मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


पर्वतांमाजी कनकमेरू । तडागांमाझी श्रीरसागरू ।
महाराष्ट्रासी काव्यगुरु । हा गौरव इये ग्रंथीं ॥
व्यासवचन इक्षुदंडु । गाळूनि सुरस सारांश गोडु ।
देशभाषा वळिले लाडू । नाबदेचे आवडी ॥
ते जैं सुज्ञीं न सेवणें । तैं आग्रहावांचूनि काय म्हणणें ? ।
कळंकरेखेस्तव चांदणें । काय चकोरीं वाळिजे ? ॥
व्यासग्रंथगिरीचें सोने । संस्कृत खोटिये गाळूनि मनें ।
देशभाषा घडिलें लेणें । साहित्यरत्नीं सुजडित ॥
तें लेववितां कर्णभूषण । कां हो परते करावे कान ? ।
श्रोते हो तुम्ही विचक्षण । निर्मत्सर विचारा ॥
तो झडपतां सत्वरगती । प्राणदीपक पंचज्योति ।
मालवूनि पडेल क्षिती । गात्रपात्र पालथें ॥
ईश्वर निष्ठुर कीं कृपाळू । काय करील केव्हां काळू ।
याचा निश्चय विवेककुशळू । करूं नेणे सर्वथा ॥
न कळे विष्णुमायेचा महिमा । जे विचार हिरोनि पाडी भ्रमा ।
म्हणोनि नळा आणि रामा । अपाय घडले जाणतां ॥
पुन्यमार्गीं खेळतां निखिल । दु:खें प्राप्त होती प्रबल ।
पाप करितां क्षेमकुशल । दिसे ये काळीं वाटतें ॥
पाप करितां पाविजे दु:ख । सुकृतें भोगिजे अक्षयी सुख ।
ऐसें बोलती मन्वादिक । वेदवाक्य प्रमाण ॥
न कळे पापपुण्याचें रूप । पापी पुन: पुन; करी पाप ।
पाप करितांही अमूप । पुण्यफळें भोगिती ॥
अधर्मेंचि धर्म एकातें । विहित तें अविहित सर्वातें ।
दिसे सर्वत्र बहुतांतें । समाधानसारिखें ॥
यालागीं कांहीं नेणवे मनें । ईश्वराचें ईश्वर जाणें ।
ऐशा वेदवाक्यप्रमाणें । पुरुष जाणते वर्तती ॥
विचारें पाहतां न मिळे साक्षी । म्हणोनि मिळिजे प्रारब्धपक्षीं ।
जैसा समुद्रीं भ्रमोनि पक्षी । नौकास्तंभीं आरुढे ॥
विवेकबुद्धीनें जितुकें टळे । तितुकें टाळिजे विविकुशलें ।
यालागीं माझीं हीं प्रांजळें । वचनें हृदयीं धरावीं ॥
पुढें वोढवूनि प्रारब्धा । जो टाकी प्रयत्न धंदा ।
तो पुरुष बुद्धिमंदा - । माजी गणिती जाणते ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP