पंचक - कलियुगपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
आलें भगवंताच्या मना ।
तेथें कोणाचें चालेना ॥१॥
जैसा कलिराजा आला ।
धर्म अवघाचि बुडाला ॥२॥
नीति मर्यादा उडाली ।
भक्ति देवाची चुकली ॥३॥
दास म्हणे पाप झालें ।
पुण्य अवघेंचि बुडालें ॥४॥
॥२॥
विप्रीं सांडिला आचार ।
क्षेत्रीं सांडिला विचार ॥१॥
मेघवृष्टि मंदावली ।
पिकें भूमीनें सांडिलीं ॥२॥
बहुवृष्टि अनावृष्टि ।
दास म्हणे केली सृष्टि ॥३॥
॥३॥
लोक दोष आचरती ।
तेणें दोषें भस्म होती ॥१॥
जनी दोष जाहले फार ।
तेणें होतसे संहार ॥२॥
रामदास म्हणे बळी ।
दिसेंदिसें पापें कळीं ॥३॥
॥४॥
नाहीं पापाचा कंटाळा ।
येतो हव्यास आगळा ॥१॥
जना सुबुद्धि नावडे ।
मन धांवे पापाकडे ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
पुण्य उणें पाप दुणें ॥३॥
॥५॥
पुण्यक्षेत्रें तीं मोडावीं ।
आणि ब्राह्मण्यें पीडावीं ॥१॥
पुण्यवंत ते मरावे ।
पापी चिरंजीव व्हावे ॥२॥
रामदास म्हणे वाड ।
विघ्रें येती धर्मा आड ॥३॥
॥६॥
लोक मिणधेचि चालती ।
त्यांसि होताती विपत्ति ॥१॥
धर्मप्रवृत्ति बुडावी ।
शास्रमर्यादा उडावी ॥२॥
रामदास म्हणे देवें ।
बौद्ध होऊनी बैसावें ॥३॥

॥ अभंगसंख्या ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP