पंचक - झटपणीपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
पांचां भूतांची झडपणी ।
जाली जीवांसी जाचणी ॥१॥
पूर्व स्मरण राहिलें ।
प्राणी आंगीं घुमारिलें ॥२॥
बाधा जाहली अंतरीं ।
मन आळचि तें करी ॥३॥
बोलों जातां सारासार ।
त्यासी कळेना विचार ॥४॥
जड देहची भावना ।
संतजन ओळखेना ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
सत्य बोलावें शहाणें ॥६॥
॥२॥
आले संत पंचाक्षरी ।
शब्द मारिती अंतरीं ॥१॥
पोटीं प्रस्ताव घालिती ।
अनुतापें पोळ विती ॥२॥
दु:खमूळ हा संसार ।
विवेकाचे फोकें मार ॥३॥
धिक्काराचा धूर देती ।
तेणें होतसे विपत्ति ॥४॥
संसाराची रक्षा भली ।
त्याचे आंगीं बाणविली ॥५॥
दास म्हणे निगुती ।
प्राणीयांसी बोलविती ॥६॥
॥३॥
कोण कोठील आहेसी ।
आम्हां सांग निश्चयेंसी ॥१॥
स्थूळ सूक्ष्म कारण ।
सांग तुझें कोण स्थान ॥२॥
पिडब्रह्मांडरचना ।
अष्टदेहविवंचना ॥३॥
पिंडज्ञान तुझें स्थूळ ।
किंवा तत्त्वांचा पाल्हाळ ॥४॥
सांग मायेचें अरण्य ।
किंवा तुझें ब्रह्मारण्य ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
आतां बोलावें स्मरणें ॥६॥
॥४॥
चहूं निगमींचीं बीजें ।
कानीं फुंकिलीं सहजें ॥१॥
तेणें प्राणी उमजला ।
पाहे विचार आपुला ॥२॥
नित्यानित्य सारासार ।
केला विवेक विचार ॥३॥
संत असतां दाविलें ।
आंत अनंत भाविलें ॥४॥
नाना साधनीं सायासीं ।
दृढ केलें निश्चयेंसीं ॥५॥
दास म्हणे निरूपणी ।
केली भूतांची झाडणी ॥६॥
॥५॥
कांहीं एक उमजलें ।
पुन्हां संदेहीं पडलें ॥१॥
म्हणे मज खाया देणें ।
मागें संदेह सांडणें ॥२॥
आलें मीपणासरिसें ।
त्याच विषयें संतोषे ॥३॥
येणेंआनष्ठेसी मांडिलें ।
मग आम्हीं सांडविलें ॥४॥
देहबुद्धीचें अज्ञान ।
मागें संशयाचें आन ॥५॥
रामदासीं उमजलें ।
भूतापासूनि सोडिलें ॥६॥
॥६॥
पंचभूतांचें अज्ञान ।
गेलें नि:शेष निघोन ॥१॥
म्हणे येथें कोण आलें ।
जन कासया मिळाले ॥२॥
मी तों आहें सावधान ।
मज कां केलें बंधन ॥३॥
पूर्व स्मरण मजला ।
भूत लागलें जनाला ॥४॥
मी तो वस्तु केवळ ।
वायां मिळाले सकळ ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
संतकृपेचेनी गुणें ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP