पंचम पटल - विशुद्धचक्रविवरणम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
विशुद्ध नावाचे पाचवे कमल किंवा चक्र कण्ठस्थानात आहे. हे कमल सोन्याच्या कांतीसारखे, तेजस्वी व सोळा स्वरांनी युक्त आहे म्हणजे या कमलाला सोळा पाकळ्या असून त्यावर सोळा स्वर विराजमान झालेले आहेत. अ पासून अ: पर्यंत म्हणजे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: हे सोळा स्वर या कमलाच्या पाकळ्यांवर शोभून दिसतात. या चक्रात छगलाण्ड सिद्धाचे वास्त्यव्य असते व याची अधिष्ठात्री देवता शाकिनी ही आहे. ( जीवात्मा देवता या स्थानी नेहमी विराजमान असते. )
जो साधक या विशुद्धचक्राचे नित्य ध्यान करतो तो योगीश्वर व पण्डित होतो. ज्याप्रमाणे एकाद्याला धनाच्या खजिन्याची त्याच्या गुपितांसह माहिती व्हावी त्याप्रमाणे या विशुद्ध नावाच्या कमलामध्ये ध्यान केल्याने साधकाला चारही वेदांची त्याच्या रहस्यासहित प्राप्ती होते.
या विशुद्धकमलामध्ये मन व प्राण स्थिर झालेल्या योग्याला जर कोणत्याही प्रकारे क्रोध उत्पन्न झाला; तर याच्या प्रभावामुळे समस्त त्रैलोक्य कम्पायमान होईल, यात काहीही संशय नाही.
जेव्हा साधकाचे मन दैववशात् या विशुद्धचक्रात लय पावते तेव्हा सर्व बाह्य विषयांचा त्याग करून म्हणजे या लयामुळे सर्व बाह्य विषय अर्थात् प्रपंच विसरून जाऊन साधकयोग्याचे मन व प्राण शरीराच्या आत म्हणजे अन्तरातच रममाण होतात हे नितांत सत्य आहे. असा विशुद्धचक्रात लय पावलेला योगी आपल्या स्वत:च्या शक्तीने म्हणजे कोणत्याही प्रकारची क्षीणता येत नाही व तो वज्रापेक्षाही कठोर होतो. ज्यावेळी असा योगी एक हजार वर्षांच्या समाधी नंतर ध्यान विसर्जित करून पुन्हा संसारात येतो म्हणजे त्याचे प्राण सहस्रारातून मूलाधारात परत येतात इडापिंवलेमधून त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होतो त्यावेळी समाधी अवस्थेतील एक हजार वर्षे एका क्षणासारखी व्यतीत झाली आहेत, असे त्याला प्रतीत होते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP