श्रीकृष्णलीला - अभंग ३१
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
३१.
गोपिका ह्मणती यशोदा सुंदरी । करितो मुरारी खोदी बहु ॥१॥
यशोदेप्रती त्या गौळणी बोलती । संकष्ट चतुर्थी व्रत घेई ॥२॥
गणेश देइल यासी उत्तम गुन । वचन प्रमाण मानावें हें ॥३॥
गजवदनासी तेव्हं म्हणत यशोदा । माझिया मुकुंदा गुण देईं ॥४॥
ऐसें हें वचन ऐकुन कृष्णनाथें । सत्य गणेशातें केलें तेहं ॥५॥
एक मास खोडी देवें नाहीं केली । प्रचीत ते आली यशोदेसी ॥६॥
धन्य धन्य देव गणपती पाहे । यशोदा ती राहे उपवासी ॥७॥
इंदिराबंधूचा उदय होऊं पाहात । यशोदा करीत पूज-नासी ॥८॥
शर्करमिश्रित लाडू येकवीस । आणीक बहुवस मोदक ते ॥९॥
ऐसा नैवेद्याचा हारा तो भरुनी । दे-व्हारां नेऊनि ठेवी माता ॥१०॥
मातेसी म्हणत तेव्हां ह्लषिकेशी । लाडू केव्हां देसी मजलागीं ॥११॥
यशोदा म्हणत पूजीन गजवदना । नैवेद्य दाऊन देईन तुज ॥१२॥
ऐसें म्हणूनियां माता बाहेर गेली । देव्हार्याजवळी हरि होता ॥१३॥
एकांत देखोनी हारा उचलिला । सर्व स्वाहा केला एकदांची ॥१४॥
घेऊनियां ग्रास उगाची बैसला । भक्तांलागीं लीला दावीतसे ॥१५॥
धूप घेवोनियां आली सदनातें । रिता हारा तेथें देखियेला ॥१६॥
विस्मय बहुत मातेसी वाटला । नैवेद्य हरीला पुसतसे ॥१७॥
कृष्ण म्हणे सत्यवचन मानीं माते । एक सहस्र उंदीर आले येथें ॥१८॥
त्यांत एक थोर होता तो मूषक । वरी विनायक बैसलासे ॥१९॥
सकळीक लाडू सोंडेनें उच-लीले । सर्व आकर्षिले एकदांची ॥२०॥
सर्वांगासी त्याणें चर्चिला शेंदूर । सोंड भयंकर हालवितसे ॥२१॥
उंदीर भ्यासुर भ्यालों मी देखून । वळली वदनीं बोबडी ते ॥२२॥
न बोलवे कांहीं माझेनी जननी । क्षुधा मजलायोगी लागलीसे ॥२३॥
लाडू मज देईं ह्मणे जनार्दन । माता क्रोधें करून बोलतसे ॥२४॥
माता ह्मणे कृष्णा पाहूं तुझें वदन । लाडू त्वांचि पूर्ण भक्षियेले ॥२५॥
हरि ह्मणे माते लाडू ते बहुत । मातील मुखांत कैसे माझ्या ॥२६॥
गणपति सर्व लाडू गेलासे घेऊन । आलें विहरण मजवरी ॥२७॥
हरी ह्मणे मज मारूं नको माते । तुज वदनातें दावीतों मी ॥२८॥
कृष्ण-नाथें तेव्हां मुख पसरिलें । ब्रह्मांडें देखिलीं मुखामाजी ॥२९॥
असंख्य गणपती दिसती वदनीं । पाहातसे नयनीं यशोदा ते ॥३०॥
मुखांत गणपति मातेसी बोलत । पूजावें त्वरित हरिलागीं ॥३१॥
ऐसें देखोनियां समाधिस्थ होत । चहूंकडे पाहात तटस्थ ते ॥३२॥
योगमाया तेव्हां हरीनें घालून । मातेपुढें जाण उभा असे ॥३३॥
यशोदा हरी कडेवरी घेत । मुखातें चुंबित आवडीनें ॥३४॥
हरि घेऊनियां घरासी ती गेली । भोजना बैसली नामा ह्मणे ॥३५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP