पंचम पटल - स्वाधिष्ठानचक्रविवरणम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
दुसर्या कमलाचे किंवा चक्राचे स्थान लिंगाच्या मुळाशी आहे. हे चक्र सहा पाकळ्यांचे असून त्या पाकळ्यांवर व पासून ल पर्यत म्हणजे ब, भ, म, य, र, ल, हे सहा वर्ण सुशोभित झालेले आहेत म्हणजे सहा पाकळ्यांवरील सहा वर्ण हे अत्यंत सुंदरपणे विराजमान झालेले दिसतात. या चक्राचे नाव स्वाधिष्ठान असून त्याचा रंग रक्तासारखा लाल आहे. या चक्रात बाण नावाच्या सिद्धाचे वास्तव्य असून राकिणी ही येथील अधिष्ठात्री देवता आहे. ( या चक्राची देवता ब्रह्मा आहे असे मानले जाते. )
जो साधक या दिव्य अशा स्वाधिष्ठानकमलाचे नेहमी ध्यान करतो त्याच्या रूपावर कामरूपिणी स्त्रिया मोहित होऊन त्याचे भजन करतात म्हणजे कामेच्छू स्त्रिया नेहमी त्याची सेवा करतात. याचा अर्थ असा की, स्वाधिष्ठान चक्राचे ध्यान करणारा साधक स्वरूपसुंदर होतो व सुंदर स्त्रिया त्याला वश होऊन त्याची प्राप्ती व्हावी म्हणून त्याची सेवा करतात.
कधीही न ऐकलेली अशी अनेक शास्त्रे या स्वाधिष्ठान चक्राच्या ध्यानप्रभावामुळे साधक नि:शंकपणे सांगतो किंवा अशा शात्रांचे तो विवेचन करू शकतो आणि यामुळेच तो सर्व रोगांपासून मुक्त होऊन संसारात निर्भयपणे म्हणजे आनन्दपूर्वक राहतो.
( स्वाधिष्ठान चक्राचे ध्यानसाधन करणारा ) साधक मृत्यूला खाऊन टाकतो म्हणजे या साधनाच्या प्रभावाने तो मृत्यूला ओलांडून पलीकडाच्या अवस्थेत जातो आणि त्याला कोणीही खाऊ शकत नाही म्हणजे कोणीही कोणत्याही प्रकारे त्याला नष्ट करू शकत नाही. त्याला गुण देणार्या अणिमादि सिद्ध प्राप्त होतात आणि त्याच्या संपूर्ण शरीरात वायूचा संचार स्वाभाविक रूपाने होतो. याचा अर्थ असा की, सर्वसामान्य माणसाचा वायू वक्र असून तो सुषुम्नेत प्रवेश करू शकत नाही म्हणजे इडापिंगलेतून वाहण्याच्या पलीकडे त्याची गती जात नाही आणि त्याच्या शरीरातील मुख्य नाड्यांशिवाय इतर नाड्या अचेतनच असतात. मात्र ज्यावेळी योगसाधनेने साधकाचा वायू सरळ होऊन सुषुम्नेत संचार करू लागतो त्यावेळी शरीरातील अचेतन नाड्याही जागृत होऊन वायूचा संपूर्ण शरीरात समपणे संचार होतो. त्याच्या शरीरात रसाची वृद्धी निश्चितपणे होते आणि सहस्रदलकमलातून जे अमृत स्रवते त्याच्यातही वाढ होते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP