मूळस्तंभ - अध्याय १९

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

श्रीगुरुभ्योनमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥

शक्ति म्हणे जी देवा ॥ बारां लिंगांचा जो ठेवा ॥ तो मजप्रती सांगावा ॥ ईश्वरा तुम्ही ॥१॥

मग शंकर म्हणे गे उमे ॥ सांगतो ज्योतिलिंगांची नांवे ॥ जी पृथ्वीमाजी उत्तमे ॥ अवतार मम ॥२॥

श्र्लोक ॥ सोराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् ॥ उज्जयिन्यां महाकालमोकारे ह्यमलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैजनाथं च नागेशं द्वारकावने ॥ सेतुबंधे तु रामेश डाकिन्यां भीमशंकरम् ॥२॥

हिमालये च केदारं घृष्णेश्वरं शिवालये ॥ वाराणस्यां तु विश्वेश त्र्यंबकं गौतमीतटे ॥३॥

एतानि ज्योतिर्लिंगानि प्रातःकाले तु यः पठेत् ॥ सर्वकामानवाप्रोति शिवलोकं स गच्छाति ॥४॥

हीं ज्योतिर्लिंगे बारा ॥ नित्य यांचा घोष करा ॥ आणि सर्व पापें संहारा ॥ पठणमात्रें सिद्वि होय ॥३॥

ह्या बारालिंगांची ज्यांसी दर्शनें ॥ घडती तयांची तुटती बंधने ॥ आणि नामें स्मरतां जाणें ॥ महादोष नासती ॥४॥

ऐसा हा लिंगमहिमा उमे ॥ तुज सांगितला अतिप्रेमे ॥ मी सर्व ह्या नानाकर्मे ॥ खेळत असें ॥५॥

सायंकाळीच्या दर्शनेकरुन ॥ सप्तजन्मीची पापें होती दहन ॥ ऐसे तुजसी संपूर्ण ॥ सांगितलें जाण देवी ॥६॥

मी एकचि लिंग हें जाणणें ॥ शक्ति सहित करी अवतरणें ॥ परी त्रिभुवनीं पूर्णपणे ॥ भरलो असे मीच की ॥७॥

जैसें मन असे अगणित ॥ कीं मेघावळी गगनांत ॥ तैसा सर्वभुती मी जगन्नाथ ॥ हीं भूतें मजमाजी ॥८॥

ऐसें महादेवें बोलतां ॥ उमा झाली आनंदभरिता ॥ मग चरणावरी ठेवुनी माठा ॥ म्हणें तूंचि एक सत्य ॥९॥

तुजपासोनि सर्व जाहलें ॥ तुवांचि हें सर्व केलें ॥ तुझा तूंचि या सर्वबोलें ॥ अनुमान नाहीं ॥१०॥

सगुण निर्गुणादि करणी ॥ वेदांतसिद्वांत पक्ष दोन्ही ॥ तुझा तूंचि शूलपाणी ॥ जगदाकार ॥११॥

ऐसें बोलूनि ती भवानी ॥ लागली देवाच्या चरणी ॥ मग बोले पिनाकपाणी ॥ ग्रंथमहिमा ॥१२॥

आतां या ग्रंथाचें महिमान ॥ सांगतों ऐक चित्त देऊन ॥ हा मूळस्तंभ निबंध गहन ॥ असे जाण पैं ॥१३॥

शंभु म्हणे भवानी ॥ सर्वही ग्रंथ यापासुनी ॥ आगमनिगमादि करणी ॥ यापासुनियां ॥१४॥

कवीश्वरी कवित्व करणें ॥ सुदुण निर्गुण संभाषणें ॥ वेदांत सिंद्वात पुराणे ॥ ह्या शिवनिबंधापासून ॥१५॥

आणि नानाप्रकार वेदमत ॥ तैसेचि अनेक शास्त्रार्थ ॥ आचार क्रिया धर्म समस्त ॥ या मूळस्तंभापासूनि ॥१६॥

नाना मंत्र यंत्र साधन ॥ लय अलक्ष ध्यान धारण ॥ नाना तर्क शब्दज्ञान ॥ ह्या शिवनिंबधें ॥१७॥

ह्य ग्रंथाचे झाले निर्माण ॥ जेथें माझे निबंध ज्ञान ॥ तें जगप्रसिद्व कीर्तन ॥ कल्याण वो देवी ॥१८॥

तें कल्याणी माझें भवन ॥ तेथें हा ग्रंथराज झाला जाण ॥ शास्त्रपुराणासी पांघरुण ॥ मूळस्तंभ निबंध हा ॥१९॥

न वाचिजे वेश्याद्वारी ॥ सभेमध्यें लौकिक नगरी ॥ जे पापिये दुराचारी ॥ त्यांच्या श्रवणी न घालिजे ॥२०॥

निंदक दुर्जन कंटक ॥ अभक्त अनाचारी दुष्ट लोक ॥ वाचाभ्रष्ट अविश्वासुक ॥ त्यांसी श्रवण न किजिये ॥२१॥

जो इंद्रियलंपट नर ॥ परघातकी मद्यपी क्रूर ॥ त्याच्या श्रवणीं न घालावें उत्तर ॥ शिवनिबंधाचें ॥२२॥

जैं पडेल दुर्घट सांकडे ॥ तैं हें कीजे उघडे ॥ परी तें मुनी धडपडे ॥ मग ग्रंथ वाचिजे ॥२३॥

जैं थोर पडेल फांसी ॥ सांकडे नुगवे कोणासी ॥ करितां बहुत सायासी ॥ मग हा ग्रंथ पाहिजे ॥२४॥

ऐकूनियां शिवनिबंधू ॥ येणें मागे चाले श्रेष्ठ साधू ॥ तयासि नलगेचि बाधु ॥ कर्माकर्मी ॥२५॥

जो अनाचारी कुचित्तें ॥ ऐकोनि पापी न वते ॥ तोचि जाणावा तेथें ॥ अनाधिकारी ॥२६॥

जे कोणी वर्तती राज्यमदें ॥ तैसेचि काहीं द्रव्यमदें ॥ आणि वीर्यमदें आंगमदें ॥ स्त्रीमदें कितीएक ॥२७॥

तेथें न वाचिजे शिवनिबंधु ॥ तेथें पापाचाचि संवादु ॥ हा वाचिजे संतसाधु ॥ पुण्यवंतीं ॥२८॥

तेथें नाहीं अनित्यत्व ॥ अथवा कोणाचें कवित्व ॥ विप्रकवीचें ऋषिमत्व ॥ या ग्रंथी नाहीं ॥२९॥

हें ईश्वराचे निरुपण ॥ केलें पार्वतीनें श्रवण ॥ जें आदिकीर्ति कल्याण ॥ तयेस्थळीं ॥३०॥

हें शंभु सांगे आपण ॥ ऐकूनि पार्वती झाली निमग्न ॥ पुनः उभय कर जोडुन ॥ विनवी देवासी ॥३१॥

म्हणे जयजयाजी देवा ॥ मज एक पडला गोंवा ॥ तो संशय उगवावा ॥ समाधान होईल ॥३२॥

जीं सत्तावीस नक्षत्रें ॥ त्यांची नामें सांगा पवित्रें ॥ आणि योगकरणें सर्वत्रें ॥ तिथीवार सांगा देवा ॥३३॥

मग म्हणे श्रीशंकर ॥ ऐक त्यां चा विस्तार ॥ सर्व सांगेन परिकर ॥ तुजलागीं ॥३४॥

मग प्रथम नक्षत्र अश्वनी ॥ भरणी कृत्तिका रोहिणी ॥ मग आर्द्रा पुनर्वसु जाणी ॥ पुष्य आणि आश्लेषा ॥३५॥

मघा पूर्वा उत्तरा हस्त ॥ चित्रा स्वाती विशाखा विख्यात ॥ अनुराधा ज्येष्ठा असत ॥ मूळ आणि पूर्वाषाढा ॥३६॥

उत्तराषाढा अभिजित श्रवण ॥ धनिष्ठा शततारका जाण ॥ पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा आन ॥ रेवती असे सत्ताविसावें ॥३७॥

हीं सत्तावीस नक्षत्रें यांत ॥ अभिजित तें अधिक गुप्त ॥ आतां सत्तावीस योग स्थित ॥ ऐक देवी ॥३८॥

विष्कंभ प्रीती आयुष्यमान् ॥ सौभाग्य आणि शोभन ॥ अतिगंड सुकर्मा , जाण ॥ धृति , शूळ आणि गंड ॥३९॥

वृद्वि , ध्रुव , व्याघात ॥ हर्षण , वज्र , सिद्वि , ब्यतिपात ॥ वरियान् परिघ , विख्यात ॥ शिव सिद्व आणि साध्य ॥४०॥

शुभ , शुक्ल , ब्रह्या आन ॥ ऐंद्र आणि वैधृति जाण ॥ ऐसे योग सत्तावीस पूर्ण ॥ पार्वती वो ॥४१॥

ऐशा सत्तावीस योगांसी ॥ आजि सांगितलें तुजसी ॥ आतां पार्वती परियेसी ॥ अकरा करणें ॥४२॥

प्रथम करण बव ॥ दुसरें जाण बालव ॥ तिंसरे असे कौलव ॥ तैतिल चतुर्थ करण ॥४३॥

गरज वणिज भद्रा शकुनी ॥ चतुष्पाद नाग आणि ॥ किंस्तुघ्न अकरावें जाणी ॥ पार्वती वो ॥४४॥

ऐसी हीं अकरा करणें ॥ पृथ्वी वर्तती जाणे ॥ आतां तूं सर्व मीच जाणणें ॥ हें ज्ञान उत्तम ॥४५॥

ऐसें ऐकोनि देवाचे वचन ॥ गिरजा पावली समाधान ॥ मग स्वामी कर्तिकासी वचन ॥ काय बोलली ॥४६॥

मग उमा स्वामीसी म्हणे ॥ हीं ईश्वरमुखीची वचनें ॥ तुंवा स्वहतें लिहिणें ॥ स्वामी कार्तिका रे ॥४७॥

हा देवमुखी निबंध जाण ॥ त्वां लिहावा संपूर्ण ॥ येणें होईल उद्वारण ॥ सकळ जनांसी ॥४८॥

ऐसें शिवेने कथिलें ॥ मग स्वामी कार्तिकानें लिहिले ॥ जें जें ईश्वरानें सांगितलें ॥ तेंचि लिहिले या ग्रंथी ॥४९॥

अठरा युगांचे ज्ञान ॥ उत्पत्ति स्थिति आदिकरुन ॥ बीज मंत्र ध्यान धारण ॥ लिहिलें स्वामी कार्तिकाने ॥५०॥

जें पार्वतीप्रती निवेदिले ॥ तें स्वामी कार्तिकानें लिहिले ॥ त्यासी शक संवत्सर झाले ॥ ते परियेसी ॥५१॥

चवदाकोटी वर्षे अनंत युग ॥ सहाकोटी वर्षे विस्तारणयुग ॥ तेराकोटी वर्षे अद्वतयुग ॥ तामधयुग कोटी बारा ॥५२॥

तारजयुग अकराकोती ॥ तांडज साडेबारा कोटी ॥ भिन्नजयुग दहाकोटी ॥ चारकोटी भिन्नयुक्त युग ॥५३॥

नवकोटी अभ्यागत ॥ आठकोटी मनरण्य युग ॥ पांचकोटी अव्यक्त युग ॥ तांबुजयुग दोन कोटी ॥५४॥

विश्वावसुयुग सातकोटी ॥ अलंकृतयुग एककोटी ॥ ऐसी चवदा युगें धूर्जटी ॥ सांगे शक्तितें ॥५५॥

आणि सत्रालक्ष अठ्ठावीससहस्त्र ॥ कृतयुग प्रमाण साचार ॥ बारालक्ष शहाण्णवसहस्त्र ॥ वर्षे त्रेतायुग ॥५६॥

आठलक्ष चौसष्टहजार ॥ वर्ष असे युग द्वापार ॥ चारलक्ष बत्तीससहस्त्र ॥ कलियुगप्रमाण ॥५७॥

हें अठरा युगांचे प्रमाण ॥ वर्षे संख्या ऐसी जाण ॥ युगांचे वर्तमान ॥ या ग्रंथीं असे ॥५८॥

हा मूळस्तंभ शिवनिबंध बोलिजे ॥ प्रथम स्वामी कार्तिकें लिहिजे ॥ कल्याणसिद्वी कीजे ॥ प्रथम देवी ॥५९॥

हा प्रगट झालियावरी ॥ परमार्थीयांसी उद्वरी ॥ दुष्ट निंदक दुराचारी ॥ जो भेद धरी अविश्वसिक ॥६०॥

त्यांसी न द्यावा हा ग्रंथ ॥ दिल्या ब्रह्यहत्या होय सत्य ॥ त्यांसी श्रवण केलिया निभ्रांत ॥ होती महादोष पैं ॥६१॥

ऐसा हा शिवनिंबध ॥ अठरा युगांचा प्रसिद्व ॥ वक्ता श्रोता प्रेम साध ॥ देवातुल्य ॥६२॥

यानें निपुत्रिकांसी पुत्रसिद्वि ॥ निर्धनासी धनसिद्वि ॥ जन्ममरणाची व्याधी ॥ बाधूं न शके ॥६३॥

आतां त्रिविधताप सांगेन ॥ आध्यात्मिक आधिदैविक जाण ॥ आणि आधिभौतिक मिळोन ॥ त्रिविध ताप ॥६४॥

सत्व , रज , तम हे त्रिगुण ॥ ब्रह्या विष्णु रुद्र हे तिघेजण ॥ चौथी ईश्वरमाया गहन ॥ चालवी सकलां ॥६५॥

अरण्यक चूरणिक ॥ गद्य पद्य नाटक ॥ गाहा संधी त्राहाटक ॥ ऐसी अष्टांगे ॥६६॥

ऐसी अष्टांगें जाण ॥ ज्याच्या आंगी असती पूर्ण ॥ तोचि पुराणिक संपूर्ण ॥ म्हणे महादेव ॥६७॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंध ॥ शिवपुराण सर्वप्रसिद्व ॥ ईश्वर पार्वती संवाद ॥ संपूर्ण जाहला ॥६८॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥

॥ श्रीउमामहेश्वरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP