मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


सुवर्णाचें पत्राक्षर कमलपत्राक्ष उकली ।
प्रभा काश्मीराची द्युति हिमकराची प्रगटली ॥
उडंगें आकाशीं रजनि अवकाशीं उगवती ।
तशा बिंद रेखावलि घन सुरेखा मिरवती ॥१॥

अनंता श्रीकृष्णा नमन तव साष्टांग चरणा ।
अनंत ब्रम्हांडोदरपति परित्राणकरणा ॥
मुकुंदा र्मदारा यदुपति उदारा गुणनिधी ।
करी व्दोनारायण भजन गंगाधर विधी ॥२॥

घनश्यामा रामा भुजगपति पर्यंकशयना ।
यजी पद्मा वक्षावरि तवपदें पद्मनयना ॥
पुन: प्रेमा नामामृत इश विषस्ताप नुरवी ।
रसीक व्यासर्षी सहजचि वदे वर्धन कवी ॥३॥

तुझ्या सौंदर्याचा त्रिभुवनिं ठसा एक न दिसे ।
पदप्राप्तीसाठीं सुरवर महेंद्रादिक पिसे ॥
त्रितापध्वंसेति श्रवण करितां कीर्तिगरिमा ।
कळेना वेदांता स्तुतचरणराजीवमहिमा ॥४॥

मुकुंदा ! जो रूप द्रविण कुळ विद्या वय धरी ।
नरांमध्यें पंचानन न वरि या कोण नवरी ? ॥
न पावेति व्रीदावति कुलवती उत्कट तपें ।
वराका मी तेथें तुज वरिन कैसेनी पडपें ? ॥५॥
मनोवाचाकाया हरि ! तुझिच जाया भरंवसा ।
तुझ्या अर्धांगातें वरिल दमघोषात्मज कसा ॥
मृगेंद्राच्या लाभें फळ कवळु गोमायु तरुणा ।
घडेना कल्पांतीं मुनिजनपरित्राणकरणा ॥६॥

दयाळा ! माझें त्वां भजनिं मनसर्वस्व हरिलें ।
निरातंका चैद्या गमन परवां लग्न धरिलें ॥
न येणें एकाकी प्रगट गुज कोणा न करणें ।
समारंभें यावें जंव न पडती सूर्यकिरणें ॥७॥

खटाटोपें याचें नृप मगध चैद्यादि मिळती ।
प्रतापें जिंकावे रसनवकुळींचे क्षितिपती ॥
उद्यां लग्नाआधीं मथुनि रणसिंधू बळनिधी ।
बळात्कारें पाणिग्रहण करणें राक्षसविधी ॥८॥

समाधानें पाणिग्रहण न घडे कौंडिणपुरीं ।
किजे लग्न द्वारावतिस विधिनें मंगळतुरीं ॥
न मानी आशंका मज म्हणसि अंत:चरपुरें ।
बलात्कारें नेतां खवळतिल बंधू उपवरें ॥९॥

पित्यानें गोपाळा वचन शिशुपाळा न दिधलें ।
न चाले ताताचें करि निजसुताचें म्हणितलें ।
परश्वींचे लग्नीं स्वभु सुहृद संलग्न विवसीं ।
उद्यां येईं नेईं तुज वरिन येईन सरसी ॥१०॥

कृपापारावारा ! कुकुरपरिवारा सजुनियां ।
त्वरें पावें चिंतामणि ! भुवनचिंता त्यजुनियां ॥
महालक्ष्मीनाथा ! करिं मज अनाथावरि दया ।
नुपेक्षीं दातारा ! चुकविं दुरिताराति विषया ॥११॥

रमाकांता ! झाली लिखित लिहितां तांतडि मला ।
नसे शाई दौती प्रचुर मज संदेह गमला ॥
कळावें ना कोण्हा हितगुज विचारूनि वहिलें ।
कनिष्टेने नेत्रांजनघनरसें पत्र लिहिलें ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP