श्रीकृष्णलीला - अभंग ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३०.
नंदाचिये घरीं चंपाषष्ठी नेम । कुळीं कुळधर्म मार्तं-डाचा ॥१॥
पक्कानेंही नाना रोटिया भरीत । केलीं अपरमित यशोदेनें ॥२॥
वाघियामुरळी सांगितलीं दोन्हीं । आला चक्रपाणी खेळतांची ॥३॥
मातेलागीं म्हणे लागलीसे क्षुधा । थांबरे गोविंदा ह्मणे माता ॥४॥
घेतलीसे आळी करी लगबग । विस्तारिलें सांग नैवेद्यासी ॥५॥
नेवोनियां पुढें देवांच्या ठेवीले । बोलवा वहीलें आमंत्रिकां ॥६॥
तोंवरी मागे तो भक्षी नारायणा । यशोदा आपण रागावली ॥७॥
दुरळ हा देव होय आतां कैसें । मार्तंडाचें पिसें लागे तुज ॥८॥
करी क्षणामाजी वांकडेंचि मुख । हरी खात वीख कालवलें ॥९॥
जाणीतला भाव मायेचें अंतर । करूनियां खरें दावी देव ॥१०॥
वांकडिया हातें ग्रास वाली मुखें । मुख तेंहि सुखें तैसें दावी ॥११॥
पिसाळल्यापरी करी वेडेचार । भय वाटे फार माये-लागीं ॥१२॥
पूर्वीं म्यां सांगतां नायकसी कैसा । पुढें हा वोळसा वोढावला ॥१३॥
पाचारिले देवऋषि हालविती सुपें । त्याचिया न भियें देव निघे ॥१४॥
वासोनियां डोळे तयाकडे पाहे । कांपे तया भयें थरथरां ॥१५॥
मंत्रूनियां पाणी आणिला अंगारा । तयाचा मातेरा केला देवें ॥१६॥
नवसा न पावती गोकुळींच्या देवता । उपाय मागुता राहिलासे ॥१७॥
चिंतावली माय मूर्च्छ आली तीसी । झाली पोरपिसी मोहजाळें ॥१८॥
जाणोनी अंतर ह्मणे कृष्णार्पण । तेव्हां आलें विघ्न दूर होय ॥१९॥
नाना ह्मणे देव पाहे कृपादृष्टी । जाणवलें पोटीं हाचि देव ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP