मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय बाविसावा|
श्लोक ४६ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


निषेकगर्भजन्मानि बाल्यकौ मारयौवनम्‌ ।

वयोमध्यं जरा मृत्युरित्यवस्थास्तनोर्नव ॥४६॥

देहींच्या अवस्था त्या नव । ऐक तयांचाही स्वभाव ।

भिन्नविभागवैभव । यथागौरव सांगेन ॥११॥

पितृदेहीं पावोनि शुक्रत्व । तेथूनि जननीजठर प्राप्त ।

त्या नांव निषेक बोलिजेत । देहींची हे येथ प्रथमावस्था ॥१२॥

जननीजठरीं रुधिरयुक्त । मुसावोनि खोटी होत ।

क्षणक्षणां वृद्धि प्राप्त । गर्भ ते येथ दुजी अवस्था ॥१३॥

प्रसूतिवाताच्या आघातीं । उदराबाहेर उत्पत्ती ।

त्या नांव जन्म बोलती । जाण निश्चितीं तिजी अवस्था ॥१४॥

अतिशयें आवडे स्तनपान । मुख्यत्वें माताचि प्राधान्य ।

रुदनाचें बळ संपूर्ण । ते चौथी जाण बाल्यावस्था ॥१५॥

मळमूत्रीं लोळे अज्ञान । गूढेंद्रिय विवेकशून्य ।

गोड गोजिरें कलभाषण । पंचहायन बाल्यावस्था ॥१६॥

इंद्रियीं चेतना वाढत । परी पोटीं नाहीं विषयस्वार्थ ।

खेळावरी आसक्त चित्त । ते पांचवी येथ कुमारावस्था ॥१७॥

याउपरी तरुणपण । इंद्रियसामर्थ्य संपूर्ण ।

मी शहाणा मी सज्ञान । देहीं देहाभिमान मुसमुशी ॥१८॥

तेथ स्त्रीकाम आवडे चित्तीं । धनकामाची अतिप्रीती ।

देहगेहांची आसक्ती । नामरुपांची ख्याती लौकिकीं मिरवी ॥१९॥

श्रीमदें गर्वितमानस । स्त्रीपुत्रांचा अतिउल्हास ।

तृष्णा दुर्धर अतिसोस । कामक्रोधांचा बहुवस वळसा भोंवे ॥५२०॥

न साहे नोकिलेपण । ’तूं’ म्हणतां टाकी प्राण ।

ते सहावी अवस्था जाण । तरुणपण अनर्थ ॥२१॥

पंधरापासोनि पंचवीस । पूर्ण तरुणपणाचा पैस ।

तेथ नानाविकारी मानस । नांदवी सावकाश देहाभिमान ॥२२॥

चाळिसांपासोनि साठीवरी । देहीं उत्तरवयसा पुरी ।

झुरडी पडों लागे शरीरीं । इंद्रियशक्ति करी प्राशन काळ ॥२३॥

क्षीणपणाचा सुमुहूर्त । काळ आरंभ करी जेथ ।

ते हे उत्तरावस्था येथ । जाण निश्चित सातवी ॥२४॥

तिची हातधरणी जरा । कांपवीतसे सुभटां नरां ।

भोग न साहे शरीरा । इंद्रियव्यापाराहारासी ॥२५॥

अस्तव्यस्त केला शरीरवेश । दांताळी पाडिली वोस ।

भेणें पालटे केश । धाकें सीस कांपत ॥२६॥

शरीर जरा करी क्षीण । तरी विषयावस्था अतिगहन ।

चिंता अनिवार दारुण । तृष्णा अपूर्ण सर्वदा ॥२७॥

तेज सांडूनि जाय नयना । टाळी पडोनि ठाती काना ।

मुखीं लागे चोरपान्हा । तरी देहाभिमाना वाढवी ॥२८॥

जरा पावलिया निजसंधी । अनिवार येती आधिव्याधी ।

महामोहें व्यापिजे बुद्धी । विवेक त्रिशुद्धीं बुडाला ॥२९॥

पायां पडे वेंगडी । आधार टेंकण लांकुडी ।

वाचा लफलफी जडत्वें गाढी । हाले होंटाची जोडी उंदिरप्राय ॥५३०॥

डोळां चिपडीं तोंड भरे । नाकींची लोळी वोठीं उतरे ।

मुखीचें लाळेचिया धारें । थिबबिबिजे उरें चिकटोनी ॥३१॥

चुंबन मागेना तोंडाप्रती । ती थुंका म्हणोनि दूर पळती ।

उसंत नाहीं खोकल्याहातीं । श्वास कास उठती अनिवार ॥३२॥

शरीरीं थरकंप उठी । तरी देहाभिमान दृढ पोटीं ।

अवघ्यांतें म्हणे धाकुटीं । सांगे जुनाट गोष्टी मोठमोठया ॥३३॥

अधोवाताचें वावधान । अनिवार सुटे जाण ।

जीवें जितां विटंबन । हे जरा जाण आठवी अवस्था ॥३४॥

जेवीं सुईमागें दोरा जाण । तेवीं जरेसवें असे मरण ।

जरा शरीर पाडी क्षीण । तंव वाजे निशाण मृत्यूचें ॥३५॥

देहींच्या तुटल्या नाडी । वाचा हों लागे बोबडी ।

तरी देहाची धरी गोडी । अधिक आवडी स्त्रीपुत्रांची ॥३६॥

मजमागें हें अनाथें । कोण सांभाळील यांतें ।

पोटासी धरोनि त्यांतें । रडे बहुतें आक्रोशें ॥३७॥

द्रव्यलोभ अतिकठिण । अंतीं न वेंची आपण ।

दूरी करुनि इतर जन । सांगे उणखूण ठेव्याची ॥३८॥

नवल वासनाविंदान । विसरोन देहाचें स्मरण ।

सर्वस्वें जे धरिजे आठवण । तेंचि आपण दृढ होय ॥३९॥

या देहाची निःशेष आठवण । ते नाठवणें सवेंचि जाण ।

चेतनासहित जाय प्राण । या नांव मरण देहाचें ॥५४०॥

एवं गर्भादि मरणांता । या देहींच्या नव अवस्था ।

येथ आत्म्याची अलिप्तता । स्वभावतां देहासी ॥४१॥

देहअवस्था विकारवंता । आत्मा अलिप्त अविकारता ।

म्हणसी देहविकारा जडता । यासी विकारता घडे केवीं ॥४२॥

सूर्य थापटूनि जन । कदा नुठवी आपण ।

तो प्रकाशतांचि जाण । सहजें जन चेवती ॥४३॥

त्या जनाची कर्मकर्तव्यता । सूर्याअंगीं न लगे सर्वथा ।

तेवीं प्रकाशोनि विकारता । अलिप्त तत्त्वतां निजात्मा ॥४४॥

झालिया सूर्यकिरण प्राप्त । जेवीं अग्नि स्त्रवे सूर्यकांत ।

तेणें याग कां दाघ होत । त्या कर्मातीत सूर्य जैसा ॥४५॥

तेवीं चित्प्रकाशें मन । शुभाशुभ कर्में करी जाण ।

त्या मनोविकारा चिद्भान । अलिप्त जाण निजात्मा ॥४६॥;

येथ मनःकृत विकार पूर्ण । मनःकृत कर्माकर्म जाण ।

मनःकृत जन्ममरण । स्वर्गनरकगमन मनःकृत ॥४७॥

मनःकृत लक्ष्यालक्ष्य । मनःकृत बंधमोक्ष ।

तेंचि निरुपण प्रत्यक्ष । श्रीकृष्ण अध्यक्ष सांगत ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP