पंचक - संतपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
मूर्ति त्रिलोकीं सांवळी ।
दृष्टि विश्वाची चुकली ॥१॥
भाग्यें आले संतजन ।
जालें देवाचें दर्शन ॥२॥
देवजवळी अंतरीं ।
भेटी नाहीं जन्मवरी ॥३॥
रामदासीं योग जाला ।
देहीं देव प्रगटला ॥४॥
॥२॥
जन्मोजन्मींचा सांगात ।
भेटी झाली अकस्मात ॥१॥
आतां सांडितां सुटेना ।
संतु प्रीतीचा तुटेना ॥२॥
सदा नित्य निरंतरीं ।
देह सबाह्य अंतरीं ॥३॥
त्याग करितां संयोग ।
नव्हे कल्पांतीं वियोग ॥४॥
॥३॥
देव अभक्ता चोरला ।
आम्हां भक्तां सांपडला ॥१॥
भेटी जाली सावकाश ।
भक्ता न लागती सायास ॥२॥
पडे विवेकवेत्रपाणि ।
वरी दृष्टीची दाटणी ॥३॥
रामदासाचें अंतर ।
देवापाशीं निरंतर ॥४॥
॥४॥
भेटी देईना जनासी ।
पाठी लागे सज्जनासी ॥१॥
ऐसें प्रीतीचें लक्षण ।
भेटीवीण नाहीं क्षीण ॥२॥
नसे साधन सायासीं ।
तो हा आम्हां अनायासीं ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
संग संगाचेनी गुणें ॥४॥
॥५॥
देव आम्हांसी जोडिला ।
संतसंगें सांपडला ॥१॥
कडाकपाटीं शीखरीं ।
धुंडिताती नानापरी ॥२॥
नाना शास्रीं धांडोळिती ।
जयाकारणें कष्टती ॥३॥
रामदास म्हणे भावें ।
वेगीं संतां शरण जावें ॥४॥
॥६॥
ब्रह्मादिकांसी दुर्लक्ष ।
देव भक्तांसी सुलभ ॥१॥
थोरपणें आकळेना ।
जाणपणासी कळेना ॥२॥
नाहीं योगाची आटणी ।
नाहीं तपीं तीर्थाटणीं ॥३॥
दास म्हणे साधूवीण ।
नाना साधनांचा शीण ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP