श्रीकृष्णलीला - अभंग २६ ते २९

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२६.
यशोदे भोंवल्या मिळाल्या गौळणी । सांगती गार्‍हाणी नानापरी ॥१॥
गोरस भक्षोनि फोडितो भाजन । गोकुळा सोडोनि जाऊं सये ॥२॥
एक गोपी ह्मणे माझ्या घरां येसी । बांधीन खांबासी तुजलागीं ॥३॥
यशोदेसी ऐसी सांगोनि गार्‍हाणीं । चा-लिल्या कामिनी गृहाप्रती ॥४॥
नाना ह्मणे गोपी बोलिली बांधीन । तिजवरी विघ्न करी देव ॥५॥

२७.
निशीं प्राप्त होतां भ्रताराचे शेजे । गोपिका ती निजे आनंदानें ॥१॥
संधी पाहोनियां प्रवेशला देव । करीत लाघव काय तेव्हां ॥२॥
भ्रताराचे दाढी कांतेची ते वेणी । एकत्र करोनी ग्रंथी देत ॥३॥
करूनि कौतुक निघोनियां गेला । अरुणोदय झाला तये-वेळीं ॥४॥
गोदोहनालागीं गोपी ते उठत । वेणी आंसडीत दाढी-संगें ॥५॥
भ्रतारासी तेव्हां बोले ते कामिनी । न धाय अजूनि मन कैसें ॥६॥
भ्रताराची दाढी ओढितांचि जाण । सक्रोध होऊन बोल-तसे ॥७॥
मस्त होवोनियां माजली धांगडी । करिती ओढाओढी मजलागीं ॥८॥
नामा ह्मणे तेव्हां उठोनी बैसती । आश्चर्य करिसी मनामाजी ॥९॥

२८.
उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहातातां परस्परें ॥१॥
सोडूं जों पाहती सत्वर ग्रंथिका । न सुटे ब्रह्मादिकां कदाकाळीं ॥२॥
सोडितां सुटेना जाळितां जळेना । कापितां कापेना कांहीं केल्या ॥३॥
स्त्रियेलागीं तेव्हां भ्रतार बोलत । तुजसंगें मृत्यु मज आला ॥४॥
दोघेंहि रडत बिदीमाजी येती । कोल्हाळ करिती तयेवेळीं ॥५॥
गोकुळींचे जन डोळां पहाताती । जाऊन सांगती नंदालागीं ॥६॥
नामा म्हणे नंद बैसला चावडी । घेऊन आवदी कृष्णजीला ॥७॥

२९.
गोपीगोप तेथें पातलीं त्वरित । हांसतीं समस्त देखो-नियां ॥१॥
कृष्ण ह्मणे कैसी बांधिसी मजला । बांधिलें तुजला भगवंतें ॥२॥
पायां पडती रडोनी बोलती । सोडवा म्हणती आह्मां-लागीं ॥३॥
पाहोनी किवें त्यांची दया आली चित्ता । कृपेनें पाहातां मुक्त झालां ॥४॥
नामा म्हणे तेव्हां वंदोनी देवासीं । गेलीं निज-धामासीं आनंदानें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP