श्रीकृष्णलीला - अभंग ३३ ते ३५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
३३.
मंदिरा नेवोनि पलंगीं बैसविला । म्हणत हरीला तये-वेळीं ॥१॥
ऐसिया समयीं थोर तूं अससी । तरी ह्लषिकेशी बरें होतें ॥२॥
देखोनि तिचा भाव थोर झाला हरी । पाहूनि सुंदरी आन-दली ॥३॥
सुखशयनीं राधा एकांतीं असतां । अनया अवचिता आला तेथें ॥४॥
सक्रोध होऊनि बोलला राधेसी । कोणासी बोलसी गुजगोष्टी ॥५॥
भ्रताराचा शब्द ऐकतां श्रवणी । दचकली मनीं रा-धिका ते ॥६॥
हात जोडोनियां विनवित हरीसी । होईं ह्लषिकेशी सान आतां ॥७॥
ऐकोनि करुणा बाळ झाला हरी । दहिंभात झडकरी ठेवीं पुढें ॥८॥
कवाड उघडून बोलत अनयासी । घरांत ह्लषिकेशी जेवितसे ॥९॥
कावड ठेऊनि घरांत तो आला । जेवितां देखिला कृष्णनाथ ॥१०॥
नामा ह्मणे अनया आनंदला मनीं । ह्लदयीं चक्रपाणी धरियेला ॥११॥
३४.
राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तूं ॥१॥
एकलें हें तुज कर्मेना मंदिरीं । खेळावया हरी आणीत जाईं ॥२॥
भ्रतार वचन राधेनें ऐकोनी । आनंद तो मनीं थोर तिच्या ॥३॥
स्वामी तुमची आज्ञा मजलागीं प्रमाण । म्हणोनी चरण वंदियेले ॥४॥
सुखशयनीं राधा भोगित अनंता । गोकुळांत वार्ता प्रगटली ॥५॥
राधेचिया घरीं थोर होतो हरी । गोकुळींच्या नारी गुजगुजती ॥६॥
यशोदे मातेसी सांगती सुंदरी । आवरीं मुरारी आपुला हा ॥७॥
तैसीच जाऊन राधेच्या गृहासी । सांगती सासूसी तिच्या तेव्हां ॥८॥
राधेलागीं वृद्धा म्हणे तयेवेळीं । घरासी वन-माळी आणूं नको ॥९॥
नामा म्हणे लोकीं पडियेली तुटी । तीसी जगजेठी अंतरला ॥१०॥
३५.
प्रात:काळीं राधा उठोनियां जाण । नंदसदनावरून पाण्या जात ॥१॥
इकडे गोदोहन करीतसे हरी । पाहे उभी द्वारी राधिका ते ॥२॥
विसरे गोदोहन वृषभाखालीं बैसत । कृष्णजीचें चित्त वेधियेलें ॥३॥
भरणा रिचवोनी बाहेर आली माता । वृषभ दोहतां हरि देखे ॥४॥
माता ह्मणे काय करीसी घननीळा । प्रत्युत्तर त्यावेळां हरि देत ॥५॥
दाराकडे पाहे राधेसी न्याहाळून । मातेसी वचन बोलतसे ॥६॥
भरणा भरला आतां जांई तूं घेऊन । माता क्रोधायमान झाली तेव्हां ॥७॥
कृष्णासी यशोदा ह्मणे खालीं पाहे । वृषभ कीं गाय दोहतसे ॥८॥
कृष्ण खालीं पाहे वृषभ देखिला । ह्मणे यशोदेला ऐक एक ॥९॥
देवाचा नवस चुकली बहुतेक । चौ थानांचें थान एक झालें ॥१०॥
वचन ऐकोनी हांसत यशोदा । द्वारीं उभी राधा देखियेली ॥११॥
कांगे येथें उभी घेऊनि घागर । जातसे सत्वर राधा तेव्हां ॥१२॥
नामा म्हणे ऐसें झालें । मुख प्रक्षाळून हरि जेविले ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP