॥
ते ही जाणोनि माघे सारी । पुढें सूर्यबिंब अवधारी ।
ज्वाळा निघती परोपरी । दंडळूं नको कल्पांतीं ॥२०॥
वायोमुख करोनी तेथें । गिळी वेगीम सूर्यकिरणातें ।
मग देखसी आनंदमार्तंडातें । तेजोमय यमपुत्रा  ॥२१॥
अनंत भानु तेज अद्भुत । खदिरांगार ज्वाळा उसळत ।
धारिष्ट तेथें न निभत । दुर्घत विभू तेथींचा ॥२२॥
तेथें हुषारीचें काम । अग्रीं लक्ष घालून नेम ।
तीर लाऊन सुगम । मागें सारी सूर्यातें ॥२३॥
पुढें दिसेल जें नवल । तें पाही हंसमेळ ।
चंद्रकिरण सीतळ । पहासी मम वत्सा ॥२४॥
तेव्हां मागील दाह शमेल । सीतळाई सर्वांग होईल ।
चंद्राची प्रभा सुढाळ । फडफडीत चांदणें ॥२५॥
तो चि डोळियाचा डोळा पाही । देहातीत वर्म विदेही ।
चिन्मयसुखाची नवाई । भोगीं आपुली कीं गा ॥२६॥
अनुभवाची सीग भरली । अग्रापरी उसळली ।
भूमंडळी प्रभा पडली । कूर्परवर्ण नभ जालें ॥२७॥
तया मध्यभागीं सघन । अढळ पद दैदिप्यमान ।
उर्वरीत ब्रह्म जाण । धृव बैसला अढळते ॥२८॥
तें तुझें स्वरूप नेटें बोटें । जेथें समस्त जाणणें आटे ।
ऐके  जालासी धिटें३ । बळकटपणें बलाढय ॥२९॥
ऐसें सुख योगिया लाधलें । तेव्हां देहाचें मरण गेलें ।
सांगणें ऐकणें मुरालें । येकत्वपणें येक ची ॥३०॥
शांती येवोनि माळ घाली । अलक्ष सेजे निजली ।
हंसपदीं ऐक्य जाली । सुख सुखाते निमग्र ॥३१॥
तेथील अनुभव घेउनी । स्वानुभव पाहे कलटुनी ।
आला मार्ग ते क्षणीं । दिसेनासा जाल कीं ॥३२॥
त्रिकुट श्रियाट गोलाट । बुडाले ते औटपीट
ईडा पिंगला सुषुम्नातट । विराले ते स्वात्मसुखें ॥३३॥
स्थूळ सूक्ष्म कारण । नेणो काय जालें महाकारण ।
इंद्रियें चुबकली जाण । धांव मोडली तयाची ॥३४॥
पंचभूताचे खवळले तयाचे ठाव चि पुसिले ।
अपरमित आनंदिले । निमग्र जाले सुखांत ॥३५॥
सखोल भूमिके ऐसे जालें । सुख सुखासी घोटलें ।
स्वयें आत्मत्व प्रगटलें । माझे देहीं रोकडे ॥३६॥
मग सहज समाधी जिरउन । शिष्य उठिला घाबिरा होउन ।
हें सुद्‍गुरुचें देणें । काय उत्तीर्ण मी व्हावें ॥३७॥
जरी स्तुती त्याची करावी । तरी माझी मति नाहीं बरवी ।
अनिर्वाच्य गती बोलावी । परा वाचा खुंटत ॥३८॥
आतां मी जी लडिवाळपणें । तुमचे कृपेनें करितों स्तवन ।
सूर्यापुढें खद्योत जाण । तैशापरी बोल हे ॥३९॥
जय जया जी करुणासिंधु । जय जया जी भवरोगवैदु ।
जय जया जी बाळबोधु । कृपाघना समर्था ॥४०॥
जय जया जी अविनाशा । जय जय जी परेशा ।
जय जया जी अध्यक्षा । दयार्णवा ॥४१॥
जय जया जी पूर्णचंद्रा । जय जया जी अलक्षविहारा।
जय जया जी भवसमुद्रभास्करा । आनंदप्रभु ॥४२॥
तुझी स्तुती करिता सांग । वेद स्तुति जाले अव्यंग ।
तेथें प्राकृत मी काग । वर्णावया योग्य नव्हे ॥४३॥
कल्याण म्हणे जी रामदासा । माझा मुकेपणाचा ठसा ।
ते मोडुनी वसोसा । मज आपणाऐसें केलें ॥४४॥
ऐकोनी मृदु वचन । कुरवाळिले तयालागोन ।
गुरुशिष्य हें बोलणें । उरलें नाहीं ते वेळीं ॥४५॥
येकपणें येक चि जालें । ऐक्यरूपी सम मिळालें ।
करुनिया सुख उसळलें । नाहींपण जाउनी ॥४६॥
सुगरणीचा पाक जाला । नभा भाजनीं वाढिला ।
अक्षय पदीं सुगरावला । संत जेविती स्वानंदें ॥४७॥
अनिर्वाच्य बोल बोलिले । साधकाचे उपेगा आले ।
सिद्धांतरीं डोलों लागले । बद्ध मुमुक्ष होताती ॥४८॥
या परतें आन नाहीं बोलनें । श्रीराम दाशरथीची आण ।
येकपत्नी तो सुजाण । आपलें पद दे दासा ॥४९॥
इति श्री दासबोध ग्रंथ । त्यांतील हा सोलीव अर्थ ।
श्रोते ऐकतां यथार्थ । समाधिस्त होती ॥५०॥

॥ समास ॥ १ ॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP