पंचम पटल - मूलाधारपद्मविवरणम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


श्रीशंकर म्हणतात, हे प्रिये पार्वती ! मी तुला आता मुक्तीचा अनुभव सांगतो. हा अनुभव जाणल्याने किंवा त्याचे ज्ञान झाल्याने पापमुक्त साधकालाही मुक्ती प्राप्त होते.

योगाकांक्षी किंवा योगाभ्यासी बुद्धिमान् साधकाने सम्यक् प्रकारे ईश्वराची पूजा करून स्वस्थचित्ताने आसनावर बसून व सद्गुरूला सर्व प्रकारे प्रसन्न करून किंवा त्याला संतुष्ट ठेवून या योगाचे ग्रहण केले पाहिजे म्हणजे योगदीक्षा घेतली पाहिजे. याचा अर्थ असा की, ज्यावेळी सद्गुरू शक्तिपातप्रभावाने आपल्या शक्तीचा शिष्य देहात संचार करतात त्यावेळी शिष्याची अनादि निद्रिस्त कुंडलिनी शक्ती जागृत होते. यालाच शिष्यदेहाकडून होणारे योगाचे म्हणजे दीक्षेचे ग्रहण म्हणतात.

बुद्धिमान् योगजिज्ञासू साधकयोगी जीवादि सकल पदार्थ सद्गुरूला समर्पण करून म्हणजे आपला जीव व इतर सर्व पदार्थ गुरुचरणी अर्पण अगर निवेदन करून किंवा त्याच्या चरणांवरून ओवाळून टाकून त्याला अत्यंत प्रयत्नाने संतुष्ट किंवा प्रसन्न करतो व हा योग त्याच्याकडून ग्रहण करतो अर्थात् शक्तिपातयोगाची दीक्षा घेतो.

योगदीक्षा ग्रहण करण्याच्या वेळी बुद्धिमान् साधकाने ब्राह्मणांना संतुष्ट करावे म्हणजे द्रव्यादि पदार्थ प्रदान करून अनेक मंगलमय विधींनी युक्त होऊन अनेक आशीर्वाद श्रवण करून किंवा मस्तकी धारण करून माझ्या अर्थात् शिवाच्या मंदिरात पवित्रता किंवा शुद्धतापूर्वक बसून आत्मप्राप्तीसाठी हा शुभ योग अर्थात् सिद्धयोग ग्रहण करावा. याचा अर्थ असा की, अत्यंत मंगलमय व पवित्र वातावरणात शिष्याने सद्गुरूंपासून शिवमंदिरात शक्तिपातयोगदीक्षा ग्रहण करावी. ( दीक्षासमयी स्थान व वातावरण कोणते व कसे असावे ते येथे सूचित केले आहे. )

या विधीने गुरूची कृपा अर्थात् दीक्षा प्राप्त करून साधकाने आपल्या पूर्व शरीराचा व  प्राक्तनांचा त्याग करून दिव्य शरीरधारी होऊन पुढे कथन केलेला योग ग्रहण करावा. याचे तात्पर्य असे आहे की, योगग्रहणाच्या म्हणजे दीक्षेच्या वेळी साधकाचे शरीर दिव्य होते. व्याधी व अज्ञानयुक्त शरीर राहत नाही; कारण सद्गुरुकृपेने शक्तिसंचार झाला की, जागृत कुंडलिनी शक्ती अग्निस्वरूप होऊन साधकशरीरातील व्याधी व अज्ञान जाळून टाकते.

साधकयोग्याने लोकसंपर्क किंवा जनसंसर्ग सोडून देऊन एकान्तस्थानी पद्मासन घालून साधनास बसावे व दोन्ही विज्ञान नाड्यांचा म्हणजे इडा व पिंगला यांचा अंगुलीने निरोध करावा. याचा अर्थ असा की, जो पर्यंत प्राण इडापिंगलेतून वाहत असतात तोपर्यंत संसारचक्राची गती चालूच राहते अर्थात् थांबत नाही. इडापिंगलेतून वाहणार्‍या प्राणगतीलाच संसारचक्र किंवा संसारवर्तन म्हणतात. ज्यावेळी या नाड्यांमधून वाहणारे प्राण सुषुम्नेत प्रविष्ट होतात त्यावेळी या नाड्यांचा निरोध होतो व साधक मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर होतो.

या विधीच्या द्वारा अर्थात् या योगाचा साधनाभ्यास करून सिद्ध झालेल्या साधकाच्या हृदयात सुखरूपी व निरंजन म्हणजे शुद्ध परब्रह्माच्या चैतन्यस्वरूप आत्मप्रकाशाचा आविर्भाव होतो अर्थात् आत्मप्रकाश हृदयात प्रकट होतो. या हेतूच्या सिद्धीसाठी हा योगाभ्यास परिश्रमपूर्वक करणे हे साधकाचे कर्तव्य आहे. अशा प्रकारच्या अभ्यासामुळे हा योग सिद्ध होतो.

जो साधकयोगी या योगाचा सतत अभ्यास करीत राहील त्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊन क्रमाक्रमाने वायूची सिद्धीही स्वत: आपोआप प्राप्त होईल यात काहीही संशय नाही.

साधकयोग्याने हा साधनाभ्यास जरी प्रत्येक दिवशी एक वेळेला केला; तरीही त्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्याचा प्राणवायू सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट होतो यात कसलाही संशय नाही.

जो योगी अशा प्रकारे अभ्यासशील राहतो त्याची देवता पूजा करतात आणि अणिमादि सिद्धींची प्राप्ती करून तो तिन्ही लोकांमध्ये इच्छापूर्वक विचरण करतो अर्थात् त्र्यैलोक्यामध्ये स्वेच्छापूर्वक हिंडण्याचे सामर्थ्य तो प्राप्त करून घेतो.

जो साधक ज्या प्रकाराने प्राणवायूला संयमित करण्याचा अभ्यास करतो त्याला त्या प्रकारची शरीर - सिद्धी प्राप्त होते आणि बुद्धिमान् साधक आत्म्यात अर्थात् आत्मस्वरूपात स्थिर राहून नेहमी दिव्य क्रीडेमध्ये अर्थात् आत्मानंदामध्ये निमग्न राहतो.

हा योग म्हणजे अशा प्रकारचे हे योगाचे साधन परम गोपनीय आहे. हे योगसाधन सरसकट सर्वांना म्हणजे अनधिकारी व्यक्तींना देणे योग्य नाही; मात्र प्रमाणयुक्त म्हणजे पूर्वी सांगितलेली लक्षणे ज्याच्या ठिकाणी आहेत अशा साधकाला हे साधन अवश्य प्रदान केले पाहिजे. याचा अर्थ असा की, सद्गुरूंनी दीक्षा देताना शिष्याच्या योग्यायोग्यतेचा विचार करून दीक्षा द्यावी.

पद्मासनावर बसून जर साधकयोगी कण्ठकूपाचे स्मरण करून म्हणजे त्या ठिकाणी मनाचा लय करून जीभ टाळूच्या मुळाशी स्थिर करील म्हणजे खेचरी मुद्रा लावील; तर त्याची भूक व तहान ही नाहीशी होईल.

कण्ठकूपाच्या खालील भागात अत्यंत सुंदर किंवा सुशोभित अशी कूर्मनाडी आहे. जर योग्याने या नाडीच्या ठिकाणी आपले मन स्थिर केले; तर त्याला चित्ताची दृढता किंवा स्थिरता प्राप्त होईल. याचा अर्थ असा की, साधकाने कूर्मनाडीत चित्त स्थिर केले; तर त्याची सर्व चंचलता नष्ट होते.

ज्यावेळी योगी कपाळाच्या मध्यभागी असलेल्या रुद्राक्ष विवराच्या ठिकाणी म्हणजे शंकराचा डोळा किंवा तृतीय नेत्र असलेल्या जागी चिंतन करतो अर्थात् चित्त एकाग्र करतो त्यावेळी त्याला तेथे विद्युतपुंजासारखा आत्मज्योतीचा प्रकाश दृष्टीस पडतो. याचा अर्थ असा की, भ्रूमध्यात म्हणजे आज्ञाचक्रात चित्त एकाग्र केले म्हणजे साधकाला तेथे प्रकाशरूपाने आत्मस्वरूपाचे दर्शन होते. अशा प्रकारच्या केवळ चिंतनाने म्हणजे चित्त एकाग्र केल्याने योग्याची सर्व पापे नष्ट होतात. असा साधक दुराचारात लिप्त राहिला; तरी त्याला परमगती प्राप्त होते.

जो बुद्धिमान् साधक रात्रंदिवस अशा प्रकारे चिन्तन करतो म्हणजे आज्ञाचक्रात मन लीन करून आत्मज्योतीचा प्रकाश पाहत राहतो त्याला निश्चितपणे सिद्ध पुरुषांचे दर्शन होते व त्यांच्याशी संभाषण करण्याचा लाभही प्राप्त होतो.

जो साधक अशा प्रकारे चालताना, बसलेला असताना, झोपताना व जेवण करताना रात्रंदिवस म्हणजे निरंतर ( वर कथन केल्याप्रमाणे ) शून्याच्या ध्यानत म्हणजे भ्रूमध्यातील प्रकाशरूप आत्मध्यानात तत्पर राहतो; तो साधक आकाशमय होऊन अर्थात् आकाशासारखा व्यापक होऊन चिदाकाशात म्हणजे सहस्रारातील शिवाशी एकरूप किंवा समरस होतो. ( शिवशक्तिसामरस्य हेच सिद्धयोग साधनाचे अंतिम ध्येय आहे. श्रीसंत तुकाराम महाराजांनी “ अणूहून थोकडा । तुका आकाशा एवढा ॥ ” असे म्हणून उपरोक्त विचार सूत्रात्मक रीतीने स्पष्ट केला आहे. एकमात्र सहस्रारातच अणुहून अणूतम व आकाशाहून व्यापक स्थिती साधकाला सामरस्यामुळे अनुभवाला येते. )

श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती ! ज्या साधकाला सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा आहे त्याने वरील प्रकारे आत्मध्यानाचा अभ्यास निरंतर करणे आवश्यक आहे. जो साधक हा साधनाभ्यास अखंडपणे करील तो तुलनेने माझ्यासारखा होईल. या ज्ञानबलाने किंवा त्याच्या प्रभावाने योगीसाधक सर्वांना अर्थात् त्रैलोक्याला प्रिय होतो. याचा अर्थ असा की, आत्मध्यानात तत्पर राहणार्‍या साधकाचा कोणीही विरोधक राहत नाही. सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात. उपरोक्त विधिविधानपूर्वक साधनाने ज्ञानप्राप्ती करणारा साधक आपल्या ज्ञानबलाने सर्व लोकांना प्रिय होतो. त्याचा कोणीही द्वेष करीत नाही.

असा साधकयोगी सर्व भूतमात्रांवर विजय प्राप्त करून तहान, भूक व परिग्रह म्हणजे कोणत्याही गोष्टीचा संग्रह करणे इत्यादि इच्छांना जिंकून म्हणजे या सर्व इच्छांपासून मुक्त होऊन जेव्हा पद्मासन घालून बसतो व नाकाच्या अग्रभागी आपली दृष्टी स्थिर करतो तेव्हा त्याचे मन दृढ किंवा स्थिर होऊन त्याला खेचरत्व म्हणजे आकाश गमनाची सिद्धी किंवा सामर्थ्य प्राप्त होते.

अशा प्रकारे जो योगीन्द्र शुद्ध चित्ताने त्या शुद्ध व अचल म्हणजे पर्वतासारख्या स्थिर अशा परमज्योतीचे दर्शन घेतो तेव्हा योगाभ्यासाच्या बलाने स्वत:च त्या ज्योतीचा तो रक्षक होतो. याचे तात्पर्य असे आहे की, ज्योतीचे दर्शन घेतल्यावर साधकाचा अभ्यास इतका दृढ होतो की, तो स्वत: आत्मज्योतिदर्शनचा अभ्यास सोडत नाही आणि अशा प्रकारे त्याच्या अभ्यासाचे रक्षण होत राहते.

बुद्धिमान् योग्याने जमिनीवर उताणे निजून निरंतर ध्यान करावे किंवा ध्यानात तल्लीन व्हावे म्हणजे आपोआपच त्याचे श्रम तत्काल नाहीसे होतात. जो साधक डोक्याच्या मागील भागाचे ध्यान करील तो मृत्यूला जिंकणारा योगी होईल. भ्रूमध्यात दृष्टी स्थिर केल्याने तत्काल जी फ़ले प्राप्त होतात ती सर्व ( हे देवी पार्वती ! ) मी प्रथम कथन केली आहेत.

चार प्रकारच्या भोजनामुळे म्हणजे खाद्य अर्थात् चावून खाल्लेल्या, शोष्य अर्थात् आत ओढून घेतलेल्या, लेह अर्थात् चाटलेल्या व पेय अर्थात् प्यालेल्या अन्नामुळे तीन प्रकारचे रस उत्पन्न होतात. त्यातील जो सारभूत किंवा सर्वश्रेष्ठ रस आहे तो लिंगदेहाचे किंवा सूक्ष्म शरीराचे अर्थात् शक्तिपीठाचे पोषण करतो म्हणजे हा रस लिंगशरीराच्या परिपोषणाकडे जातो. दुसरा किंवा मध्यम रस सप्तधातुमय पिण्डाचे पोषण करतो. तिसरा किंवा मध्यम रस सप्तधातुमय पिण्डाचे पोषण करतो. तिसरा किंवा अत्यंत निकृष्ट रस हा सप्तधातूंच्यापेक्षा निराळा होऊन मलमूत्राच्या रूपाने शरीरातून बाहेर पडतो. पहिले जे दोन रस सांगितले आहेत ते सर्व नाड्यांमधून प्रवाहित होऊन म्हणजे समस्त नाड्यांच्या रूपाने राहून पायांपासून मस्त्कापर्यंत पसरलेल्या शरीरस्थ सर्व वायूंचे पोषण करतात. जेव्हा वायू सर्व नाड्यांच्या बरोबर अर्थात् नाड्यांमधून संचार करतो त्यावेळी या वायूबरोबर अन्नाचा रस समान भावाने सर्व शरीरात प्रवृत्त होतो किंवा पसरतो. याचा अर्थ असा की, वायू व रस शरीरातील सर्व नाड्यांमध्ये संचारित होऊन शरीर पुष्ट करीत असतात व शरीराला शक्ती व उत्साह देत राहतात.

सर्व नाड्यांमध्ये ज्या चौदा नाड्या प्रमुख आहेत त्या शरीरातील मुख्य अंगांचा व्यवहार करतात. या प्राणसंचार करणार्‍या चौदा नाड्यांमध्ये एक नाडी दुसरीपेक्षा कमीअधिक महत्त्वाची नाही. याचा अर्थ या चौदा नाड्या सारख्याच महत्त्वाच्या आहेत.

गुदद्वारापासून चार बोटे खाली असलेल्या जागी चार बोटे विस्तार असलेला एक कन्द आहे.

गुदा व लिंग यांच्या मध्यभागी असलेली योनी पश्चिमाभिमुखी म्हणजे पाठीकडे मुख केलेली आहे. त्या ठिकाणी कन्द आहे आणि त्या स्थानातच कुण्डलिनी शक्तीचा नेहमी निवास असतो. ही कुण्डलिनी शक्ती सर्व नाड्यांना वेढून, सोडतीन वेटेळो घालून, कुटिल आकृतीचे रूप घेऊन व आपल्या मुखात आपलेच पुच्छ घालून सुषुम्णेच्या विवरापाशी अर्थात् ब्रह्मद्वाराच्या मार्गात पडून राहते.

ही कुण्डलिनी शक्ती सर्पाच्या आकृती सारखी असून सुप्तावस्थेत म्हणजे संसार भोगण्याच्या अवस्थेत मूलाधारात पडून राहते. ही शक्ती आपल्या स्वत:च्या प्रकाशानेच नेहमी प्रकाशित होत राहतए व सर्पाप्रमाणे संधीमध्ये म्हणजे इडा व पिंगला यांच्या मध्यभागी असलेल्या सुषुम्नेच्या मुखापाशी पडून राहते. ही कुण्डलिनी शक्तीच वाग्देवी म्हणजे ज्ञानाची जननी आहे व तिचे बीज असे नावही आहे. बीज म्हणजे संसाराचे व अध्यात्माचे बीज होय. ज्यावेळी ही शक्ती सुप्तावस्थेत राहते त्यावेळी ती बहिर्मुख होऊन जीवाला संसारचक्रात घुमविते व ज्यावेळी ही शक्ती सद्गुरुकृपेने म्हणजे शक्तिपातयोगदीक्षेने जागृत होते त्यावेळी ती अंतर्मुख होऊन जीवाला सुषुम्नार्गाने सहस्रारात शिवाशी एकरूप करते. या दोन्ही गोष्टी ही शक्तीच करीत असल्याने तिला बीज म्हटले आहे.

ही कुण्डलिनी भगवान् विष्णूची शक्ती असून ती तप्त सुवर्णाप्रमाणे निर्मल तेजाने प्रकाशित होत राहते. त्याचप्रमाणे सत्त्व, रज व तम या तीन गुणांची ही माता आहे म्हणजे या त्रिगुणांची ती उत्पत्ती किंवा निर्मिती करते.

जेथे कुण्डलिनी शक्तीचे स्थान आहे त्या ठिकाणीच बन्धूक पुष्पासारख्या लाल रंगाच्या कामबीजाचे स्थान आहे. हे कामबीज तापलेल्या सोन्याप्रमाणे उज्ज्वल असून त्याचे स्वरूप अक्षर आहे असे योगशास्त्रात कथन केले आहे. तात्पर्य कामबीज हे प्रेमस्वरूप असून कुण्डलिनी शक्ती ही परमप्रेमस्वरूप आहे. या दोन्ही गोष्टी एकाच स्थानी राहतात म्हणजे जवळ जवळ एकरूपच आहेत.

जेथे कुण्डलिनी शक्तीचा निवास आहे त्या ठिकाणीच कामबीजाबरोबर सुषुम्नानाडी राहते. याचा अर्थ असा की, मूलाधारात सुषुम्नानाडीचे शेवटचे टोक अर्थात् ब्रह्मद्वार, कामबीज व कुण्डलिनी शक्ती ही त्रयी एकत्रित राहते. कामबीज हे शरच्चंद्राप्रमाणे तेजस्वी असून ते स्वत:च प्रकाशित होणारे आहे. त्याचप्रमाणे हे कामबीज कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी व कोटी चंद्रांप्रमाने शीतल आहे. या तिन्ही गोष्टी म्हणजे कुण्डलिनी शक्ती, कामबीज व सुषुम्ना मिळून त्रिपुरभैरवी देवी होते. या त्रिपुरभैरवीलाच बीज असे नाव असून ती परम तेजस्वी आहे.

हे बीज म्हणजे त्रिपुरभैरवी शक्ती ही क्रियाशक्ती व ज्ञानशक्तीशी एकरूप होऊन शरीरात भ्रमण करीत राहते. हे बीज कधी कधी ऊर्ध्वगामी होते, कधी कधी ते जलात म्हणजे जलतत्त्वात प्रवेश करते आणि कधी कधी ते सूक्ष्म होते. त्याच प्रमाणे हे बीज प्रज्ज्वलित अग्निशिखांसारखे असून तेच परम तेजस्वी बिन्दुरूपाने म्हणजे वीर्यरूपाने योनिस्थानात स्वयंभूलिंग हे नाव धारण करून राहते.

आत्तापर्यंत ज्याचे वर्णन केले त्याला आधारपद्म असे म्हणतात. या पद्माच्या मुळाशी योनीचे स्थान आहे. हे आधारकमल अत्यंत प्रकाशमान असून त्याच्या चार पाकळ्यांवर व, श, ष, स हे चार वर्ण आहेत. याचा अर्थ असा की, आधारपद्माला चार पाकळ्या असून या चार पाकळ्यांवर वरील चार वर्ण विराजमान झालेले असतात. या पद्मालाच मूलाधारचक्र म्हणतात. या पद्माला किंवा चक्राला कुल असे नाव आहे. ( कुल म्हणजे शक्ती व अकुल म्हणजे शिव होय. कुलाचा अर्थ स्थान असाही आहे. त्यामुळे कुण्डलिनी शक्तीचे स्थान असा आशयही येथे होऊ शकेल. ) मूलाधारचक्राची कांती सुवर्णासारखी आहे. हे चक्र स्वयंभूलिंगाने युक्त अर्थात् त्याच्यासह आहे. या चक्रात द्विरण्ड नावाच्या सिद्धाचा निवास असून डाकिनी ही येथील अधिष्ठात्री देवता आहे. या चक्राच्या मध्यभागी योनी आहे. त्या योनीत कुण्डलिनी शक्तीचा निवास असतो. या कुंडलिनी शक्तीच्यावर दीप्तिमान् तेजाने स्फ़ुरण पावणारे कामबीज भ्रमण करीत असते. जो बुद्धिमान् साधक या मूलाधारचक्राचए नेहमीं ध्यान करतो त्याची दार्दुरी वृत्ती म्हणजे बेडकासारख्या उड्या मारण्याची वृत्ती सिद्ध होते. अर्थात् जागृत शक्तीच्या चालनामुळे शरीर बेडकासारख्या उड्या मारू लागते. ( त्यामुळे प्राणांची किंवा शक्तीची गती सुषुम्नेत होऊन ) क्रमाक्रमाने साधक भूमीचा म्हणजे मूलाधारचक्राचा त्याग करून आकाशगमन म्हणजे सहस्रारगमन करतो. तात्पर्य दार्दुरी वृत्तीप्रमाणे म्हणजे बेडूक उंच उडी मारून पुन्हा धरणीवर येतो त्याप्रमाणे प्राण सुषुम्नेतून  सहस्राराकडे जाऊन पुन्हा मूलाधारात परत येतात. वारंवार असे घडले म्हणजे प्राण क्रमाने अधिकाधिक वेळ सहस्रारात स्थिर होऊ लागतात.

मूलाधारकमलाच्या ध्यानाने शरीराची कान्ती उत्कृष्ट होते व जठराग्नी प्रदीप्त किंवा वर्धित होतो. शरीर आरोग्यसंपन्न राहते म्हणजे हे ध्यान करणार्‍या साधकाला कोणताही रोग होत नाही. या ध्यानामुळे साधक अत्यंत हुशार अर्थात् कार्यदक्ष होतो व त्याला सर्वज्ञता प्राप्त होते म्हणजे ज्ञात - अज्ञात अशा सर्व वस्तूंचे ज्ञान त्याच्या ठिकाणी आतूनच आपोआप उत्पन्न होते.

( मूलाधारचक्राचे ध्यान करणार्‍या साधकाला ) भूत, भविष्य व वर्तमान अशा तिन्हीही कालांचे सर्व वस्तूंचे कारणासहित ज्ञान प्राप्त होते. जे शात्र कधी ऐकले नाही त्याचे रहस्यासहित व्याख्य करण्याची शक्ती त्या साधकाला निश्चितपणे प्राप्त होते अर्थात् अशा अश्रुतशास्त्राचे हा साधक सहजतेने विवरण करतो.

( मूलाधारचक्राच्या ध्यानात निरंतर रत असणार्‍या साधकयोग्याच्या ) मुखात सरस्वती देवी नेहमी नृत्य करते म्हणजे त्याच्या मुखात तिचा नेहमी निवास असतो आणि ( कोणत्याही मंत्राचा ) जप केल्याने त्या मंत्राची सिद्धी त्याला प्राप्त होते, यात काहीही संशय नाही.

म्हातारपण, मरण, दु:ख, रोग इत्यादि सर्व व्याधींचा गुरूच्या वचनाने नाश होतो. पवनाभ्यासी म्हणजे वायू जिंकण्याचे अर्थात् कुण्डलिनी शक्ती जागृत करून तिचे सुषुम्नेत चालत व्हावे म्हणून प्रयत्न करणार्‍या साधकानए या म्हणजे मूलाधारचक्राच्या परमश्रेष्ठ ध्यानात नेहमी तत्पर राहिले पाहिजे; कारण अशा प्रकारच्या नुसत्या ध्यानाने योगीन्द्र सर्व पापांपासून मुक्त होतो.

ज्यावेळी साधकयोगी स्वयम्भूलिंगसंयुक्त अशा मूलाधार कमलाचे ध्यान करतो त्यावेळी त्याच क्षणी त्याच्या सर्व पापसमूहाचा नाश होतो अर्थात् अशा प्रकारचे ध्यान साधकाची सर्व पापे जाळून टाकते.

जो साधक मूलाधार चक्राचे ध्यान करतो तो ज्या ज्या पदार्थाची किंवा वस्तूंची आपल्या चित्तात इच्छा करतो त्या त्या सर्व वस्तू त्याला प्राप्त होतात आणि जे साधक नेहमी प्रयत्नपूर्वक हा अभ्यास करतात ते निश्चितपणे मुक्ती देणार्‍या परमात्म्याचे दर्शन घेतात. हा श्रेष्ठ आत्माच आत - बाहेर म्हणजे सर्वत्र प्रयत्नपूर्वक पूजन करण्यास योग्य आहे. श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती ! या योगापेक्षा श्रेष्ठतम म्हणजे श्रेष्ठातील श्रेष्ठ असा दुसरा कोणताही योग नाही, असे माझे मत आहे.

आपल्या हातातील पिण्ड सोडून देऊन जीव अन्य पिंडाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे भ्रमण करतो म्हणजे जीव हातचे सोडून पळत्याच्या मागे लागतो त्याप्रमाणेच आपल्या देहात राहणार्‍या शिवरूपी आत्म्याच्या त्याग करून बाहेर असणार्‍या देवतांचे पूजन करणे आहे.

जो साधक आळस सोडून देऊन शरीरस्थ परमात्म्याचे नित्य पूजन करतो म्हणजे अनालस्याने निरंतर साधन करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, या बद्द्ल कसलाही विचार करण्याचे कारण नाही. जो (  मूलाधार चक्राचे ध्यान करण्याचा ) अभ्यास निरंतर म्हणजे खंड न पडता अर्थात् अखंडपणे करतो त्याला सहा महिन्यात सिद्धी प्राप्त होते आणि त्याचा प्राणवायू म्हणजे कुंडलिनी शक्ती निश्चितपणे सुषुम्नानाडीत प्रवेश करते. यामुळे साधकाला मनावर विजय मिळतो, वायू व बिन्दूची धारणा सिद्ध होते आणि ऐहिक व पारलौकिक या दोन्हींची सिद्धी होते, यात काहीही संशय नाही. याचा अर्थ असा की, निरंतर साधनाने आत्मपूजन करणारा साधक इहलोक व परलोक किंवा भोग व मोक्ष या दोन्हींची उत्तमरीतीने प्राप्ती करतो. या लोकात राहून सर्व सुखांचा उपभोग घेतो व मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. अशा प्रकारे याला दोन्ही लोकांची सिद्धी होते.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP