मूळस्तंभ - अध्याय १२

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

ऐसें महादेवें सांगितलें ॥ तें पार्वतीनें परिसिलें ॥ आणि मन संतोषले ॥ दुर्गादेवीचें ॥१॥

मग त्यावरी पार्वती बोले ॥ पुढें कैसें जी वर्तलें ॥ ते सांगावें मजसी वहिलें ॥ स्वामिराया ॥२॥

आताम अलंकृतयुग ॥ जयांत अलंकार झाला अभंग ॥ आणि भाव कुभाव मार्ग ॥ म्हणे ईश्वर ॥३॥

अलंकारासी निपजू झाला ॥ म्हणोनि अलंकृत नाम पावला ॥ तो किती वर्षे वर्तला ॥ तें ऐक देवी ॥४॥

तंव उमा म्हणे ईश्वरा ॥ मागें सांगितलीं युगें तेरा ॥ हें चवदावें सर्वेश्वरा ॥ अलंकृत नाम ॥५॥

याचें किती वर्षे प्रमाण ॥ यांत जन्मले कोण कोण ॥ तें सांगावेम संपूर्ण ॥ मजप्रति ॥६॥

मग म्हणे शूलपाणी ॥ अवो देवी शक्तिची करणी ॥ ह्या युगांचे प्रमाण भबानी ॥ एक कोटी वर्षे जाण ॥७॥

यांत देवता असे रुद्र ॥ आणि राजा वीरभद्र ॥ त्यापासूनि ठाव सर्वत्र ॥ देवत्रयासी ॥८॥

या युगी वर्तती आश्रम ॥ देवनाम उत्तम ॥ कनिष्ठ आणि मध्यम ॥ दैत्य दानव ॥९॥

तंव देवी म्हणे जी देवा ॥ देवांचा विस्तार सांगावा ॥ कोणापासूनि कोंण ठेवा ॥ कथिजे मजप्रती ॥१०॥

मग सांगे शूलपाणी ॥ मज एकाची हे करणी ॥ मजपासुनी त्रिभुवनीं ॥ देवत्रय ॥११॥

विष्णु जन्मला तुजपासूनी ॥ विष्णुचिया नाभिस्थानीम ॥ ब्रह्या जन्मला तयापासूनी ॥ बारा ब्रह्ये जाहएल ॥१२॥

मुख्य बारांची गणती ॥ त्यांपासाव असंख्य होती ॥ ते मागें सांगितलें असता ॥ तुजप्रती देवी ॥१३॥

आताम जो सर्व जीवांस आदि ॥ त्या कश्यपाचा जो आदी ॥ तो सांगतों तुज आदी ॥ ऐक देवी ॥१४॥

ती ऐक ईश्वर मती ॥ जेणें हें मानव उद्वरती ॥ आणि ही सर्व त्रीजगती ॥ उद्वरे पैं ॥१५॥

ॐकार आदिबीजागम ॥ प्रथम सांगितले पंचशून्य उत्तम ॥ त्यांपासुनि देवजन्म ॥ जाण देवी ॥१६॥

ॐकारी जन्मली शक्ति ॥ तियेचें नाम इच्छा म्हणती ॥ तिये मजपासुनी उत्पत्ती ॥ तिचे वामभुजीं विष्णु ॥१७॥

विष्णूचे नाभीं ब्रह्ययाचें जन्म ॥ त्यापासूनि बारा ब्रह्य जाण ॥ त्यापासुनि झालेम जन्म ॥ कश्यपासी ॥१८॥

हा कश्यपाचा आदि सत्य ॥ परब्रह्यापासून अव्यक्त ॥ अव्यक्तापासुनि व्यक्त ॥ जाण देवी ॥१९॥

व्यक्तापासूनि आकाशाचा आदी ॥ त्याचा जाण वातु प्रसिद्वी ॥ वायुचा अरुण भेदी ॥ असे जान ॥२०॥

अरुणाचा आप ॥ आपाचा तेजरुप ॥ तेजाचा ब्रह्यद्वीप ॥ जाण देवी ॥२१॥

तंव दुर्गा म्हणे सांगावें ॥ आदि ब्रह्य कोण म्हणावे ॥ पंचतत्व कैसे बोलावे ॥ देवराया ॥२२॥

ऐसें उमेनें पुसिलेम ॥ मग देव बोले वहिलें ॥ म्हणें एकचित्तें परिसिलें ॥ पाहिजे तुवां ॥२३॥

प्रथम तो अव्यक्त एक ॥ त्या अगोचराचा आलेख ॥ त्याचा निरंजन ईश्वर देख ॥ मीच पै ॥२४॥

मजपासाव इच्छा शक्ति ॥ तिचा जाण श्रीपती ॥ त्यापासूनी उत्पत्ती ॥ ब्रह्ययासी ॥२५॥

तयापासूनि ब्रह्यऋषि ॥ तयाचा जाण महाऋषी ॥ महाऋषिचा कश्यपऋषि ॥ कश्यपाचा महादेव ॥२६॥

ऐसा कश्यपाचा आगम ॥ त्यापासूनि कोण कोणासी जन्म ॥ तें ऐक देवी उत्तम ॥ सांगतो तुज ॥२७॥

कश्यपाच्या राण्या छत्तीस ॥ त्यांत लग्नाच्या तेरा नि :शेष ॥ आणि मोहजाळें व्यापिला ॥ त्यानें नानाजातीचा मेळा ॥ उद्वविला देवी ॥२९॥

कुबुद्वी ठाकली त्यासी ॥ म्हणोनि संबंध अन्य यातींसी ॥ आतां प्राणी नानाकुळांसी ॥ ऐक वो देवी ॥३०॥

तेरांची उत्पत्ति उत्तम ॥ तयांपासुनी देवांचे जन्म ॥ तें मी सांगतों कोण वर्म ॥ ऐक तूं देवी ॥३१॥

आणि तो यातिविशेष सांगेन ॥ कश्यपाच्या राण्या जाण ॥ आणि त्यांच्या मातापितास्थान ॥ सांगतो ऐक ॥३२॥

असुरदळी १ , दैत्यसुनळी २ ,सोमप्रभा ३ , हेमगर्भा ४ , मेघनादा ५ , मायाब्रह्यी ६ , रुपादेवी ७ , सत्रादेवी ८ , हेमप्रभा ९ , सुप्रभा

१० , कनकरेखा ११ , नीगावशा १२ , कद्रु १३ , विनता १४ , षणनेत्रा १५ , कालिंदी १६ , कुलमती १७ , नागकन्या १८ , पद्मपत्रा

१९ , जीनादेवी २० , सुपादेवी २१ , सुललिका २२ , करंजका २३ , कुमंडलिका २४ , मेघदंडा २५ , जैनमती २६ , विघरजा

२७ , अचिंता २८ , सुंदरा २९ , विधृथा ३० , संजीविता ३१ , रुपसेना ३२ , मुनवती ३३ , कर्दमा ३४ , कनकदंडा ३५ , सुवर्णभद्रा

३६ ॥ ऐशा ह्या राण्या छत्तीस ॥ असत्या झाल्या कश्यपास ॥ त्यांजपासूनि सर्व जगास ॥ उत्पत्ति जाण ॥३३॥

तंव देवासी पुसे भबानी ॥ कोणापासाव झाला कोणी ॥ तें सांगावे कृपा करुनी ॥ मजप्रती ॥३४॥

ऐसी बोलंता पार्वती ॥ मग शंभू देव सांगती ॥ ऐक देवी एकचित्ती ॥ पुसलें जें ॥३५॥

सोहंशून्यतत्व एक ॥ परब्रह्यीं देवी ऐक्य ॥ मजपासून तूं एक ॥ तुजपासून विष्णु ॥३६॥

विश्णुपासून चतुर्मुख ॥ त्याचा मरीचि ऋषि एक ॥ त्याचा कश्यप देख ॥ कश्यपाची सर्व सृष्टी ॥३७॥

ऐसा हा कस्यप मुख्य ॥ तयांपासुनिया देख ॥ उत्पन्न जाहले सर्व लोक ॥ जाण देवी ॥३८॥

त्या कश्यपाच्या भार्या ॥ सुरासुरांते व्याल्या ॥ उत्तम मध्यम कनिष्ट व्हाया ॥ कूळ तेंचि ॥३९॥

त्या राण्या छत्तीस ॥ देवदैत्यां ब्याल्या तें परिस ॥ आणि अन्य याती तेवीस ॥ ऐक देवी ॥४०॥

प्रथम राणी असुरदळी ॥ तिचा सुत महाबळी ॥ नारायण ते कुळीं ॥ कश्यपाच्या ॥४१॥

आणि तिच्या उदरीं ॥ कवण झाले गौरी ॥ तें परियेसी सुंदरी ॥ सांगो तुज ॥४२॥

ती कश्यपाची राणी जाण ॥ असुरदळी याति क्षत्रिण ॥ पिता लोमऋषि पुत्र नारायण ॥ असे देवी ॥४३॥

त्यापासूनि ब्रह्या आपण ॥ त्यापासून पाडळीचा जाण ॥ पाडळी नंदन ॥ पिसाध्वनी ॥४४॥

त्याचा इंद्रध्वनी ॥ त्याचा मेघनादमुनी ॥ तोखासुर त्यापासुनी ॥ त्याचा हिरण्यकश्यपु ॥४५॥

त्याचा पुत्र प्रल्हाद ॥ त्याचा विरोचन प्रसिद्व ॥ त्याचा बळी दानव अगाध ॥ त्याचा बाण ॥४६॥

त्याचा पुत्र लोणासुर ॥ त्याचा कपिलासुर ॥ त्याचा इंद्रसेन कुमर ॥ जाण देवी ॥४७॥

उग्रसेन त्याचे उदरीं ॥ त्याचा कंस अवधारी ॥ त्याचा पुत्र हरी ॥ हा ब्रह्यवंश ॥४८॥

मागें म्यां शापिले ब्रह्ययासी ॥ म्हणोनि दैत्य झाले याचे कुशीं ॥ तिहीं विरोधिला ह्रषीकेशी ॥ म्हणोनि त्यानें ते वधिले ॥४९॥

ऐसी हे असुरदळी ॥ आतां दुसरी सुनळी ॥ तिजपासाव उत्पत्ति जाहली ॥ ती ऐक देवी ॥५०॥

जी दुसरी सुनळी ॥ ती बारा आदित्यां व्याली ॥ ती जन्मली कोणे कुळीं ॥ तें परिस आतां ॥५१॥

पिता कौत्सऋषी जाण ॥ तो तेजोमय महासंपन्न ॥ माता दमयंति ती शिंपीण ॥ पार्वती वो ॥५२॥

घर्णुपुत्र मनूचा ॥ एकवास्या घर्णूचा ॥ मांधता सुत त्याचा ॥ त्याचा धनु जान ॥५३॥

सुनळींराणी ते वेळीं ॥ बारां सूर्यातें व्याली ॥ मुख्य सूर्यापासुनि जाहली ॥ उत्पत्ति मनूची ॥५४॥

निर्घोष पुत्र त्याचा ॥ ब्राह्यध्वज निर्धोषाचा ॥ कमळसेन तयाचा ॥ जाण देवी ॥५५॥

त्याचा पुत्र पुरीचंद्र ॥ मग त्याचा हरिचंद्र ॥ त्याचा रोहिदास वीर ॥ सूर्यवंशी ॥५६॥

त्याचा कार्तिक सिंधु ॥ त्याचा चित्रांगदू ॥ त्याचा पुत्र महीगदू ॥ त्याचा दिलीप ॥५७॥

त्याचा अजपाळ सुत ॥ अजपाळाचा दशरथ ॥ त्याचा श्रीरघुनाथ ॥ जाण देवी ॥५८॥

कौसल्या त्याची माता ॥ आणि लक्ष्मण तयाचा भ्राता ॥ लक्ष्मणाची ती माता ॥ सुमित्रा होय ॥५९॥

भरत आणि शत्रुघ्न ॥ हे दोन कैकयीपासून ॥ रामाचा कुश नंदन ॥ आणि लव द्वितीय ॥६०॥

कुशाचा पुत्र धुंधुमारी ॥ त्याचा संजाती अवधारीं ॥ तयाचिये झाला उदरीं ॥ बाह्यध्वनी ॥६१॥

त्याचा पुत्र गुजध्वनी ॥ त्यापासूनि कपिलध्वनी ॥ प्रसिद्व जाण त्रिभुवनीं ॥ आदिमनू ॥६२॥

हा सूर्यवंश बोलिला ॥ कश्यपापासूनि जाहला ॥ सुनळीचे उदरीं जन्मला ॥ असे जाण ॥६३॥

आतां तिसरी राणी कैसी ॥ ती व्याली सोमवंशासी ॥ तिची उत्पत्ति परियेसी ॥ माता पिता कोण ॥६४॥

सोमप्रभा राणी जाण ॥ ती मंगळऋषिकन्या ॥ माता मार्गजावती जाण ॥ ती माळीण जातीची ॥६५॥

तियेपासून उत्पत्ति ॥ तेराकोटी नक्षत्रें होती ॥ पिता कश्यप बहुशक्ति ॥ सोमवंशाचा ॥६६॥

पुत्र चंद्र तिचा देवी ॥ त्याची स्त्री रोहिणी जाणावी ॥ त्याचा दुदुमा शांभवी ॥ पुत्र होय ॥६७॥

त्याची स्त्री दुदुमका जाण ॥ त्याचा अभव्या जाण ॥ त्याची राणी पुसादेवी सुजाण ॥ पुत्र उर्ध्वयु ॥६८॥

त्याची राणी वेळा म्हणिजे ॥ त्याचा पुत्र पुरिखा जाणिजे ॥ त्याची बोलिजे ॥ वैशामती ॥६९॥

तयाचा पुत्र नल म्हणती ॥ त्याची राणी दमयंती ॥ तयाची सांगतों संतती ॥ ती अवधारीं ॥७०॥

तयाची राणी जाण ॥ शूळमस्तकीं नामें गहन ॥ तियेचा नंदन । दुसळ देव ॥७१॥

तयासी राणी म्हणिजे ॥ कौसल्या नामें जाणिजे ॥ पुत्रनाम तें सहजें ॥ भीमया जाण ॥७२॥

त्याची राणी विश्वदेवी ॥ पुत्र शंतनु वो शांभवी ॥ त्याची राणी जाणावी ॥ जनागदी ॥७३॥

तीस झाले दोन पुत्र ॥ एक चित्र दुसरा विचित्र ॥ त्यांच्या राण्या पवित्र ॥ अंबा आणि अंबालिका ॥७४॥

त्यांसी दोन पुत्र ॥धृतराष्ट् पंडु विख्यात सर्वत्र ॥ धृतराष्ट्राची राणी पवित्र ॥ गांधारी नामें ॥७५॥

पंडुची पत्नी कुंती देवी ॥ तिचे पांडव वो शांभवी ॥ गांधारीची संतती जाणावी ॥ एकोत्तरशत कौरव ॥७६॥

त्या पंडुराजाचे वो देवी ॥ पुत्रनामें परिसावीं ॥ तें ऐक वो शांभवी ॥ सांगो तुह ॥७७॥

धर्मपुत्र तो यमाचा ॥ यम जाण सटवीचा ॥ यमाची राणी साचा ॥ विहंगमावती ॥७८॥

भीमसेन दुसरा पुत्र ॥ तो वायुचा होय कुमर ॥ वायू बीरुजाचा पुत्र ॥ त्याची राणी सुल्लजा ॥७९॥

अर्जुन इंद्राचा म्हणिजे ॥ इंद्रमाता रुपसादेवी जाणिजे ॥ राणी द्रौपदी म्हणजे ॥ जाण देवी ॥८०॥

चवथा पुत्र कुंतीचा ॥ तो सुत अंकुराचा ॥ अंकुर मयंतकेचा ॥ जाण देवी ॥८१॥

पांचवा सहदेव जाण ॥ तो कुबेराचा नंदन ॥ राणी कमळा सौजन्य ॥ जाणिजे वो ॥८२॥

हे पांडवांचे पिते ॥ त्यांपासाव जन्म कोणातें ॥ तें सांगेन आतां तुतें ॥ परिस देवी ॥८३॥

सौभद्र द्रौपदीचा ॥ वीराग्नी सारणीचा ॥ सारणी अंगस्थळीचा ॥ जाण देवी ॥८४॥

अंगस्थळी लोथळीचा ॥ लोथळी वीरगंधीचा ॥ वीरगंधी जन्मोध्याचा ॥ जाण तूं ॥८५॥

त्याची राणी स्वस्ति ॥ तिचा वीनवस्तु भूपती ॥ वीनविताची युवती ॥ विद्वराजा ती ॥८६॥

विद्वराजेचा षण्मुख ॥ त्याची राणी कुशा देख ॥ कुशेचा पुत्र एक ॥ विक्रमादित्य ॥८७॥

विक्रमाची राणी ॥ सुधा रमा ती सुलक्षणी ॥ तिचा पुत्र भवानी ॥ बेळ्या जाण ॥८८॥

बेळ्याची राणी सौधामती ॥ तिचा पुत्र कृष्ण वो शक्ति ॥ त्याचा कजेरदेव म्हणती ॥ पार्वती वो ॥८९॥

त्याची स्त्री श्रियादेवी जाण ॥ तिचें भाळकेतू संतान ॥ दधी झाला भाळकेतूपासूनी ॥ ही वंशवेली ॥९०॥

दधीचा पुत्र जातिवारु ॥ त्याचा सुत तो खासुरु ॥ तयापासूनि प्रतिवारु ॥ जाण देवी ॥९१॥

त्याचा धनु नामें भूपती ॥ त्याचा पुत्र निघोष नृपती ॥ उत्तम जयाची राज्यस्थिती ॥ तो भोजराज तयाचा ॥९२॥

भोजाचा पुत्र अवधान ॥ तयाचा कोथळी नंदन ॥ तयाचा भांडप्रहरी जाण ॥ पार्वती वो ॥९३॥

त्याचा तनय सीधनू ॥ त्याचा भिलमु नंदनू ॥ त्याचा पुत्र सुजाणू ॥ अमर गंगादेव ॥ ९४॥

त्याचा जैतपाळ ॥ त्याचा कोव्हेदेव बाळ ॥ तयाचा पुत्र भूपाळ ॥ रामदेराउत ॥९५॥

ऐसा हा सोमंवश ॥ देवी सांगितला सुरस ॥ पुढें कथा सुंदर परिस ॥ कश्यपरचना ॥९६॥

कश्यपापासून विख्यातू ॥ सोमप्रभेचा विस्तारतंतू ॥ जाहला असे निभ्रांतू ॥ ऐसा हा जाण देवी ॥९७॥

आतां राणी जी चौथी ॥ तियेस कद्रू ऐसें म्हणती ॥ तियेपासाव जन्मती ॥ सर्व नागकुळें ॥९८॥

तंव शक्ति म्हणे जी देवा ॥ नागलोक पाताळठेवा ॥ तो मज आजि सांगावा ॥ सकळहीं ॥९९॥

मग ईश्वर उवाच ॥ तिचा प्रथम शेष तक्षक ॥ शंखपाळ वासुकी पुंडलिक ॥ कंकोळ अनंत पद्मक ॥ पळ पडळ आणि काळिया ॥१००॥

हे मुख्यत्वें सकळिक ॥ कश्यापापासाव कद्रुपुत्रक ॥ आणि तिचा पिता तो देख ॥ ददमऋषि ॥१॥

मातां कंदनादेवी जाण ॥ ती यातीची कोष्टीण ॥ तियेचें सर्व संतान ॥ नागकुळ ॥२॥

ही राणी सांगितली चौथी ॥ आतां पांचवी ऐक वो शक्ति ॥ तिंचे नाम होय अदिती ॥ तेहतीस कोटी देव तिचे ॥३॥

तिचा तात आत्मऋषि जाण ॥ आतां माता क्रंदनादेवी जाण ॥ ती असे यातीची साळीण ॥ ऐसी राणी पांचवी ॥४॥

कश्यपाची राणी सहावी ॥ तिचें नाम विनता देवी ॥ तिजपासाव उत्पत्ति बरवी ॥ ती ऐक आतां ॥५॥

बीजू , गरुड , अरुण , ॥ संपाती आणि जटायू जाण ॥ ही ऐसी अंडजखाण ॥ तिजपासाव ॥६॥

ती तेजमऋषीची कुमरी ॥ माता महाभालाख्या वो गोरी ॥ यातीची तेलिण तामधापुरीं ॥ जन्म तियेंचे ॥७॥

आतां राणी सातवी ॥ नामें सुनळी जाणावी ॥ तिजपासाव उत्पत्ति बरवी ॥ तेराकोटी तारांची ॥ ८॥

ती मलंदुऋषीची कन्या ॥ माता मार्गजादेवी जाणा ॥ ते यातीची गुरविण ॥ नाम सुनळी ॥९॥

आतां राणी आठवी ॥ नामें हेमगर्भा जाणावी ॥ तिजपासुनी उत्पत्ति बरवी ॥ नाना इंद्रांची ॥११०॥

ती ताम्रऋषीची कन्या उत्तमा ॥ माता जाणावी तिलोत्तमा ॥ ती यातीची तांबोळीण महीमा ॥ ऐसा आठवीचा ॥११॥

आतां राणी सांगतों नववी ॥ नामें कुनमती म्हणावी ॥ ते भालिकाऋषीची जाणावी ॥ कन्या देवी ॥१२॥

तिची माता चंद्रवदना ॥ जन्म पुरंदरनगरी जाणा ॥ यातीची वंजारीण म्हणा ॥ तिचे आठ्यायशीं सहस्त्र ऋषी ॥१३॥

आतां सांगतों दहावी राणी ॥ नामें मेघनादा यातीची ब्राह्यणी ॥ राष्ट्ररायाची नंदिनी ॥ आदिशक्तिवो ॥१४॥

माता तयेची भीकेमा जाण ॥ तियेपासूनि झाले उत्पन्न ॥ धर , दवन , पांगुळा , पवन ॥ हे चार मेघ ॥१५॥

आतां राणीं अकरावी ॥ नामें नागकन्या म्हणावी ॥ यातीची लाडीण जाणावी ॥ येलापुरीं जन्म ॥१६॥

ती पराशऋषीची कन्या ॥ माता सुंदरा देवी जाणा ॥ तियेपासाव झाली उत्पन्न ॥ अठरा धान्यें ॥१७॥

कनकरेखा बारावी जाण ॥ ती जातीची असे गुजरीण ॥ तिची उत्पति वसिष्ठापासून ॥ माता रोजना दे वी ॥१८॥

तुंरगापुरीं जन्मली ॥ तियेपासाव उत्पत्ति झाली ॥ ताड माड अठरा वनस्थळीं ॥ झाली जाण ॥१९॥

जी तेरावी राणी वो पार्वती ॥ तिचें नाम पद्मावती ॥ तींते व्यवस्तऋषीची कन्या म्हणती ॥ माता सीधारदेवी ॥१२०॥

ती यातीची परटीण ॥ जन्म मलयाचळनगरीं जाण ॥ आणि चौ -याहात्तर गुण ॥ तियेपासाव जाहले ॥२१॥

आता राणी चौदावी ॥ तिंचे नाम सत्रावी देवी ॥ ती भार्गऋषीची कन्या जाणावी ॥ कुंकमावती माता ॥२२॥

ती यातीची कासारीण ॥ रुद्रावतीनगरी जन्म जाण ॥ तियेपासाव सप्तसमुद्र गहन ॥ ते ऐक आतां ॥२३॥

क्षारसमुद्र , नीरसमुद्र ॥क्षीरसमुद्र ॥ इक्षुरससमुद्र ॥ मधुसमुद्र , दधिसमुद्र्म ॥ आणि शर्करासमुद्र ॥२४॥

ऐसे हे सातसमुद्र ॥ सतरादेवीपासाव पवित्र ॥ ऐसी चौदावी राणी सुपात्र ॥ जाण देवी ॥२५॥

आतां राणी पंधरावी ॥ तिंचे नाम जीवनादेवी ॥ यातीची अहेरीण जाणावी ॥ रोमऋषीची कन्या ॥२६॥

माता शैलाक्षा सुंदरी ॥ जन्म जाण कर्णपूरनगरीं ॥ तियेपासाव उत्पत्ति बरी ॥ ऐक देवी ॥२७॥

द्विपद चतुष्पद पाषाण ॥ जीवनादेवीपासाव उत्पन्न ॥ ही पंधरावी राणी जाण ॥ पार्वती वो ॥२८॥

आतां राणी नामें सोळावी ॥ लिंगवाहा म्हणावी ॥ यातीची मोचीण जाणावी ॥ भवानी वो ॥२९॥

ते क्षणाग ऋषीची कन्या ॥ माता रोदना देवी जाणा ॥ तियेपासाव जन्म कवणा ॥ झाले पैं ॥१३०॥

तियेचें जनन गे सती ॥ तुरंगापुरीं झालें म्हणती ॥ तियेपासाव उत्पत्ति ॥ नवलक्ष वेताळांची ॥३१॥

आणि नवकोटी चामुंडा ॥ तियेपासाव जन्म पुढां ॥ परियेसीं वो वेगाढा ॥ ही राणी सोळावी ॥३२॥

आतां ऐक राणी सत्रावी ॥ नामें करंजका जाणावी ॥ माता कुळसणादेवी ॥ ही तियेची जाण ॥३३॥

ती विधृरऋषीपासुन ॥ जन्म चैतन्यपुरीं जाण ॥ ती यातीची कुंभारीण ॥ तिचे कंरज ऋषि अरुडऋषी ॥३४॥

आतां राणी अठरावी ॥ तिचें नाम सुपादेवी ॥ ती यातीची डोंबीण जाणावी ॥ आदिशक्ति वो ॥३५॥

ती विभांडकाची कन्या ॥ माता पुराणदेवी जाणा ॥ तियेपासाव उत्पत्ति नाना ॥ औटकोट भूतावळी ॥३६॥

आतां कश्यपाची राणी ॥ एकूणिसावी गे भवानी ॥ नामें रुपप्रभा जाणी ॥ यातीची सुतारीण ॥३७॥

तिचा कौडिण्यऋषी तात ॥ पूर्णा देवी माता विख्यात ॥ आणि जन्म सहजापुरींत ॥ तिजपासाव गोरक्ष ॥३८॥

आतां राणी विसावी ॥ नामें सुरनळी म्हणावी ॥ पिता कौंऋषी गे देवी ॥ यातीची डोहरीण ॥३९॥

माता कंदना देवी परियेसीं ॥ तिचा पुत्र एक संजीवनऋषी ॥ ही विसावी स्त्री ऐसी ॥ कश्यपाची ॥१४०॥

आतां स्त्री एकवीसावी उत्तम ॥ कनकदंड तिचें नाम ॥ ती यातीची अनामिकीण ॥ महारीण पैं ॥४१॥

ते निर्मळऋषीची कन्या ॥ माता अर्चिता देवी जाणा ॥ पुष्पावती नगरीं जन्म ॥ तिचा वो ॥४२॥

तीपासाव उत्पत्ति ॥ अर्थ रत्न पाषाण सुजाती ॥ हिरा पुष्कराज माणिक मोतीं ॥ जाण देवी ॥४३॥

आतां राणी बाविसावी ॥ नामें जाण जारजा देवी ॥ ती यातीची सोनारिण म्हणावी ॥ जन्म शाहापुरी ॥४४॥

तिचा कंलकऋषि पिता ॥ चंद्रमती तियेची माता ॥ ते प्रसवली दोघां सुतां ॥ सुपती आणि आल्हादऋषि ॥४५॥

आतां राणी तेविसावी ॥ नामें कमंडलुका म्हणावी ॥ ती यातीची मांगीण जाणावी ॥ पार्वती वो ॥४६॥

ती श्वेतऋषीपासूनि उत्पन्न ॥ माता श्वेतांगी नामें जाण ॥ मुखापुरीं जन्म गहन ॥ तिचा पुत्र शैलेंद्रऋषि ॥४७॥

आतां चोवीसावी राणी ॥ ती यातीची कुळंबिणी ॥ नामें मेघदंडा जाणी ॥ सुमंतऋषीची कन्या ॥४८॥

शैलाक्षमाता तिची जाण ॥ यौवनाश्वपुरी असे जनन ॥ चौ -यांयशीं झाले उत्पन्न ॥ तिजपासूनि ॥४९॥

आतां राणी पंचविसावी ॥ नामें मेघप्रभा म्हणावी ॥ तिची उत्पत्ति जाणावी ॥ शिवशक्तिपरायण ॥१५०॥

ती विकृतऋषीची कन्या ॥ युवनापुर जन्म जाण ॥ यातीची वंजारिण ॥ तिचे दोन पुत्र ॥ ५१॥

आतां सव्विसावी राणी ॥ ते यातीची चांभारीणी ॥ ते मार्गऋषीची नंदिनी ॥ नाम विघरजा ॥५२॥

तिची समता माता शक्ति ॥ तियेपासाव होय उत्पत्ति ॥ आणि कळवऋषि पिता म्हणती ॥ ही सव्विसावी राणी पैं ॥५३॥

आतां राणी सत्ताविसावी ॥ नामें अचिंता म्हणावी ॥ ती यातीची कोळीण जाणावी ॥ पार्वती वो ॥५४॥

मियातऋषि तिचा तात ॥ मकरंदा नामें जननी विख्यात ॥ तियेसी झाला एक सुत ॥ मार्धक नामें ऋषी ॥५५॥

आतां कश्यपस्त्री अठ्ठाविसावि ॥ नामें सुंदरा बरवी ॥ तिचा पुत्र नामें माधवी ॥ जान पैं ॥५६॥

ते खरऋषीची कन्या जाण ॥ माता अधृती आपण ॥ ते यातीची हटकरीण ॥ पार्वती वो ॥५७॥

आतां राणी कश्यपाची म्हणती ॥ एकुणतिसावी वो पार्वती ॥ तिचें नाम असे विघृती ॥ जाण देवी ॥५८॥

ते रक्ताक्ष कन्या ॥ माता सुघृती असे जाणा ॥ ते प्रसवली नंदना ॥ भाउकऋषि नामें ॥५९॥

आतां सांगतों राणी तिसावी ॥ नामें मनुवता जाणावी ॥ तिंचे उत्पत्तिस्थान वो देवी ॥ एक काळऋषि ॥१६०॥

ते काळऋषीची नंदिनी ॥ माता असे सुप्रभा जाणी ॥ ते यातीची जाटिणी ॥ भवानी वो ॥६१॥

आतां राणी एकतिसावी ॥ नामें कर्दमा जाणावी ॥ तीपासाव उत्पत्ति बरवी ॥ मर्याद ऋषीची ॥६२॥

जळजऋषीपासोनि तिंचे जनन ॥ तियेची माता मधुमती जाण ॥ ती यातीची खाटकीण ॥ आदिशक्ति वो ॥६३॥

आतां बत्तिसावी राणी ॥ ते परिस वो भवानी ॥ तिंचे नाम वैनजाणी ॥ तिचा पुत्र महाऋषी ॥६४॥

आतां राणी तेहतिसावी ॥ नामें जनमती जाणावी ॥ तियेपासाव उत्पत्ति देवी ॥ नानाजळजंतूंची ॥६५॥

ते मनुवतेऋषीची कन्या ॥ माता ममता देवी जाणा ॥ ते यातीची तुरकीण ॥ तिंचे म्लेंच्छ खटियार मणियार ॥६६॥

आतां राणी चौतिसावी ॥ नामें मायाब्रह्यी म्हणावी ॥ तिची उत्पत्ति जाणावी ॥ सर्व श्वापदें ॥६७॥

आतां पस्तिसावी राणी ॥ ते परिस वो भवानी ॥ नाम षण्नेत्रा जाणी ॥ पार्वती वो ॥६८॥

ते श्रुंगऋषीची कन्या ॥ माता बिंबाबती जाणा ॥ जन्म भोगवती यातीची न्हावीण ॥ तिचे द्विमुख चतुर्मुख ॥६९॥

आतां छत्तिसावी राणी जाणा ॥ तिचें नाम रुपसेना ॥ ती मल्यातऋषीची कन्या ॥ जाण देवी ॥१७०॥

तिची माता गुणवंती ॥ ते यातीची तेलीण पार्वती ॥ तियेपासाव उत्पत्ति ॥ नानाबुद्विमतें ॥७१॥

ऐशा छत्तिस राणीया ॥ कश्यपाच्या तुज सांगितल्या ॥ त्या चराचरांसी प्रसवल्या ॥ पार्वती वो ॥७२॥

ह्यांपासाव त्रिभुवन ॥ म्हणोनि काश्यपी जाण ॥ आतां पुढील विस्तार गहन ॥ सांगेन म्हणे ईश्वरु ॥१७४॥

इति श्रीमूळस्तंभे शिवपुराणे महाशास्त्रे ईश्वरपार्वतीसंवादे कश्यपसृष्टीकथंन नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥

॥श्रीशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP