एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


धम चार्थे च कामे च यदाऽसौ परिनिष्ठितः ।
गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारतिधनावहः ॥७॥

पुरुषाच्या ठायीं क्रियाकर्म । क्षणें स्वधर्म क्षणें काम ।

क्षणें वाढवी अर्थोद्यम । हा संक्रम त्रिगुणांचा ॥३८॥

गुणसंक्रमण करी काय । त्रिगुणीं धर्म त्रिविध होय ।

कामही त्रिविध होऊनि ठाय । अर्थस्वार्थनिर्वाह त्रिगुणात्मक ॥३९॥

येथ कर्मासी दोष नाहीं । दोष कर्त्याचे बुद्धीच्या ठायीं ।

तो जे कल्पना करील कांहीं । तें फळ पाहीं स्वयें भोगी ॥१४०॥

सोनें वंद्य सोनेपणें । त्याचें स्वयें घडविल्या सुणें ।

वंद्य तेंचि निंद्य करणें । तेवीं स्वकर्म दूषणें गुणबुद्धी ॥४१॥

भूमि सहजें शुद्ध आहे । जें पेरिजे तें पीक होये ।

तेवीं स्वकर्म शुद्ध स्वयें । फलभोगू लाहे गुणवृत्ती ॥४२॥

वाचा सहज सरळ गोमटी । रामनामें जोडे ब्रह्मपुष्टी ।

वृथा जाय करितां चावटी । भोगी निंदेपाठीं महापाप ॥४३॥

तेवीं स्वधर्म श्रद्धायुक्त । पुरुषास करी विरक्त ।

तेथ त्रिगुणांचा सन्निपात । श्रद्धा छळित तें ऐक ॥४४॥

स्वधर्मकर्मी श्रद्धा जोडे । क्षणैकें लागे विरक्तीकडे ।

क्षणें भोगफळाशा वाढे । क्षणैक पडे ममतासंधीं ॥४५॥

तैशी्च कामाचीही रती । क्षणैक निष्कामीं अतिप्रीती ।

क्षणें स्त्रीभोगआसक्ती । क्षणें कामरती परद्वारीं ॥४६॥

याचिपरी धनाची जोडी । क्षणैक द्रव्याशा सोडी ।

क्षणैक अर्थाची अतिगोडी । क्षणैक आसुडी परद्रव्य ॥४७॥

त्रिविध धर्म त्रिविध कर्म। त्रिविध रुपें धनागम ।

या गुणवृत्तीस्तव स्वधर्म । सांडूनि अकर्म करी प्राणी ॥४८॥

एवं धर्मअर्थकामांआंत । गुणसन्निपात अनंत ।

फोडूनि सांगतां येथ । वाढेल ग्रंथ अनिवार ॥४९॥

यालागीं गुणसन्निपात । सांगीतला संकलित ।

तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत संक्षेपें ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP