मूळस्तंभ - अध्याय १३

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः॥

तंव उमा म्हणे जी देवा ॥ यातींचा विस्तार सांगावा ॥ कोणापासून कोण ठेवा ॥ तो सांगावा मजलागी ॥१॥

मग म्हणे त्रिनयन ॥ देवी ऎकें चित्त देऊन ॥ कैसें रचिलें त्रिभुवन ॥ आणि वर्णयातींची ॥२॥

प्रथम देवी तूं भवानी ॥ विष्णु जन्मला तुजपासूनि ॥ विष्णूचिये नाभिस्थानी ॥ ब्रह्या झाला उत्पन्न ॥३॥

विष्णूच्या पायी शूद्र जन्मले ॥ उरुपासूनि वैश्य झाले ॥ भुर्जी क्षत्रिय उद्ववले ॥ आणि मुखीं ब्राह्यण ॥४॥

ऎसे चारी वर्ण होती ॥ यांपासूनि अठरा जाति ॥ कैशा झाल्या त्या तुजप्रती ॥ सांगतों ऎक ॥५॥

प्रथम तो ब्राह्यण वंश ॥ दुसरा झाला क्षत्रियांश ॥ तृतीय उद्ववला वैश्य ॥ शूद्र जाण चतुर्थ ॥६॥

ब्राह्यणापासूनि ज्या ज्या जाती ॥ झाल्या त्या सांगतो तुजप्रती ॥ कीं ज्याणें येईल प्रचीती ॥ यथार्थ देवी ॥७॥

मांग , तुरुक , डोंब , महार ॥ आणिक पंचम निशाचर ॥ ऎशा ह्या जाती अतिक्रूर ॥ ब्राह्यणोद्वव असती पैं ॥८॥

या समस्त दैत्य जाती ॥ ब्रह्यें शापिल्या म्हणोनि होती ॥ यास्तव ह्या नीच जाती ॥ उत्पन्न जाण ॥९॥

आतां क्षत्रिय यांच्या जाती ॥ ईश्वर सांगे पार्वतीप्रती ॥ त्या ऎकाव्या सुनिश्चिती ॥ एकाग्र चित्तें ॥१०॥

कांसार , कोष्टी , अहीर , ॥ परिट , शिंपी , सोनार , ॥ न्हावी , सुतार , लोहार , ॥ गुरव आणि तांबट ॥११॥

तैसेचि मणियारें बुरुड ॥ पाथरवटी आणि गौंड ॥ आणिक ते लोणारी लाड ॥ या जाती क्षत्रियांच्या ॥१२॥

आतां वैश्यांच्या ज्या असती जाती ॥ त्यांसी वाणी ऎसें म्हणती ॥ त्या सांगतों तुजप्रति ॥ पार्वती वो ॥१३॥

साळी , माळी , तांबोळी , वाणी , कोळी , तेली , तैसेचि जाणी ॥ ह्या साहा जाती तुजलागुनी ॥ सांगितल्या वैश्यांच्या ॥१४॥

आतां कुणबी आणि धनगर ॥ सनगर , लोणार , हाटकर ॥ तैसेचि पंचम क -हेकर ॥ इत्यादि जाती शूद्रांच्या ॥१५॥

ऎसी कश्यपाची सृष्टिस्थिती ॥ ऎकूनि म्हणे पार्वती ॥ कश्यपगोत्री मजप्रती ॥ सांगिजे देवा ॥१६॥

आणि अठरापकडयाती ॥ यांची गोत्रें सांगा पशुपती ॥ कोणकोणत्या वंशाप्रती ॥ उत्पन्न झाले ॥१७॥

ऎसें ऎकूनी कश्यपगोत्र ॥ शंभु सांगे परम पवित्र ॥ ऎकावें अति पवित्र ॥ एकाग्र चित्त करुनी ॥१८॥

ब्राह्यण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ कश्यपापासाव उत्पन्न पवित्र ॥ यांची सांगतों गोत्रे विचित्र ॥ जीं लोकीं वर्तती ॥१९॥

जे त्रैलोक्यीं लोक आहेती ॥ त्यांच्याच याती बोलती ॥ ज्या अठरापकडयाती ॥ कश्यपापासूनी ॥२०॥

या सर्व यातींपासुनी ॥ अठयायशींसहस्त्र ऋषी जान ॥ त्या ऋषीपासूनि उत्पन्न ॥ सर्व गोत्रें ॥२१॥

सर्वाचें गोत्रस्थ ऋषीश्वर ॥ जे जे म्हणती आम्ही थोर ॥ आणि सर्वासी पवित्र ॥ आचरतां ॥२२॥

त्यांसी नव्हे कुळ गोत्र ॥ जें यातिकर्म अपवित्र ॥ अठयायशीं सहस्त्र ब्रह्यगोत्रे ॥ पाप वर्तती ॥२३॥

ऎसे ऎकिलियावरी ॥ उमा म्हणे हो त्रिपुरारी ॥ तरी तीं गोत्रें कोणेपरी ॥ सांगाजी देवा ॥२४॥

आणि अठरापकडयाती ॥ त्यांची गोत्रें काय म्हणतीं ॥ तीं सांगावीं मजप्रती ॥ देवराया ॥२५॥

ऎसें गौरींने पुशिलें ॥ मग देवें सांगों आदरिलें ॥ म्हणे ऎक वो अबले ॥ गोत्रें सर्वाचीं ॥२६॥

कश्यपवंश ब्राह्यण ॥ रुद्रवंश क्षत्रिय जाण ॥ विष्णुवंशी वैश्य उत्पन्न ॥ इंद्रवंशीं शूद्रलोक ॥२७॥

ब्राह्यण शूद्र वाणी ॥ हे चारी वर्ण गे भवानी ॥ यांच्या उत्पत्तीची करणी ॥ ईश्वरदेहीं ॥२८॥

या चहूंपासूनि सर्व याती ॥ अठरापकड उत्पन्न होती ॥ यांची गोत्रें तुजप्रती ॥ सांगतों ऎक ॥२९॥

त्यांची आचारकर्मे बांधलिया ॥ कुकर्मे असतीं वोखटिया ॥ त्यांसींच म्हणतलिया ॥ महाअनुभवी ॥३०॥

परी तें सर्व असो आतां ॥ याती सांगतों समस्ता ॥ ज्या त्रिभुवनामाजी भरिता ॥ असती पैं सर्वत्र ॥३१॥

आणि त्यांची गोत्रें सांगेन ॥ जे कश्यपप्रणीत आपण ॥ तेणें भरिलें त्रिभुवन ॥ ऎक तें देवी ॥३२॥

शातमऋषीचा वंश साळी ॥ ताम्रऋषीचा तांबोळी ॥ वाल्मीकाचा वंश कोळी ॥ मोची वंश पंचकाचा ॥३३॥

कमळऋषीचा वंश वंजार ॥ ताप ऋषीचा वंश धनगर ॥ गर्गाचार्याचा लोहार ॥ आणि चांभार दुसरा ॥३४॥

दुंदुभीऋषीचा कुंभारु ॥ तिपळीऋषीचा गळीवरु ॥ जरामदाचा सुतारु ॥ मणिमंताचा हटकर ॥३५॥

मधवाऋषीचा वंश जाठ ॥ नंदऋषीचा वंश परिट ॥ कौंडिण्याचा भामट ॥ न्हावी वंश नारदाचा ॥३६॥

सनकऋषीचा वंश डोहार ॥ आणि सुमंताचा कासार ॥ काळऋषीचा महार ॥ अहीर खरऋषीचा ॥३७॥

माधवऋषीचा वंश लाड ॥ सैंधवऋषीचा वंश वोड ॥ कर्दमऋषीचा धवड ॥ कागऋषीचा डोंबारी ॥३८॥

रक्तऋषीचा वंश खाटिक ॥ जलंदऋषीचा तुरुक ॥ मर्यदऋषीचे वंश ऎक ॥ खटियार आणि मणियार ॥३९॥

मनुऋषीचा वंश गौंड ॥ मयवंतऋषीचा बुरुड ॥ आणि तैसाचि मार्तड ॥ मातंगाचा वंशादि ॥४०॥

श्वेतऋषीचा सोनार वंश ॥ लावातीचां वंशादि लोमश ॥ बोलेश्वरीऋषीचा वंश ॥ कुणबी असे जाण पां ॥४१॥

शिंपींवंशाचा आदि मर्गज ॥ कोष्टीवंश तो वराहत ॥ गुरव ते नीतिवंतऋषीज ॥ पिप्पला बागवान ॥४२॥

ऎसे छत्तीस ऋषी मुळीं बोलिले ॥ परी अठ्ठावीस मुख्य भले ॥ परी गोत्रीं वाखणिले ॥ छत्तीस हे ॥४३॥

ऎसे हे गोत्रऋषि सांगितले ॥ यां पासाव अठयायशींसहस्त्र झाले ॥ ते अठरापकड यातींस व्याले ॥ ते मग झाले पर्वत ॥४४॥

आणि सांगतों एक ऎक ॥ ऋषिमत बोलती लोक ॥ यांसी माझी करणी आणिक ॥ मनें सृष्टीं संहार ॥४५॥

तंव पार्वती म्हणे जी देवा ॥ ह्या करणीचा कैसा ठेवा ॥ कोण कैसियापरी तो सांगावा ॥ चंद्रचूड हो ॥४६॥

मग म्हणे तो ईश्वरु ॥ सृष्टीनें रचिला विस्तारु ॥ तो सांगतों ऎक प्रकारु ॥ ऋषिकरणीचा ॥४७॥

अजाऋषीचें कथित शेळिया ॥ आणि मद्राचार्याचें मेंढिया ॥ वसिष्ठऋषींचे किडे मुंग्या ॥ आणि मक्षिका तैशाच ॥४८॥

कर्दमऋषीचें कथित काक ॥ आणि तैसीच सारसें चातक ॥ बेदमऋषीचें कथित बेडूक ॥ भादावी गुळी धावा ॥४९॥

गर्गाचार्याचें कथित हरिण ॥ तैसेचं सांबर चितळें जाण ॥ सैंधवऋषीचें पंचानन ॥ पद्यऋषींचे व्याघ्र पैं ॥५०॥

विश्वामित्राचे कथित म्हैस ॥ आर्द्रऋषीचें कथित रीस ॥ हंसाचार्याचें कथित हंस ॥ सिद्वऋषींचें गाढव ॥५१॥

दर्दमाचार्याचें मुंगुस मार्जार ॥ जळाचार्याचें मीन सुसर ॥ पिंडऋषीचें लावे तित्तिर ॥ आणि होले , रावे , बाल्हाया ॥५२॥

उग्राचार्याचें कथित गोधिका ॥ पार्यातकऋषींचें पल्लिका ॥ सारिया सरडे उंदिर देखा ॥ आणि रेचकऋषीचें घोडे पैं ॥५३॥

कोत्रऋषींचें कथित उल्क ॥ तैसेचि कोळसुंदे आणि भालुक ॥ श्रीरामाचार्याचें सर्प देख ॥ रोमाचार्याचेम कथित हत्ति ॥५४॥

व्यासऋषींचें तुरी गहूं चणक ॥ सांवे साळी नाचण्या कापूस देख ॥ आणि मदऋषीचें कथित मठक ॥ राई जिरें तैसिंचि ॥५५॥

फटी वांगी वाळकें आम्रफळें ॥ कुहरिया लिंबु वासंदे तोंडलें ॥ महाळुंगें मिरें ओंवा बदरीफळें ॥ हंसऋषीचें कथित हें ॥५६॥

द्राक्षऋषीचें कथित नारळ ॥ आणि द्राक्षे ऊंस कर्दळीफळ ॥ तैसींच उततिया फणसफळ ॥ हीं जाण वो पार्वती ॥५७॥

मूग उडिद सातु राळे ॥ कुसुंबे तैसेचि जोंधळें ॥ व -या कोद्रु आणि तिळे ॥ हें कथित वसिष्ठचें ॥५८॥

ऎसें सांगितलें ऋषींचे करणें ॥ मग पार्वती काय म्हणे ॥ ऋषिजन्म मजकारणें ॥ सांगा जी देवा ॥५९॥

ऎसे पुसिलें दुर्गेनें ॥ मग सांगितलें त्रिनयनें ॥ म्हणे ऎक एकमनें ॥ ऋषिमूळ ॥६०॥

विश्वामित्र महामुनी ॥ क्षत्रिणीगर्भी त्याची जननी ॥ अत्युग्र तपस्या करुनी ॥ ब्राह्यणत्व पावला ॥६१॥

कळिकाळ महाऋषी ॥ त्याची उत्पति क्षत्रिणीकुशीं ॥ बाळेश्वर तो महाऋषि ॥ शूद्रिणीगर्भी उत्पन्न ॥६२॥

ब्रह्याऋषि तपोधन ॥ वेश्यागर्भी उत्पन्न जाण ॥ आणि कांसारिणीपासून ॥ कुशऋषी जाण पैं ॥६३॥

कुंदनामा महामुनी ॥ त्याची माता असे कायस्तिणी ॥ लइंद्रऋषीची जननी ॥ लाडिण जाण जगदंबे ॥६४॥

महातपस्वी जनार्दन ॥ तांबोळीगर्भी उत्पन्न ॥ आणि कोळिणीगर्भी जनन ॥ झालें वाल्मिकऋषींचे ॥६५॥

महातपस्वी कुलजऋषी ॥ उत्पन्न झाला कान्होजवंशी ॥ माळिणीगर्भी मळीऋषी ॥ आणि व्यासऋषी धीवरिज ॥६६॥

वसिष्ठमाता ती धवडिणी ॥ कश्यपऋषीची खातीण जननी ॥ नारद नामक महामुनी ॥ धोबिणीगर्भी उत्पन्न ॥६७॥

महातपस्वी जो भार्गव ॥ तांबटिणीगर्भी त्याचा उद्वव ॥ आणि क्रौचऋषी ज्यांचे नांव ॥ तो उत्पन्न न्हाविणीगर्भी ॥६८॥

शंतनूनामा महाऋषि ॥ उत्पन्न झाला साळिणी कुशीं ॥ आणि कौंडिण्य कोष्टिवंशीं ॥ झाला असे उत्पन्न ॥६९॥

चंपकनामऋषीश्वर ॥ त्याची जननी चर्मकार ॥ आणि महामुनि तो दुर्दूर ॥ डॊहारिणीगर्भज ॥७०॥

मार्कंडेय जो महामुनी ॥ असे मातंगी त्याची जननी ॥ मर्गजऋषीची शंपिणी ॥ माता असे जाण पैं ॥७१॥

महातपस्वी बृहस्पती ॥ बुरुडिणीगर्भी त्याची उत्पत्ति ॥ कुंभकऋषी प्रसिद्व जगतीं ॥ कोल्हाटिणीगर्भज ॥७२॥

धनिर्गऋषि तपोधन ॥ धनरिणीगर्भी उत्पन्न ॥ खटऋषीची खाटकिण ॥ जननी असे जाण पां ॥७३॥

विष्णुशर्मा महामुनी ॥ पुष्करिणीगर्भी त्याची जनी ॥ ग्रेध्राक्षऋषीचीम जननी ॥ गोसावीण असे कीं ॥७४॥

अश्वाक्षऋषी अश्विनीपासुन ॥ पाशबंदमुनि पल्लिगर्भी जाण ॥ महिडाऋषींचे जनन ॥ मार्जारीगर्भी असे ॥७५॥

ग्रीडाक्षऋषीची माता सर्डिणी ॥ खराक्षमुनी गर्दभिणीपासुनी ॥ आणि कोडाचार्याची जननी ॥ काकिणी असे जाण पां ॥७६॥

तांडवीगर्भी लोमऋषी ॥ कोडाचार्य कुकुटीच्या कुशीं ॥ आणि गउनामा महाऋषी ॥ गाजिणीगर्भी उत्पन्न ॥७७॥

मुजनु नामक महामुनी ॥ वाल्मिकापासुनी त्याची जननी ॥ आणि घर्घरऋषी घारीपासुनी ॥ उत्पन्न जाण ॥७८॥

व्याघ्राचार्य तलोधन ॥ व्याघ्रिणीपासुनी झाला उत्पन्न ॥ आणि सिंधुऋषींचें जनन ॥ सिंहिणीगर्भी असे ॥७९॥

रिसाचार्य महामुनी ॥ आश्वलीगर्भी त्याची जनी ॥ मंग्राचार्य महामुनी ॥ मृगीगर्भी उत्पन्न ॥ ८०॥

साबीचार्याची माता सांबरी ॥ वेदऋषी दर्दुरी ॥ आणि रोहिणीच्या उदरीं ॥ रोदनाचार्य उत्पन्न ॥८१॥

नीलार्जुन ऋषीश्वर ॥ जन्मस्थान नीळणीउदर ॥ हिरण्याक्ष तो ऋषीश्वर ॥ कुंगगर्भी उत्पन्न ॥ ८२॥

चंद्राक्षनामा महामुनी ॥ तयाची जाण चितळी जननी ॥ आणि वाळाक्ष महामुनी ॥ बाळणीर्भी उत्पन्न ॥८३॥

सर्पाचार्य महाऋषी ॥ उत्पन्न झाला सर्पिणीकुशी ॥ आणिं हंसाचार्याची हंसी ॥ माता असे प्रसिद्व ॥८४॥

विद्यादिगुणसंपन्न ॥ सुरनरांसी सदा मान्य ॥ ऎसा जो विभांडक तपोधन ॥ तो पद्मिणीगर्भी मूळ ॥ ब्रह्यकरणी ॥८६॥

हरिसुता ब्रह्यभार्या उर्वशी ॥ तीपासूनि झाला वसिष्ठऋषी ॥ वसिष्ठापासूनि चांडाळीकुशीं ॥ उत्पन्न झाला पराशर ॥८७॥

पराशराची कैवर्तीं भार्या ॥ जेथें जन्म व्यासाचार्या ॥ व्यासापासूनि विचित्रवीर्यभार्या ॥ अंधपंडूते प्रसवल्या ॥८८॥

अंध म्हणजे धृतराष्ट्र ॥ दुर्योधनादि त्याचे कुमर ॥ एक शत एकोत्तर ॥ गांधारीपोटी जन्मले ॥ ८९॥

पंडुस्त्री कुंती पुत्र धर्म ॥ नकुळ सहदेव पार्थ भीन ॥ ऎसी कुळें आणि कर्म ॥ तूं जाण पार्वती ॥९०॥

तंव पार्वती म्हणे जी त्रिनयना ॥ ऋषिनामें कवण कवण ॥ तीं सांगावी मजलागून ॥ संकलित ॥९१॥

मग म्हणे उमापति ॥ ऋषिनामें ऎक पार्वती ॥ जी ऎकिल्या पळती ॥ महादोष ॥ ९२॥

ऋषि सर्व परम पवित्र ॥ जे बद्रिकाश्रमीं निरंतर ॥ वसती अठ्यायशींसहस्त्र ॥ ते ऎक वो देवी ॥९३॥

वसिष्ठ , वाल्मिक ,भालुकर्ण ॥ भृगु , भरद्वाज लोमचरणु ॥ अत्रि , द्रोणाचार्य , संदीपनु , ॥ जांबळ शाणि जाबाली ॥९४॥

अश्वत्थामा , कृष्णार , ॥ विभांडक , दुर्वास , जरत्कार , ॥ श्रुंगी , मार्कडेय , बृहत्कार , ॥ मगत्कार , पिंगाक्ष ॥९५॥

दधीची , पुलस्ती , मुदल , ॥ अगस्ती , महत्कटी , गौगाळ , ॥ पौलस्ती , पैठीण , कपिला , ॥ पुलह आणि ऋतु ॥९६॥

अंबरीष , कपिलेश , भृचंडी , ॥ हतकरी , सुगंधी , भृकुंडी ॥ महागंधी , गंधी , मृकुंडी ॥ कविली आणि श्रीगंधु ॥९७॥

इतउ , सनक , सनातन ॥ सनत्कुमार , सनंदन ॥ जयउ , जउन , चेतन , ॥ महाज प्राण तैसाचि ॥९८॥

शुन :शेप , पुच्छहरितकु ॥ सुनु , मार्गा , त्रयोदकु , ॥ महिकंदु , विनिर्भू : , जनकु , ॥ शुनलांगलु देव नामा ॥९९॥

सनत्कुवळी , भृतृनंदन ॥ महिकंदु , वीचीस्तवा , च्यवन ॥ मुशनाकवी , जमदग्न , ॥ इंगळाक्ष , मादिसू ॥१००॥

मृगाचार्य , ग्रीक्षुकमंडल ॥ भ्रमराचार्य , हस्तिबाळ ॥ शुकदेव , गौतम , जठाळ ॥ गाल्व , रुचिक , रिचाक ॥१॥

मधूसूदन आणि पराशर ॥ पृथव्याचार्य कमळाकर ॥ तमाचार्य , पद्मसुंदर ॥ जय , विजय , शैलाक्ष ॥२॥

निगमाचार्य , सोमसेन ॥ वैजयंत , माघनौ , सुमन ॥ पिंगलाक्ष , ददमा , लावण ,॥ पक्व , रद , सिद्वरेता ॥३॥

प्रायु , दुरात्य , उदारकु ॥ गदमलु , जीरतु , जन्मपाकु ॥ कुंकुमाक्षी , तमयंतकु , ॥ लवणु आणि आदिकेतु ॥४॥

मीदमतु , तुरियो , सरुण ॥ हस्तकुचा , संतोष , रीतापूर्ण , ॥ तेकाचार्य , मद , पनकीर्ण ॥ प्रीतवक्षी जिव्हांक्तरु ॥५॥

बामडु , श्रीरामाचार्य ॥ मुक , घोर , लवणाचार्य ॥ आदिमु , अग्नि , शरीताचार्य ॥ भद्रसाधु , वेळऋषी ॥६॥

ताम्र , हलाल , त्रिपुरोलक ॥ तावन्य , प्रभाकर , वृंदाकर , लक्ष ॥ दुदुभोक्ता , वाल्मिक ॥ कर्णाचार्य , अंधऋषी ॥७॥

चंद्रमल , श्रीयंका , रुपागुदु ॥ सूर्यदीप , निगज , आदिकंदु ॥ सूर्यसेन , वेगीरितु , त्रांगदु ॥ सवणाचार्य कनकजिव्हा ॥८॥

पिप्पल , केतुमाल , मोक्षाद ॥ रत्नसायु , त्राहिहा , अमृताक्ष ॥ वेदबहु , निगज , सोलाक्ष , ॥ श्रुतिसिंधु , खंडांगज्योती ॥९॥

शनीकमुनी , कमळाकर ॥ चिद्र आणिक पाराशर ॥ मरीचिकू , वेशत्वा , बाणासुर ॥ त्रांगदु आणि जंत्रजयो ॥११०॥

भार्गव , रविकर्त , नीरंगंउ , ॥ बकदाल्भ्य . त्रिलोलम् ॥ भूर्णपिसु , निगमू , ॥ तापत्रय , गर्गऋषी ॥११॥

सौभरी , च्यवनु , औशिक , ॥ महातपस्वी तैसा कौशिक , ॥ केदमुनी , कौत्स आणिक ॥ जयऋषि तपोधन ॥१२॥

असो हें अठ्यायशीं सहस्त्र ऋषी ॥ त्यांतूनि अल्प सांगितले तुजसी ॥ परी प्रथम अठ्ठाविसांसी ॥ तें मूळ सर्वा ॥१३॥

ते अठ्ठावीस आदिकारण ॥ त्यांपासुनी अठ्यायशींसहस्त्र जाण ॥ मग त्यांपासुनी अठरा यातिजन ॥ जाहाले देवी ॥१४॥

ह्या ऋषींची तर्पें मोठीं ॥ मनें संहार मनें सृष्टी ॥ करिती आणि याची रहाटी ॥ दुर्बोध असे ॥१५॥

मनीं उद्ववें तेंचि करावें ॥ मागुतें तें लपवावे ॥ माझें ज्ञान स्वभावें ॥ असें त्यांसी ॥१६॥

ऎसे हे ऋषीश्वर ॥ महातपस्वी अवतार ॥ हें सांगितले सर्वत्र ॥ ऋषिमूळ ॥१७॥

प्रथम अठ्ठावीस सांगितले ॥ त्यांपासुनी अठ्यायशींसहस्त्र झालें ॥ ते अठरापकड यातींस व्याले ॥ ते मग जाहले पर्वत ॥१८॥

हा ब्रह्यंवंश सांगितला ॥ मागें ब्रह्या शापिला ॥ तो षट्कर्मे निपजला ॥ अठरा यातींस ॥१९॥

तंव उमा म्हणे त्रिनयना ॥ जें होय निराकार जाणा ॥ आकार झाला तो म्हणा ॥ मजप्रती ॥१२०॥

श्र्लोक ॥ न भूमिर्न चैव वामुस्तेजो नभस्तथा ॥ न ब्रह्या नच वै विष्णुर्न तारार्को न चंद्रमा : ॥१॥

न पाताले नागपति : सर्वशून्यं निरानयम ॥ अखिलं विश्वमेतद्वि निरालंबे प्रतिष्ठीतम् ॥२॥

आदौ तु जगदुत्पत्तिं कृत्वाथाऽपि स्वशक्तित : ॥ शिवस्तत्परिपाल्याथ स्वमिस्त्रेव विलप्यति ॥३॥

ईश्वर म्हणे वो देवी ॥ जैं निराकार होतें सर्वही ॥ तैं याति उत्पन्न ईश्वरदेही ॥ झाल्या जाण ॥२१॥

ईश्वरदेहीं याति उत्पन्न ॥ महीलोकीं कोण कोण ॥ त्यांचे जन्म सांगेन ॥ पार्वती वो ॥२२॥

भुजीं जन्म क्षत्रियांना ॥ पाणी जन्म कांसारांना ॥ रुद्र जन्म ब्रांह्यणांना ॥ वामांगी वैश्य जन्मले ॥२३॥

नखी , जन्म षट्यातीसी ॥ त्या कोणकोण परियेसीं ॥ गौंड ,बुरुड , गुरव , अहीरांसी ॥ लोणार , डोंब जाण देवी ॥२४॥

घ्राणी लाड जन्मला ॥ कांती जन्म देवांगनाला ॥ कर्णी जन्म माळ्याला ॥ भ्रूमध्यें भूतिजन्म ॥२५॥

तर्जनीपासाव उत्पन्न ॥ मध्यमीं कोष्ट्याचें जनन ॥ कनिष्ठिकीं हटकर जाण ॥ उत्पन्न झाले ॥२६॥

अनामिकीं जन्म प्रभूसी ॥ अंगुष्ठीं देवदैत्यांसी ॥ स्त्रेहीं जन्म ऋषिगणांसी ॥ तैसेचि दंती साळी लोक ॥२७॥

जिव्हेपासुनिया कोळी ॥ ओष्ठी जन्मले तांबोळी ॥ तैसेचि जन्मले अंगुळी ॥ डोहार आणि चर्मिक ॥२८॥

रजक पादीं जन्मले ॥ आणि परीट मस्तकीं झाले ॥ रेतापासाव उद्ववलें ॥ कांचन जाण ॥२९॥

भुवनेश्वराचें भ्रूमध्यें जनन ॥ कपालेश्वराचें कपालस्थान ॥ नासिकी नारायण उत्पन्न ॥ कर्णी जाण कर्णेश्वर ॥१३०॥

दशनीं उत्पन्न दशनेश्वर ॥ कंठी जाण श्रीकंठेश्वर ॥ तैसाचि उदरी उदरेश्वर ॥ गजेश्वर नाभिस्थानीं ॥३१॥

पृष्ठीं पृष्ठेश्वराचें जनन ॥ सर्वेंद्रिया इन्द्रियेश्वर जाण ॥ जंघी जन्मला जनार्दन ॥ रोमीं जन्म रामेश्वर ॥३२॥

पादी जन्म शूद्रेश्वरासी ॥ नखीं जनन मर्गजांसी ॥ अंगोळिया जिनेश्वरासी ॥ उत्पत्तिस्थान ॥३३॥

दक्षिणांगी गुडजेश्वरजनन ॥ बामांगी श्रीविष्णु जाण ॥ मुखीं जन्मला तो अग्न ॥ नेत्रीं सूर्य तैसाचि ॥३४॥

मनापासोनि सोम जन्मला ॥ ध्यानस्थ तो वायु झाला ॥ शिव पांचाळ पंचवक्री जन्मला ॥ जाण देवी ॥३५॥

ऎसी स्वरुपें अनेक ॥ करी उत्पन्न जगन्नायक ॥ परी आराध्य तें लिंग एक ॥ परब्रह्य ॥३६॥

समस्तासी मुख्य शिवलिंग ॥ कोणतें म्हणसी तरी श्रीगुरुलिंग ॥ याहुनि दुसरी चांग ॥ नसती पैं ॥३७॥

हें गुरुलिंग आतां देवी परियेसीं ॥ लिंगपूजा असे सकळांसी ॥ तरी कोणतीं लिंगे कवणासी ॥ तीं सांगतों नामें ॥३८॥

ब्रह्ययासी शिळामय लिंग ॥ विष्णूसी इंद्रनीळ लिंग ॥ चंद्रासी मठज्ञलिंग ॥ प्रभाकरलिंग रुद्रासी ॥३९॥

स्फटिकलिंग वरुणासी ॥ वज्रलिंग तें कंसासी ॥ काश्मिरलिंग यमासी ॥ अग्नीसी जाण हेमलिंग ॥१४०॥

निऋतीसी निर्मळलिंग ॥ निर्भूतयामी निर्गमलिंग ॥ कुबेरासी कुबेरेश्वर लिंग ॥ ईशानासी इष्टेश्वर ॥४१॥

खलनाथासी शैलेश्वर ॥ क्षेत्रपाळासी पावकेश्वर ॥ कार्तिकस्वामीसी पातेश्वर ॥ विघ्रेश्वरलिंग हरभ्यासी ॥४२॥

घृष्णेश्वरलिंग पार्वतीसी ॥ जमदग्नीश्वर रेणुकेसी ॥ कांचीश्वर चामुंडेसी ॥ महालक्ष्मीसी कल्पवेध ॥४३॥

कामाक्षीसी संध्यावळीश्वर ॥ कात्यायनीसी कात्यायनीश्वर ॥ तुळजेसी तुळेश्वर ॥ वाणीसी बाणेश्वरलिंग ॥४४॥

मध्यान्हीसी पुरेश्वर ॥ महालसेसी मर्गजेश्वर ॥ काळीकेसी कंदर्पेश्वर ॥ जयेश्वर वरदायिनीसी ॥४५॥

जोगेश्वरीसी निष्कलंकलिंग ॥ नीतावियेसी उग्रलिंग ॥ वीरभद्रासी जटात्रासलिंग ॥ सोमासी जाण सोमेश्वर ॥४६॥

बुधासी जाण भालेश्वर ॥ मंगळासी कंदर्पेश्वर ॥ आणि गुरुसी कंजनेश्वर ॥ सुमनेश्वर शुक्रासी ॥४७॥

आदित्यासी तुरयलिलंग ॥ राहूसी कल्लोळलिंग ॥ आणि जाण भाळेश्वरलिणग ॥ भावकादेवीसी ॥४८॥

तुळेश्वरलिंग शनीसी ॥ ज्योतिश्वरलिंग बश्वराजासी ॥ काळेश्वरलिंग महाकालीसी ॥ सर्वगणांसी ईश्वरलिंग ॥४९॥

गंधर्वासी सजीवलिंग ॥ किन्नरांसी अढळलिंग ॥ तारागणांसी शचीलिंग ॥ केदारलिंग विद्याधरीं ॥१५०॥

श्रीकांचनेश्वर मेरुसी ॥ शून्यलिंग आकाशीं ॥ रामेश्वरलिंग भूमिकेसी ॥ मनुष्यांसी हाटकेश्वर ॥५१॥

वायुसी मायिकलिंग ॥ उदकासी तोयेश्वरलिंग ॥ मृत्युलोकासी महालिंग ॥ तारकलिंग आकाशासी ॥५२॥

ऎसीं हीं लिंगे अर्चिता ॥ तत्स्वरुप होय तत्वंता ॥ मीच सर्व कर्ता हर्ता ॥ मजविण आणिक नसे ॥५३॥

ऎसे समस्त लिंगवंत ॥ त्रैलोक्यामाजी समस्त ॥ परी मी ईश्वर असें सत्य ॥ आदिअंतीम सकळांसी ॥५४॥

श्र्लोक ॥ प्रात :काले शिवं द्दष्टा नैंश पापं व्यपोहीत ॥ आजन्मनस्तु मध्यान्हे सायाह्रे सप्तजन्मजम् ॥१॥

मेरुकांचन दत्तांना गवां कोटिशतैरपि ॥ पंचकोटीतुरंगाणां तत्फळ शिवदर्शनात् ॥२॥

ज्यांसी घडे लिंगदर्शन ॥ त्यासीं कधी न होय लांछन ॥ आणि पुन : नाही आया गमन ॥ चुके :रोरव ॥५५॥

ऎसें ईश्वरें सांगतां ॥ पार्वती झाली तन्मयचित्ता ॥ चरणीं ठेविला माथा ॥ म्हणें तूं ज्ञानकळेची पार ॥५६॥

देव म्हणे वो पार्वती ॥ या अठरापकड याती ॥ सांगितल्या तुजप्रति ॥ यथार्थ जाण ॥५७॥

या सर्वयाति परिकर ॥ नाना उदीम करिती व्यापार ॥ मग झगडतां पाखर ॥ नाहीं तयां ॥५८॥

सर्व कुकर्मा प्रवर्तले ॥ मग वोखटे वासनेची पडसावले ॥ सर्वाधारेसी झगटलें ॥ तें अठरा जण ॥५९॥

मग देउळें रचिलीं देवी ॥ देवपूजा करिती बरवी ॥ जय आमुची कर्मे निवारावीं ॥ म्हणोनि घालिती दंडवत ॥१६०॥

ऎसीं झालीं पापें बहुत ॥ एकमेकांसी विरोध करित ॥ पाप झालें मग सुकृत ॥ मांडिलें तिहीं ॥६१॥

जे प्रपंचस्वार्थी अभक्ति ॥ ते मज कैसे पावती ॥ कुकर्मे बांधिले आहेती ॥ ते सुटती कैसे ॥६२॥

केल्या कर्मा कांहीं न चले ॥ मग तिही जपतप आरंभिले ॥ एक वैष्णव म्हणूं लागले ॥ आपणासी ॥६३॥

एक शिकती गायन ॥ एक गळा घालिती आभरण ॥ एक मांडिताती कीर्तन ॥ तिथीवार ॥६४॥

एक करिती नानाकर्मे ॥ एक म्हणती या धर्मे ॥ ऎसी नानाकर्मे वर्मे ॥ मांडिताती ॥६५॥

मग ते एकमेकां बोलती ॥ झणीं शास्त्र खोटें म्हणती ॥ ते मजसी झगडती ॥ नानामतें ॥६६॥

त्या शास्त्रांसी लागती झसडे ॥ मग निवाडे येती ऋषीपुढें ॥ तो आपल्या कुळाकडे ॥ शास्त्रें झगडती ॥६७॥

ते चढती नानावादां ॥ पुराणें रचिलीं नानाविधां ॥ व्यासऋषीनें प्रबोधा ॥ अठरा पुराणें रचिली ॥६८॥

तो रचा नवरसमेळा ॥ मेळवून केला गोळा ॥ वेळ गमविती भूपाळा ॥ सांगोनिया ॥६९॥

तीं आदींच भूपाळकुळें ॥ नाना पापपुण्यें असती भरले ॥ आणि नानादोषें मेळले ॥ एक गढले कुकर्मे ॥१७०॥

तंव बोले गौरी ॥ देवा पुरे या जनाची परी ॥ मग श्रवण केलें त्रिपुरारी ॥ परी बहुतें ॥७१॥

मग उमा म्हणे हे शंकर ॥ त्यांसी वाद लागला अपार ॥ मग पोटे भरण्याचा व्यापार ॥ तिहीं काय केला ॥७२॥

मग सांगे ईश्वर ॥ त्यांचा पिता कश्यप ऋषीश्वर ॥ तो नानासूत्रें परिकर ॥ म्हणोनि तो सूत्रधारी ॥७३॥

विश्वकर्मा सूत्र चालविता ॥ म्हणोनि विश्वकर्मा नाम धरिता ॥ ऐसी उत्पत्ति झाली तत्वंता ॥ काम्य कश्यप म्हणती ॥७४॥

नाहीं उदीम म्हणे पार्वती ॥ हीं अठरा धान्यें उत्पत्ति ॥ मग मार्ग कैसे चालती ॥ तें सांगा देवा ॥७५॥

जें जें रचिलें आचरन ॥ त्यांसी ठेविती नाम आपण ॥ तो सर्वाचा पिता म्हणुन ॥ श्र्लाघ्यता करी ॥७६॥

ज्यांसी दिधलें षट्कर्म ॥ ते धरिनि राहिले धर्म ॥ ऐसे करिती वर्म ॥ आपुले ठायीं ॥७७॥

पांचांसी पांच परी ॥ नाम ठेविंले अवधारी ॥ ते पांचाळ यापरी ॥ नाम झाले ॥७८॥

ते पांच म्हणती कोण कोण ॥ तरी ऐक वो सांगेन ॥ ते पांचाळ विलक्षण ॥ असती जे ॥७९॥

प्रथम मनूचा लगखाती ॥ लाखी सोनारा शिल्पजाती ॥ तांबट जाण चतुर्थी निगुती ॥ आणि पीतक पाथर्वट ॥१८०॥

हे पांच पांचाळ ऐक ॥ हे भूलोकचाळक ॥ नाना पापकर्मी लोक ॥ चालविले ॥८१॥

पापपुण्य विचारें ॥ चाले यांच्या आधारें ॥ नानामार्ग सविस्तरें ॥ इही केले ॥८२॥

ऐसे अलंकृतयुगीं झालें ॥ सर्व अलंकार आले ॥ आतां कृतयुगीं विस्तारलें ॥ तें ऐक देवी ॥८३॥

ऐसें झालें गौरी ॥ माझी भक्ति अंतरली दुरी ॥ आतां कृतयुगींची कुसरी ॥ म्हणे श्रीमहादेव ॥१८४॥

॥ इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP