मूळस्तंभ - अध्याय ६

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

मग देव म्हणे पार्वतीसी ॥ आताम भिन्नयुक्तयुग परियेसी ॥ ते युगीं रचना रचिली कैसी ॥ ती ऐक देवी ॥१॥

मग त्या पांचांनी परियेसी ॥ मेरुकडा एकवीस स्वर्गेसीं ॥ रचिली नवखंडॆ पृथ्वीसी ॥ परी वस्तीसी ठाव नाहीं ॥२॥

एकवीस स्वर्गे उद्वसें ॥ सप्त पाताळें भुमंडळ तैसें ॥ रचिलें पूर्वीच्या ऐसें ॥ पांचांजणीं ॥३॥

तंव देवासी म्हणे भवानी ॥ हे पांचजण कवणी ॥ यांचा जन्म कोणापासूनी ॥ जाहला जी देवा ॥४॥

मग शक्तिस सांगे देव ॥ मजपासून मुज जाहला ठाव ॥ तुजपासून विष्णुदेव ॥ जन्मला पैं ॥५॥

विष्णुपासून ब्रह्या जाण ॥ त्यापासून पांचजण ॥ तिहीं रचिला गहन ॥ मेरुपर्वत ॥६॥

ऐसें निपजवून त्रिभुवना ॥ कामविले स्वर्ग मेरुप्राणा ॥ मग ते विनविती चतुरानना ॥ पांचजणही ॥७॥

हा जी आदिपुरुषाच्या कुमारा ॥ तुम्ही रचिलें या वोडंबरा ॥ परी वस्तीवीण अवधारा ॥ नावं रुप नाही ॥८॥

मग तो रची पुरें पट्टणॆं ॥ मेरुमार्ग चौदा भुवनें ॥ तेथें जाहलें राहणें ॥ तिही देवांसी ॥९॥

त्या पुरांचीं नावे परियेसीं ॥ ब्रह्यपुरी विष्णुपुरी शैवपुरी ऐसीं ॥ तेहतीसकोटी देवांसी ॥ शिवपुरी वसती ॥१०॥

या तिहीं माजी करिंता सातसात ॥ ते एकवीस स्वर्ग म्हणत ॥ तेथें रचना मध्यस्थ ॥ कोणी केलीं ॥११॥

त्या सर्वाचीं पृथक् नांवे ॥ तें मागे निरोपिलें बरवें ॥ आतां युक्ति सांगेन स्वभावें ॥ भूतजात ॥१२॥

ब्रह्यपुरीसी ब्रह्या ॥ विष्णुपुरीसी विष्णु महिमा ॥ शिवपुरी आम्हां ॥ ठाणें केवी ॥१३॥

तंव देवातें शक्ति पुसे ॥ त्यां पुरापरतें काय असे ॥ मग देवें कैलासवासेम ॥ सांगूं आदरिले ॥१४॥

शिव म्हणे ऐक वो साक्षेप ॥ तेथून ऊर्ध्व चैतन्यरुप ॥ तें आणिकां न कळे निर्लेप ॥ मज वांचुनी ॥१५॥

तें चैतन्य ब्रह्य मूर्ण ॥ तें माझाचि अंश जाण ॥ वेदशास्रे पुराणें गहन ॥ तयांसी अगोचर तें ॥१६॥

शब्दब्रह्य त्यावरिष्ठ ॥ तें संकल्य द्दष्टास्सष्ट ॥ तें सांगता महादुर्घट ॥ मीच जाण वो ॥१७॥

तेथून परमपुरुष परमेश्वर ॥ तो व्यक्ताव्यक्त अगोचर ॥ तो आलेख अपरंपार ॥ भरोनि उरला असे ॥१८॥

तो काळा ना निळा ॥ गोरा ना सावळा ॥ आरक्त ना ढवळा ॥ नेणिजे पां ॥ १९॥

त्यासी रेखा ना रुप ॥ सुखदु :ख ना मायबाप ॥ अगणित आणि अमूप ॥ एकलाच तो ॥२०॥

त्यासी जाति ना कुळ ॥ ना घरडा ना मूळ ॥ रात्र ना दिन सकळ ॥ कळा पूर्ण ॥२१॥

त्या पिंडब्रह्यांडाविवर्जित ॥ चैतन्य ना अकल्पित ॥ तें मज स्मरण अखंडित ॥ त्या अविनाशाचें ॥२२॥

त्या उत्पतिप्रळयाची घडामोडी ॥ तो मी करीत असें निवडी ॥ परी त्यासी नाहीं आवडी ॥ उत्पत्तिप्रळयाची ॥२३॥

जरी पिंडब्रह्यांडा प्रळय होय ॥ तिन्ही देव पावती लय ॥ परी तो अभंग दिसता होय ॥ तो न सांगवे आणिकां ॥२४॥

माझें रुप निर्धारितां ॥ भुली पडे वेदांता ॥ माया परब्रह्य सिद्वांता ॥ जाणे कोण ॥२५॥

मीच अवतरलो ईशरु ॥ पूर्ण ब्रह्य साक्षात्कारु ॥ तुज सांगितला बीजांकुरु ॥ गुप्ताक्षरीं प्रगट ॥२६॥

तुवां मजसी पुसिले ॥ तें न सांगावें सांगणें घडलें ॥ मज नेणती श्रुति पुराणें बोलें ॥ मग तो कोणा कळे ॥२७॥

तंव म्हणे ती पार्वती देवी ॥ तुमच्या अवतारांची उत्पत्ति सांगावी ॥ कोण मातापिता कोणे गांवी ॥ आणि नाम काय ॥२८॥

मग सांगती शंकर ॥ देवी माझे अकरा अवतार ॥ ते जाण अकरा रुद्र ॥ अंश माझे ॥२९॥

आतां सांगतों अकरा रुद्रांची नांवे ॥ ते युगानुयुगीं जाणावे ॥ त्यामछॆ आयुष्यगणित बोलावें ॥ तरी मागें सांगितलें ॥३०॥

अंबरीष दधिरायाचा कुमर ॥ दरिद्रेच्या पोटीं भालुकापट्टणीं जन्मला ॥३१॥

मदाग्न प्राकृत रायाचा कुमर ॥ चक्रदेवीच्या पोटीं कुशातनगरीं जन्मला ॥३२॥

दिवाकर बळिभद्ररायाचा कुमर ॥ मंगळदेवीच्या पोटीं कनकाग्रनगरीं जन्मला॥३३॥

तारज आदित्यरायाचा कुमर ॥ कौसल्यादेवीच्या पोटीं ताम्रपूरनगरीं जन्मला ॥३४॥

उग्रसेन हरिरायाचा कुमर ॥ कौसल्यादेवीच्या पोटीं शूद्रसेननगरी जन्मला ॥३५॥

वेदांग ॐकाररायाचा कुमर ॥ आपदेवीच्या उदरी कनकाग्रनगरी जन्मला ॥३६॥

केटक नरहरी रायापासून ॥ मयंतकदेवीच्या उदरी धनंजयनगरीं जन्मला ॥३७॥

स्तनकंद चक्रसेन रायापासुन ॥ नीलसेनदेवीच्या उदरीं निळापरी जन्मला ॥३८॥

दु :शासन चक्रकंट रायाचा कुमर ॥ मयंतादेवीच्या उदरीं धनयाजनगरीं जन्मला ॥३९॥

कंपिलाकर रुद्रसेन रायाचा कुमर ॥ आनंदादेवीच्या उदरीं गंधनापुरीं जन्मला ॥४०॥

हनुमंत वायुदेव रायाचा कुमर ॥ अंजनादेवीच्या उदरीं कावणापुरीं जन्मला ॥४१॥

हे देवी रुद्रसार ॥ हे माझेचि होत अवतार ॥ यांसी युगें गेलीं अपार ॥ जाण देवी ॥४२॥

ब्रह्या विष्णु महेश्वर ॥ हे करिती सृष्टीचा व्यापार ॥ हा ब्रह्यांड गोळ वोडंबर ॥ रचिती तिघे ॥४३॥

ब्रह्या सवालक्ष घडी मोडी ॥ विष्णु स्थिति माया जोडी ॥ रुद्र संहारुन पाडी ॥ पंचभूतेंसी प्रपंच हा ॥४४॥

या तिघांचें हें काम जाण ॥ हे चालविती त्रिभुवन ॥ आणि रचिलेंसे मेरुचें मान ॥ एकवीस स्वर्ग ॥४५॥

तंव शक्ति म्हणे जी देवा ॥ या विष्णूचा अवतार सांगावा ॥ सांगितलियावरी बरवा ॥ विश्ववंद्य होईल ॥४६॥

मग पार्वतीसी देव म्हणे ॥ ते नव नारायण जाणें ॥ अवतार धरिले विष्णूनें ॥ ते ऐक देवि ॥४७॥

सांगे विष्णूचा अवतार ॥ जे नवनारायण हरिहर ॥ ब्रह्यादिकांसी आधार ॥ तो कोटिगुणें आगळा ॥४८॥

प्रथम आदि नारायण ॥ आदि महाऋषिरायाचा पुत्र जाण ॥ त्रिकाळआदिशक्तिच्या उदरीं उत्पन्न ॥ मायापुरींत ॥४९॥

महावीर नारायण ॥ जीनदेव नजंकरायापासून ॥ नग्नदेवीचा नंदन ॥ मीनापुरीं जन्मला ॥५०॥

मधुवाक्षी नारायण ॥ विक्षापुररायापासून ॥ अबळादेवीचा नंदन ॥ कंदनापुरीं जन्मला ॥५१॥

अजानुनामक नारायण ॥ तो सारंगरायापासून ॥ जवदमेचा नंदन ॥ संध्यावंत नगरीं जन्मला ॥५२॥

अलंकारु नारायण ॥ चंद्रसेन रायाचा नंदन ॥ पवळसेना देवीच्या उदरीं जाण ॥ चातकापुरींत जन्मला ॥५३॥

शांतनुनामा नारायण ॥ हा कीर्तरायाचा नंदन ॥ शिकयादेवीच्या पोटीं जाण ॥ पुरंदरनगरीं जन्मला ॥५४॥

वामननामक नारायण ॥ धौमग्नरायाचा नंदन ॥ मुक्ताफळादेवीच्या उदरीं जाण ॥ वैष्णव नगरीं जन्मला ॥५५॥

हरिहर हे नारायण ॥ दोन तुझिया वाम भुजेसी जाण ॥ ऐसा जन्मला आपण ॥ नारायण नव हे ॥५६॥

तुझे वामभुजीं जन्मले ॥ त्यांपसाव दशअवतार झाले ॥ हरिहर ऐसे बोलिले ॥ हे जहाले भिन्नयुक्तयुगीं ॥५७॥

मग या उत्तरावरी ॥ पार्वती शिवातें प्रश्न करी ॥ देवा हे जन्मले कवणे परि ॥ तें सांगा मज ॥५८॥

ऐसा ऐकोनि तियेचा प्रश्न ॥ सांता होय त्रिनयन ॥ ब्रह्या विष्णु रुद्राचें जनन तें परियेंसी देवी ॥५९॥

तुजपासोनी साकारु ॥ उठिला सर्व अलंकारु ॥ श्रुंगारवेलींसी विस्तारु ॥ जगदंबे तुं ॥६०॥

मीच होऊनि ठेविलीसी ॥ एवढा ब्रह्यांड गोळ व्यालीसी ॥ इंद्रशक्ति जाहलीसी ॥ माझेनी आंगें ॥६१॥

माझे शक्तिने तेज पाहिलें ॥ मज जन्मोजन्मीं उपजविलें ॥ मी चैतन्यरुप जाणविलें ॥ तुज येवढें देवी ॥६२॥

सांगितलें तें नेणसी ॥ तरी जाणे मी सर्वासी ॥ सर्व कर्ता हें मानसीं ॥ द्दढ धरिलें ॥६३॥

ऐसीच तुझी करणी ॥ तिन्ही देव भ्रांतिभरें मौनी ॥ अहंमती वाढविती जनीं ॥ जाण देवी ॥६४॥

देवी एकेचि बोलें साचार ॥ माझे सर्वत्र हेचि खूण ॥ दुसरें नाहीं मजविण ॥ हें सत्य जाण मनीं ॥६५॥

हारपलिया हें साचार ॥ माझे स्वरुपीं होय स्थिर ॥ म्हणोनि माझें सुरासुर ॥ मूर्तिमंत ॥६६॥

माझें आंगीचे अवयव बोलिले ॥ तितुके सुरासुर जन्मले ॥ ते जगीं वर्णिले ॥ वेदशास्त्रीं ॥६७॥

ब्रह्या विष्णु इंद्र म्हणती ॥ हे चारी पदीं वर्तती ॥ या चहुं वर्गासी उत्पत्ति ॥ माझ्या स्वरुपीं ॥६८॥

माझे चरणीं जन्मला इंद्र ॥ तोचि म्हणती शूद्र ॥ वक्रीं जन्मला रुद्र ॥ ब्रह्या तो जानूसी ॥६९॥

ऊरुंत जन्म वैश्व म्हणिजे ॥ ब्रह्या राजक्षत्रिय जाणिजे ॥ ऐसें कां म्हणिजे ॥ नाभीं जन्मला म्हणूनी ॥७०॥

यांते मजपासाव उत्पत्ति ॥ देवी तुजपासाव सर्व नेणती ॥ नाना अवतार होती ॥ परी सर्वा आदि मी ॥७१॥

ऐसी चतुर्वर्गाची उत्पत्ति ॥ मग नाना युक्ति बोलती ॥ आणि ऋषि गोत्र म्हणती ॥ नानाविध ॥७२॥

मजपासुनी हे होती ॥ यांपासुनी मध्यम याती ॥ त्यांसी आचार क्रियाभक्ति ॥ परी दोन्हीच कुळें ॥७३॥

परी मी अकळ कोणां न कळें ॥ सर्व लोकीं दोन्हीच कुळें ॥ हीं भ्रमली अविचारबळें ॥ ब्रह्ययाचेनी ॥७४॥

सुकृतीयांसी उत्तम कुळी जन्म ॥ आणि त्यांसी उत्तम गति सप्रेम ॥ पापिया उत्तम कुळीं न ये जन्म ॥ मम स्वरुपा विसरले जे ॥७५॥

या जन्मीं उत्तम मध्यम नाम ॥ हें दोन्हीं प्रकारें मीच सप्रेम ॥ हें जाणे जो कारण वर्म ॥ तोचि ज्ञानी होय ॥७६॥

हेंचि स्वधर्मकारण ॥ येर कर्मबंधन ॥ हें नकळेचि वर्मज्ञान ॥ शिव ज्ञान माझें ॥७७॥

कुळें दोन पात्रें दोन ॥ मुखें दोन पूज्य दोन ॥ पक्ष दोन कवीश्वर दोन ॥ ते परियेसीं देवी ॥७८॥

आकाश धात्री हीं पात्रें दोन्ही ॥ अग्नि ब्राह्यण ही मुखें दोन्ही ॥ सूर्यवंश दोन्ही ॥ हीं कुळें जाण देवी ॥७९॥

मातृपक्ष पितृपक्ष हे दोन ॥ ब्यास वाल्मिक हे कवीश्वर दोन ॥ हरिहर हे पूज्यमान दोन ॥ असती पैं ॥८०॥

परि मज निष्कर्मा आंत सामावे ॥ तेचिं पूज्य कुळ म्हणावें ॥ पाप कुळ तें न दावे ॥ मज निष्कर्मामाजी ॥८१॥

हा पाहीं मायाप्रपंच ॥ तो दावितां एक मीच ॥ लपवीं आपुल्या स्वरुपीं निर्वच ॥ तें तेज जागवित असे ॥८२॥

इच्छा सुख हें तिहीं लोकीं ॥ माझी नांदणूक निकी ॥ सर्व प्रपंच हाच कीं ॥ म्यां आंगे चालविजे ॥८३॥

अलंकृत ब्यक्ति विनोदेंसी ॥ सहज संकल्प प्रबोधेंसी ॥ मजमाजी एकवटली ऐसी ॥ जाणिजे देवी ॥८४॥

सर्व साकार श्रुंगारेंसी ॥ माझ्या स्वरुपीं एकवटलीसी ॥ ते वेळीं सांवरिती झालीसी ॥ आधारस्तंभ होउनी ॥८५॥

इतुकिया उत्तरावरी ॥ शक्ति म्हणे जी त्रिपुरारी ॥ हें मज कळलें अंतरी ॥ देवराया ॥८६॥

या तोही देवांचे जन्म ॥ तुम्हीं सांगितले मूळवर्म ॥ तें मज मानलेंसे उत्तम ॥ कृपानिधी ॥८७॥

या भिन्नजयुगीं अंडें भिन्न ॥ आणि मेरुचे प्रमाण ॥ या तिही देवांपासून ॥ कोण कोण जन्मले ॥८८॥

ते कोण रीतीं वर्तती ॥ आणि कोणे ठायीं वसती ॥ त्यांचीं नगरें कोणतीं किती॥ तें सांगा जी देवा ॥८९॥

मग म्हणे ईश्वर ॥ देवी तुझा जो प्रश्न विचार ॥ त्यांचे देतों उत्तर ॥ ऐक एकचित्त ॥९०॥

इंद्रपुरीसी इंद्रलोक ॥ ब्रह्यपुरीसी ब्रह्यलोक ॥ विष्णुपुरीसी विष्णुलोक ॥ जाण देवी ॥९१॥

यामध्यें विलासी पूर्ण ॥ कैलासलोक कैलासीं जाण ॥ तेथें असणे सर्व गण ॥ जाण देवी ॥९२॥

सर्व देवांची नगरें ॥ वेष्ठुनी असती मेरुशिखरें ॥ याभीतरीं जें जें साकारे ॥ तेचि स्वर्ग एकवीस ॥९३॥

तंव पार्वती म्हणे जी देवा ॥ तोही भेद त्वां सांगावा ॥ मग सप्तपाताळें स्र्गठेवा ॥ कळेल मज ॥९४॥

देव म्हणे पाताळींचे भेद सात ॥ ते सप्तपाताळें म्हणिजेत ॥ मृत्युलोकींचे भेद चौदा विख्यात ॥ तेचि चौदा भुवनें ॥९५॥

स्वर्गाचे भेद बोलती ॥ ते एकवीस जाण निगुती ॥ त्यांतेंच एकवीस स्वर्ग म्हणती ॥ जाण देवी ॥९६॥

मागें सांगितली सप्तपाताळें ॥ आणि एकवीसस्वर्ग विशाळें ॥ ऐसीं अठ्ठावीस स्थानें निर्मळे ॥ जाण देवी ॥९७॥

ते चौदा आणि अठ्ठावीस ॥ मिळोन झाले बेचाळीस ॥ ऐसे भेद हे लोकत्रयास ॥ जाहले पैं ॥९८॥

ऐसी मेरुरी उपराउपरें ॥ आणि नाना ठाणांतरे ॥ त्रौलोक्यासी तिन्ही नगरें ॥ तिन्ही देवांची ॥९९॥

तंव पार्वती देवासी म्हणे ॥ ऐसी रचिली स्थाननामें ॥ हीं तुझ्या आंगांमध्यें भुवनें ॥ निर्मिलीं देखा ॥१००॥

तीं कैसी कोणे स्थानी ॥ रचिली देहामाजी कोण कोणीं ॥ तें कृपा करोनि मज कारणीं ॥ सांगा जी देवा ॥१॥

ऐसें शक्तिचे प्रश्नोत्तर ॥ ऐकोनि बोले ईश्वर ॥ मजमाजी रचिलें चराचर ॥ तें ऐक देवी ॥२॥

अतळ लोक परियेंसी ॥ तो असे माझे नाभींसी ॥ यावरी वितळ लोक कटीसी ॥ असे जाण ॥३॥

सुतळ लोक मांडिये असे ॥ महातळ लोक जानूसी वसे ॥ तळातळ लोक असे ॥ माझिया अंगुष्ठी ॥४॥

रसातळ लोक परियेसीं ॥ असे माझिये गुल्फेसी ॥ पाताळ लोक तळवेसी ॥ जाण देवी ॥५॥

हे सप्त पाताळ लोक परियेसें ॥ आतां स्वस्थ एकाग्र मानसें ॥ चौदा भुनें परियेसें ॥ सांगतो तीं ॥६॥

ऐसीं सप्त पाताळें ॥ वरी एकवीस स्वर्गे विशाळें ॥ मध्यें चौदा भुवनें अंतराळें ॥ परियेंसी देवी ॥७॥

भूलोक माझिया गर्भी असे ॥ भुवर्लोक माझिया उदरी वसे ॥ तपोलोक तो नयनीं असे ॥ माझिया जाण ॥८॥

जनलोक माझें ललाटी असे ॥ सत्यलोक माझे उत्तमांगी वसे ॥ विष्णुलोक माझे कुक्षीं प्रकाशे ॥ आणि स्वर्गलोक ह्रदयीं जाण ॥९॥

ऐसे सात दुणे चौदा ॥ माझे गर्भी असती सदा ॥ आणि ब्रह्या विष्णुरुद्रां ॥ संख्या नाहीं ॥११०॥

यांसी मीच असें आधार ॥ यांचे जन्म गेले अपार ॥ तो मागें अनंतयुगी विस्तार ॥ सांगितला ॥११॥

यापरी नाना रचना ॥ तिघे आणिक करिती जाणा ॥ इंद्रासी ठाण माण गहना ॥ देऊनी देवी ॥१२॥

हा भिन्नयुक्तयुगींचा विचारु ॥ शक्तिसी सांगे शंकरु ॥ तो हा मूळस्तंभ परिकरु ॥ म्हणॆ श्रीमहादेव ॥११३॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे भिन्नयुक्तयुग नाम षठोऽध्यायः ॥६॥

श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शंभुभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP