एकनाथी भागवत - श्लोक २ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


शमो दमस्तितिक्षेक्षा तपः सत्यं दया स्मृतिः ।

तुष्टिस्त्यागोऽस्पृहा श्रद्धा र्‍हीर्दयादिः स्वनिर्वृतिः ॥२॥

आपुली जे चित्तवृत्ती । सांडूनि बाह्यस्फूर्ती ।

अखंड राखणें आत्मस्थिती । शम निश्चितीं त्या नांव ॥५३॥

बाह्य इंद्रियांची चरफड । शमेंसीं करावा गलजोड ।

निग्रहणें विषयचाड । दमाचें कोड या नांव ॥५४॥

जेणें हरिखें साहणें सुख । त्याचि वृत्तीं साहणें दुःख ।

तितिक्षा या नांव देख । शुद्धसत्त्वात्मक उद्धवा ॥५५॥

मी कोण कैंचा किमात्मक । निष्कर्म कीं कर्मबद्धक ।

करणें निजात्मविवेक । ईक्षापरिपाक या नांव ॥५६॥

जागृतिस्वप्नसुषुप्तीआंत । भगवत्प्राप्तीलागीं चित्त ।

झुरणीमाजीं पडे नित्य । तप निश्चित या नांव ॥५७॥

आवडीं जेवीं नेघवे विख । तेवी प्राणांतें न बोले लटिक ।

साचचि बोलणें निष्टंक । हें सत्य देख सात्विका ॥५८॥

भूतांवरी कठिणपण । जो स्वप्नीं न देखे आपण ।

भूतदया ते संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥५९॥

माझा मुख्य निजस्वार्थ कोण । मी काय करितों कर्माचरण ।

ऐसें जें पूर्वानुस्मरण । स्मृति जाण या नांव ॥६०॥

न करितां अतिआटाटी । यथालाभें सुखी पोटीं ।

या नांव गा निजसंतुष्टी । जाण जगजेठी उद्धवा ॥६१॥

जे मिळाले जीविकाभाग । त्यांतही सत्पात्रीं दानयोग ।

विषयममता सांडणें सांग । त्या नांव त्याग उद्धवा ॥६२॥

अर्थस्वार्थीं इच्छा चढे । अर्थ जोडतां अधिक वाढे ।

ते इच्छा सांडणें निजनिवाडें । निस्पृहता घडे ते ठायीं ॥६३॥

जेथ निस्पृहता समूळ सांग । त्याचि नांव दृढ वैराग्य ।

हें परमार्थाचें निजभाग्य । येणें श्रीरंग सांपडे ॥६४॥

जो गुरुवाक्यविश्वासी । सबाह्य विकला सर्वस्वेंसीं ।

तोचि भावार्थ द्विजदेवांसी । श्रद्धा त्यापाशीं समूळ नांदे ॥६५॥

नरदेहीं लाभे परब्रह्म । तदर्थ न करुनि सत्कर्म ।

विषयार्थ करी धर्माधर्म । ते लज्जा परम अतिनिंद्य ॥६६॥

जेणें दुःखी होईजे आपणें । तें पुढिलासी नाहीं करणें ।

दुःख नेदूनि सुख देणें । हे दया म्यां श्रीकृष्णें वंदिजे ॥६७॥

पुढिलासी नेदूनि दुःख । स्वयें भूतमात्रीं देणें सुख ।

हेचि दया पारमार्थिक । दुसरेनि देख यालागीं सांगे ॥६८॥

खातां नाबदेपुढें पेंड जैसी । तैसें गौण देखोनि विषयांसी ।

जो विनटला ब्रह्मसुखासी । स्वनिवृत्ति त्यासी बोलिजे ॥६९॥

रंक बैसल्या पालखीसी । उपेक्षी पूर्वील सुडक्यासी ।

तेवीं उपेक्षूनि विषयांसी । जो ब्रह्मसुखासी पकडला ॥७०॥

कणाची वाढी भुसापाशीं । कण निडारे भुसेंसीं ।

तो कण यावया हातासी । सांडिती भुसासी पाखडूनी ॥७१॥

तेवीं ब्रह्मसुखाचिये पाडें । नरदेहाचा पांगडा पडे ।

तें ब्रह्मसुख जैं हाता चढे । तैं देहींचें नावडे विषयभूस ॥७२॥

तेवीं सांडूनि विषयप्रीती । ज्यासी ब्रह्मसुखीं सुखप्राप्ती ।

याचि नांव स्वनिवृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥;

या पंधरा लक्षणांची स्थिती । वर्ते तो शुद्ध सत्वमूर्ती ।

शोधितसत्वाची सत्ववृत्ती । ’आदि’ शब्दें श्रीपती सांगत ॥७४॥

सर्व भूतीं अकृत्रिमता । देखे भगवद्भावें तत्त्वतां ।

या नांव शोधितसत्त्वता । गुणावस्थाछेदक ॥७५॥

ऐशियापरी सत्वगुण । सात्विकापासीं वर्ते पूर्ण ।

आतां रजाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥७६॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP