श्रीकृष्णलीला - अभंग २१ ते २५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
२१.
द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागीं ॥१॥
रामरूप धरून मज बोळवावें । तें रूप राहावें ह्लदया-माजी ॥२॥
मनोरथ ऐकोनी श्रवणीं । झाला चापपाणी तात्कालीक ॥३॥
पाहोनियां ध्यान करूनि नमन । निघाला तेथून वायुसुत ॥४॥
घेवोनियां आज्ञा सेतुबांधा गेला । ध्यानस्थ बैसला नामा ह्मणे ॥५॥
२२.
एक गोप तेव्हां स्रियेसी सांगत । सांठवीं समस्त नवनीत ॥१॥
देवाचा नवस आहे पुरवणें । धरावें येथून अनसुट ॥२॥
सांगोनियां ऐसें राहिला तो स्वस्थ । मागें स्त्रीनें कृत्य काय केलें ॥३॥
चोरोनियां घृत भरोनि घागरीं । नेवोनि शेजारी ठेवि-येल्या ॥४॥
गौळियानें तेव्हां संकल्प सोडिला । नवस फोडिला नामा ह्मणे ॥५॥
२३.
गोपीनें घृतासीं चोरोनी ठेविलें । देवासी कळलें अंत-र्यामीं ॥१॥
सेजे घरीं होतें ठेविलें चोरून । सौंगडे घेऊन गेला तेथें ॥२॥
आज्य घेऊनियां गोपाळांसी देत । आपन भक्षीत प्रेमानंदें ॥३॥
तृप्त होवोनियां गेला क्रीडायासी । पूर्ण नवसासी केलें त्याच्या ॥४॥
नामा ह्मणे ऐसा वैकुंठनायक । दावीत कौतुक नानापरी ॥५॥
२४.
कांहीं एक दिवस लोटलियावरी । गोपी तिचे घरीं प्रवेशली ॥१॥
म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीनें सदन धुंडा-ळिलें ॥२॥
म्हणे सये येथें नाहीं माझें घृत । ऐकोनियां मात क्रोधा-वली ॥३॥
चोरी नवनीत तुझें नाहीं गेलें । माझें काय झालें पुसतसे ॥४॥
नष्टें अभिलाष केला सांग सत्य । बोलेनि निवांत राहिली ते ॥५॥
कलह करावा भ्रतारा कळेल । तो शिक्षा करील यथास्थित ॥६॥
न मिळे जाणोन म्हणे कृष्णार्पण । आलीसे बोलोन मंदिरासीं ॥७॥
नामा म्हणे शूक सांगे परीक्षिती । ऐशा किती ख्याति तुज सांगों ॥८॥
२५.
एकदां श्रीकृष्ण खेळत असतां । प्रवेशे अवचिता गोपीगृहीं ॥१॥
दोहीं करीं तेव्हां नेत्र चोळीतसे । गोपी पुसते काय झालें ॥२॥
कृष्ण ह्मने माझे दुखताती डोळे । उपाय न कळे करूं काय ॥३॥
पुत्रा़ची जननी तिचें दूध मिळे । घालितांची डोळे बरे होती ॥४॥
गोपी ह्मणे दूध देतें मी काढून । तें नेमी घालून बरें करी ॥५॥
देव ह्मणे दूध तूं काधून देसी । कैसा गुण त्यासी येईल सांग ॥६॥
माझिया करानें पिळून देसी स्तन । तरी येईल गुण लवकरी ॥७॥
ऐकतांचि गोपी धांवे मारावया । पळे उठो-नियां नामा ह्मणे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP