श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
आतां आली कृतयुगाची रचना ॥ ती सांगतां येईल तुझिय मना ॥ कृत्यें केली तिहीं देवी जाणा ॥ म्हणोन कृतयुद ॥१॥
म्यां एकत्र रुप केलें ॥ तें कार्य रुपासी आलें ॥ त्यातेंचि देव बोलिले ॥ कृतयुग ॥२॥
त्या कृतयुगाचे संवत्सर ॥ सत्रा लक्ष अठ्ठावीस हजार ॥ ही संख्या परम पवित्र ॥ जाण देवी ॥३॥
कार्तिक शुद्वनवमी पवित्र ॥ हस्तनक्षत्र आदित्यवार ॥ तयें दिनीं जाहला संचार ॥ कृतयुगाचा ॥४॥
ऐसें कृतयुगाचें प्रमाण ॥ तैं ब्रह्ययापासून झाले कोण ॥ ते सांगतों विस्तार करुन ॥ ऐक तूं देवी ॥५॥
ब्रह्ययापासूनि दैत्यवंश थोर ॥ आणि झाले राक्षस असुर ॥ तैसाचि राजवंश मनोहर ॥ तो सांगतों ऐक पैं ॥६॥
आदिपुरुषाचा चतुरानन ॥ त्याचा मरीचि नंदन ॥ तैसाचि कश्यप जाण ॥ आणि पुलस्ती ॥७॥
पुलस्तीचा विश्रवा नंदन ॥ त्याचा पुत्रा राक्षस रावण ॥ आणि कुंभकर्ण विभीषण ॥ हे दोन बंधु त्याचे ॥८॥
रावणाचे दोन सुत ॥ महाबलिष्ठ इंद्रजित ॥ आणिक तो आखया विख्यात ॥ मंदोदरीपोटी ॥९॥
इंद्रजिताचा पुत्र पाताळकेतु ॥ आणि दुसरा अलोटकेतु ॥ हे मत्स्योदरीं समुद्रांत ॥ वाढविले ॥१०॥
आतां कश्यपाचा सुघार्य ॥ त्यापासूनि मणीतनय ॥ मणिपासूनि इखीकू होय ॥ त्याचा पुत्र वाण इंद्र ॥११॥
त्यापासूनि स्कंदमुनी ॥ स्वनीरनपु स्कंदापासुनि ॥ त्यापासुनि झाली काकुत्स्थाची जनी ॥ काकुर्स्थाचा विश्वावसु ॥१२॥
त्यापासूनि महामुनि जाण ॥ महामुनीचा पुत्र च्यवन ॥ च्यवनाचा प्रकाम नंदन ॥ त्याचा पुत्र धनुर्धर ॥१३॥
तयापासूनि महीगहनु ॥ पुढें त्याचा च्योमास्त नंदनु ॥ त्यापासूनि मांधात्याची जनु ॥ महापुरुषार्था तयाचा ॥१४॥
ऐसा हा ब्रह्यदेवांश ॥ जाहला असे राक्षसवंश ॥ आणि दुजा चैत्यांश ॥ त्या युगीं जाहला ॥१५॥
याहीं सर्व व्यापिली क्षिती ॥ परचक्रें जी भूमीवर फिरती ॥ त्यांची मस्तकें तें छेदिती ॥ बारा राजे ॥१६॥
हे त्या युगा जै नांदत ॥ तैं पुरुष एकवीस ताल उंच होत ॥ छत्तीस सहस्त्र नागगणित ॥ बल होतें क्षत्रियांसी ॥१७॥
तैं छत्तीस सहस्त्र ग्रहणें होती ॥ राजे स्वर्गी गमन करिती ॥ चतुष्पाद धर्ममूर्ती ॥ होती जाण ॥१८॥
त्यायुगीं अस्थिगतप्राण ॥ मनें भोगादि सर्व जाण ॥ लक्षवर्षे आयुष्य पूर्ण ॥ मनुष्यांसी ॥१९॥
त्यायुगीं परियेंसीं ॥ बारा राजे दैत्यवंशी ॥ झाले कोण कोण ते तुजसी ॥ सांगतों पैं ॥२०॥
हिरण्याक्ष , अधीग , मच्छकंद ॥ हिरण्य कशिपु , कपिलासुर मंद ॥ कपिल , भैरव , शंखासुर नंद ॥ गयासुर भद्रजाती ॥२१॥
हे राजे दैत्यंवंशी उत्पन्न ॥ आचरणें करुनि यांच्या जाण ॥ भूमि दग्ध झाली ऐसें पाहून ॥ मग नारायणें काय केलें ॥२२॥
दैत्यभारें भूमि पीडित ॥ पाहूनि मग रमाकांत ॥ अवतार धरी अतिअद्वुत ॥ तें सांगतों तुजलागी ॥२३॥
प्रथम मत्स्यरुप धरी जीवनीं ॥ त्याची शंखावती असे जननी ॥ आणि प्रभावळी नामक राणी ॥ पिता हुतेशशंकु ॥२४॥
मांधाता गुरु हंस शिरक्षेत्र ॥ दैत्य निर्दाळुनीं शंखासुर ॥ आणून दिधले वेद चार ॥ ब्रह्यदेवासी ॥२५॥
दुसरा कूर्मरुपी रमापती ॥ त्याची माता चंद्रावती ॥ आणि राणी बीजावंती ॥ पिता जाण पुरुरवा ॥२६॥
गुरु सहजानंद साचार ॥ क्षेत्रे जाण वेताळपूर ॥ निर्दाळुनी मधुकैटभासुर ॥ धरित्री त्याने स्थापिली ॥२७॥
तिजा वराहरुपी लक्ष्मीपती ॥ त्याची माता पद्मावती ॥ आणि कांता कंदावती ॥ पिता देव कैगळु ॥२८॥
त्याचा गुरु ॐकार ॥ तैसेंचि क्षेत्र टौलसमुद्र ॥ निर्दाळूनियां मुर्कासुर ॥ पृथ्वीभार फेडिला ॥२९॥
नृसिंहरुपी अवतार चौथा ॥ शिलावंती तयाची माता ॥ आणि हरितकू जाण पिता ॥ लक्ष्मीराणी तयाची ॥३०॥
आणि गुरु पुरुरव पवित्र ॥ मनुस्थळी क्षेत्र सुंदर ॥ मारुनि हिरण्यकश्यपु असुर ॥ केलें प्रल्हाद संरक्षण ॥३१॥
ऐसीं मच्छादिरुपे चारी ॥ धरुनि अवतरला श्रीहरी ॥ मग पुराणें केलीं कवीश्वरी ॥ लोकोपकारार्थ ॥३२॥
तै शिवतत्वीं सिद्वविचारण ॥ आणि आत्मोपासना विवरण ॥ तैसेचिं झालें त्रिभुवन ॥ स्थावर जंगम ॥३३॥
तैं चंद्रसूर्याची गती ॥ घटिका प्रहर दिनराती ॥ मास पक्ष संवत्सरगणती ॥ हें सर्व जाहलें ॥३४॥
त्या युगांत असे शक्ति ॥ रवि ग्रहणाची गणती ॥ बत्तीससहस्त्र ऐसें म्हणती ॥ जाण देवी ॥३५॥
तै सशसहस्त्रवर्षपर्यत जाण ॥ बालकें करिती स्तनपान ॥ तैसें त्रिमासांत भोजन ॥ करिती सर्व मानव ॥३६॥
तैं सवाखंडीचा आहार ॥ हा त्या युगाचा विचार ॥ कन्या आणि कुमर ॥ दोन अपत्यें ॥३७॥
कन्या उपवर झाल्या जाण ॥ भावासहित लावी लग्न ॥ त्याणेंच घडे त्यांसी पुण्य ॥ जाण दुर्गे ॥३८॥
ऐसें त्या युगीं वर्तमान ॥ माता पिता पुण्य समान ॥ मातापितरांची भक्ति पूर्ण ॥ मनोभावें पुत्र करी ॥३९॥
तैं अठरा पुण्य पूर्ण ॥ दाता वोळगें मागत्यालागुन ॥ विनंति नमन मागुतीन ॥ याचकांसी ॥४०॥
एक लक्ष संवत्सर ॥ वांचती सर्व सदा नर ॥ हा त्या युगाचा विचार ॥ आयुष्याचा ॥४१॥
एवं कृतयुगाची ख्याति ऐका ॥ तैं आळेश्वर सिंहासन देखा ॥ आतां त्रेतायुगाच्या लेखा ॥ प्रांरभितों ॥४२॥
उमेसी म्हणे शूळपाणी ॥ आतां त्रेतायुगाची करणी ॥ ती ऐक गे तूं भवानी ॥ एकाग्रचित्तें ॥४३॥
इति श्रीमूळस्तंभेशिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे कृतयुगकथंन नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
शुभंभवतु ॥ श्रीरस्तु ॥