पंचक - संशयपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
गेलों काशी विश्वेश्वरा ।
सेतुबंध रामेश्वरा ॥१॥
तरी संशय तुटेना ।
पुर्ण गुण पालटेना ॥२॥
भागीरथी गोदावरी ।
केली कृष्णा आणि कावेरी ॥३॥
राम अयोध्येचा पति ।
केली कृष्णद्वारावती ॥४॥
बद्रि ओढया जगन्नाथ ।
केला स्वामी त्रिमल्लनाथ ॥५॥
मातापूर तुळजापूर ।
सप्तश्रृंगी कोल्हापूर ॥६॥
केली पंढरी नरहरी ।
शंभू पाहिला शीखरीम ॥७॥
मोरेश्वर भुलेश्वर ।
ज्वालामुखी हरेश्वर ॥८॥
सिद्ध मैराळ मारुती ।
देव केले नेणों किती ॥९॥
बारा लिंगें या वेगळीं ।
तीर्थे केलीं भूमंडळीं ॥१०॥
रामदास म्हणे भावें ।
तरी हें मन पालटावें ॥११॥
॥२॥
तेणें संशय तुटती ।
पूर्व गुण पालटती ॥१॥
एक उपासना धरी ।
भक्ति भावें त्याची करी ॥२॥
सर्व नेश्वर जाणून ।
वृत्ति करी उदासीन ॥३॥
सत्य वस्तु तें ध्यानें साचार ।
त्याचा करावा विचार ॥४॥
त्यागुनियां अनर्गळ ।
सदा असावें निर्मळ ॥५॥
ध्यानें आवरानें मन ।
आणि इंद्रियदमन ॥६॥
अखंड वाचें रामनाम ।
स्नान संध्या नित्यनेम ॥७॥
दास म्हणे सर्व भाव ।
जेथें भाव तेथें देव ॥८॥
॥३॥ मुख्य पूजा परंपार ।
एकाहूनि एक थोर ॥१॥
आतां कोठें ठेऊं भाव ।
जेथें तेथें महादेव ॥२॥
माझे कुळीचें दैवत ।
पाहों जातां असंख्यात ॥३॥
राम कृष्ण महादेव ।
बनशंकरी खंडेराव ॥४॥
माता सटवाई आपण ।
स्वामी लक्ष्मी नारायण ॥५॥
वीर बैसविला देव्हारा ।
माझी माता एकवीरा ॥६॥
माय राणी पांडुरंग ।
मुंजा नरसिंग झोटिंग ॥७॥
महालक्ष्मी रवळिया ।
कुळदैवत मोरया ॥८॥
मातापुरीची यमाई ।
सप्तशृंगीं चंडाबाई ॥९॥
तुळजापुरीं तुकाबाई ।
घाटमाथाची नवलाई ॥१०॥
दंडपाणी जोगेश्वरी ।
माता कामाक्षी कावेरी ॥११॥
ह्मैसबाई नारायण ।
आग्या वेताळ कारण ॥१२॥
मुंजा जोगिणी मांगिणी ।
बहुसाल मानविणी ॥१३॥
धोपेश्वर कोपेश्वर ।
सिद्धेश्वर सोमेश्वर ॥१४॥
सात पांच रंगनाथ ।
व्यंकटेश वैजनाथ ॥१५॥
अन्नपूर्णा शालिग्राम ।
हयग्रीव मेवश्याम ॥१६॥
परशुराम कोटेश्वर ।
नाना शक्ती परमेश्वर ॥१७॥
महिकावती भोगावती ।
आमुच्या देव्हारां बैसती ॥१८॥
रानदेवी नारायण ।
ह्मैसासुर मल्लिकार्जुन ॥१९॥
अग्निसारिखें दैवत ।
आणि मुख्य प्राणनाथ ॥२०॥
देव तांबडे अनेक ।
बहुसाल केला टाक ॥२१॥
लांबे देव ते नर्मदे ।
देव दाटले नुसदे ॥२२॥
सोमकांत सूर्यकांत ।
नाग आणि चक्रांकित ॥२३॥
औटहात मृत्तिकापूजन ।
नाना देवांचें लेखन ॥२४॥
डाउ पूजावे अनंत ।
गौरी आणि कपोईत ॥२५॥
रामदासीं देव एक ।
येरे सर्वही माईक ॥२६॥
॥४॥
भाव धरी संतापायीं ।
तेणें देव पडे ठायीं ॥१॥
नाना देवांचें भजन ।
तेणें नोहे समाधान ॥२॥
सकळ देवांमध्यें सार ।
आहे अनंत अपार ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
अवघे देव केलें जेणें ॥४॥
॥५॥
आतां कोणा शरण जावें ।
सत्य कोणाचें मानावें ॥१॥
नाना पंथ नाना मतें ।
भूमंडळीं असंख्यातें ॥२॥
जपी तपी नाना हटी ।
मंत्रावळी लक्ष कोटी ॥३॥
एक मुद्रा हे लविती ।
एक आसन घालिती ॥४॥
एक दाविती देखणी ।
एक अनस्यूतध्वनि ॥५॥
एक नासाग्रीं लक्षिती ।
एक हदयीं दाविती ॥६॥
पिंडज्ञानी तत्त्वज्ञानी ।
योगाभ्यासी सिद्ध ज्ञानी ॥७॥
पंचाक्षरी धूम्रपानी ।
गोरांजन उपोषणी ॥८॥
दुग्धाहारी निराहारी ।
फळाहारी पर्णाहारी ॥९॥
एक औषधीप्रयोग ।
एक देती धातुमार्ग ॥१०॥
एक विभूती लविती ।
एका प्रिया द्वारावती ॥११॥
दंडधारी जटाधारी एक बाळब्रह्मचारी ॥१२॥
मौनी नग्र दिगंबर ।
पंचाक्षरी योगेश्वर ॥१३॥
एक जोशी आणि वैदिक ।
एक पंडित पुरा.णिक ॥१४॥
साधु संत मुनीश्वर ।
ऋषीश्वर कवीश्वर ॥१५॥
गाती हरिदास बागडे ।
नृत्य करिती देवापुढें ॥१६॥
एक म्हणती अवघे वाव ।
एक म्हणती अवघे देव ॥१७॥
एक कळोंचि नेदिती ।
एक दाटुनि सांगती ॥१८॥
एक कर्मींच तप्तर ।
एक कर्मीं अनादर ॥१९॥
एक मानिती सगुण ।
एक मानिती पाषाण ॥२०॥
एके केला सर्व त्याग ।
एक म्हणती राजयोग ॥२१॥
रामदास सांगे खूण ।
भक्तिवीणें सर्व शीण ॥२२॥
॥६॥
शरण जावें संतजना ।
सत्य मानावें निर्गुण ॥१॥
नानामतीं काय चाड ।
करणें सत्याचा निवाड ॥२॥
ज्ञान भक्तीसी जाणावें ।
भक्त तयासी म्हणावें ॥३॥
रामीं रामदास सांगे ।
सर्वकाळ संतसंगें ॥४॥
॥७॥
संत कैसेनी जाणावे ।
साधु कैसे ओळखावे ॥१॥
बहुत गोसावी असती ।
भले अवघेचि दीसती ॥२॥
एक संसारीं गुंतले ।
एकें वेष पालटिले ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
कैसीं संतांची लक्षणें ॥४॥
॥८॥
तेचि जाणावे सज्जन ।
जयां शुद्ध ब्रह्मज्ञान ॥१॥
जवंवरी देहाची संगति ।
तंववरी सगुणीं भजती ॥२॥
जाणोनियां सारासार ।
सदा श्रवणीं तप्तर ॥३॥
बाह्यत्याग संपादणे ।
अंतरत्याग निरूपणें ॥४॥
कर्म करिती आवडीं ।
फळाशेची नाहीं गोडी ॥५॥
शांति क्षमा आणि दया ।
सर्वसख्य मानी जया ॥६॥
हरिकथानिरूपण ।
सदा श्रवन मनन ॥७॥
बोलासारिखें चालणें ।
तींच संतांचीं लक्षणें ॥८॥
एकनिष्ठ उपासना ।
अति तत्पर भजना ॥९॥
स्वार्थ सांडुनियां देणें ।
नित्य तेंचि संपादणें ॥१०॥
म्हणे रामीं राम-दास ।
जया नाहीं आशापाश ॥११॥

॥ अभंगसंख्या ॥९०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP