एकनाथी भागवत - श्लोक ४ था

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याञ्चा दम्भः क्लमः कलिः ।

शोकमोहौ विषादार्ती निद्राशाभीरनुद्यमः ॥४॥

क्रोध कामाची पूर्वावस्था । लोभ म्हणिजे अतिकृपणता ।

अनृत म्हणिजे असत्यता । हिंसा ते तत्त्वतां परपीडा ॥९२॥

याञ्चा म्हणिजे लोलंगता । दंभ म्हणिजे अतिमान्यता ।

क्लमनामें अतिआयासता । व्यर्थ कलहता कलि जाण ॥९३॥

शोक म्हणिजे हाहाकारु । मोह म्हणिजे भ्रमाचा पूरु ।

विषाद म्हणिजे दुःखसंचारु । अभ्यंतरु जेणें पोळे ॥९४॥

आर्ति म्हणिजे अतिसंताप । निंदा म्हणिजे असदारोप ।

आशा म्हणिजे अतिलोलुप्य । महाभयकंप भीशब्दीं ॥९५॥

ऐक निद्रेचें निजवर्म । जें आळसाचें निजधाम ।

जाडयता सोलींव परम । ते निद्रा निःसीम तामसी ॥९६॥

सांडूनियां सर्व कर्म । स्तब्धता राहे परम ।

या नांव अनुद्यम । सुखावलें तम ते ठायीं वसे ॥९७॥

या तमोगुणाच्या सोळा कळा । ज्याचे अंगीं बाणती सकळा ।

तो तमोरात्रींची चंद्रकळा । अविवेक आंधळा तामसू ॥९८॥

सत्वरजतमोगुण । यांचे ओळखीलागीं जाण ।

केलें भिन्नभिन्न निरुपण । अतां मिश्रलक्षण तें ऐक ॥९९॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP