पंचक - भक्तिपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
सोडी संसाराची आस ।
धरी भक्तीचा हव्यास ॥१॥
दु:खमूळ हा संसार ।
तयांमध्यें भक्ति सार ॥२॥
ग्रंथ पहातां लक्ष कोटी ।
जेथें तेथें भक्ति मोठी ॥३॥
जन्मा आलियाचें फळ ।
दास म्हणे तें सकळ ॥४॥
॥२॥
राम दासाचा कैवारी ।
सेवकांचा अंगीकारी ॥१॥
अंगीकारिले वानर ।
त्यांची ख्याति झाली थोर ॥२॥
स्वये निजधामा जाणें ।
राज्य कीजे बिभीषणें ॥३॥
भक्ता उणें देखे जेथें ।
स्वयें धांव घाली तेथें ॥४॥
तया वैर केलें साहे ।
परी भक्तांचें न साहे ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
निजभक्तांचेनि गुणें ॥६॥
॥३॥
भक्ति रामाची करावी ।
वंशावळी उद्धरावी ॥१॥
तन मन आणि धन ।
सर्व लैकिक सोडून ॥२॥
पांचा पंचकाचे भरें ।
सर्वकाळ अत्यादरें ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
दृढ भक्तीचेनि गुणें ॥४॥
॥४॥
अरे मनुष्यें काय द्यावें ।
एक रघुवीरा मागावें ॥१॥
उपमन्यें धांवा केला ।
क्षीरसिंधु त्या दधिला ॥२॥
धरु शरण चक्रपाणी ।
अढळ शोभा तारांगणीं ॥३॥
राम म्हणतां वदनीं ।
गणिका बैसलीं विमानीं ॥४॥
बाळ मित्र निष्कांचन ।
त्याचें दरिद्र विच्छिन्न ॥५॥
कुब्जा खंगली म्हातारी ।
केली लावण्यसुंदरी ॥६॥
शुकमिषें रामवाणी ।
म्हणतां पावन कुंटिणी ॥७॥
शरणागत निंशाचर ।
राज्य देऊनी अमर ॥८॥
होता बंधूनें गांजिला ।
तो सुग्रीव राजा केला ॥९॥
तया अंबऋषीकारणें ।
दहा जन्म येणें जाणें ॥१०॥
रामदासीं रामराव ।
निजपदीं दिधला ठाव ॥११॥
॥५॥
शिरीं आहे रामराज ।
औषधांचें कोण काज ॥१॥
जो प्रयत्न रामावीण ।
तो तो दु:खासी कारण ॥२॥
शंकराचें हळाहळ ।
जेणें केलें सुशीतळ ॥३॥
आम्हां तोचि तो रक्षिता ।
रामदासीं नाहीं चिंता ॥४॥
॥६॥
विषे शंकरा जाळिलें ।
ज्याच्या नामें शीतळ झालें ॥१॥
रामनामाची औषधी ।
जेणें तुटे भवव्याधि ॥२॥
शिवें केली काशीपुरी ।
विश्व नामें मुक्त करी ॥३॥
रामनामें पुरे कोड ।
न मनें त्यासि घाली होड ॥४॥
रामदासीं दृढ भाव ।
संदेहासि केली भाव ॥५॥
॥७॥
दास आपुले मानावे ।
माझे गुण पालटावे ॥१॥
काम क्रोध मद मत्सर ।
माझे ठायीं तिरस्कार ॥२॥
राग द्वेष लोभ दंभ ।
नांदे अंतरीं स्वयंभ ॥३॥
रामदास म्हणे आतां ।
देवा तुझे गुन गातां ॥४॥
॥८॥
धन्य धन्य ते वानर ।
जवळी राम निरंतर ॥१॥
ब्रह्मादिकां नातुडे ध्यानीं ।
राम वानरगोठणीं ॥२॥
वेद श्रुति नेणे महिमा ।
तो गुज सांगे प्लवंगमा ॥३॥
वानरवेष धरी देव ।
भाग्यें लाधला केशव ॥४॥
दास म्हणे ते देवाचे ।
आवडते रघुनाथांचे ॥५॥
॥९॥
ताळ वाजे मंद मंद ।
मुखीं हरिनाम छंद ॥१॥
फडके ताळी ऐके वेळे ।
घोषे नाचे हें आगळें ॥२॥
रंगीं हरिनाम मातले ।
नामघोषें आनंदले ॥३॥
उभे हरिदास रंगणी ।
रामदास लोटांगणीं ॥४॥
॥१०॥
राज्य आलें रघुनाथाचें ।
भाग्य उदेलें भक्तांचें ॥१॥
कल्पतरू चिंतामणी ।
कामधेनूची दुभणी ॥२॥
परिस जहाले पाषाण ।
अंगीकार करी कोण ॥३॥
नाना रत्नांचे डोंगर ।
अमृताचें सरोवर ॥४॥
पृथ्वी अवघी स्वर्णमय ।
कोणीकडे न्यावें काय ॥५॥
ब्रह्मादिकांचे कैवारी ।
रामदासाचे अंतरीं ॥६॥
॥११॥
एकादशी नव्हे व्रत ।
वैकुंठींचा महापंथ ॥१॥
परी रुक्मांगदाऐसा ।
व्हावा निश्चय मानसा ॥२॥
एकादशी उपोषणें ।
विष्णुलोकीं ठाव घेणें ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
काय प्रत्यक्ष प्रमाणें ॥४॥
॥१२॥
रुक्मांगद होता नर ।
आम्ही काय आहों खर ॥१०॥
देव भक्तवेळाईत ।
राव रंक नाहीं तेथ ॥२॥
तेणें नेला अवघा गांवू ।
आम्ही स्वयें तसे जावूं ॥३॥
रामीं रामदासीं काज ।
धरा एकामेकां लाज ॥४॥
॥१३॥
ज्यासी हरीची प्राप्ति व्हावी ।
तेणें हरिदिनी करावी ॥१॥
एकादशी त्यजिल्या अन्न ।
प्राप्त वैकुंठभुवन ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
हरिजागर उपोषणें ॥३॥
॥१४॥
एकादशीच्या अन्नाखालीं ।
भय पातकें लपालीं ॥१॥
कां जीं संतीं अव्हे-रिलीं ।
म्हणूनि तेथें थारावलीं ॥२॥
म्हणे रामीं रामदास ।
घडे अंगीकारी त्यास ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
रामकृपेचेनि गुणें ॥४॥
॥१६॥
जेथूनिया प्रबळता ।
केली तेथेंचि अहंता ॥१॥
तरी ते सर्वही जाणार ।
पुढें घातचि होणार ॥२॥
होताहे भवाचा भार ।
झाली वृत्ति अनावर ॥३॥
दास म्हणे एका-कार ।
पडे देवासी कातर ॥४॥
॥१७॥
सकळ कळा हातीं आल्या ।
रिद्धिसिद्धिही वोळल्या ॥१॥
तरि आदि सांडूं नये ।
देवा भक्तांचा उपाये ॥२॥
मनोसिद्धि वाचासिद्धि ।
जाहली उदंड उपाधी ॥३॥
दास म्हणे राज्य झालें ।
इंद्रपद हाता आलें ॥४॥
॥१८॥
आत्मज्ञानपारंगत ।
झाला बोलका महंत ॥१॥
गुरुपद हाता आलें ।
भूमंडळीं सत्ता चाले ॥२॥
दास म्हणे ज्ञान झालें ।
सर्व मिथ्यासें कळलें ॥३॥
॥१९॥
ज्ञान झालें भक्तजना ।
सांडूं नये उपासना ॥१॥
एका साराचेंहि सार ।
सर्व सांगतों विचार ॥२॥
हेंचि सर्वांचें कल्याण ।
मानूं नये अप्रमाण ॥३॥
दास म्हणे अनु-भवलें ।
भजन भगवंताचें भलें ॥४॥
॥२०॥
देव असतां पाठीराखा ।
त्रैलोक्याचा कोण लेखा ॥१॥
नाना उद्योग वाढती ।
नाना चिंता उद्भवती ॥२॥
स्वस्थ वाटेना अंतरीं ।
नाना व्यवधान करी ॥३॥
रामदास म्हणे भावें ।
भजन देवाचें करावें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥९०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP