मूळस्तंभ - अध्याय १०

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥

श्रीगुरुभ्यो नम :

आतां ऐक विस्तारणयुग ॥ यांत रचना कोण मार्ग ॥ याचा किती वरुर्षे भोग ॥ तो परिस देवी ॥१॥

पार्वतीसी सांगे त्रिनयन ॥ ह्या युगाचें प्रमाण ॥ सात कोटी वरुषें जाण ॥ पार्वती वो ॥२॥

या युगामाजीं रचना ॥ रचिली कोण कामना ॥ विषयमार्ग विषयकल्पना ॥ अर्थ द्रव्याचा ॥३॥

काम म्हणिजे मदन ॥ कामना म्हणजे मनचिंतन ॥ भोग म्हणजे अष्टगुण ॥ कल्पना सप्तधातु सुवर्ण म्हणिजे ॥४॥

चारी पुरुषार्थ नाम ॥ प्रथम अर्थ दुसरा धर्म ॥ तृतीय मोक्ष चतुर्थ काम ॥ ऐसीं जाण पार्वती ॥५॥

हे चारी पुरुषार्थ ॥ उठिले मनामाजी बहुत ॥ त्या मार्गें लोक जात ॥ अज्ञानपणें ॥६॥

एक म्हणती आदिपुरुष ॥ स्त्री पाहिजे जगदिशा ॥ मग मी त्यांच्या मनाची आशा ॥ पुरविता जाहलों ॥७॥

मग रचिलें दोन पदार्थ ॥ शिवतत्व आणि कामतत्व ॥ यांपासूनिंया बहुत ॥ सुखदु :ख जाहलें ॥८॥

सप्तधातुंचे पर्वत विशेष ॥ त्यांतुनि काढिलें सप्तधातुंस ॥ त्याचे नाणे घडलें विशेष ॥ शुद्व मुद्रा ॥९॥

येणेंच वर्तती सर्व लोक ॥ आणि त्यासी म्हणती सर्व सुख ॥ परी याचेनि संगे महादु :ख ॥ ते चोजवेना ॥१०॥

धरितील कल्पना नानापरी ॥ म्हणती द्रव्य हवें गा श्रीहरी ॥ मग त्यांचे मनोरथ सिद्व करीं ॥ मीच पैं ॥११॥

देवा अर्थ मनोरथ कार्यसिद्वी होती ॥ आणि कामनेची कैसी गती ॥ ऐसी बोलती झाली पार्वती ॥ सदाशिवास ॥१२॥

मग म्हणे जनपाळु जगन्नाथ ॥ अवो कामना आणि मनोरथ ॥ ऐक सांगतों त्यांचे वृत्तांत ॥ सावचित्तें ॥१३॥

अर्थ धर्म व्हावया सप्रेम ॥ मनकानमा आदिधर्म ॥ सत्पात्रीं कीजे दान हेम ॥ तेणें अर्थ होय ॥१४॥

वोहळ विहिरी चौबारी ॥ मठ देउळें हरिजागरीं ॥ सडे चौक शोभा करी ॥ शिवस्थानीं ॥१५॥

करावें अन्नदान उत्कृष्ट ॥ पूजावे भस्त भरोडे भट्ट ॥ ऐसी मनकामना करितां श्रेष्ठ ॥ अर्थ होय ॥१६॥

ऐसा अर्थ झाला पूर्ण उत्तम ॥ मग चालवितां तें कर्मे ॥ अविद्या उठोनि झाला अधर्म ॥ अपार जैं ॥१७॥

अर्थ पडलिया गांठी ॥ सहज अधर्माच्या येती गोष्टी ॥ मनुश्य कोणी नाहीं द्दष्टी ॥ हा गुण अर्थाचा ॥१८॥

नेदी सत्पात्रीं दान ॥ लक्ष्मीनें वरता केली मान ॥ न ऐके नाम शास्त्र पुराण ॥ हा गुण द्रव्याचा ॥१९॥

ऐसा जणूं अर्थे भुलला ॥ मग नाना योनीं हिंडू लागला ॥ जन्ममरणाधिकारी जाहला ॥ लोकोपचारी ॥२०॥

मग ब्रह्या सांगे सत्कर्मे ॥ आम्हीं शापिला तेणें कर्में ॥ जनासि सांगे नानावर्में ॥ जी म्यां निरोपिली ॥२१॥

तयाने सांगतां धर्मकर्मे ॥ मग लोक चालती तेणें धर्में ॥ म्हणोनि बुडती हेचि नेमें ॥ जाण देवी ॥२२॥

तंव बोलती जाहली गौरी ॥ काम कैसा सांगा त्रिपुरारी ॥ आणि मोक्ष होय संसारी ॥ तें सांगा जी देवा ॥२३॥

ऐसें पुसे ती शक्ति ॥ मग बोलते जाहले पशुपति ॥ कामतत्व बोलिजे पार्वती ॥ ते पदार्थ दोन्ही ॥२४॥

जे पदार्थ चालती ॥ त्यांसी कामतत्व बोलती ॥ त्यांसी सांगतों उत्पत्ती ॥ तुजलागी ॥२५॥

बोलती कामतत्व तें मदनशास्त्र ॥ शिवतत्व तें सिद्वांतशास्त्र ॥ यांचे भेद सांगेन विचित्र ॥ ते ऐक देवी ॥२६॥

आतां कामतत्व परिसिजे ॥ देहीं दशेंद्विंयें जाणीजे ॥ तीं एके स्त्रिय़ें सुखी कीजे ॥ सांगेन जाण ॥२७॥

तें ऐक वो शक्ति ॥ श्रृंगारें नेत्र सुखी होती ॥ सुस्वर गायनें सुखावती ॥ श्रावण पैं ॥२८॥

परिमळें नासिका सुखी ॥ षड्सें जिव्हा सुखी ॥ भगद्वारीं शिश्न सुखी ॥ देह अंगस्पर्शे ॥२९॥

हस्त तृप्त स्तनस्पर्शनें ॥ पाद तृप्त हस्त स्पर्दनें ॥ हें दश इंद्रिय सुखी करणें ॥ एक स्त्रिया ॥३०॥

त्यां स्त्रियांच्या जाती जाणीं ॥ हस्तिणी चित्रीणी पद्मिनी ॥ आणि तैसीच चवथी शंखणि ॥ ऐशा चार शक्ति वो ॥३१॥

आतां सांगतों यांची आचरणेम ॥ प्रकृती आणखी लक्षणें ॥ ऋतु आणि वशीकरणें ॥ ऐक देवी ॥३२॥

त्या प्रकृती असती तीन ॥ सात्विक राजस तामस गुण ॥ यांचे विवरण सांगेन ॥ तुजकारणें ॥३३॥

सत्व ती सात्विक प्रकृती ॥ यांची कैसी रीती ॥ तें सांगतां कळेल चित्तीं ॥ कामतत्व ॥३५॥

पित्तप्रकृतीसी कपटें असिजे ॥ वातप्रकृतीसी मन धरिनि बोलिजे ॥ श्लेष्मप्रकृतीसीं निर्मळमनें वर्तिजे ॥ न धरिजे वोखटे ॥३६॥

ह्यांच्या चारी अवस्था सांगिजेती ॥ बाला १ प्रौढा २ मुग्धा ३ प्रगल्भा ४ म्हणती ॥ आतां वर्षाची सांगतों गणती ॥ ती ऐक देवी ॥३७॥

बारा वरुषांची ती बाला ॥ चौविसांची ती प्रौढा अबला ॥ बत्तीस वरुषांची मुग्धा बाला ॥ प्रगल्भा ती चाळींसां ॥३८॥

ह्या चारी अवस्था बोलिजेत ॥ आतां यांची रुपें सांगिजेत ॥ तें परिस कीं समस्त ॥ चित्त देउनी ॥३९॥

एक शैवरत ॥ दुजेम भेणरत ॥ तिसरें द्रव्यरत ॥ चौथें कामरत जाण देवी ॥४०॥

आतां शहाणी नार कथन ॥ जीच्या पुण्यें भरें त्रिभुवन ॥ ती जाणें कामतत्व संपूर्ण ॥ ऐक देवी ॥४१॥

तरी हे शाहाणी नारी ॥ जे भ्रतारचरणावरी ॥ आणि न निघे घराबाहेरी ॥ तीच बरवी जाण नारी ॥ धनपुत्रवर्धिनी ॥४३॥

जिंचे मन स्त्रेहाळ ॥ सर्वाभूतीं असे कृपाळ ॥ उदरीं वाढे पुत्र बाळ ॥ ती नारी बरवी ॥४४॥

जीसीं श्रुंगारावीण शोभा ॥ अंग जैसें कर्दळी गाभा ॥ येरांची मार्धुर्यशोभा ॥ जैसे जंत्र वाजे ॥४५॥

ऐसी जी ती शाहाणी ॥ वर्णिजेते पुराणी ॥ ती मनोधर्मा लागुनी ॥ पात्र पवित्र ॥४६॥

यावरी म्हणे भवानी ॥ देवा तूं पिनाकपाणी ॥ पुरुष शाहणा कोणें गुणीं ॥ तो कैसा सांगा ॥४७॥

तो कोण लक्षणें कैसा ॥ सांगिजे वो मातें महेशा ॥ मग अत्यंत माझ्या मानसा ॥ सुख होईल ॥४८॥

मग सांगे त्रिनयन ॥ शाहाण्या पुरुषांचे लक्षण ॥ जेणें संतोषती सुजाण ॥ सर्व लोक पैं ॥४९॥

आधीं आपण कोण तें जाणावें मग दुजियासी ओळखावें ॥ ऐसेचिं करिती ते शहाणे ॥ म्हणावे शक्ति वो ॥५०॥

शास्त्राचें गव्हर जाणे ॥ गृहवार्ता राजवार्ता जाणे ॥ उणें उत्तम जाणे ॥ मान अपमान सर्वही ॥५१॥

आतां मूर्ख सांगो गौरी ॥ वेधें उंचा झाडावरी ॥ आनि चढे टेकावरी ॥ तो मुर्ख जाणावा ॥५२॥

अपशब्द गीतें गाय ॥ वेश्यादासीसंगे जाय ॥ संतांची निंदा करिता होय ॥ तो एक गव्हारु ॥५३॥

व्यर्थ सर्व घरोघरी जाय ॥ परस्त्रीं अभिलाषें आळविता होय ॥ आणि संतांचा अंत पाहे ॥ तो एक मूर्ख ॥५४॥

वाखाणी स्वर्धमाचा मांडू ॥ लोकांप्रती उच्चारी उदंडु ॥ आतां असो हे अबंडू ॥ मूर्खजात ॥५५॥

शरीर आपुलें म्हणे तो मूर्ख ॥ स्त्री माझी म्हणे तो मूर्ख ॥ पुत्राचा संतोष मानी तो मूर्ख ॥ जाण देवी ॥५६॥

द्रव्य माझें म्हणे तो मूर्ख ॥ कवित्व करुन रिझे तो मूर्ख ॥ प्रीतिछंदे रिझे तो मूर्ख ॥ हा मूर्ख सहावा ॥५७॥

परत्र साधन न करी साचा ॥ तो सातवा मूर्ख सत्याचा ॥ आतां गुण लक्षण विचारु त्याचा ॥ परिस देवी ॥५८॥

हे सात मूर्ख थोर ॥ यांचा सांगेन विचार ॥ तो ऐकावा पवित्र ॥ साधुजनें ॥५९॥

हें शरीर साधून आतां ॥ अंतरला जो जीविता ॥ आणि अंतरला परमार्था ॥ तो मूर्ख जाण ॥६०॥

तो शरीर म्हणे आमुचे ॥ परि तें प्रतिदिनीं वेंचे ॥ अन्नोदकाविणें न वांचे ॥ तरी तें त्यांचे कैसें पैं ॥६१॥

एकशत प्रमाण ॥ तीव्रपण वेंचलें जाण ॥ जेधवां न मिळे जळ अन्न ॥ तेधवांचि खचे ॥६२॥

प्रथम आयुष्यें वेंचला ॥ मग त्यासी लाभ काय झाला ॥ माझें म्हणता काय पावला ॥ तेचिं विचारी देवी ॥६३॥

याचें शरीर जरी होय ॥ तरी त्यांते काळ कां खाय ॥ म्हणॊनि तो शतमूर्ख होय ॥ माझें माझें म्हणोनि ॥६४॥

जे शरीर म्हणती माझें ॥ ते जाण शतमूर्ख सहजें ॥ हें शरीर स्मशांनीं मातीरजे ॥ राहील नगराबाहेरी ॥६५॥

देउळीं राउळीं भोगित असे ॥ परी तें शेवटीं स्मशानी वसे ॥ एवं असोनी मूर्ख ऐसे ॥ माझें म्हणती पैं ॥६६॥

आतां दुसरी स्त्रीचा वेष ॥ माझी म्हणे तो मूर्ख विशेष ॥ स्त्रीकामें रात्रंदिवस ॥ वेंचलासे ॥६७॥

स्त्रीसी सदा करी कामू ॥ यापरी गेले सर्व जन्मू ॥ माझी म्हणंता बहूत श्रमू ॥ पावती नर ॥६८॥

तिचा व्रतनेम चाली ॥ करी श्रुंगार साडीचोळी ॥ ऐसा पडला योनिखल्लाळीं ॥ स्त्रीनदीच्या ॥६९॥

ऐसा भोगें खादला कैसा ॥ देह वेंचला परियेसा ॥ स्त्रींने केला अत्यंत पिसा ॥ तो स्त्रीमूर्ख ॥७०॥

तो कन्यापुत्रीं गोंविदा ॥ पर्व जाण विसरला ॥ स्त्रीसंगे भूलला ॥ हा दुजा मूर्ख जाण ॥७१॥

आतां तिजा मूर्ख अपवित्र ॥ जो माझे म्हणे कन्यापुत्र ॥ याचा तर्क अपवित्र ॥ जाण देवी ॥७२॥

जे पुत्र पौत्र थोरमंडण ॥ तें तव बंधनाहूनि बंधन ॥ माझें म्हणतां पावेल शीण ॥ पुत्रमूर्ख तो ॥७३॥

चौथा मूर्ख द्रव्याचा ॥ त्याकारणें विटाळी वाचा ॥ बहूत कुकर्म अधर्माचा ॥ आचार वर्तें ॥७४॥

मुर्ख द्रव्य माझें म्हणती ॥ तरी ठेवी त्या देखतां हरपती ॥ किंवा तस्कर हिरोनि नेती ॥ तरी ह्याचें तें कैसें ॥७५॥

म्हणे लक्ष्मी माझें घरीं ॥ कधीं न खाया वेंचून करी ॥ जैसा राखणाइत निधीवरी ॥ अजगरु तैसा ॥७६॥

ऐसा कळविला मूर्ख द्रव्याचा ॥ पांचवा मूर्ख कवित्वाचा ॥ अनुवाद सांगेन त्याचा ॥ परिस देवी ॥७७॥

एक कवित्वें संती हेवा करी ॥ आपण वर्णी नगरनारी ॥ ऐकोनि देखोनि कवित्व करी ॥ तो एक मूर्ख ॥७८॥

एक कवित्व करी ॥ त्यांचे आपण उच्चारी ॥ अभंगी आपुलें नाम सारी ॥ तो एक मूर्ख जाण देवी ॥७९॥

वाणी कवित्वबडिवारु ॥ धीटपणा म्हणती थोरु ॥ आणि कवित्वीं नाही हरिहरु ॥ तोही मूर्ख ॥८०॥

रायावरिनि गाई कविता पद ॥ संगीत शास्त्रज्ञानें मद ॥ शिवज्ञान नेणंता तोषपद ॥ मानी मूर्ख जाण ॥८१॥

हा पांचवा मूर्ख कवित्वाचा ॥ आतां सहावा ऐक वृत्तीचा ॥ हा ठावो माझ्या वडिलांचा ॥ म्हणे पैं जो ॥८२॥

म्हणे भूमी वृत्त्ति आमुची ॥ तरि ही पृथ्वी स्थापिली कोणी कैंची ॥ इजवरी उपजलीं मेलीं त्यांची ॥ गणती नाहीं ॥८३॥

ऐसे अज्ञानी जे मूर्ख ॥ करिती वृत्तिभूमीचे घोष अनेक ॥ ते देवी माजले लोक ॥ ते वृत्तिमूर्ख जाण ॥८४॥

सातवा मूर्ख परत्र साधनाचा ॥ तो नित्य घोष करी शास्त्रांचा ॥ संग्रह शास्त्रबडिवारांचा ॥ केला पर्वतु ॥८५॥

म्हणे शास्त्रमार्ग हे यागहवन ॥ आगमनिगम मंत्रसाधन ॥ या प्रति म्हणे मजप्रती पावेन ॥ तो मूर्ख जाण ॥८६॥

एक घेती कपट नट ॥ इंद्रियें मारिलीं म्हणती श्रेष्ठ ॥ ऐसी संसाराची खटपट ॥ ते मूर्ख जाणिजे ॥८७॥

हें कामतत्व पवित्र ॥ विस्तारयुगीं रचिलें पवित्र ॥ यापरिस थोर पवित्र ॥ शिवतत्व मूर्ख ॥८८॥

तंव बोले शक्ति ॥ देवाजी पशुपती ॥ ही सांगितली व्युत्पत्ति ॥ कामतत्व मूर्ख ॥८९॥

आतां देवा ऐके विनंती ॥ मज शिवतत्वाची आर्ती ॥ तें ऐकता मोक्षप्राप्ती ॥ जन उद्वरे ॥९०॥

ऐकोनि शक्तिचेम बोलंणे ॥ शिवतत्व सांगों आदरिलें त्रिनयनें ॥ जेणे उद्वरती त्रिभुवनें ॥ म्हणे ईश्वर ॥९१॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे कामतत्वकथंन नाम दशमोऽध्यायः ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP