श्रीगणेशाय नमः ॥
ईश्वरउवाच ॥
अनंतयुग तामसयुज ॥ अद्वुतयुग तारजयुग ॥ आणि पांचवें तांबुज युग ॥ जाण पैं ॥१॥
या पाच युंगाचे सांगितलें गुज ॥ तें शक्ति उपदेशिलें तुज ॥ यांत सहज सोहं बीज ॥ ॐकारे उभारिलें ॥२॥
आतां सांगिजेल तांडजयुग ॥ त्यामाजी कोंण झाले योग ॥ त्याचा उभारा आणि भोग ॥ तें ऐक देवी ॥३॥
तो ब्रह्या लावुनी असे ध्याना ॥ ध्यानापासुनी वैकुंठराणा ॥ सांगितलीया खुण ॥ ऐक वो देवी ॥४॥
तों ब्रह्ययानें केली कल्पना विशेखू ॥ मग करुं आदरिला ब्रह्यांडगोळकू ॥ दुसरें करावयाचा आवांकू ॥ धरिला मनीं ॥५॥
मग आदिदेव भवानी ॥ त्यासी ब्रह्या म्हणे काहीं करावी करणी ॥ मग पूर्ण चैतन्य स्वामिनी ॥ काय केलें ॥६॥
मग शंभु आणि शक्ति ॥ आकार्य करी उत्पत्ति ॥ ब्रह्ययासी काय म्हणती ॥ तुवां करावी ब्रह्यांडरचना ॥७॥
तंव ब्रह्या म्हणॆ चैतन्यशक्ति ॥ आकार्य करितों उत्पत्ती ॥ परी तुजवाचुनीं नव्हती ॥ जाण भवानी वो ॥८॥
मज त्या चैतन्यशक्तिसी ॥ मिळवुनी पांच भूतांसी ॥ ब्रह्यदेव ब्रह्यांडासी ॥ रचिता झाला ॥९॥
मग तारजयुगी काय केलें ॥ ब्रह्ययानें अंडॆ घातलें ॥ तैं तें नाम पावले ॥ ब्रह्यांड म्हणोनि ॥१०॥
ते पंचभूतात्मक रचिलें ॥ तें कैसें आवरोनि राखिलें ॥ मूळरंभी आवरिलें ॥ आवर्णोदक वो ॥११॥
शक्तिसी म्हणे चंद्रमौळी ॥ निराकार शून्य पोकळी ॥ मी व्यापक आहें अंतराळीं ॥ सर्वत्र पैं ॥१२॥
मीच दाखविता लपविता ॥ सर्वसंकेत चेतविता ॥ मीच सामाविता विस्ता -रिता ॥ सकळ मीच जगामाजी ॥१३॥
पार्वती म्हणे देवासी ॥ एकवीस स्वर्ग तुम्हापासी ॥ आणिक सप्तपाताळें तीं कैसीं ॥ सांगिजे देवा ॥१४॥
मग म्हणे जाश्वनीळ ॥ एकवीस स्वर्ग पाताळ ॥ माझ्यासाठी ब्रह्यांडगोळ ॥ तें सांगेन तुजलागी ॥१५॥
प्रथम तें असे भूतळ ॥ दुजें होय भवांगतळ ॥ आणि तृतीय भिन्नतळ ॥ जाण देवी ॥१६॥
चौथे तें आदित्यतळ ॥ पांचवें असे अधरतळ ॥ सहावें जाण सर्वातळ ॥ आणि उभयानकतळ सातवें ॥१७॥
ऐसी सप्त पाताळें प्रमितें ॥ परी स्वरुप याहीपरतें ॥ रचुनी धरिली अव्यक्तें ॥ आपणा प्रेमे ॥१८॥
माझिया स्वरुपा उर्ध्व विभागी ॥ शिरस्थळीं उत्तमांगी ॥ माझॆ एकवीस स्वर्ग मुगुटमार्गी ॥ व्यक्त तंव देवी ॥१९॥
मुगुट आज्ञा मर्यादातळीं ॥ माझें स्वरुप अव्यक्त पाताळीं ॥ रचुनी म्यां सांवरली ॥ आपण आपें ॥२०॥
माझ्या निजस्वरुप निराळीं ॥ स्वर्गे रचिली अंतराळीं ॥ ती मुगुटआज्ञे वेगळीं ॥ निवडती वचना ॥२१॥
स्वर्ग गगन अवरीं ॥ रचिली माझ्या स्वरुपा -भीतरीं ॥ तें सांगिजेल अवधारी ॥ आदि देवी ॥२२॥
प्रथम तो ज्योतीस्वर्ग ॥ दुसरा जाण सितस्वर्ग ॥ तिजा होय विमळस्वर्ग ॥ परिपूर्णत्वें ॥२३॥
चौथा स्वर्ग अभियागत ॥ पांचवा प्रकाश विख्यात ॥ सहावा तो सदोदित ॥ रम्यस्वर्ग ॥२४॥
सातवा सहजस्वर्ग ॥ आठवा तो सिद्वस्वर्ग ॥ नववा असे नादस्वर्ग ॥ जाणिजे देवी ॥२५॥
दहावा तो दिव्यस्वर्ग ॥ अकरावा जाण एकांत स्वर्ग ॥ बारावा असे स्थिरस्वर्ग ॥ अनुपम्य ॥२६॥
तेरावा स्वर्ग नाम तृप्ती ॥ चौदाव्यास निर्मळ म्हणती ॥ पंधराव्यास प्रेमळ बोलती ॥ अनुपम्य ॥२७॥
निजस्वर्ग सोळाचा ॥ लयस्वर्ग तो सतरावा ॥ अनंत स्वर्ग अठरावा ॥ जाण देवी ॥२८॥
एकोणिसावा तो नित्य स्वर्ग ॥ विसावा अतीतस्वर्ग ॥ एकविसावा तो स्वर्ग ॥ सच्चिदानंदनाम ॥२९॥
बाविसावा महास्वर्ग बोलिजे ॥ अव्यक्तस्वरुप तो माझें ॥ मन अप्रमेय सहजें ॥ शब्दविरहीत देवी ॥३०॥
ऐसे मुगुटाचेनि अंगलगें ॥ रचिली एकवीस स्वर्गे ॥ त्यांच्या शिव -स्वरुपा जी जी लिंगे ॥ व्यक्तिवंते माया माझी ॥३१॥
पाताळ रचना स्थूळा ॥ स्वयें सुखावे लिंगाची मेखळा ॥ स्वर्गापर्यत अंतराळा ॥ लिंगरुप परिसा देवी ॥३२॥
ज्योतिस्वर्गी ज्योति लिंग ॥ श्वेतस्वर्गी अमृतलिंग ॥ विमलस्वर्गी विमललिंग ॥ विमलाकार ॥३३॥
अभियागत -स्वर्गी अभित्रलिंग ॥ प्रकाशस्वर्गी प्रकाशलिंग ॥ सदोदितस्वर्गी साक्षाल्लिंग ॥ अनुपम्य ॥३४॥
स्थिरस्वर्गी प्रकाशलिंग ॥ तृप्तिस्वर्गी दिब्यलिंग ॥ निर्मळस्वर्गी निष्कलंकलिंग ॥ दिव्यतेजा ॥३५॥
सहजस्वर्गी सहजलिंग ॥ सिद्वस्वर्गी सिद्वलिंग ॥ नादस्वर्गी नादमिंग ॥ नादभरित परिपूर्ण ॥३६॥
दिव्यस्वर्गी भवलिंग ॥ एकांतस्वर्गी निर्मळलिंग ॥ प्रेमस्वर्गी प्रेमलिंग ॥ परिपूर्ण ॥३७॥
निजस्वर्गी निजलिंग ॥ लयस्वर्गी अकललिंग ॥ अनंतस्वर्गी अपारलिंग ॥अनुपम्य ॥३८॥
नित्यस्वर्गी निर्लयलिंग ॥ अतीतस्वर्गी अव्यक्तलिंग ॥ सच्च्दानंदस्वर्गी शिवलिंग ॥ सर्व संपुर्ण जें ॥३९॥
महास्वर्गी महालिंग म्हणिजे ॥ तेंचि अव्यक्त स्वरुप माझें ॥ एकवीस स्वर्गापरतें सहजें ॥ अपरंपार वो ॥४०॥
सोहंलिंग सर्वादी कैवल्य केवळ ॥ तो मायादी निर्माण सकळ ॥ ते सूक्ष्म आणि स्थूळ ॥ व्यक्ताव्यक्तवंत ॥४१॥
सप्तपाताळ दिशा दश ॥ ऊर्ध्वस्वर्ग एकवीस ॥ माझें प्रकाशले मानस ॥ चौदा भुवनें ॥४२॥
शिवसिंहासनी शतकोटी ॥ निर्मळ तीर्थे लक्षासाठीं ॥ पुण्यसरिता जळ गोमटी ॥ सवालक्ष ॥४३॥
श्रूंगारमहास्थळ भुवंगा ॥ जटाजूटी आदिगंगा ॥ थोर आधार सर्व जगा ॥ माझिया विभूतीचा ॥४४॥
प्रथम सारासार विचारिलें ॥ विभुतिसार ऐसे आम्ही म्हटलें ॥ म्हणोनि म्यां हिचें घेतलें ॥ पांघरुण देवी ॥४५॥
विभूतीरजरसें उजळ ॥ निर्मळ स्वरुप कांती चोखाळ ॥ सर्वागीं मिरवे म्हणोनि मज ढवळ ॥ देव सर्व म्हणताती ॥४६॥
सर्व याग पूजा आचरण ॥ समस्त तीर्थादि विशेष पुण्यें गहन ॥ सत्कर्मादि फळ साधन ॥ यामुळें आदि विभूति ॥४७॥
आंगी विभूतीवीभ जितके पाक ॥आणि कर्मे जे जे लोक ॥ त्यांसी पुनु दैत्यराक्षसीं हरिलें ॥
आणि तेचि असंख्य योनि फिरले ॥ हें सत्य वाक्य माझें ॥४९॥
हें सहजची हळुवारा ॥ म्हणोनि भवजाळीं धरिला थारा ॥ पावती जाण पैल पारा ॥ भवसागराच्या ॥५०॥
करिजे विभूतीचें उधळण ॥ तरी काळासी अद्दश्यकारण ॥ तेणें न दिसे जन्ममरण ॥ माझ्या स्वरुपीं ॥५१॥
तंव शक्ति म्हणे जी त्रिनयना॥ विभूति मर्दिजे कैशा वचया ॥ काय जपिजे पंचवदना ॥ निर्मळतार्थे सांग मज ॥५२॥
ऐशा रीती ती गौरी ॥ शंकराप्रती प्रश्न करी ॥ मग उत्तर देई त्रिपुरारी ॥ तें परियेसिजे आतां ॥५३॥
मग म्हणे तो ईश्वरु ॥ पांचां अक्षरांचा कीजे उच्चारु ॥ तो सांगेन समाचारु ॥ मंतउद्वारण ॥५४॥
विभूतीची षडक्षरी गायत्री ॥ ॐनमःशिवाय ऐशापरी ॥ हा मंत्र पांच वेळ म्हणोनियां शरीरीं ॥ बिभूती चर्चावी ॥५५॥
आतां ऐक षडक्षरी ॥ जपिता सर्व पाप हरी ॥ विभूती लावितां मुखीं उच्चारीं ॥ तें बीज सांगतो ॥५६॥
ऐसें बोलुनि विभूतीमर्दनमंत्रु ॥ षडक्षरी जो परम पवित्रु ॥ तो शक्तिप्रती त्रिनेत्रु ॥ सांगता जाहला ॥५७॥
श्लोक ॥
ॐ कारबीजमात्रेण नित्यं ध्यायंति योगिनः ॥ कामदो मोक्श्दश्वैव ॐकाराय नमोनमः ॥१॥
नमंति यं मुनिजनाः नमंति च महे श्वराः ॥ नराः नमंति दवाश्व नकाराय नमोनमः ॥२॥
महा -देवं मगात्मानं महाज्ञानपरायणम् ॥ महापापगरं देवं मकाराय नमोनमः ॥३॥
शिवं शांतंजगन्नाथं लोकानां गुह्यकारकम् ॥ शिवमेकं परं ज्ञान शंकराय नमोनमः ॥४॥
वाहन वृषभश्वैव वासुकी कंठभूषणम् ॥ वामे शक्तिधरं देवं वकाराय नमोनमः ॥५॥
यत्रं तत्रं स्थितो देवः सर्व -व्यापी महेश्वरः ॥ सदुरूः सर्वदेवश्व यकाराय नमोनमः ॥६॥
ॐकारमूलमाधाने नकारो नाभि -मंडले ॥ सकारो वक्षःस्थाने च वकारो ब्रह्यवर्धनः ॥७॥
षडक्षरमिदंपुण्यं यं पठेच्छिवसत्रिधो ॥ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥८॥
ॐनमःशिवाय ॥ विभूतीचें प्रेमकारण ॥ महिमा तरी असाधारण ॥ युगपरत्वाचें लक्षण ॥ आणि सृष्टि हेचि ॥५८॥
ऐसें निरोपिले महेशें ॥ तवं शक्ति म्हणे पुढें कैसे ॥ मी पुसते अति सौरसें ॥ जें अगम्य जमलें मज ॥५९॥
दुर्गो -वाच ॥
देवा गे त्रैलोक्यादि सकळें ॥ एकवीसस्वर्ग सप्तपाताळें ॥ सॄक्ष्म स्थूळ हीं कोणाचे बळें ॥ कोणॆं धरीलीं ॥६०॥
हाजी देवा शूळपाणी ॥ आणि पुसतें तुम्हांलागुनी ॥ ही पृथ्वी बोलिजे शेषाचे फणी ॥ तरी तो शेष कोणॆ धरिला ॥६१॥
ही पृथ्वी ज्या शेषाचे फणी ॥ तोशेष तुमच्या कंकणी ॥ एकवेळ विष्णूच्या आंथुरणीं ॥ तरी ऐसे शेष किती असती ॥६२॥
एक बोलती वराहाचे दाढे ॥ वरी उभविले पृथ्वीचे दळवाढें ॥ तरी त्याचें ओझे एवढें ॥ तें कोणें धरिले असे ॥६३॥
कीं सप्तपाताळतळवटी ॥ हा गारोडा रचिला कूर्मापाठी ॥ तरी तयाचे शेवटी ॥ कोणॆ धरिला ॥६४॥
देवा एवढे महायंत्र ॥ कैसे उभविले चित्र ॥ कैसे सांवारिलें सूत्र ॥ हें वोडंबर ॥६५॥
ये -हवी सप्तपाताळा ॥ कोण पाहून आला डोळां ॥ तरी हें ज्ञान जाश्वनीळा ॥ मज केले पाहिजे ॥६६॥
ऐसे जोडोनिया कर ॥ देवा प्रश्न करी परोपर ॥ मज सांगते झाले ईश्वर ॥ शक्तिप्रती ॥६७॥
पार्वती म्हणे जी देवा ॥ हा ब्रह्यांडगोळा आघवा ॥ कैसा केला तो सांगावा ॥ मजप्रती ॥६८॥
करणी तरी तुमची देवा ॥ परी ब्रह्या म्हणे मीच आघवा ॥ ऐसा तो मीपणाचा ठेवा ॥ कैसा मिरवी ॥६९॥
देवा हे तांडजयुगीं अंडे ऐसे ॥ ब्रह्ययानें घातले कैसे ॥ आणि हें निराकार होतें कैसें ॥ ते मज सांगावे ॥७०॥
मग म्हणे चंद्रमौळी ॥ हे भ्रांति कळली सकळी ॥ घरांत घरकुल करुन हे राहिली ॥ असती जाण ॥७१॥
मी स्वयें शंभु ऐसे नेणती ॥ जैसें उंबरांत किडे असती ॥ उंबर फोडिलिया देखती ॥ सर्वशून्ये ॥७२॥
तैसे मुख्य ब्रह्ये बारा ॥ आणि येरां संख्या नाहीं अवतारां ॥ मी पणाचे कुठारां ॥ वाया पडले असती ॥७३॥
मी त्यांसी जाहलों प्रसन्न ॥ मग दिधलें गायत्रीमंत्र वरदान ॥ तेणें देव दानव गहन ॥ वोडंबर रचिले ॥७४॥
अठरायुगांची रचना ॥ देवधर्मादि प्रमाणा ॥ आणि आयुष्याची गणना ॥ रचिली तेच वेळी ॥७५॥
तेणें केली घरकुली ॥ माजी चवदा भुवनें रचिली ॥ माझिया मुखीची बीजें घेतलीं ॥ म्हणोनियां ॥७६॥
तींच पंचमहाभूतें ॥ त्यांनी वोडंबर रचिले आइतें ॥ आंडे घातले जिवातें ॥ व्यावयालागीं ॥७७॥
तांडजयुगी महाकाळ देवे ॥ तो राजा चक्रवर्ती महा हो ॥ आणि चंद्रसूर्य देवो ॥ माझ्या तिजा नेत्रीचे ॥७८॥
ऐसे भूतपंचक सरलें ॥ तंव तांडजतुग क्रमिलें ॥ मग ते अंडें कठिण झालें ॥ जीवासी ब्यावया ॥७९॥
ऐसें सांगतसे महादेव ॥ सहजचा सहज भाव ॥ साकार करावयास ठाव ॥ रचिता होय ॥८०॥
ऐसें परिसोनि आदिशक्ति ॥ म्हणे देवा कैशी रीती ॥ तें सांगा मजप्रती ॥ देवाधिदेवा ॥८१॥
येथुनी तांडजयुग संपलें ॥ त्याचे बारा कोटी गणित झालें ॥ आतां भिन्नजयुग ऐका वहिलें ॥ म्हणे महादेव ॥८२॥
इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे शिवपुराणे महाशास्त्रे ईश्वरपार्वतीसंवादे तृतीयोऽध्यायः ॥३॥
॥ श्रीउमामहेश्वरार्पणमस्तु ॥
॥शुभं भवतु ॥