|
पुन . युद्धभूमि . युद्ध ; संग्राम ; लढाई . श्रीराम राक्षसांचा तो कीं हा एक होय परम रण । - मोभीष्म ३ . ५७ . - न . तंटा ; आवेशाचें भांडण ; जोराजोराचा वादविवाद . वाळूचें मैदान . कच्छचें रण . [ सं . ] ०कंदन कंदळ - न . निकराची लढाई ; कापाकापी ; परस्परांमध्यें आवेशानें होणारें पराकाष्ठेचें युद्ध . ज्यांत हाणामारी , अरेतुरे होते असा जो पराकाष्ठेचा कज्या , भांडण इ० ; तुंबळ युद्ध ; नाश . मुसळघायें करी चूर्ण । रणकंदन मांडिलें । - एरुस्व १० . ६० . ०कर्कश वि. चिकाटीनें लढणारा . आम्ही प्रचंड धनुर्वाडे । रणकर्कश रणगाढे । - एरुस्व ८ . १९ . ०कावो पु. युद्धांतील डाव , पेच . वीरीं घेतला रणकावो । देखोनि धाविन्नला शाल्वो । - एरुस्व १० . ६२ . [ रण + कावा ] ०कुदळ वि. भांडखोर . लठ्ठ व वातुळ व्यक्तीस म्हणतात . ०खंदळ खुदळ खुंदळ ळा ०खुदल स्त्रीनपु . निकराची लढाई ; घनचक्री ; रणभूमीवरील बिनशिस्त लढाई ; रणकंदन ; जंगी युद्ध ; दाणादाण ; नाश ; कत्तल . त्यांनीं फौजेंत रणखुंदल करुन मारामारी केली . - भाब ६७ . [ सं . रण + कृंतन ] ०खंदळी खंदाळी - स्त्री . युद्धपराक्रम ; रणकंदन ; मारामारी ; गर्दी . यादव उठावले महाबळी । रणखंदळी करितील । - एरुस्व ८ . ५६ . ०खांब पु. रणस्तंभ ; एकमेकांवर हल्ला करुन जाणार्या दोन सैन्यांमध्यें पुरलेला खांब ; लढाईस उत्सुक झालेल्या दोन सैन्यांमधील खुणेचा खांब . या खांबाचा सैनिकांस एकत्र जमण्यास खुणेसारखा उपयोग होत असे . रणखांब रोविला मुक्काम घोडेगांव । - ऐपो ११८ . [ सं . रणस्तंभ ] ०गंभीर वि. युद्धाच्या वेळीं न डगमगणारा ; धीराचा . [ सं . ] ०गरी स्त्री. आरमार . - के १ . ५ . ३६ . ०गाडा पु. लढाईंत तोफा किंवा दारुगोळा वाहून नेणारा गाडा ; बैल , घोडे यांनीं ओढावयाचा तोफेचा गाडा . ओझें वाहावयाचे उपयोगी मोठा गाडा . ०गाढा वि. कसून लढणारा . आम्ही प्रचंड धर्नुवाडे । रणकर्कश रणगाढे । - एरुस्व ८ . १९ . ०घर न. रण ; रणमैदान ; रणभूमी . आम्ही जातों रणघराला । - ऐपो ११६ . ०घाई स्त्री. युद्धांतील पराकाष्ठेची गडबड ; हातघाई . जोराचा , नेटाचा प्रयत्न . घाईघाईचें काम . ( क्रि० करणें , चालणें ). ०घाल्या वि. ऐन लढाईच्या दिवशीं विश्वासघात , निराशा करणारा ; दगा देणारा ; हातपाय गाळणारा ( घोडा , मनुष्य ); ऐन वेळीं अवसान सोडणारा ; अवसानघातकी . ०चत्वर चत्वार - न . रणांगण . [ सं . ] ०छतरी स्त्री. सैन्याच्या भोंवतीं पहारा करणार्या संत्र्यास उभें राहण्याकरितां केलेली तात्पुरती लांकडी खोली . ०जोडवें न. पायाच्या अंगठ्यांतलें चांदीचें वळें . ०झुंझार पु. पराक्रमी ; शूर ; लढवय्या . किती झाले तरी स्वराज्याचे ते एक अनुभवी , कसलेले वयोवृद्ध रणझुंझार वीर आहेत . - स्वप ९६ . ०झेंडा पु. ध्वज ; सैन्याचें निशाण ; युद्धाच्या क्षेत्रावरील निशाण , खूण . ०टाळ पु. युद्धांतील एक वाद्य . ०ठाण पु. पवित्रा ; युद्धाकरितां उभें राहण्याची पद्धति . तुझे गर्वकवच छेदन करण्याकरितां रणठाण मांडून बसलों आहे . - पारिभौ ५३ . ०ढोल पु. युद्धांतील नौबत ; मोठें ढोलगें , मृदंग ; दोन्ही बाजूनीं वाजवितां येणारें ढोलगें . ०तुंबळ न. तुमुल , घनघोर युद्ध ; जोराची लढाई ; धुमश्चक्री . - वि . अतिशयित जोराचें ( भांडण , मारामारी , कज्जा इ० ). [ रण + तुमुल ] ०तुरा पु. युद्धांत विजयी झाल्याचें चिन्ह म्हणून पागोट्यांत , शिरोवेष्टणांत खोचण्याचा तुरा , दागिना इ० . ०तुरा तूर्य - पुन . रणांत वाजवावयाचें वाद्य . रणतुराचेनि बंबाळें । भीडींनिलीं दोनि दळें । - शिशु ८७६ . ०तुरा - क्रि . पराक्रमी वीराप्रमाणें डौलांत चालणें , जाणें , मिरविणें . लावणें - क्रि . पराक्रमी वीराप्रमाणें डौलांत चालणें , जाणें , मिरविणें . ०धीट वि. युद्धांत ज्यास भय वाटत नाहीं असा . ०धीर वि. रणगंभीर पहा . [ सं . ] ०धुमाळी स्त्री. धुमश्चक्री ; हातघाई ; निकराची लढाई ; युद्धांतली गडबड . ०धेंडा पु. लग्नांत वधुवरास खांद्यावर घेऊन नाचतात त्याप्रमाणें रणांत नाचणें . ऐसिनि लग्न लागलिया पुढा । रणीं नाचेल रणधेंडा । वोवाळणी बाण प्रचंडा । परस्परें पडतील । - एरुस्व ४ . ४० . ०नवरा वि. मर्द ; शूर ; उत्साही ( वीर ). स्वारीवर असतां अथवा हिंडतांना ज्याला आपल्यापुढें वाद्यें वाजतगाजत ठेवण्याचा अधिकार अथवा मान आहे असा ( योद्धा ). स्फुरण येऊन लढणारा ; सेनापति ; पुढारी ; लढवय्या . अखंड रणनवरा । - दावि १७६ . बेफाम ; बेहोष . ०पंडित पु. लढवय्या ; युद्धकलेंत निष्णात ; सफाईनें शस्त्र चालविणारा . [ सं . ] ०पिसा न. युद्धाचें वेड लागलेला . एक ते रणपिसेचि जाले । कंबर सोडूनि मोकळे । - गीता १ . ४८८ . ०प्रसंग न. युद्ध ; लढाई . एकदोन वेळां रणप्रसंग पाहिल्यावांचून कोणी धीट होत नाहीं . [ सं . ] ०फंदी पु. रणशूर ; लढवय्या ; युद्धाची आवड असलेला . जिवबादादा ते रणफंदी । - ऐपो २६७ . ०बहिरी स्त्री. रणभेरी ; एक मोठें कर्ण्यासारखें वाद्य . कर्णे किती एक रणबहिरी कर्कती । - ऐपो ११९ . - वि . रणशूर ; लढाईंत धीट असलेला . [ रणभेरी = रणवाद्य ] ०बावरा वि. लढाईसाठीं अथवा युद्धासाठीं बेफाम . ( ल . ) भयंकर उतावळा ; अत्यंत उत्सुक . ०बोका वि. गलेलठ्ठ ; गब्बू व अधाशी आणि विषयी ( प्राणी ). फार मोठा ( खांब , तुळई , ओझें इ० ). ०भीत वि. युद्धाला भिणारा ; रणभीरु . [ सं . ] ०भूमी स्त्री. युद्धस्थळ ; युद्धाची जागा ; रणांगण . [ सं . ] ०भेरी स्त्री. रणबहिरी ( - स्त्री . ) पहा . सोनजी भापकर मानाजी पायघुडे रणांत राहिल्या रणभेरी । - ऐपो १३५ . [ सं . ] ०मंडल ळ - न . एक प्रकारचा व्यूह ; योद्ध्यांची वर्तुळाकार उभारणी . रणभूमी ; रणमैदान ; रणांगण . रणमंडळीं रघुवीर । ऐका कैसा शोभला । ०मोहरी मोहरें - स्त्रीन . रणवाद्य . राऐ गिडगिडिआं रणमोहरी । - शिशु ५२६ . ०यज्ञ पु. युद्धरुपी यज्ञ - होम . गाठी आराधाया रणयज्ञें करुनि सिद्ध कटकांतें । - मोभीष्म ५ . १ . ०यूप पु. दोन्ही सैन्याच्या मधोमध खुणेकरितां उभारलेला खांब ; रणस्तंभ . [ सं . ] ०रंग पु. लढाईची हातघाई ; घनचक्कर ; युद्धाचें भीषण स्वरुप ; युद्धाचा भयंकर देखावा ; युद्धाच्या वेळची गडबड , गोंधळ . ०रंगधीर वि. रणामध्यें धीट ; वीर ; रणवीर ; युद्धांत पराक्रम करणारा . ०वट पु. रणांगणातील स्थान . कीं हा ( मुकुट ) माथां असतां रणवट । न भंगे तुझा । - कथा २ . ४ . १२८ . ०वाद्य न. लढाईंतील वाद्य , शंख , दुंदुभि इ० [ सं . ] ०विंदान न. युध्दकौशल्य . गदें घातली आपुली आण । रणविंदान पाहे माझें । - एरुस्व १० . ३८ . ०शिंग न. रणाच्या वेळीं योध्यांना बोलावण्यासाठीं , उत्साह येण्यासाठीं वाजवितात तें शिंग . [ सं . रणशृंग ] ०शूर पु. घोड्याच्या शुभलक्षणापैकीं गणलेला , मानिलेला एक गुण . - वि . युध्दांत धीट , पराक्रमी , माघार न घेणारा ; वीर . [ सं . ] ०शौंड वि. युध्दकलानिपुण ; विक्रमशाली . [ सं . ] ०संकुल न. हातघाईची लढाई . [ सं . ] ०सज्जा स्त्री. युध्दकाळचा पोषाख ; समरशोभा . [ सं . ] ०सांडी स्त्री. पराभव . होईल आतां रणसांडी । - उषा १७४३ . ०सौरा वि. रणशूर . आनंदे नाचत रणसौरे । - निगा ६१ . ०स्तंभ पु. रणयूप पहा . स्मारकासाठीं उभारलेला खांब ; स्मृतिस्तंभ . [ सं . ] ०हलकी गी - स्त्री . एक प्रकारचें रणवाद्य . ०क्षेत्र रणांगण - न . रणभूमि . [ सं . ] रणालगी - स्त्री . ( बे ) टिमकी . [ रण + हलगी ] रणोत्साह - पु . युध्दाची आवड ; गोडी .
|