श्रीकृष्णलीला - अभंग ३८ ते ४१

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३८.
चेंडु देखोनियां यशोदा कोपली । ह्मणे तयेवेळीं राधिकेसी ॥१॥
महा नष्ट तुम्ही अवघिया गवळणी । माझा चक्रपाणी ब्रह्मचारी ॥२॥
इतुकें ऐकोनि राधा ते चालिली । स्वगृहासी गेली आपुलिया ॥३॥
राधेचिया मनीं समजलें पूर्ण । ब्रह्मसनातन श्रीकृष्ण हा ॥४॥
इकडे यशोदा घेऊनि हरीसी । गेली मंदिरासी नामा म्हणे ॥५॥

३९.
बरवें बरवें बाळ कोडीसवाणेरे । यशोदा म्हणे दृष्टी होईल बारे ॥१॥
बरवी बरवी डोळस सांवळी । कोण उतरोनी हरीची पाउली ॥२॥
चंदन पोटाळा कांसे सोनसळा । विष्णुदास नामा चरणाजवळी ॥३॥

४०.
दोंदील दोंदील टमकत चाले । गोजिरीं पाउलें घाले:-नियां ॥१॥
पायीं रुणझुण रुणझुणिती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥
सांवळें सगुण मानसमोहन । गोपीमनरंजन ह्मणे नामा ॥३॥

४१.
आई मज ह्मणसील अवगुणांचें । तरी मी काय करितों कोणाचें । जें जें होणार जयाचें । तें कां मजवरी घालिसी ॥१॥
भट आलासे माभळ । तेणें वर्णिल जन्मकाळ । तो चुकला ग्रहमूळ । तेणें त्यासी पाडिलें ॥२॥
माये तीच मावशी । तिनें मज घेतलें वोसंगासी । तिचे अंगीं होती विवशी । तिनें तिसी ग्रासिलें ॥३॥
दहीं भात रत्नताटीं । कालवूनि लावीं माझे ओंठी । जेवितां काग घाली मिठी । धरूनि मुष्टी रगडिला ॥४॥
कैसी पाठविली रिठा-गांठी । ती घातली माझे कंठीं । तेणें माझ्या गळां मिठी । मग म्यां दाढे रगडिली ॥५॥
खेळत होतों यमुनेतटीं । बक लागला माझे पाठी । मग मी धरूनि चंचु उपटीं । धरणीवरी आपटिला ॥६॥
आई म्यां तुझें काय केलें । त्वां मज उखळासी बांधिलें । रांगत रांगत अंगणीं आलों । तेणें वृक्ष उन्मळिले ॥७॥
ऐसा नाटकी ह्लषिकेशी । परब्रह्म दावी यशोदेसी । विष्णुदास नामा अह-र्निशीं । ह्लदय कमळीं पाहातसे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP