वनं तु सात्त्विको वासो ग्रामो राजस उच्यते ।
तामसं द्यूतसदनं मन्निकेतं तु निर्गुणम् ॥२५॥
पवित्र आणि तीर्थभूत । विजन वन एकान्त ।
ऐशिये वस्तीं सुखावे चित्त । ते वास निश्चित सात्विक ॥३४॥
वस्ती व्यवहारीं व्यापारीं । कां सदा सन्मानें राजद्वारीं ।
विवाहमंडपामाझारीं । ज्यासी प्रीति भारी वस्तीसी ॥३५॥
ज्यासी आवडे धनसंपदा । निकटवासें वसती प्रमदा ।
जो नगरीं ग्रामीं वसे सदा । हे वस्ती संपदा राजस ॥३६॥
जेथ सन्मान वांछी चित्त । सदा क्षोभे विषयासक्त ।
ऐसऐसी वस्ती जेथ । ते जाण निश्चित राजस ॥३७॥
जेथ साधुनिंदा जोडे । जेथ गुणदोषीं दृष्टि वाढे ।
ऐशिया ठायीं वस्ती आवडे । तें तामसाचें गाढें निवासस्थान ॥३८॥
जेथ कलहाचें कारण । जेथ अविवेकी होय मन ।
वेश्या द्यूत मद्यसदन । हें निवासस्थान तामस ॥३९॥
देवालयीं घवघविती । देखोनि माझी निजमूर्ती ।
साचार सुखावे चित्तवृत्ती । ते निर्गुण वस्ती उद्धवा ॥३४०॥
अभेदभक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें निजघर ।
तेथ सुखत्वें ज्याची वृत्ति स्थिर । ते वस्ती साचार निर्गुण ॥४१॥
विषयातीत निजस्थिती। सुखें सुखरुप राहे वृत्ती ।
ते निर्गुणाची निजवस्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४३॥
सांडूनि आकाराचें ज्ञान । निराकारीं सुखसंपन्न ।
वृत्ति स्थिरावे परिपूर्ण। ते वस्ती निर्गुण जनीं विजनीं ॥४४॥
त्रिगुणसंगें त्रिविध कर्ता । निर्गुणलक्षणीं लक्षिजे चौथा ।
चतुर्विध कर्त्यांची व्यवस्था । ऐक आतां सांगेन ॥४५॥;