यथा मनोरथधियो विषयानुभवो मृषा ।
स्वप्नदृष्टाश्च दाशार्ह तथा संसार आत्मनः ॥५४॥
आत्मा निजमुक्त अविकारी । तो संकल्पें कीजे विकारी ।
असंसारी परी संसारी । मनोविकारीं मानिजे ॥२२॥
ऐसें दुजयावीण कांहीं । कथा वार्ता सांगतां नाहीं ।
एक श्रोता दुसरा वक्त पाहीं । यालागीं येही उपाये ॥२३॥
जेवीं एकटा क्रमेना पंथ । मी राजा करी मनोरथ ।
परचक्र कल्पूनि तेथ । होय उद्यत युद्धासी ॥२४॥
तो युद्धआवेश कडकडाट । तेणें सत्राणें उडे उद्भट ।
अडखळूनि आदळे पोट । म्हणे मी घायवट पडिलों कीं ॥२५॥
मिथ्या भ्रमें पडला भुली । चालतां चालतां मृगजळीं ।
उतरावया पैलतीरीं । बुडी वहिली देतसे ॥२६॥
गंधर्वनगरीं प्रचंड । माडया सोपे उदंड ।
क्षणामाजीं विरस चंड । वितंड करी निर्वाळा ॥२७॥
तेवीं संसार हा काल्पनिक । तेथील सुख आणि दुःख ।
मिथ्या केवळ मायिक । जाण निष्टंक निजभक्तां ॥२८॥
दाशार्हवंशीं जन्मलासी । तूं उत्तम दशा पावलासी ।
यालागीं म्हणे हृषीकेशी । उद्धवासी दाशार्ह ॥२९॥
जेवीं का स्वप्नभोग जाण । स्वप्नीं सत्य मानी आपण ।
तेवीं संसार हा दीर्घ स्वप्न । मायिक जाण मिथ्यात्वें ॥६३०॥
जागा झालिया स्वप्न वृथा । निरहंकारीं संसार मिथ्या ।
हे ब्रह्मज्ञानाची मुख्य कथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥३१॥
संसार तो कल्पनामात्र । आत्मा निर्विकार चिन्मात्र ।
जेवीं मृगजळ भरी भास्कर । तेवीं संसार करी आत्मा ॥३२॥
उद्धवा तूं म्हणशी आतां । ऐकतां तुझे मुखींची कथा ।
संसार मिथ्या तत्त्वतां । तरी साधनावस्था कां सोसावी ॥३३॥
जेवीं वंध्यापुत्राचें लग्न । करावया कोणी न करी यत्न ।
कां मृगजळीं बांधोनि धरण । पाट जाण कोणी काढीना ॥३४॥
तेवीं मिथ्या संसारबंधन । तेथ श्रवण मनन चिंतन ।
विवेक वैराग्य ज्ञान ध्यान । वृथा कां जन सोशिती ॥३५॥
उद्धवा बागुलाचें भय खोटें । परी बाळकासी सत्य वाटे ।
तेवीं मिथ्या संसारकचाट । जीवीं प्रकटे बद्धता ॥३६॥
तेचि अर्थीचा दृष्टांत । स्वयें श्रीकृष्ण सांगत ।
मिथ्या सांसारिक येथ । भ्रमें बाधीत भ्रांतासी ॥३७॥