स्त्रीसंसर्ग म्हणजे आठ प्रकारचे मैथुन, ( कोणत्याही अवस्थेत स्त्रीचे स्मरण करणे, तिच्या रूपाचे व गुणांचे वर्णन करणे किंवा श्रृंगाररसप्रसाधन ग्रंथ वाचून स्त्रीसंबंधी चर्चा करून तिची स्तुती करणे, स्त्रियांबरोबर पत्ते, सोंगट्या इ. खेळणे, स्त्रियांकडे वाईट दृष्टीने पाहणे, स्त्रीबरोबर एकान्तात बोलणे, स्त्री प्राप्त व्हावी म्हणून व तिच्याशी संभोग व्हावा असा संकल्प करणे, हा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून उपाय किंवा प्रयत्न करणे आणि स्त्रीशी संभोग करणे असे आठ प्रकारचे मैथुन शास्त्राने व विद्वानांनी सांगितले आहे. ) उत्तम शय्या, मनोहर किंवा श्रेष्ठ आसन, रमणीय वस्त्र आणि खूप धनसंचय या सर्व गोष्टी मोक्षाच्या मार्गातील विडम्बनास्वरूपच आहेत म्हणजे या सर्व गोष्टी मोक्षाच्या आड येणार्या आहेत. विडा खाणे, उत्तमोत्तम गाड्यांमधून प्रवास करणे, राजैश्वर्य उपभोगणे म्हणजे अत्यंत स्वादिष्ट भोजन करणे, सर्वांवर प्रभुत्व गाजविणे व मोठेपणा मिरविणे; सोने, चांदी, तांबे, रत्ने, सुगंधित द्रव्ये, संपत्ती व गायी या सर्व वस्तू एकत्रित करून त्यांचा संचय करणे ह्या सर्व गोष्टी योगमार्गांतील विघ्नेच आहेत. पांडित्य प्रदर्शन करणे, वेदशास्त्रांवर व्याख्यान किंवा प्रवचन करणे, नृत्य करणे, गीत गाणे, अलंकार घालणे; बासरी, वीणा, मृदंग आदि वाद्ये वाजविण्यात तल्लीन राहणे आणि हत्ती, घोडे या सारख्या वाहनांचा वापर करणे ह्या सर्व गोष्टी भोगरूपी विघ्नेच आहेत. आता धर्मरूपी विघ्ने कथन करतो, ती ऐक.