पंचम पटल - आज्ञाचक्रविवरणम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
आज्ञाचक्र ( हे सहावे कमल किंवा चक्र असून ) ते भ्रूमध्यात म्हणजे दोन भिवयांच्या मध्ये आहे. त्याला दोन पाकळ्या असून त्यावर ‘ ह ’ व ‘ क्ष ’ ही दोन बीजाक्षरे किंवा वर्ण विराजमान आहेत. या दोन्ही पाकळ्यांचा रंग पांढरा शुभ्र आहे. या चक्रात महाकाल नावाचा सिद्ध आहे व हाकिनी ही येथील अधिष्ठात्री देवता आहे. ( या कमलाची देवता परमात्मा आहे असे मानले जाते. )
या आज्ञाचक्राच्या मध्यभागी शरच्चन्द्रासारखा प्रकाश असलेले परमतेजस्वी चन्द्रबीज म्हणजे ‘ ठं ’ हे बीज विराजमान झालेले आहे. या बीजाचे ज्ञान झाल्यावर परमहंस पुरुषांना केव्हाही कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नाहीत. या चक्रात जो परम तेजस्वी प्रकाश आहे तो सर्व तंत्रात प्रमुख आहे किंवा गुपत ठेविला आहे. या परम तेजस्वी प्रकाशाच्या केवळ चित्ननाने परम सिद्धीची प्राप्ती होते, यात काहीही संशय नाही.
श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती ! या आज्ञाचक्रात तुरीय तृतीय लिंगाच्या रूपाने मी मुक्तदाता म्हणून विराजमान झालो आहे. याच्या म्हणजे तुरीय तृतीय लिंगाच्या केवळ ध्यानाने योगीन्द्र माझ्यासारखा होतो, हे नितांत सत्य आहे.
शरीरात इडा व पिंगला या ज्या दोन नाड्या आहेत त्यांना वरणा व असी असे म्हणतात ( या वरणा व असी नाड्यांच्या मध्यभागातील म्हणजे या नाड्या ज्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकत्र मिळतात त्या स्थानाला वाराणसी म्हणतात. ) या दोन नाड्यांमधील वाराणसीमध्ये स्वत: विश्वनाथ विराजमान झालेले आहेत.
या वाराणसी क्षेत्राच्या म्हणजे आज्ञाचक्राच्या माहात्म्याचे वर्णन तत्त्वदर्शी ऋषींनी अनेक शास्त्रात अनेक वेळा परमतत्त्व म्हणून केले आहे.
मेरुदण्डाच्या मार्गाने सुषुम्नानाडी ब्रह्मरन्ध्रापर्यन्त म्हणजे सहस्रारापर्यन्त गेली आहे आणि इडानाडी सुषुम्नानाडीला वरून आवृत करीत म्हणजे गुंडाळून किंवा झाकून घेत आज्ञाचक्राच्या दक्षिणेच्या बाजूने जाऊन डाव्या नाकपुडीपर्यन्त गेली आहे. या इडा नाडीला गंगा असे म्हणतात.
ब्रह्मरन्ध्रात जे सहस्त्रदलपद्म म्हणजे सहस्रारचक्र आहे त्याच्या कंदामध्ये योनी आहे व त्या योनीमध्ये चंद्र विराजमान आहे ही योनी त्रिकोणाकार असून तिच्यामधून नेहमी चंद्रामृत स्रवत म्हणजे पाझरत असते. चंद्रापासून पाझरणारे हे अमृत धारारूपाने व समभावाने निरंतर इडानाडीच्या द्वारा वाहत असते. या इडानाडीचा प्रवाह किंवा गती डाव्या नाकपुडीतून होत असल्याने योगीलोक या नाडीला गंगा असे म्हणतात.
ही इडानाडी आज्ञाचक्राच्या उजव्या भागाकडून डाव्या नाकपुडीकडे वाहत जाते म्हणून उदग्वाहिनी म्हणजे उत्तरेकडे वाहणारी वरणा अर्थात् गंगा असे म्हणतात.
अशा प्रकारे वाहणार्या इडा व पिंगला या नाड्यांमध्ये वाराणसी आहे असे चिन्तन साधकाने करावे. इडानाडीप्रमाणेच पिम्गलानाडीही आज्ञाचक्राच्या डाव्या भागाकडून उजव्या नाकपुडीकडे जाते. या करिता श्रीशंकर म्हणतात, हे देवी ! मी पिंगला नाडीला असी असे म्हटले आहे किंवा या नाडीला असी असे नाव दिले आहे.
मूलाधारात जे कमल आहे त्याला चार पाकळ्या आहेत. या कमलात एक कन्द असून त्यात एक योनी आहे व या योनीमध्ये सूर्याचा निवास आहे.
या सूर्यमण्डलाच्या द्वारा निरन्तर विष पाझरत असते. हे विष धारारूपाने पिंगला नाडीच्या द्वारा उष्णतेच्या रूपाने किंवा तत्परूपाने प्रवाहित होत राहते. प्रथमच कथन केल्याप्रमाणे ही नाडी डाव्या नाकपुडीत गेलेली आहे.
ही पिंगलानाडी आज्ञाचक्राच्या डाव्या बाजूने गमन करीत किंवा वाहत उजव्या नाकपुडीत गेली आहे. यासाठी या नाडीला असी असे म्हणतात.
येथ पर्यन्त ज्या आज्ञाचक्राचे वर्णन केले त्याची महेश्वर ही देवता आहे. योगाचे चिन्तन करणारे साधक असे सांगतात की, या कमलाच्या किंवा चक्राच्या वर पीठत्रयाचे म्हणजे तीन पीठांचे स्थान आहे. नाद, बिन्दू व शक्ती अशी या तीन पीठांची नावे असून ही तिन्ही पिठे आज्ञाकमलरूप भालपद्मात विराजमान आहेत.
जो योगी या गुप्त अशा आज्ञाकमलाच्या ध्यानात तल्लीन राहतो त्याने पूर्व जन्मी केलेल्या कर्माचे फ़ल निर्विघ्नरूपाने नष्ट होते अर्थात् अशा साधकाला पुन्हा कोणत्याही प्रकारचे कर्मफ़ल भोगावे लागत नाही. जो साधक या आज्ञाचक्राचे निरन्तर ध्यान करतो त्याचे कोणत्याही प्रतिमेचे पूजन किंवा जप करणे निरर्थक किंवा अनर्थकारक आहे. यक्ष, राक्षस, गन्धर्व, अप्सरा, आणि किन्नरादि सर्व, अशा ध्यानात मग्न राहणार्या योगीसाधकाच्या ताब्यात राहून, नेहमी त्याच्या चरणांच्या सेवेत रत राहतात.
जो योगी आपली जीभ उलटी करून वर टाळूच्या मुळात अर्थात् टाळूच्या शेवटी असलेल्या रंध्रात प्रविष्ट करून भयनाशक आज्ञाचक्राचे ध्यान करतो व या ठिकाणी अधक्षिणभरही ज्याचे मन निश्चल होते त्याची सर्व पापे त्या क्षणी नष्ट होतात.
पहिल्या पाच कमलांच्या किंवा चक्रांच्या ध्यानाने प्राप्त होणारी जी जी फ़ले आत्तापर्यन्त कथन केली आहेत ती ती सर्व फ़ले एका आज्ञाचक्राच्या ज्ञानाने अर्थात् ध्यानोत्तर प्राप्त झालेल्या ज्ञानाने प्राप्त होतात.
जो बुद्धिमान् साधक या आज्ञाचक्राचा नेहमी अभ्यास करतो म्हणजे या कमलात आपले मन लीन करण्यासाठी ध्यान करतो तो वासनारूपी महाबन्धांना तोडून टाकून अर्थात् त्यांचे उल्लंघन करून अखंड आनंदात मग्न राहतो.
जो बुद्धिमान् साधक मृत्यूच्या वेळी या आज्ञाचक्राचे ध्यान करतो तो धर्मात्मा साधक प्राणत्याग केल्यावर परमात्म्यात लीन होतो.
जो साधकयोगी बसताना, चालताना, झोपताना व स्वप्नात या आज्ञाचक्राचे नेहमी ध्यान करतो म्हणजे सदासर्वकाळ या कमलध्यानात निमग्न राहतो तो जरी पापकर्मात रत राहिला; तरी त्याला पापकर्मे स्पर्शही करू शकत नाहीत म्हणजे तो पापांपासून मुक्त होऊन मोक्षाचा अधिकारे होतो.
या आज्ञाचक्राचे ध्यान करणारा साधक राजयोगाचा अधिकारी होतो, हे नितान्त सत्य आहे. असा योगी आपल्या स्वत:च्या प्रभावाने सर्व बंधनांपासून मुक्त होतो अर्थात् अशा रीतीने साधन करणार्या साधकाला दुसर्या कोणत्याही साधनाची अपेक्षा राहत नाही; कारण जागृत कुण्डलिनी शक्ती स्वत:च सर्व साधन करून साधकाला मोक्ष किंवा कैवल्यापर्यन्त घेऊन जाते. श्रीशंकर म्हणतात, हे देवी पार्वती ! या द्विदल कमलाच्या माहात्म्याचे वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. मात्र ब्रह्मादि देवता माझ्या द्वाराच या कमलाचे किंचित् माहात्म्य जाणतात म्हणजे माझ्याकडून ऐकल्यामुळेच ते माहात्म्यांश जाणू शकतात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP