मूळस्तंभ - अध्याय ७

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगुरुभ्योनमः ॥

आतां मनतुक्ततुग परियेसीं ॥ याची संख्या किती कैसी ॥ आणि चारी खाणी उत्पत्तिसी ॥ केली कवणे परी ॥१॥

ती मनीं इच्छा झाली देवासी ॥ ती मानसीं उठे कैसी ॥ पांचकोटी वर्षे ऐसी ॥ त्याची संख्या ॥२॥

चार वर्ण अठरा ज्ञाती ॥ त्या कोण कोण सांगिजेती ॥ तूं परियेसी वो पार्वती ॥ एकचित्तें ॥३॥

वैश्य शूद्र ब्राह्यण क्षत्री ॥ ऐशाप्रकारे वर्ण चारी ॥ आजि अठरा ज्ञातींची परी ॥ बोलतों देवी ॥४॥

चौवर्णा माजी भवानी ॥ हे चौ -यायशीं लक्ष जीवयोनी ॥ घडामोडी ही करणी ॥ तिन्ही देवांची ॥५॥

ब्रह्या घडी सवा लक्ष ॥ मायामोह चालवी आदिपुरुष ॥ सवेंचि संहारी महेश ॥ अंश माझा ॥६॥

माझें हाड तें असे कठिण ॥ मांस ते विष्णु जाण ॥ त्यांची रोमें आपण ॥ ब्रह्या बोलिजे ॥७॥

कठिण तें तम आपण ॥ मांस तें सत्व जाण ॥ त्वचा रोमादि गहन ॥ राजस पैं ॥८॥

ऐसे सत्व रज तम जाण ॥ हे तिन्हीं देवांचे तीन गुण ॥ ऐसी सर्व रचना पूर्ण ॥ चारी खाणींची ॥९॥

ऐशा ह्या चारी खाणी ॥ आणि चौ -यायशींची जीवलक्षयोनी ॥ ही मनयुक्तयुगापासुनी ॥ उत्पत्ती झाली ॥१०॥

तंव म्हणे पार्वती ॥ देवा चौ -यायशींची संख्या किती ॥ तें सांगा मजप्रती ॥ आदिपुरुष ॥११॥

ऐसी ऐकूनि विनंती ॥ मग बोलते झाले पशुपती ॥ भली केली त्वां स्फूर्ती ॥ भवानी हो ॥१२॥

एकवीस लक्ष स्वेदज ॥ एकवीस लक्ष अंडज ॥ एकवीस लक्ष उद्विज्ज ॥ आणि जारज एकवीस लक्ष ॥१३॥

ऐसे चौ -यायशीं लक्ष जीवराशी ॥ तंव देवी म्हणे शंभूसी ॥ आणिक एक परियेसी ॥ देवाधिदेवा ॥१४॥

तुम्हीं कथिले चौखाणीसी ॥ तरी कैसा निपज कोणासी ॥ तें सांगा आम्हांसी ॥ देवराया ॥१५॥

ऐसा प्रश्न परिसोनी ॥ मग म्हणे शूळपाणी ॥ तोही प्रकार श्रवणीं ॥ ऐक देवी ॥१६॥

श्र्लोक ॥ मेघाश्वत्वारिलक्षाश्व ताराश्व नवलक्षका : पर्वता ह्य ष्टलक्षाश्वाप्येंवं स्वेदजसंभव : १॥

धान्यानि नवलक्षाश्वाप्यष्टलक्षाश्वतुष्पद:   पादभाराश्वतुर्लक्षाश्वौवं जारजसंभव:  ३॥

चतुर्लक्षा जलचरा नागाश्व नवलक्षका:   पक्षिणो ह्यष्टलक्षाश्वाप्येवमंडजसंभव:  ४॥

ताराकांचनताम्राणि स्वेदजेषूत्तमानि वै ॥ तारारुपो भवेद्वह्या ताम्ररुपो जनार्दन:  ५॥

भवेत्कांचनरुंप हि मग मम तत्वं निरंजनम् ॥ अन्नचंदनपुष्पाणि ह्युद्विज्जेषूत्तमानि च ॥६॥

अन्नरुपोभवेद्वह्या चंदनं च जनार्दन:   भवेत्कुसुमरुपं हि मम तत्वं निरंजनम् ॥७॥

जारजेषूत्तमा ह्येते वाजिमातंगमानवा:   वाजिरुपो भवेद्वह्या हस्तिरुपो जनार्दन:  ८॥

भवेन्मानवरुपं हि मम तत्वं निरंजनम् ॥ अंडजेषूत्तमा हंसा गरुडा : कच्छापास्तथा ॥९॥

हंसरुपो भवेद्वह्या गरुडस्तु जनार्दन:   कच्छपो ममरुपं हि वर्तते यन्निरंजनम् ॥१०॥

टीका ॥ तंव म्हणे पार्वती ॥ देवा याची कैसी गती ॥ तें सांगा मजप्रती ॥ आदिपुरुषा ॥१७॥

मग शंभु म्हणे जीवजातीसी ॥ कैसी संख्या कोणासी ॥ तें एकचित्तें परियेसी ॥ आदिशक्ति वो ॥१८॥

पर्वत ते आठ लक्ष जाण ॥ नवलक्ष तो तारागण ॥ मेघमाळा चारलक्ष पूर्ण ॥ ही स्वेद्जखाणी ॥१९॥

आणि धान्यें तीन लक्ष ॥ परिमळ चार लक्ष ॥ कंदमूळ आठ लक्ष ॥ ही उद्विज्जखाणी ॥२०॥

द्विपद नव लक्ष सुंदर ॥ आठ लक्ष चतुष्पाद वनचर ॥ पादभार लक्ष चार ॥ ही जारजखाणी जाण ॥२१॥

चार लक्ष जलचर जाण ॥ नवलक्ष ते नाग पूर्ण ॥ आठ लक्ष पक्षी संपूर्ण ॥ ही अंडजखाणी ॥२२॥

ऐशा म्यां केल्या चार खाणी ॥ हे मज कर्तेरुपाची करणी ॥ यांत पवित्र वस्तु निवडूनी ॥ सांगो तुज ॥२३॥

या खाणीत पवित्रा ॥ वस्तु असती जाण बारा ॥ त्या आदरिल्या श्रुंगारा ॥ सुखालागीं ॥२४॥

ही त्रिविधरुप युक्ति ॥ तिहीं देवांच्या त्रिमूर्ती ॥ ब्रह्या विष्णू पशुपती ॥ हें तेजत्रय ॥२५॥

आणिक एक चिन्ग ॥ या खाणींत व्यापक निर्गुण ॥ सोहं स्वरुप तिहीं देवांसी पूर्ण ॥ चौखाणीमाजी ॥२६॥

आतां सांगेन परिकर ॥ स्वेदज खाणीचा प्रकार ॥ जे प्रसवली पाषाणगिरीवर ॥ मेघमाळादिक ॥२७॥

सप्तधातु आणिक हिरे ॥ माणिक मोतीं साजिरें ॥ ऐसीं अत्यंत पवित्रें ॥ स्वेदज खाणी ॥२८॥

या स्वेदजखाणी आंतू ॥ सांगतों अति पवित्र वस्तु ॥ ज्यांत तिन्ही देव विख्यातु ॥ अवतरले ॥२९॥

तार ताम्र कांचन ॥ ताररुपें ब्रह्या जाण ॥ ताम्ररुपें जनार्दन ॥ सुवर्ण तें तनुमाजीं ॥३०॥

आतां अंडजखाणी आंतु ॥ पवित्र त्या तीन वस्तु ॥ कूर्म गरुडं हंस श्वेतू ॥ या वस्तु तीन्ही ॥३१॥

कूर्म तो जाण ब्रह्यारुप ॥ गरुड तो विष्णूचें स्वरुप ॥ तो हंस निर्दोष निष्पाप ॥ हे मन्मूर्ती वो ॥३२॥

तो कैसा माझा अंश ॥ मनें सकोमळ निजवास ॥ सोहं हंस निरंजन अवकाश ॥ उभय पक्षी ॥३३॥

आतां उद्विज्जखाणी विचित्र ॥ जेथें तीन वस्तु पवित्र ॥ अन्न चंदन आणि वस्त्र ॥ या तीन मूर्ती ॥३४॥

वस्त्र तें ब्रह्यारुप उज्वळ ॥ चंदन हरिरुप शीतळ ॥ आणि अन्न रुचिकर रसाळ ॥ तो मीच जाण देवी ॥३५॥

आतां जारजा निरुपमा ॥ निजस्तु उत्तमा ॥ अश्व गज नरनामा ॥ या तिन्हीं मूर्ति ॥३६॥

गजरुपें तो नारायण ॥ अश्वरुप तो चतुरानन ॥ नररुपें संपूर्ण ॥ मी जाण देवी ॥३७॥

ऐशा चारी खाणी देवी ॥ म्यां रचिल्या विशेषपदवी ॥ चारी ग्रामादि लोक मानवी ॥ जीवजार पैं ॥३८॥

तंव देवासी म्हणे शक्ति ॥ देवा हे लोक कोठे वसती ॥ यांची नगरे किती असती ॥ तीं सांगावीं मजलागी ॥३९॥

मग बोले शूळपाणी ॥ मागें पुशिलें तेंच पुसशी कैसेनी ॥ रचना सांगितली संचुनी ॥ अष्टलोकांची ॥४०॥

रचूनियां खाणी वाणी ॥ उद्वेश हे त्रिभुवनीं ॥ हे खाणी पासुनी ॥ सांगणें लागलें ॥४१॥

भूर्लोक जनलोक ॥ नरलोक पाताळलोक ॥ सत्यलोक महर्लोक ॥ देवलोक जाण देवी ॥४२॥

हे लोक म्यां रचिले सकळ ॥ व्यक्ताव्यक्त पिंड ब्रह्यांड निर्मळ ॥ तैसेंच सूक्ष्म आणि स्थूळ ॥ हें सर्व माझेनी ॥४३॥

तंव शक्ति म्हणे जी देवा ॥ हें सर्व निर्मिती तुं शिवा ॥ तरी पुसेन तो सांगावा ॥ अभिप्राय ॥४४॥

सर्वकर्ता तूं धूर्जटी ॥ ऐसे देखिजेतें सृष्टी ॥ तरी ब्रह्या करी ही गोष्टी ॥ सांगा देवा ॥४५॥

तंव देव म्हणे सत्यवचन ॥ तुंवा पुसिलें जें कारण ॥ त्या अभिप्रायाची खूण ॥ ऐक देवी ॥४६॥

पूर्वी भिन्नजयुगामाझारी ॥ सह्ज एके अवसरीं ॥ दोघे बैसले महाद्वारीं ॥ माझिया वो ॥४७॥

विरंची आणि हरी ॥ ते बोलती नानापरी ॥ अहंवाद भरोवरी ॥ करिती मीपणाचा ॥४८॥

तेणें पडिले हटा ॥ करित आपणा प्रतिष्ठा ॥ ब्रह्या म्हणे मी सृष्टीश्रेष्ठा ॥ सर्व करितों ॥४९॥

तंव विष्णु म्हणे अद्वुत ॥ सर्वकर्ता मीच समर्थ ॥ मजवांचूनि त्रैलोक्यांत ॥ कवण असे ॥५०॥

तंच ब्रह्या म्हणे मी समर्थ ॥ सर्व मीच असे करित ॥ ऐसे अहंकारगर्वार ॥ पडिले दोघे ॥५१॥

आम्हांसी कोणें निर्मिले ॥ कोणा पासाव जन्म झालें ॥ या विचारातें ते भले ॥ नेणतीच ॥५२॥

हें सर्व चराचर ॥ कर्तेपणाचा डोंगर ॥ नेणती ते अपार ॥ स्वरुप माझें ॥५३॥

मीच कर्ता मीच निर्मिता ॥ ऐसी मिरविती अहंता ॥ बोलती प्ररिज्ञा महंता ॥ आपुल्या ठायीं ॥५४॥

ऐसे दोघे प्रतिवादतां ॥ अहंकारी पडिले वृथा ॥ मग निकरा गेले बोलेंता ॥ पिता पुत्र ते ॥५५॥

ते एकमेकां विरोधिती ॥ हठविवाद करिती ॥ आणि आले मजप्रती ॥ उभयवर्ग ॥५६॥

मग ते म्हणती शिवा ॥ आमुचा निवाडा करावा ॥ दोघांत कोण तो सांगावा ॥ कर्ता निर्मिता पैं ॥५७॥

या सृष्टीचा कर्ता कवण ॥ तो दोघांत द्याजी निवडून ॥ या कार्याहून आमुचे अन्य ॥ कार्ये नाही पैं ॥५८॥

अहंकारही भुली ॥ करिता घरांत घरकुली ॥ स्तुति वाढविती आपुलाली ॥ मूढपंणें ॥५९॥

हें सर्व म्यां रचिले ॥ परि मजचि विसरले ॥ भ्रांतीने असती वेधले ॥ मीपणाचे ॥६०॥

ऐसा ऐकोनी अभिप्रावो ॥ मग निवडावया उपावो ॥ म्यां रचिला पहा हो ॥ मनामाजी ॥६१॥

मी स्वर्ग पाताळकर्ता ॥ मग सांगितले अर्था ॥ त्यांचा विकल्प निरसिता ॥ मी जाहलों पैं ॥६२॥

माझी स्वरुपता जाणावी ॥ त्रैलोक्यरचना दावावी ॥ दोघांची अहंता निरसावी ॥ म्हणॊनियां ॥६३॥

त्या दोघांचा संकल्पू ॥ जाणोनि दिधला निरोपू ॥ जेणें हरे दोघांचा कोपू ॥ स्वभावेंचि ॥६४॥

मग म्यां म्हटलें भावें ॥ अगा तुम्हीं दोघीं ऐसे करावें ॥ सांगे थोड्यामाजी बरवें ॥ तुम्हां दोघांसी ॥६५॥

तुंम्हीं ऐसे करावें ॥ माझें रुप निर्धारावें ॥ निर्धारुनियां यावें ॥ सत्वर दोघीं ॥६६॥

एके मुकुटेपर्यत जावें ॥ एके चरण पाहूनि यावें ॥ दोघांमाजी आदि येथें पावे ॥ तोचि समर्थ ॥६७॥

त्यांसी निरोप दिधला ऐसा ॥ हें आलें ॥ दोघांच्यां मानसा ॥ धरला अंगवणेचा भरंवसा ॥ दोघा जणी ॥६८॥

ब्रह्या म्हणे मी मुकुट पाहीन ॥ तेथून क्षणांत येईन ॥ विष्णु म्हणे मी क्षणांत चरण ॥ येईन पाहोनियां ॥६९॥

दोघीं र्व आपंगिला ब्रह्या मुकुट पाहूं निघाला ॥ विष्णु पाताळीं प्रवेशला ॥ चरण पहावयासी ॥७०॥

विष्णु प्रौढी पुरुषार्थे ॥ चालता पाताळपंथे ॥ युगें गेलीं अनंते ॥ कल्पकोटी ॥७१॥

तेणें सप्तपाताळें क्रमिली ॥ त्याणें बळ आणि शक्ति सरली ॥ प्रौढी आंगवण गेली ॥ परि चरण न देखिले ॥७२॥

अपार क्रमिंता पाताळपंथ ॥ बहु शिणला तो अंनत ॥ पडला असे घोर तमांत ॥ लक्ष्मीपति ॥७३॥

तेथें तो बहुत श्रमला ॥ काहीं नेंणे दिशा भुलला ॥ कोठोन हा कोण ठाव पावला ॥ ऐसे त्यासी नकळेचि ॥७४॥

पाहीन चरणांचा अंत ॥ हा गेला त्याचा पुरुषार्थ ॥ आणि पडला अंधकारांत ॥ न सुचे काहीं ॥७५॥

न लगेचि चरणाचा अंत ॥ सांडिला असे मनोगत अर्थ ॥ आणि झाला चिंताक्रांत ॥ सरले सत्व ॥७६॥

ऐसा पडला अंधकारी ॥ गजबजिला असे अंतरी ॥ म्हणे मागें कोणेपरी ॥ ठाकेन आतां ॥७७॥

ऐसा त्याचा अभिमान सरला ॥ मग मनीं विचारुं लागला ॥ म्हणे देवा तुझा पार कोणाला ॥ न कळेचि पैं ॥७८॥

मनीं विचारी पुरुषोत्तम ॥ शिवा तूं सर्वासी विश्राम ॥ आम्ही व्यर्थ पावलों श्रम ॥ अहंभावे या ॥७९॥

ऐसा पराक्रम सरला ॥ मग हरि थोर पस्तावला ॥ चरण पहावयाचा फिटला । भ्रम सहज ॥८०॥

ऐसा शिणे नाना उत्तरीं ॥ पडिला असे अंधकारीं ॥ म्हणें धांव धांव गा त्रिपुरारी ॥ या समयी ॥८१॥

म्हणे आम्हीं जाहलों क्षीण ॥ चांगले मर्दिले असे मन ॥ हा अंहकार गहन ॥ आड ठाकला आम्हां ॥८२॥

तेणें करोनिया हे डोळे ॥ वायां जाहले आंधळे ॥ आतां कैसे हें वळें ॥ तमपडळ ॥८३॥

येथूनि निघावे कैसे ॥ कोणीकडे कांही न दिसे ॥ हेंचि रचिलें महेंशें ॥ आम्हालागीं ॥८४॥

ऐसा बहुत त्रासला ॥ शिवशिव म्हणोनि स्मरिला ॥ तो उच्चार ऐकिला ॥ आणि एकें ॥८५॥

ऐसा माझ्या नामाचा उच्चार ॥ ऐके पाताळकंद गणेश्वर ॥ तो म्हणे माझा स्वामी शंकर ॥ कोणे मनीं स्मरिला ॥८६॥

आणि म्हणें तूं कोण आलासी येथें ॥ कां स्मरिले माझिया स्वामीतें ॥ ऐसें पाताळकंदे विष्णुतें ॥ विचारिलें पैं ॥८७॥

ऐसे पाताळकंद बोलिला ॥ ऐकोनि हरि संतोषला ॥ म्हणे शिवचरणासी सोय मला ॥ कैसी लाभेल ॥८८॥

या महा अंधकारा ॥ संग झाला अवधारा ॥ आतां रक्षीं परमेश्वरा ॥ कृपाळुवा ॥८९॥

तंव पुसे पाताळकंदु ॥ येरु म्हणे मी गोविंदु ॥ येथे य़ावया काय संबंधू ॥ कवण कार्य ।९०॥

मग विष्णु करी अनुवादू ॥ सांगे पूर्वील संबंधू ॥ म्हणे जी जाहला महावादु ॥ मज आणि ब्रहयासी ॥९१॥

तो म्हणे मी सर्वकर्तु ॥ मी म्हणें मी समर्थू ॥ मग तो ऐकविला वृतांतू ॥ ईश्वरासी ॥९२॥

मग तो आमुचा विवाद ॥ तुटावयासी संबंध ॥ देवेम रचिला प्रबोध ॥ मनामाजी ॥९३॥

दोघांसी निरोप दिधला शिवें ॥ एकें चरण पाहोनि यावें ॥ एकें मुकुटासी जावें ॥ नभपंथें ॥९४॥

माझे चरण आणि मुकुट ॥ जो देखें तो बळकट ॥ आधीं येई तो श्रेष्ठ ॥ दोघांमाजी ॥९५॥

मग मुकुटाचा महिमा ॥ पाहों गेला असे ब्रह्या ॥ येरुकडे लागला छंद आम्हां ॥ शिवचरणांचा ॥९६॥

मग तो गण विष्णूसी म्हणे ॥ तुम्हीं चालविले कवणें ॥ या अहंमतींच्या गुणें ॥ केवी चरण देखसी ॥९७॥

अत्यंत पवित्र तुम्हीं ॥ वायां पडलेत भ्रमीं ॥ या अहंकारेकरुनि श्रमी ॥ जाहलेती ॥९८॥

शिवचरणांचा अंत ॥ पाहंता सर्व सिद्वांत ॥ हें नकळेचि कोणा गणित ॥ भरंवशानें ॥९९॥

अमर्याद तो केवीं मर्यादेसी येईल ॥ उमाप तो केवीं मापा पावेल ॥ तो अकळ कोणासी कळेल ॥ अपरंपारु ॥१००॥

मज मागें शिव असंणे ॥ परि मी त्याचा पार नेंणें ॥ ऐसे केलें दैव कोणें ॥ जो चरण देखे ॥१॥

येथें असणें मजप्रत ॥ चरणदर्शनाचा धरुति अर्थ ॥ आयुष्य गेलें अनंत ॥ परि न देखे चरण ॥२॥

हा शिव अगम्य अगोचर ॥ कोणी नेणे याचा पार ॥ हा अति गहन अपार ॥ अमर्याद ॥३॥

अहंमती आंगवण ॥ पहांता कोणा निर्धारण ॥ न कळे पद निर्वाण ॥ हा अचोज अरुप ॥४॥

तो नेणवे तर्कानुमानें ॥ नकळे विद्यादिसाधनें ॥ कीं टाकिता ते गर्वपणे ॥ आतुडेल तो ॥५॥

तो गणिता कोणा आणवेल ॥ आणि तो कवणा कळेल ॥ अचोज चोजवेल ॥ केवी तया ॥६॥

कविकुल ज्ञातेपणें ॥ श्रुति स्मृति शास्त्रें पुराणें ॥ अचोज तो अनुमानें ॥ निउरुप शिव ॥७॥

हा न पाविजेल हठें ॥ कीं लोभ प्रपंच कपटें ॥ मददर्शन वेष ॥ न दिसे तो ॥ ८॥

दोन किंवा आगळ्या धर्मे ॥ सर्व आचार क्रिया कर्मे ॥ कीं जाणिवेच्या भ्रमेम ॥ शंभू पाविजे ॥९॥

वेद शास्त्रांमाजी प्रवीण ॥ पुराणीं असे पूर्ण ॥ सर्व काळांमाजी सुजाण ॥ तेणेंही न भेटे ॥११०॥

त्यापुढे न चले समर्थपण ॥ जगासी न कळे महिमान ॥ वायां भुललेती म्हणोन ॥ जाहलेती श्रम वरपडे ॥११॥

कौशल्यमल्ल शंभु आपण ॥ प्रौढी पुरुषार्थ आंगवण ॥ म्हणोनि लागलें विंदान ॥ आपलागपणें ॥१२॥

नाना प्रकार उर्मीपण ॥ समर्थ वाद आंगवण ॥ येणें न कळती शिवचरण ॥ नारायणा ॥१३॥

निबंध वेद शास्र मतें ॥ उपनिषदें आणि वेदांते ॥ एक कर्मे शिवाते ॥ केवि जाणती ॥१४॥

म्हणोनि विद्या कीं संपत्तीं ॥ व्यर्थ सर्व उत्पत्ती ॥ येणें चरण ठाकीती ॥ शिवाचे पैं ॥१५॥

ऐसा शिरुप विचारु ॥ हरीसी सांगे गणेश्वर्य ॥ तो ऐकोनि शार्ड् धरु ॥ आनंदे पूर्ण ॥१६॥

मग बोले नारायण ॥ चांग भेटलासी शिवगण ॥ परम परायण सर्व शीण ॥ हरिला माझा ॥१७॥

मग त्यासी पुसे ह्रषीकेश ॥ तुज आधार कीं प्रकाश ॥ येथेम तुज रहिवास ॥ कोणे सुखें ॥१८॥

ऐकोनि हरिचें बोलणें ऐसे ॥ पाताळकंद गण हंसे ॥ म्हणे तुज दुर्बळपण कैसें ॥ अजूनवरी ॥१९॥

तुं पडिलासी मीपणाच्या पाटे ॥ जरी सद्वुरु शिव भेटे ॥ तरी अज्ञान सर्व फिटे ॥ सहजचि पैं ॥१२०॥

हा अज्ञाजफांटा फिटे ॥ गुरुअंजन डोळां झगटे ॥ मग शिव निर्धारें भेटें ॥ स्वइच्छापणेम ॥२१॥

सद्वुरु अंजन भेटे ॥ तेणें बंधनभ्रांति तुटे ॥ मग शिव सुवर्ण दिठे ॥ दिव्यद्दष्टीसी ॥२२॥

गुरुचे वेष्टिलेनि तेजें ॥ बाह्यभीतरी सर्व देखिजे ॥ तेणें निजस्र्वरुप लाहिजे ॥ अंतरात्मा ॥२३॥

ह्रदयीं शिव दिनकर ॥ तेणें फिटेल अज्ञान अधंकार ॥ तरी येथें आम्हीं तम घोर ॥ कैसे उरेल पैं ॥२४॥

त्या अविनाशतेजें ॥ आम्ही उदय अस्ता नेणिजे ॥ तम लोपलें सहजें गुरुचरणीं ॥२५॥

ऐसे ऐकूनि हरी ॥ जाहला सप्रेम अंतरी ॥ म्हणे शिवचरण कोणेपरी ॥ ठाकती आम्हां ॥२६॥

धरिला अहंकार मानसीं ॥ तेणें अंतर पडिलें चरणासी ॥ तरी सांगा प्रायचित्त आम्हांसीं ॥ सत्य भक्तिबीज ॥२७॥

माझा वेळ वहावलो ॥ मीं अहंबुद्वीसीं पडलो ॥ अहंकारप्रवाहीं बुडालों ॥ अविवेकी मी ॥२८॥

खटाटोपी मी जाहलो ॥ शिवचरण पाहों निघालों ॥ तेणें मी आजि दुरावलों ॥ शिवचरणासी ॥२९॥

जरी मी अंत न पाहतो ॥ तरी शिवचरणासी कां दुरावतों ॥ आणि अंधकारी पडतों ॥ कासयालागीं ॥१३०॥

तरी प्रसंगे स्वभाचे ॥ तुं मज भॆटलासी दैवें ॥ तरी प्रायचित्त द्यावें ॥ आम्हांलागी ॥३१॥

तरी आतां करुनि उपदेशू ॥ तुं करिसी शिवचरणीं वासू ॥ प्रगटी सोहंबीज प्रकाशू ॥ ह्रदयीं माझ्या ॥३२॥

ऐसा अहंकार निरसला ॥ सर्व विकार विरसला ॥ कैवल्यभावें अनुसरला ॥ महेशासी ॥३३॥

ते वेळीं पाताळकंदू ॥ उपदेशी प्राणलिंग संबंधू ॥ मग हरिसी होय आनंदू ॥ प्राणलिंगदीक्षें ॥३४॥

तंव म्हणे ती पार्वती ॥ देवा प्राणलिंग दीक्षा कासया म्हणती ॥ ते कोण कोठें स्थिती ॥ आणि स्मरण काय ॥३५॥

मग म्हणे तो महेश्वरु ॥ प्राणदीक्षेचा जो समाचारु ॥ तो सांगतों ऐक कारु ॥ एकचित्तें ॥३६॥

विष्णुगायत्री

हं

ब्र

ह्म

त्व

वि

ष्णु

मा

त्मा

रू

द्र

सो

हं

रु

द्र

त्व

वि

ष्णु

मा

त्मा

ब्र

ह्म

ऐसें पाताळकंदे ब्रह्य ॥ विष्णूसी सागितलें वर्म ॥ मग शिवज्ञान सप्रेम ॥ स्फुरलें तया ॥३७॥

तेणें उत्तम झाला विष्णु ॥ पुनरपि म्हणे तो गुण ॥ ह्रदयीं असोनि त्रिनयनु ॥ सदाशिव हा ॥३८॥

तो अपरंपार अकळु ॥ अनुसरला कृपाळु ॥ जो शिव अति स्त्रेहाळु ॥ भवालागीं ॥३९॥

ऐसें विश्वासभावें ॥ नलगें दूरी पाहावें ॥ कृपा केलिया देवें ॥ तोचि प्रगटे ॥१४०॥

हा गायत्रीवेद जाणतां ॥ षडक्षरी मंत्रमाता ॥ देवासी शंभू उपदेशिता ॥ जो शिव सर्वव्यापक ॥४१॥

वरिष्ठ सर्वा मंत्रबीज ॥ मानी विश्वस्वरुप निजगुज ॥ तंव हरिसी प्रकाशिले शिवतेज ॥ अखंडित ह्रदयीं ॥४२॥

तेणें प्राणलिंगगव्हरी ॥ शिवज्ञान दिनकरीं ॥ तें सबाह्य अभ्यंतरीं ॥ विमल ब्रह्य ॥४३॥

नलगे उतार चढगिरी ॥ आणि धावणें नलगे दूरी ॥ तो सामवेद ह्रदयाभीतरी ॥ सेज भावें लिंग ॥४४॥

ह्रदयकमळवोहरा ॥ कैवल्यभावाचा गाभारा ॥ तेथें शिवशक्ति वोहरा ॥ विसावला सेजे ॥४५॥

म्हणोनि एकभाचे ॥ ह्रदयामाजी पहावें ॥ हें निजवर्म जाणावें ॥ सद्गुगुरुकृपें ॥४६॥

शिव झाला निर्धारु ॥ मग फिटला अंधकारु ॥ पाताळकंद गणेश्वरु ॥ नमिला देव ॥४७॥

महेश्र स्थानीं उपदेशिला ॥ सर्गरुपीं अनुसरला ॥ मग हरि एकरुप झाला ॥ हरतेजीं ॥४८॥

विश्वासलेनी जीवीं ॥ बुद्वी रुतली शिवीं ॥ देही बाणली स्वभावीं ॥ प्रेमशक्ति ॥४९॥

झाला शिवतत्वीं निर्धार ॥ तेथोनि बोलिजे हरिहर ॥ दोघां भिन्नत्वें व्यवहार ॥ असेचिना ॥१५०॥

भक्तिरुपें एकाकार ॥ म्हणोनि एक हरिहर ॥फिटला अहंत्वाचा अंधकार ॥ शिवतत्वीं ॥५१॥

ऐसें अनादिसिद्वज्ञान ॥ पाताळकेतें उपदेशिले आपण ॥ त्यापासाव शिवज्ञान ॥ विष्णूसी ॥५२॥

केली संख्या पाताळाची ॥ परी चरणाचा पार नकळेचि ॥ पाताळ जगीं बोले तोचि ॥ शब्दश्रुति अतळ ॥५३॥

तो पाहुं गेला चरणकमळ ॥ तें रुप केलें पाताळ ॥ त्यापरती लीला अकळ ॥ शिवरुपाची ॥५४॥

चित्त गुरुशब्दीं विश्वासलें ॥ भावलिंगी अनुसरले ॥ ह्रदयामाजी देखिले ॥ शिवचरण ॥५५॥

विष्णूसी भावें भजिजे ॥ विष्णु तो हरचि म्हणिजे ॥ उत्तमांगी लिंग बोलिजे ॥ सहज तया ॥५६॥

हरि होतां बळे गर्वित ॥ तैं न लाभेचि चरणांचा अंत ॥ त्या अहंतेसी मी दूरी ठाकत ॥ अपरंपार ॥५७॥

मग तो अत्यंत श्रमला ॥ मज स्मरतांचि स्थान पावला ॥ आणि सर्वही भ्रम फिटला ॥ त्या विष्णूचा ॥५८॥

ऐसा शंभू सांगे वृत्तांत ॥ तंव शक्ति म्हणे ब्रह्ययासी कैसी मात ॥ ती सांगिजे मजसी त्वरित ॥ देवराया ॥५९॥

ऐसें पार्वतीने पुसिले ॥ मग शिवें काय बोलिलें ॥ अवो त्यानें मन गर्वे केलें ॥ शिव मुकुट पहावया ॥ १६०॥

मग निघाला ब्रह्या ॥ पहावया मुगुटाचा महिमा ॥ परि तो वरफड झाला श्रमा ॥ चालता ऊर्ध्व ॥६१॥

चतुर्युग सहस्त्र मिती ॥ हे ब्रह्ययाची दिनराती ॥ त्यासी लागली वस्ती ॥ कल्पकोटी ॥६२॥

तो क्रमी जितुलें ॥ जेथें जेथें बैसकार केलें ॥ तेंचि स्वर्गगणित झालें ॥ एकविसांसि ॥६३॥

ऐसा ब्रह्या जाय ऊर्ध्वमार्गे ॥ क्रमली एकवीस स्वर्गे ॥ लक्षानुलक्ष मुकुट ऊर्ध्वमार्गे ॥ नानापरी अचोज ॥६४॥

तेणें श्रमला कमळासनू ॥ क्रमितां पंथ नसेचि गहनू ॥ तंव केतकी आणि धेनू ॥ तीसरा काग भेटला ॥६५॥

ती धेनू पवित्र शिरी वाहिजे ॥ केतकी मुगुटी वास कीजे ॥ तिहीं येतां देखिजे ॥ चतुरानन ॥६६॥

धेनू म्हणे ब्रह्ययासी ॥ तूं येथवरी कां श्रमलासी ॥ काय धरिलें असे मानसीं ॥ तें सांगिजे पैं ॥६७॥

मग ब्रह्या सांगे तियेसी ॥ शिवें सांगितलें ज्या वचनासी ॥ तरी तूं येथे भेटलीसी ॥श्रांत समयीं ॥६८॥

अहो त्रिकालमनीं ॥ तूं वाहिजे त्रिसंध्यावंदनीं ॥ ते तूं देखिलीस नयनीं ॥ त्रिपदा संध्या ॥६९॥

ती तूं मंत्रवेदा ॥ जगीं धन्य तूं त्रिपदा ॥ तुझिया चतुर्थ पदा ॥ सिद्व उपासिती ॥१७०॥

ती तूं सबाह्य अभ्यंतरी ॥ अजपा म्हणिजे आद्याक्षरी ॥ ती तूं सोहंभाव योगेश्वरी ॥ चिंती जैसी ॥७१॥

तूं प्राणाधारनिधी ॥ चौथा चरण त्रिशुद्वी ॥ आंम्हीं क्रियाकर्म उपाधी ॥ अधिकारी वो ॥७२॥

वेदगर्भी तुझी शुक्षुषा ॥ आणि उपाधिकर्म देखा ॥ परी मूर्खत्वें ऐका ॥ अभिमानीं ॥७३॥

त्या अभिमानें श्रमलो थोर ॥न लागेचि मुकुटाचा पार ॥ सरलें बळ राहिलें शरीर ॥ संकीर्णता प्राप्त पैं ॥७४॥

या उत्तरावरी धेनु पुसे ॥ तूं येवढे मोठे आक्रोशे ॥ मुकुट पहावया कैसे ॥ येणें झालें ॥७५॥

मग तो ब्रह्या बोलिला ॥ मज आणि विष्णूसी वाद लागला ॥ मग दोघांस निवाडा दिधला ॥ चंद्रचूडें ॥७६॥

विष्णूनें चरण पाहून येणे ॥ म्यां मुकुटासी लक्षणें ॥ आदि येणे मान पावणें ॥ शिवसभेसी ॥७७॥

आदि ब्रह्या मी सृष्टीकर्ता ॥ मज ऐसी असे अरौंता ॥ मग मी आलों तुज उपासिता ॥ आवके गायत्री ॥७८॥

तें पाही शेवटी चुके ॥ जेणे मुकुटाचा पार ठाके ॥ आज आमचें उणें चुके ॥ कोणे परी वो ॥७९॥

ऐसें बोलून चतुर्मुख ॥ म्हणें काहीं असेल तुज ठाऊक ॥ तरी सांगावा उपाय एक ॥ मजलागीं ॥१८०॥

मग बोले धेनु केतकी ॥ आम्हां वास शिवमस्तकी ॥ परि मर्यादा मुकुटाची किंतुकी ॥ तें आम्हां नेणवे ॥८१॥

हें ऐकूनि श्रमलों बहुत ॥ मग होउनी गर्वगलित ॥ म्हणे आतां सर्व देवांत ॥ लाज थोर झाली ॥८२॥

मग ब्रह्या म्हणे आपण ॥ जी तुमच्या शब्दें करुन ॥ माझी लाज अपमान ॥ चुके ऐसे करा तुम्ही ॥८३॥

मी ब्रह्या होय गहन ॥ सर्व सुरांत होईन मान्य ॥ ऐसा कांही करावा यत्न ॥ तिघें तुम्हीं ॥८४॥

तरी ऐसे तुम्हीं करावे ॥ मी सांगेन तें द्यावें ॥ मुकुट देखिला ऐसें म्हणावें ॥ शिवसभेसी ॥८५॥

गायी ब्राह्यणाचेनि पक्षें ॥ असत्य बोलिजे भलतेसें ॥ असत्य बोलंता परियेसें ॥ दोष नाहीं त्यासी ॥८६॥

तें आलें त्यांच्या चिचा ॥ मग धेनू काक केतकीसी त्वरिता ॥ आला परतोनी मागुता ॥ चतुरानन ॥८७॥

तो आला शिवसभेसी ॥ तंव विष्णु बैसला शिवापाशीं ॥ मग शंभु पुसे ब्रह्ययासी ॥ मुकुट देखिला कीं ॥८८॥

येरु म्हणे पाहिला असे ॥ ऐसे बोले उल्हासें ॥ साक्ष काग धेनु केतकी असे ॥ या बोलासी ॥८९॥

तंव ते दोघे बोलती वचना ॥ आम्ही साक्ष असो त्रिलोचना ॥ मुकुटे देखिला ब्रह्ययानें जाणा ॥ ऐसें बोलती ॥१९०॥

मग या उत्तरावरी ॥ दोघांत शापी त्रिपुरारी ॥ तुम्ही जा मृत्युलोकाभीतरीं ॥ अनन्य भक्षावेम ॥९१॥

मुकुटाची वर्जिली केतकी ॥ ही लटकीच साक्ष वदे मुखीं ॥ इजसी घाला मृत्युलोकीं ॥ अघोर भूमिके ॥९२॥

केतकी काग ऋषि गायत्री ॥ तिघें घातली मृत्युलोकीं ॥ तें अमंगळ भक्षित वक्रीं ॥ शिवें शापिले म्हणोनि ॥९३॥

ऐसे तिघांसी भोवलें ब्रह्यकथन ॥ असत्यें पावलीं अमंगळ स्थान ॥ लटकें सामावे कैसेन ॥ सत्यस्वरुपीं ॥९४॥

सहज मजमाजीं सकळ ॥ कैसे मजमाजी अकळ ॥ आम्हांसी हळहळ ॥ करुं जातां ॥ ९५॥

अवो गायत्री तुं समर्थ ॥ आणि लटकें आज बोलत ॥ जाहलीस जगा देखता येथ ॥ महादोषिणी ॥९६॥

असत्य अनुवादली ॥ म्हणोनि मुखी अपवित्र झाली ॥ एवढा अपमान पावली ॥ ब्रह्यकथनाचा ॥९७॥

केतकी जी पवित्र होती ॥ तीही जाहली असत्य वदती ॥ म्हणोनि तिची वर्जिली संगती ॥ दिधली दैत्यां ॥९८॥

आणि एक काग ऋषि ॥ सुवर्णकांची चंचुमुखी ॥ तो कृष्णकाया आणि नरकीं ॥ मुख सदां तिष्ठत ॥९९॥

ऐसें शापिलें तिघांसी ॥ मग पाचारिले ब्रह्ययासी ॥ तो शाप ह्यषीकेशी ॥ परिसत असे ॥२००॥

जो अबद्व संसार ॥ जो असे कुकर्मी नर ॥ त्याचा तुझे मस्तकीं भार ॥ पडो रे विरंची ॥१॥

तुं खाटिक कसाब होय गायत्रीचा ॥ हातीं विकरा करिसी मांसाचा ॥ मुहूर्त देउनी जींवाचा ॥ घातकी होसी ॥२॥

विश्वकर्म करीं रे पापिष्ठा ॥ तो तुझ्या शिरी भार मोठा ॥ ऐसा असत्याचा वांटा ॥ प्राप्त तुजसी ॥३॥

तुज ऐसा आहे ताठा ॥ यास्तव तुझें एक शिर तोडिलें नष्टा ॥ तुजसी आला साक्षीचा बट्टा ॥ असत्याचे ॥४॥

तुझे कुळीं होतील नष्ट ॥ महाकुकर्मी पापिष्ठ ॥ दैत्य राक्षस अति दुष्ट ॥ होतील जाण ॥५॥

जे लागती तुझें संगती ॥ ते कर्मभ्रमीं पडती ॥ त्यांसी नाहीं फळप्राप्ती ॥ तुझ्या मार्गी ॥६॥

घेती दान प्रतिग्रह ॥ मग मोक्षासी नाहीं ठाव ॥ मग ते रचिती देवीदेव ॥ भूतजाती ॥७॥

तूं होसी विश्वाचा गुरु ॥ त्याच्या कर्माचा प्रतिकासु ॥ बेत होईल अपारु ॥ त्यासी अजय तुझेनी ॥८॥

तुझे वंशीं विधवा ॥ त्यांसीं विटंबू करावा ॥ आन जातीचा रिघावा ॥ त्यांसी होईल ॥९॥

ऐसा शापिल ब्रह्या ॥ मग तो गेला कुकर्मी ॥ तो चुकला निजवर्मा ॥ धोत्रें प्रक्षावळी ॥२१०॥

वदतां लटकी बुद्वी ॥ पडला ब्रह्यया संधी ॥ त्यांस पूर्वजां वर्जिली त्रिशुद्वी ॥ तिहीं लोकीं ॥११॥

मी ब्रह्या कर्ता श्रेष्ठा ॥ ऐसा जो आंगीं होता ताठा ॥ ती उतरली प्रतिष्ठा ॥ लटिका जाहला ॥१२॥

मग म्यां विष्णूतें पुशिलें ॥ तुंवा चरण कीं देखिले ॥ हरि म्हणे देवा तूं अकळलीळे ॥ केवीं आतुडसी ॥१३॥

देवा तूं श्रेष्ठा त्रिजगती ॥ अप्रमेय अमूर्ती ॥ येवढी मज कैंची प्राप्ती ॥ जे तुझे चरण देखेन ॥१४॥

परी बरवें जाहलें एक ॥ जे फिटली गर्वाची कुळक ॥ तुंवा केलें निष्कंलक ॥ कृपानिधी ॥१५॥

सर्व हरा तूं हर्ता ॥ शिवा तूं एक समर्था ॥ बरवे जाणितलें आतां ॥ भ्रांति फिटली ॥१६॥

ऐशा शब्दी संपूर्ण ॥ विष्णू बोलिला स्वधर्मवचन ॥ त्यासी म्यां दिधलें महिमान ॥ तिहीं लोकीं ॥१७॥

तरी मी त्यासी सारथी ॥ ज्यासीं जैसा विश्वास चित्तीं ॥ त्याते कटकें न म्हणती ॥ तो त्रिजगती वंद्य ॥१८॥

ऐसे वाहिलें विष्णूसी भोज ॥ आणि पावविलें त्रिलोकींचे राज्य ॥ ऐसा बरवा जाहलाअ सहज ॥ आणि मान पावलाअ ॥१९॥

तंव येरु अहंमती ब्रह्या॥ घेऊनि राहिला गरिमा ॥ तो पावला अत्यंत श्रमा ॥ अहंमतिस्तव ॥२२०॥

ऐसे हरिविरिंची विवादताम ॥ आलीं स्वर्गपाताळें गणिता ॥ येरासी निभ्रांता ॥ अकळ सर्वा ॥२१॥

ऐसी मनयुक्तयुगींची रचना ॥ पार्वती परियेसी जाणा ॥ मजवीण निर्वाणां ॥ नाही आणिक ॥२२॥

ऐसा हा मनयुक्तयुग ॥ पांचकोटी वर्षाचा प्रस्मग ॥ सर्व शास्त्रांचा मार्ग ॥ असे जाणा ॥२३॥

हें मूळस्तंभ वाक्य सत्य ॥ शिव सांगे शक्ति ऐकत ॥ हें परिसतां निभ्रांत ॥ मीच होय ॥२४॥

सर्व शास्त्रांमाजी श्रेष्ठ ॥ आणि देवांसी असे प्रतिष्ठ ॥ तैसाच पुराणासी वरिष्ठ ॥ शिवनिबंध हा ॥२५॥

हा शिवागम ऐसें जाणा ॥ सांगितली आगमरचना ॥ शिवाहुनी अधिक त्रिभुवना ॥ कोण असे ॥२६॥

हा ग्रंथ श्रवण परिसिजे ॥ तेणें सर्व ज्ञान पाविजे ॥ आदि जयासी ह्यणिजे ॥ तेणें पाविजे हा ग्रंथ ॥२७॥

जे शिवागम ऐकती ॥ गाती वाखाणिती सुमती ॥ त्यांसी प्राप्त माझी स्थिती ॥ म्हणे शिव शंभू ॥२२८॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे सप्तमोऽध्यायः ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP